![]() |
शुक्ल यजुर्वेद विनियोग - 'क्षत्रस्य योनि' या मंत्रभागानें दक्षिणोत्तर वेदीवर चौरंग स्थापन करावा व 'मा त्वा' या मंत्रभागानें त्या चौरंगावर कृष्णाजिन पसरावें. क्षत्रस्य योनिरसि क्षत्रस्य नाभिरसि । मा त्वा हिँसीन्मा मा हिँसीः ॥ १ ॥ अर्थ - हे चौरंगा, तूं क्षत्र जातीचें उत्पत्तिस्थान व बंधनस्थान आहेस. हे कृष्णाजिना, चौरंग तुझी हिंसा न करो व तूं माझी हिंसा करूं नकोस. ॥१॥ विनियोग - 'निषसाद' या मंत्रानें यजमानानें कृष्णाजिनावर बसावें. नंतर 'मृत्योः' या मंत्रभागानें सोन्याचें भूषण यजमानाच्या मस्तकावर स्थापन करावें. निषसाद धृतव्रतो वरुणः पस्त्यास्वा । साम्राज्याय सुक्रतुः । मृत्योः पाहि विद्योत्पाहि ॥ २ ॥ अर्थ - हा यज्ञकर्म करणारा, अनिष्टनिवारक व बुद्धिमान् असा यजमान स्वामित्वानें प्रजेमध्यें साम्राज्य भोगण्याकरितां बसला. हे सुवर्ण रुक्मा, मृत्यूपासून व विद्युत्पातापासून माझें रक्षण कर. ॥२॥ विनियोग - 'देवस्यत्वा' इत्यादि तीन मंत्रांनीं अध्वर्यूनें यजमानावर अभिषेक करावा. देवस्य त्वा सवितुः प्रसवेऽश्विनोर्बाहुभ्यां पूष्णो हस्ताभ्याम् । अश्विनोर्भैषज्येन तेजसे ब्रहवर्चसायाभि पिञ्चामि सरस्वत्यै भैषज्येन वीर्यायान्नाद्यायाभि षिञ्चामीन्द्रस्येन्द्रियेण बलाय श्रियै यशसेऽभि षिञ्चामि ॥ ३ ॥ अर्थ - प्रेरक अशा सवितृदेवाच्या प्रेरणेनें, अश्विनीकुमाराच्या बाहूंनीं व पूषाच्या हस्तांनीं हे यजमाना, अश्विनीकुमारांच्या वैद्य कर्माने ब्रह्मवर्चस तेजाकरितां मी तुजवर अभिषेक करितों व सरस्वतीच्या वैद्य कर्मानें, अन्नभक्षण सामर्थ्याकरितां मी तुजवर अभिषेक करितों आणि इंद्राच्या सामर्थ्यानें बलाकरितां, समृद्धीकरितां व कीर्तीकरितां मी तुझ्यावर अभिषेक करितों. ॥३॥ विनियोग - 'कोऽसि' हा मंत्रभाग म्हणून अध्वर्यूनें यजमानाला स्पर्श करावा. नंतर यजमानानें 'सुश्लोक' इत्यादि नांवाच्या पुरुषांना बोलवावें. कोऽसि कतमोऽसि कस्मै त्वा काय त्वा । सुश्लोक सुमङ्गल सत्यराजन् ॥ ४ ॥ अर्थ - हे यजमाना, तूं प्रजापति आहेस. तसेंच सर्व प्रजापतींत श्रेष्ठ आहेस. मीं कोणच्या प्रजापतिपदप्राप्तीकरितां व प्रजापतित्वाकरितां तुजवर अभिषेक केला. उत्तम कीर्ती ज्याची आहे अशा सुश्लोका तूं ये. चांगला ज्याचा उदय आहे अशा सुमंगला तूं ये आणि ज्याचा राजा अविनाशी आहे अशा सत्यराज संज्ञक पुरुषा तूं ये. ॥४॥ विनियोग - 'शिरो मे' इत्यादि पांच मंत्रांत सांगितलेल्या शरीरावयवांना यजमानानें स्पर्श करावा. शिरो मे श्रीर्यशो मुखं त्विषिः केशाश्च श्मश्रूणि । राजा मे प्राणोऽ अमृतँ सम्राट् चक्षुर्विराट् श्रोत्रम् ॥ ५ ॥ अर्थ - माझें मस्तक शोभारूपी, मुख यशोरूपी, केश व श्मश्रू दीप्तिरूपी, प्राणवायु अमृतरूपी, चक्षुरिंद्रिय सम्राट्स्वरूपी आणि श्रोतेंद्रिय नाना तर्हेनें शोभणारें विराट्रूपी असो. ॥५॥ विनियोग - जिह्वा मे भद्रं वाङ् महो मनो मन्युः स्वराड् भामः । मोदाः प्रमोदाऽ अङ्गुलीरङ्गानि मित्रं मे सहः ॥ ६ ॥ अर्थ - माझी जिव्हा कल्याणरूपी, वाणी पूज्यरूपी, मन क्रोधरूपी, क्रोध स्वयंशोभमानरूपी, अंगुली आनंदरूपी, अंगें प्रमोदरूपी व माझे मित्र रिपुनाशकस्वरूपी असोत. ॥६॥ विनियोग - बाहू मे बलमिन्द्रियँ हस्तौ मे कर्म वीर्यम् । आत्मा क्षत्रमुरो मम ॥ ७ ॥ अर्थ - माझे बाहु बलवान्, इंद्रिय आणि बल स्वकार्य समर्थ, हस्त स्वकर्मकुशल आणि माझें अंतःकरण व हृदय नाशापासून निवारण करणारें असें असो. ॥७॥ विनियोग - पृष्ठिर्मे राष्ट्रमुदरमँसौ ग्रीवाश्च श्रोणी । ऊरूऽ अरत्नी जानुनी विशो मेऽङ्गानि सर्वतः ॥ ८ ॥ अर्थ - माझा पृष्ठभाग देशासारखा सर्वाधार, उदर, खांदे, कंठ, कंबर, जंघा, मांडया, हात, गुडघे इत्यादि सर्व माझी अंगें प्रजेप्रमाणें पोषण करण्यास योग्य असोत. ॥८॥ विनियोग - नाभिर्मे चित्तं विज्ञानं पायुर्मेऽपचितिर्भसत् । आनन्दनन्दावाण्डौ मे भगः सौभाग्यं पसः । जङ्घाभ्यां पद्भ्यां धर्मोऽस्मि विशि राजा प्रतिष्ठितः ॥ ९ ॥ अर्थ - माझी नाभी ज्ञानरूपी, गुदेंद्रिय विज्ञानरूपी, स्त्रीजननेंद्रिय प्रजारूपी असो. (स्त्रीजननेंद्रिय यजमान पत्नीसंबंधीं समजावयाचें.) माझीं वृषणेंद्रियें संभोगसुखानें आनंदित होणारीं असोत; लिंग ऐश्वर्ययुक्त व संपत्तियुक्त असो, मांडया व पायांच्या योगानें मी धर्मरूपी असो, धर्मरूपामुळें राजा प्रजेच्या ठायीं उत्तम रीतीनें प्रतिष्ठित होतो. (जो धर्मप्रतिष्ठित असतो तोच राजा होतो.) ॥९॥ विनियोग - 'प्रति क्षत्रे' हा मंत्र म्हणून यजमानानें चौरंगावरून कृष्णाजिनावर उतरावें. प्रति क्षत्रे प्रति तिष्टामि राष्ट्रे प्रत्यश्वेषु प्रति तिष्ठामि गोषु । प्रत्यङ्गेषु प्रति तिष्ठाम्यात्मन् प्रति प्राणेषु प्रति तिष्ठामि पुष्टे प्रति द्यावापृथिव्योः प्रति तिष्टामि यज्ञे ॥ १० ॥ अर्थ - क्षत्रिय व राष्ट्र माझे स्वाधीन होवो. मला गाई व घोडे मिळोत. मी सर्व शरीरानीं निरोगी व निश्चिंत असावें, तसेंच धनसमृद्ध असावें. पृथ्वी व स्वर्ग उभयलोकीं मला कीर्ति मिळावी व मीं यज्ञ करावें. ॥१०॥ विनियोग - 'त्रयो देवाः' इत्यादि दोन मंत्रांनीं वसापात्राचा होम करावा. त्रया देवाऽ एकादश त्रयस्रिँशा सुराधसः । बृहस्पतिपुरोहिता देवस्य सवितुः सवे । देवा देवैरवन्तु मा ॥ ११ ॥ अर्थ - तिप्पट केलेलें अकरा म्हणजे तेहतीस संख्याक उत्तम द्रव्यवान् देव पुढें सांगितलेल्या देवांसह आमचें संरक्षण करोत. त्यांचा पुरोहित बृहस्पति आहे. ते सवितृ देवाच्या आज्ञेंत वागतात व ते प्रकाशमान आहेत. ॥११॥ विनियोग - प्रथमा द्वितीयैर्द्वितीयास्तृतीयैस्तृतीयाः सत्येन सत्यं यज्ञेन यज्ञो यजुर्भिर्यजूँषि । सामभिः सामान्यृग्भिर्ऋचः पुरोऽनुवाक्याभिः पुरोऽनुवाक्या याज्याभिर्याज्या वषट्कारैर्वषट्काराऽ आहुतिभिराहुतयो मे कामान्त्समर्धयन्तु भूः स्वाहा ॥ १२ ॥ अर्थ - प्रथम देव द्वितीय देवांसह, द्वितीय देव तृतीय देवांसह, तृतीय देव सत्यासह, सत्य यज्ञासह, यज्ञ यजुर्मंत्रांसह, यजुर्मंत्र साममंत्रासह, साममंत्र ऋग्मंत्रांसह, ऋग्मंत्र पुरोनुवाक्यांसह, पुरोनुवाक्या याज्यासह, याज्या वषट्कारांसह, वषट्कार आहुतींसह व आहुती पूर्व देवांनीं पालित होऊन माझ्या सर्व इच्छांना पूर्ण करोत, भूलोकाला हें हवि सुहुत असो. ॥१२॥ विनियोग - 'लोमानि प्रयतिः' या मंत्रानें यजमानानें ग्रह शेषाचे भक्षण करावें. लोमानि प्रयतिर्मम त्वङ् मऽ आनतिरागतिः । माँसं मऽ उपनतिर्वस्वस्थि मज्जा मऽ आनतिः ॥ १३ ॥ अर्थ - माझी लोमें (बारीक केश) प्रयत्नरूपी, माझी त्वचा सर्वभूत नमस्काररूपी, माझें मांस उपनती (ज्याकडे भूतें येतात) रूपी, माझें अस्थि घनरूपी, मज्जा आनती (जिकडे भूतें येतात) तद्रूपी आहे. ॥१३॥ विनियोग - यानंतर अवभृथ इष्टी करावी. 'यद्देवा' इत्यादि साडेचार मंत्रांनीं मासरकुंभ पाण्यामध्यें तरंगावयास लावावा. यद्देवा देवहेडनं देवासश्चकृमा वयम् । अग्निर्मा तस्मादेनसो विश्वान्मुञ्चत्वँहसः ॥ १४ ॥ अर्थ - हे प्रकाशमान देवांनो, आम्हीं देवांचा जो अपराध केला त्या पापांपासून अग्नि आम्हांला मुक्त करो, तसेंच तो सर्व विघ्नांपासून आम्हाला मुक्त करो. ॥१४॥ विनियोग - यदि दिवा यदि नक्तमेनाँसि चकृमा वयम् । वायुर्मा तस्मादेनसो विश्वान्मुञ्चत्वँहसः ॥ १५ ॥ अर्थ - दिवसा व रात्रींही जर आम्हीं पापें केलीं असतील; तर वायू त्या पापांपासून व सर्व विघ्नांपासून आम्हाला मुक्त करो. ॥१५॥ विनियोग - यदि जाग्रद्यदि स्वप्नऽ एनाँसि चकृमा वयम् । सूर्यो मा तस्मादेनसो विश्वान्मुञ्चत्वँहसः ॥ १६ ॥ अर्थ - जाग्रत् दशेंत अथवा स्वप्नावस्थेंत जर आम्हीं पापें केलीं असतील; तर सूर्य त्या पापांपासून व सर्व विघ्नांपासून आमचें रक्षण करो. ॥१६॥ विनियोग - यद् ग्रामे यदरण्ये यत्सभायां यदिन्द्रिये । यच्छूद्रे यदर्ये यदेनश्चकृमा वयं यदेकस्याधि धर्मणि तस्यावयजनमसि ॥ १७ ॥ अर्थ - गांवांत, रानांत व सभेंत जें आम्ही पाप केलें व परस्त्रीदर्शनादि जें इंद्रियजन्य पाप केलें, तसेंच शूद्रविषयक, वैश्यविषयक व देवविषयक जें पाप केलें आणि पत्नी व यजमान या दोघांपैकीं कोणाच्याहीं एकाच्या कर्मामध्यें जो धर्मलोप झाला त्या सर्वांचा हे कुंभा, तूं नाशक आहेस. ॥१७॥ विनियोग - 'यदापः' इत्यादि 'ओषधी रुतापः' इत्यादि मंत्रानें कुंभ जलांत बुडवावा व 'सुमित्रियानः' या मंत्रानें उत्तर दिशेकडे दोन पावलें जाऊन ज्या बाजूला शत्रु असेल त्या दिशेंत जलांजली टाकावा. यदापोऽ अघ्न्याऽ इति वरुणेति शपामहे ततो वरुण नो मुञ्च । अवभृथ निचुम्पुण निचेरुरसि निचुम्पुणः । अव देवैर्देवकृतमेनोऽयक्ष्यव मर्त्यैमर्त्यकृतं पुरुराव्णो देव रिषस्पाहि ॥ १८ ॥ अर्थ - हे वरुणा, अहिंस्य आहेत आणि आम्हीं तर हिंसा केली तेव्हां आम्ही प्रार्थना करितों कीं, आम्हांला या हिंसादोषापासून मुक्त कर. हे अवभृथ यज्ञा, जरी तूं नित्य गमनशील आहेस तथापि मंद गमन करणारा हो. कारण कीं, द्योतनात्मक अशा आमच्या इंद्रियांनीं हविःस्वामी देवांविषयीं जें पाप केलें व आमच्या ऋत्विजांनीं यज्ञ पाहण्याकरितां आलेल्या लोकांचा अपमान करून जें पाप संपादन केलें, तें मीं या जलांत नष्ट केलें आहे. हे अवभृथ यज्ञा, विरुद्ध फल देणार्या यज्ञापासून तूं आमचें रक्षण कर. ॥१८॥ विनियोग - समुद्रे ते हृदयमप्स्वन्तः सं त्वा विशन्त्वोषधीरुतापः । सुमित्रिया नऽ आपऽ ओषधयः सन्तु दुर्मित्रियास्तस्मै सन्तु योऽस्मान्द्वेष्टि यं च वयं द्विष्मः ॥ १९ ॥ अर्थ - जें तुझें हृदय समुद्रासारख्या पाण्यांत आहे तेथें तुला मीं पोहोचवितों. तेथें तुझ्याकडे ओषधी व जलें येवोत. जलें व ओषधी आमच्याशीं चांगली मैत्री करोत व जो आमचा द्वेष करतो व आम्ही ज्याचा द्वेष करतों त्याच्याशीं जलें व ओषधी शत्रुत्व करोत. ॥१९॥ विनियोग - 'द्रुपदादिव' या मंत्रानें यजमानानें व पत्नीनें आपलें वस्त्र पाण्यांत टाकावें. द्रुपदादिव मुमुचानः स्विन्नः स्नातो मलादिव । पूतं पवित्रेणेवाज्यमापः शुन्धन्तु मैनसः ॥ २० ॥ अर्थ - पादत्राण काढल्यावर पादत्राणाचे दोष ते घालणार्याला स्पर्श करीत नाहींत, घाम आल्यानंतर स्नान केलेल्या पुरुषाला घामाचे दोष लागत नाहींत. कामळ्यांतून गाळलेलें तूप शुद्ध होते; म्हणजे कीटादिकांनीं रहित होतें; त्याप्रमाणें जलांनीं मला पातकांपासून मुक्त करावें; म्हणजे शुद्ध करावें. ॥२०॥ विनियोग - 'उद्वयं' या मंत्रानें जलाच्या बाहेर पडावें. उद्वयं तमसस्परि स्वः पश्यन्तऽ उत्तरम् । देवं देवत्रा सूर्यमगन्म ज्योतिरुत्तमम् ॥ २१ ॥ अर्थ - आम्ही उत्कृष्ट अशा स्वर्गाकडे पाहणारे होत्साते तमो बहुल अशा या लोकांतून बाहेर पडलों आणि देवलोकांत सूर्याकडे पहात पहात आम्ही ब्रह्मलोकांत प्राप्त झालों. ॥२१॥ विनियोग - 'आपो अद्य' या मंत्रानें यजमानानें आहवनीय अग्नीचें उपस्थान करावें. अपोऽ अद्यान्वचारिषँ रसेन समसृक्ष्महि । पयस्वानग्नऽ आगमं तं मा सँ सृज वर्चसा प्रजया च धनेन च ॥ २२ ॥ अर्थ - हे अग्ने, जो मी अवभृथ कर्मानें जलाला प्राप्त झालों व जलानें संयुक्त झालों व उदकयुक्त होऊन बाहेर आलों त्या मला तूं ब्रह्मवर्चस तेज, पुत्रादिक प्रजा व सुवर्णादि द्रव्य यांनीं युक्त कर. ॥२२॥ विनियोग - 'एधोसि' या मंत्रभागानें समिधा घेऊन 'समिदसि' या मंत्रभागानें तिचा अग्नींत होम करावा व समाववर्ति या मंत्रभागानें आज्याचा होम करावा. एधोऽस्येधिषीमहि समिदसि तेजोऽसि तेजो मयि धेहि । समाववर्ति पृथिवी समुषाः समु सूर्यः । समु विश्वमिदं जगत् । वैश्वानरज्योतिर्भूयासं विभून्कामान्व्यश्नवै भूः स्वाहा ॥ २३ ॥ अर्थ - हे समिधे, तूं प्रदीप्त करणारी आहेस म्हणून आम्ही धनादिकांची वृद्धि मिळवूं. हे समिधे, तूं तेजोरूपी आहेस म्हणून मजमध्यें तेज स्थापन कर. पृथ्वी व दिवसही व सूर्य पुनः पुनः प्रदक्षिणा घालून नष्ट होतो व हें सर्व जग नष्ट होते; म्हणून मी परमात्म ब्रह्मःज्योतीरूपी होईन व महामनोरथांना प्राप्त होईन. सत्तास्वरूपी जें ब्रह्म त्याला हें हवि सुहुत असो. ॥२३॥ विनियोग - 'अभ्यादधामि' इत्यादि तीन ऋचांनीं यजमानानें तीन समिधांचा आहवयाग्नींत होम करावा. अभ्या दधामि समिधमग्ने व्रतपते त्वयि । व्रतं च श्रद्धां चोपैमीन्धे त्वा दीक्षितोऽ अहम् ॥ २४ ॥ अर्थ - हे कर्मपालक अग्ने, मी तुजमध्यें समिधेचा होम करितों. त्यायोगें दीक्षित झालेला असा मी कर्म व श्रद्धा यांप्रत प्राप्त होतो. मी तुला प्रदीप्त करतों. ॥२४॥ विनियोग - यत्र ब्रह्म च क्षत्रं च सम्यञ्चौ चरतः सह । तँल्लोकं पुण्यं प्रज्ञेषं यत्र देवा सहाग्निना ॥ २५ ॥ अर्थ - त्या पवित्र लोकाला मी समजून घ्यावें. ज्या लोकांत उत्तम गमन करणार्या ब्राह्मण व क्षत्रिय जाति एकत्र राहतात व त्या लोकांत देव अग्निबरोबर संचार करितात. ॥२५॥ विनियोग - यत्रेन्द्रश्च वायुश्च सम्यञ्चौ चरतः सह । तँल्लोकं पुण्यं प्रज्ञेषं यत्र सेदिर्न विद्यते ॥ २६ ॥ अर्थ - ज्या लोकांत उत्तम गमन करणारे इंद्र व वायूबरोबर गमन करतात व ज्यांत अन्न न मिळाल्याचें दुःख नाहीं; म्हणजे जेथें सर्वदा अन्न मिळतें त्या पवित्र लोकांला मी समजून घ्यावें. ॥२६॥ विनियोग - 'अ???शुना' ही ऋचा सुरा मिश्रीकरणांत विनियुक्त आहे. अँशुना ते अँशुः पृच्यतां परुषा परुः । गन्धस्ते सोममवतु मदाय रसोऽ अच्युतः ॥ २७ ॥ अर्थ - हे सुरे, तुझा अंशभाग सोमभागाशीं युक्त होवो व तुझे पर्व सोमपर्वाशीं युक्त होवोत. तुझा सुवास व अविनाशी रस मद उत्पन्न करण्याकरितां सोमाचें आलिंगन करो. म्हणजे सुरा व सोम यांचा योग होवो. ॥२७॥ विनियोग - 'सिञ्चन्ति' या मंत्राचा सुराग्रहणांत विनियोग आहे. सिञ्चति परि षिञ्चन्त्युत्सिञ्चन्ति पुनन्ति च । सुरायै बभ्र्वै मदे किन्त्वो वदति किन्त्वः ॥ २८ ॥ अर्थ - पिंगट वर्णाच्या ऋत्विज पात्रांमध्यें दूध वगैरे घालून जिला ओततात व गोपुच्छ केश वगैरेंनीं जिला पवित्र करतात; त्या सुरेनें उन्मत्त झालेला इंद्र दुसर्याला तूं कोण व कोणाचा असें तिरस्कारात्मक वाक्य बोलतो. ॥२८॥ विनियोग - 'धानावंत' हा मंत्र श्रवण कर्मांतील धानाहोमामध्यें विनियुक्त आहे. धानावन्तं करम्भिणमपूपवन्तमुक्थिनम् । इन्द्र प्रातर्जुषस्व नः ॥ २९ ॥ अर्थ - हे इंद्रा, आम्ही प्रातःकालीं उक्थस्तुतिपूर्वक दिलेल्या धाना, करंभ व अपूपांनीं युक्त असा जो पुरोडाश तो तूं ग्रहण कर. ॥२९॥ विनियोग - 'बृहदिंद्राय' या मंत्रानें ब्रह्मदेवानें बृहत्सामाचें गायन करावें. बृहदिन्द्राय गायत मरुतो वृत्रहन्तमम् । येन ज्योतिरजनयन्नृतावृधो देवं देवाय जागृवि ॥ ३० ॥ अर्थ - हे ऋत्विजांनो, तुम्ही इंद्राकरितां बृहत्सामाचें गायन करा. तें बृहत्साम अत्यंत पापनाशक आहे. यज्ञ वाढविणारे देव ज्या सामगायनानें इंद्राकरितां प्रकाशक व अविनाशी तेज उत्पन्न करिते झाले असें तें बृहत् तेज आहे. ॥३०॥ विनियोग - 'अध्वर्योः अद्रिभिः' या मंत्रानें ब्रह्म्यानें पयाचें अभिमंत्रण करावें. अध्वर्योऽ अद्रिभिः सुतँ सोमं पवित्रऽ आ नय । पुनाहीन्द्राय पातवे ॥ ३१ ॥ अर्थ - हे अध्वर्यो, तूं दगडांनीं कुटलेला सोम, कामळ्याच्या पवित्रावर इंद्राला पिण्याकरितां ओत व गाळ. ॥३१॥ विनियोग - 'यो भूतानां' या मंत्रानें अध्वर्यूनें त्रयस्त्रिंश संज्ञक वसाग्रहाचें ग्रहण करावें. यो भूतानामधिपतिर्यस्मिँल्लोकाऽ अधि श्रिताः । यऽ ईशे महतो महाँस्तेन गृह्णामि त्वामहं मयि गृह्णामि त्वामहम् ॥ ३२ ॥ अर्थ - हे ग्रहा (पात्रा), जो परमात्मा जरायुजादि चतुर्विध प्राण्यांचा अधिपति आहे व ज्यांवर भूरादि लोक राहतात व जो सर्वोत्कृष्ट असा महत्तत्वादिकांचा नियंता आहे त्या परमात्म्याच्या साह्यानें मी तुझें ग्रहण करतों व परमात्मस्वरूपी अशा मजविषयींही तुझें ग्रहण करितों. ॥३२॥ विनियोग - 'उपयाम' हा मंत्र पात्रस्थापनामध्यें विनियुक्त आहे. उपयामगृहीतोऽस्यश्विभ्यां त्वा सरस्वत्यै त्वेन्द्राय त्वा सुत्राम्णऽएष ते योनिरश्विभ्यां त्वा सरस्वत्यै त्वेन्द्राय त्वा सुत्राम्णे ॥ ३३ ॥ अर्थ - तूं उपयाम पात्रानें गृहीत आहेस. अश्विनीकुमारांकरितां, सरस्वतीकरितां, इंद्राकरितां व सुत्रास्याकरितां तुझें मीं ग्रहण केलें. हें तुझें स्थान आहे. त्यावर अश्विनीकुमारांकरितां, सरस्वतीकरितां व संरक्षक इंद्राकरितां तुझें स्थापन करितों. ॥३३॥ विनियोग - नंतर सर्व ऋत्विजांनीं पात्रांतील हविशेषाचें भक्षण करावें. प्राणपा मेऽ अपानपाश्चक्षुष्पाः श्रोत्रपाश्च मे । वाचो मे विश्वभेषजो मनसोऽसि विलायकः ॥ ३४ ॥ अर्थ - हे ग्रहा, तूं माझ्या प्राणाचें, अपानाचें, चक्षूंचें, श्रोत्राचें रक्षण करणारा आहेस व माझ्या वाणीला सर्व तर्हेनें जपादि द्वारां औषधरूपी बनविणारा आहेस व मनाला विषयापासून निवृत्त करून आत्म्यामध्यें विलीन करणारा आहेस. ॥३४॥ विनियोग - अश्विनकृतस्य ते सरस्वतिकृतस्येन्द्रेण सुत्राम्णा कृतस्य । उपहूतऽ उपहूतस्य भक्षयामि ॥ ३५ ॥ अर्थ - हे ग्रहा, ऋत्विजांनीं आज्ञा केल्यामुळें मी तुझें भक्षण करतों. तूं अश्विनीकुमार, सरस्वती व संरक्षक इंद्र यांनीं दृष्ट आणि ऋत्विजांकडून उपहूत असा आहेस. ॥३५॥ विनियोग - आध्वर्यव कांड संपले. आतां यापुढें सौत्रामणींतील हौत्र सांगतात. 'समिद्ध इंद्र' इत्यादि अकरा ऋचा ऐंद्र पशूच्या प्रयाज याज्या आहेत. समिद्धऽ इन्द्रऽ उपसामनीके पुरोरुचा पूर्वकृद्वावृधानः । त्रिभिर्देवैस्त्रिँशता वज्रबाहुर्जघान वृत्रं वि दुरो ववार ॥ ३६ ॥ अर्थ - इंद्रानें वृत्रासुराला मारलें व त्याच्या नगराचीं द्वारें मोकळीं केलीं. तो इंद्र प्रदीप्त झालेला, प्रातःकालीं पुढें पसरणार्या कांतीनें आदित्यस्वरूपानें पूर्व दिशेला उत्पन्न करणारा, तेहतीस देवांच्या योगानें वाढणारा व हातांत वज्र धारण करणारा असा आहे. ॥३६॥ विनियोग - नराशँसः प्रति शूरो मिमानस्तनूनपात्प्रति यज्ञस्य धाम । गोभिर्वपावान्मधुना समञ्जन्हिरण्यैश्चन्द्री यजति प्रचेताः ॥ ३७ ॥ अर्थ - प्रकृष्ट ज्ञानसंपन्न यजमान इंद्राचा रोज याग करितो तो इंद्र ऋत्विजांकडून स्तुती केला गेलेला, यज्ञस्थानें जाणणारा, शूर, प्रजापतीचा नातू, पशुसंबंधीं वपानीं युक्त, गोड अशा घृतानें हविर्द्रव्यें भक्षण करणारा, पश्ववदानरूपी सुवर्णानें सुवर्णयुक्त असा आहे. ॥३७॥ विनियोग - ईडितो देवैर्हरिवाँ २ऽ अभिष्टिराजुह्वानो हविषा शर्धमानः । पुरन्दरो गोत्रभिद्वज्रबाहुरा यातु यज्ञमुप नो जुषाणः ॥ ३८ ॥ अर्थ - देवांनीं पूजित, अश्वयुक्त, सर्वत्र ज्याचा याग होतो असा, ऋत्विजांनीं हविर्द्रव्याच्या निमित्तानें बोलावला जाणारा, अत्यंत बलवान्, शत्रुनगर फोडणारा, पर्वतांना विनाशक वज्र धारण करणारा, व आमच्या यज्ञाचें सेवन करणारा असा इंद्र येवो. ॥३८॥ विनियोग - जुषाणो बर्हिर्हरिवान्नऽ इन्द्रः प्राचिनँ सीदत्प्रदिशा पृथिव्याः । उरुप्रथाः प्रथमानँ स्योनमादित्यैरक्तं वसुभिः सजोषाः ॥ ३९ ॥ अर्थ - इंद्र आमच्या पूर्वदिशेकडील स्थानावर बसो. तो इंद्र अश्वयुक्त, देवयजन भूमि दाखविणारा, विस्तीर्ण कीर्तिमान्, संतुष्ट, विस्तीर्ण व सुखकारक आदित्य व वसु यांनीं घृतसिंचित अशा दर्भांचें सेवन करणारा असा आहे. ॥३९॥ विनियोग - इन्द्रं दुरः कवष्यो धावमाना वृषाणं यन्तु जनयः सुपत्नीः । द्वारो देवीरभितो वि श्रयन्ताँ सुवीरा वीरं प्रथमाना महोभिः ॥ ४० ॥ अर्थ - यज्ञगृहाचीं द्वारें शूर व इच्छापूर्ण करणार्या इंद्राप्रत प्राप्त होवोत. तीं द्वारें सच्छिद्र असल्यानें शब्द करणारीं व शीघ्र गमन करणारीं अशीं आहेत. ज्याप्रमाणें पतिव्रता यज्ञपत्न्या शीघ्र गमन करतात त्याप्रमाणें हीं द्वारें इंद्राप्रत जावोत व इंद्राकडे गेल्यावर उत्तम ऋत्विजांनीं युक्त व तेजांनीं विस्तृत होणारीं हीं प्रकाशक द्वारें सर्वत्र पसरोत म्हणजे इंद्राकरितां उघडीं होवोत. ॥४०॥ विनियोग - उषासानक्ता बृहती बृहन्तं पयस्वती सुदुधे शूरमिन्द्रम् । तन्तुं ततं पेशसा संवयन्ती देवानां देवं यजतः सुरुक्मे ॥ ४१ ॥ अर्थ - आदित्यप्रभा व रात्री या दोघी इंद्राशीं युक्त होतात. तो इंद्र मोठा पराक्रमी व सर्वदेवपूज्य आहे. आदित्यप्रभा आणि रात्री या मोठया, ज्यांत दंव पडतें अशा, उत्तम दोहन करणार्या व उत्तम कांतिमान् अशा आहेत. संग्रथनाविषयीं दृष्टांत - ज्याप्रमाणें विस्तीर्ण तंतु एखादा कारागीर पट निर्माण करण्याकरितां सूत्ररूपानें ग्रथित करितो त्याप्रमाणें आदित्यप्रभा व रात्री इंद्राला रूपानें संयुक्त करितात. ॥४१॥ विनियोग - दैव्या मिमाना मनुषः पुरुत्रा होताराविन्द्रं प्रथमा सुवाचा । मूर्धन्यज्ञस्य मधुना दधाना प्राचीनं ज्योतिर्हविषा वृधातः ॥ ४२ ॥ अर्थ - हा अग्नि व वायु हे दोघे देवांचे होते आहेत. ते पूर्वदिशेकडील आहवनीय अग्नीला मधुर हविर्द्रव्यानें वाढवितात. ते अग्निवायु पुष्कळ तर्हेनें यज्ञ निर्माण करणारे, मनुष्य होत्याच्या आरंभीं उत्पन्न झालेले, उत्तम वाणी बोलणारे व यज्ञाच्या मस्तकावर इंद्राचे स्थापन करणारे असे आहेत. ॥४२॥ विनियोग - तिस्रो देवीर्हविषा वर्धमानाऽ इन्द्रं जुषाणा जनयो न पत्नीः । अच्छिन्नं तन्तुं पयसा सरस्वतीडा देवी भारती विश्वतूर्तिः ॥ ४३ ॥ अर्थ - सरस्वती, ईडा व भारती या तीन देवी पयोरूपी हविर्द्रव्यानें यज्ञाला निर्विघ्न करोत. या पुष्टियुक्त आहेत व पतिव्रता स्त्रियांप्रमाणें इंद्राचें ??? करितात. त्या प्रकाशमान असून सर्वगामी आहेत. ॥४३॥ विनियोग - त्वष्टा दधच्छुष्ममिन्द्राय वृष्णेऽपाकोऽचिष्टुर्यशसे पूरूणि । वृषा यजन्वृषणं भूरिरेता मूर्धन्यज्ञस्य समनक्तु देवान् ॥ ४४ ॥ अर्थ - त्वष्टा, यज्ञाचें शिर जें आहवनीय अग्नि त्यावर देवांना जेऊं घालो. तो त्वष्टा, यशस्वी व वीर्यसिंचन करणार्या इंद्राला पुष्कळ बळ देणारा, ज्याहून दुसरा कोणी प्रशस्त नाहीं असा सर्वत्र गमन करणारा, इंद्राची पूजा करणारा व सर्वोत्पादक असा आहे. ॥४४॥ विनियोग - वनस्पतिरवसृष्टो न पाशैस्त्मन्या समञ्छमिता न देवः । इन्द्रस्य हव्यैर्जठरं पृणानः स्वदाति यज्ञं मधुना घृतेन ॥ ४५ ॥ अर्थ - वृक्षाचा बनविलेला प्रकाशक यूप, मधुर रस व घृत यज्ञाकडून भक्षण करवो. तो यूप पाशांनीं (रज्जूंनीं) आज्ञप्त केल्याप्रमाणें आपल्या शरीरांत पशूंना बांधतो. ज्याप्रमाणें शमिता (पशूहिंसक) दोर्यांनीं पशूंला आपल्या शरीराशीं बांधतो त्याप्रमाणें यूप पशूला बांधतो. तसेंच हा यूप हविर्द्रव्यांनीं इंद्राच्या उदराला पूर्ण करणारा आहे. ॥४५॥ विनियोग - स्तोकानामिन्दुं प्रति शूरऽ इन्द्रो वृषायमाणो वृषभस्तुराषाट् । घृतप्रुषा मनसा मोदमानाः स्वाहा देवाऽ अमृता मादयन्ताम् ॥ ४६ ॥ अर्थ - होम केले गेलेले देव वपासंबंधीं जे बिंदु तद्रूपी सोमाच्या उद्देशानें संतुष्ट होवोत व इंद्रही वरील सोमाच्या उद्देशानें संतुष्ट होवो. तो इंद्र, शूर, वृषभाप्रमाणें गर्जना करणारा, वीर्यसेचन करणारा व शत्रूंचा पराजय करणारा आहे. ते होम केलेले देव घृतबिंदुही प्राप्त झाला असतां अंतःकरणांत संतुष्ट होणारे व अविनाशी असे आहेत. ॥४६॥ विनियोग - यापुढें याज्या व अनुवाक् या आहेत. आ यात्विन्द्रोऽवसऽ उप नऽ इह स्तुतः सधमादस्तु शूरः । वावृधानस्तविषीर्यस्य पूर्वीर्द्यौर्न क्षत्रमभिभूति पुष्यात् ॥ ४७ ॥ अर्थ - इंद्र आमचें रक्षण करण्याकरितां आमच्याजवळ येवो व देवांसहवर्तमान भोजन करो. त्या शूर व वाढणार्या इंद्राची आम्ही स्वर्गाप्रमाणें वृत्रवधादि पराक्रमांची स्तुति करतो. तो इंद्र आमचें शत्रुनाशक तेज वाढवो. ॥४७॥ विनियोग - आ नऽ इन्द्रो दूरादा नऽ आसादभिष्टिकृदवसे यासदुग्रः । ओजिष्ठेभिर्नृपतिर्वज्रबाहुः सङ्गे समत्सु तुर्वणिः पृतन्यून् ॥ ४८ ॥ अर्थ - आमचें रक्षण करण्याकरितां इंद्र जवळच्या व दूरच्याही प्रदेशांतून येवो. तो आमचे मनोरथ पूर्ण करणारा आहे व तो उत्कृष्ट असून तेजस्वी अशा अनुयायांनीं युक्त आहे. वज्र हस्त व मनुष्य रक्षक असा तो एका अगर एकदम उत्पन्न झालेल्या पुष्कळ युद्धांत शत्रूंचा नाश करणारा आहे. ॥४८॥ विनियोग - आ न इन्द्रो हरिभिर्यात्वच्छार्वाचीनोऽवसे राधसे च । तिष्ठाति वज्री मघवा विरप्शीमं यज्ञमनु नो वाजसातौ ॥ ४९ ॥ अर्थ - इंद्र आमचें रक्षण करण्याकरितां व आम्हाला धन देण्याकरितां अश्वयुक्त रथानें आमच्या सन्मुख येवो. आल्यानंतर वज्रयुक्त धनवान् व महान् अशा त्यानें आमच्या यज्ञांत अन्न वांटण्याच्या निमित्तानें रहावें; म्हणजे आमचे यज्ञांतील अन्न वांटण्याचें काम करावें. ॥४९॥ विनियोग - त्रातारमिद्रमवितारमिन्द्रँ हवे-हवे सुहवँ शूरमिन्द्रम् । ह्वयामि शक्रं पुरुहूतमिन्द्रँ स्वस्ति नो मघवा धात्विन्द्रः ॥ ५० । अर्थ - रक्षण करणारा, संतुष्ट करणारा, सहज बोलावतां येण्यासारखा शूर समर्थ व पुष्कळांनीं बोलाविलेला जो इंद्र त्याला आम्ही प्रत्येक यज्ञांत बोलावितो. अशा तर्हेनें बोलाविला गेलेला तो धनवान् इंद्र आमचें कल्याण करो. ॥५०॥ विनियोग - इन्द्रः सुत्रामा स्ववाँ २ऽ अवोभिः सुमृडीको भवतु विश्ववेदाः । बाधतां द्वेषो ऽ अभयं कृणोतु सुवीर्यस्य पतयः स्याम ॥ ५१ ॥ अर्थ - संपूर्ण वस्तूंचा मालक, धनवान्, चांगलें रक्षण करणारा इंद्र अन्न देऊन आम्हांला सुखी करो. तो आमचें दौर्भाग्य दूर करो व अभय देवो. आणि त्याचे प्रसादानें आम्ही द्रव्याचे स्वामी होऊं. ॥५१॥ विनियोग - तस्य वयँ सुमतौ यज्ञियस्यापि भद्रे सौमनसे स्याम । स सुत्रामा स्ववाँ २ऽ इन्द्रोऽ अस्मेऽ आराच्चिद् द्वेषः सनुतर्युयोतु ॥ ५२ ॥ अर्थ - आमचेविषयीं हित करणार्या अशा, त्याची बुद्धि चांगली होवो व त्याचें मत उत्तम होवो. तो चांगला रक्षण करणारा धनवान् इंद्र आमचे जवळचें व दूरचें दौर्भाग्य नाहींसें करो. ॥५२॥ विनियोग - आ मन्द्रैरिन्द्र हरिभिर्याहि मयूररोमभिः । मा त्वा के चिन्नि यमन्विं न पाशिनोऽति धन्वेव ताँ २ऽ इहि ॥ ५३ ॥ अर्थ - हे इंद्रा, तूं गंभीर नाद करणारे व ज्यांचे केश मोरासारखे आहेत असे घोडे जुंपलेल्या रथांत बसून ये. फासेपारधी ज्याप्रमाणें पक्ष्याला अडवितात त्याप्रमाणें तुला कोणी न आडवो. तसेंच वाटसरू निर्जल मरुप्रदेश ओलांडून जातात त्याप्रमाणें रस्त्यांत आडविणारास तूं ओलांडून जा. ॥५३॥ विनियोग - एवेदिन्द्रं वृषणं वज्रबाहुं वसिष्ठासोऽ अभ्यर्चन्त्यर्कैः । स न स्तुतो वीरवद्धातु गोमद्यूयं पात स्वस्तिभिः सदा नः ॥ ५४ ॥ अर्थ - वसिष्ठ पुत्र मुनी मंत्रांनीं अशीच इंद्राची स्तुति करतात तो इंद्र वृष्टी करणारा व वज्रबाहु आहे, अशा रीतीनें स्तुति केलेला तो इंद्र पुत्र व गाईंनीं संयुक्त धन आम्हांला देवो. हे ऋत्विजांनो, तुम्ही आमचा नाश करूं नका व सर्वदा आमचें पालन करा. ॥५४॥ विनियोग - 'समिद्धः' इत्यादि बारा ऋचा त्रिपशूच्या प्रयाज याज्या आहेत. समिद्धोऽ अग्निरश्विना तप्तो घर्मो विराट् सुतः । दुहे धेनुः सरस्वती सोमँ शुक्रमिहेन्द्रियम् ॥ ५५ ॥ अर्थ - हे अश्विनीकुमारांनो, अग्नि प्रदीप्त झाला आहे व प्रवर्ग्यही तापला आहे. विविध प्रकारें शोभणार्या सोमाचें कंडण झालें आहे. संतुष्ट करणारी सरस्वती या यज्ञांत शुद्ध व इंद्रियांना बलप्रद अशा सोमाचें दोहन करिते म्हणजे देते. अर्थात् यज्ञाची तयारी झाली तुम्ही या. ॥५५॥ विनियोग - तनूषा भिषजा सुतेऽश्विनोभा सरस्वती । मध्या रजाँसीन्द्रियमिन्द्राय पथिभिर्वहान् ॥ ५६ ॥ अर्थ - सोमरसाचें कंडण झालें असतां दोघे अश्विनीकुमार आणि सरस्वती मधुर रसानें लोकांना पूर्ण करितात. ते अश्विनीकुमार शरीरांचे संरक्षक व वैद्य आहेत व ते अश्विनीकुमार आणि सरस्वती इंद्राकरितां यज्ञमार्गांनीं वीर्य धारण करितात. ॥५६॥ विनियोग - इन्द्रायेन्दुँ सरस्वती नराशँसेन नग्नहुम् । अधातामश्विना मधु भेषजं भिषजा सुते ॥ ५७ ॥ अर्थ - सरस्वती यज्ञासह इंद्राकरितां सोम व सुराकंद धारण करिती झाली. सोम रसाचें कंडण झाल्यावर अश्विनीकुमाररूपी वैद्य मधुर असें औषध धारण करिते झाले. ॥५७॥ विनियोग - आजुह्वाना सरसवतीन्द्रायेन्द्रियाणि वीर्यम् । इडाभिरश्विनाविषँ समूर्जँ सँ रयिं दधुः ॥ ५८ ॥ अर्थ - इंद्राला बोलावणारी सरस्वती आणि अश्विनीकुमार इंद्राकरितां चक्षुरादि इंद्रियें, त्यांचें सामर्थ्य, पशूंसह अन्न, दधि वगैरे रस आणि द्रव्य यांप्रत धारण करिते झाले. ॥५८॥ विनियोग - अश्विना नमुचेः सुतँ सोमँ शुक्रं परिस्रुता । सरस्वती तमा भरद्बर्हिषेन्द्राय पातवे ॥ ५९ ॥ अर्थ - अश्विनीकुमारांनीं सुरेसह कांडलेला, शुद्ध सोमरस नमुचिनामक असुरापासून आणला व सरस्वतीनें तोच रस इंद्राला पिण्याकरितां यज्ञांत पसरण्यास योग्य अशा दर्भांसह आणला. ॥५९॥ विनियोग - कवष्यो न व्यचस्वतीरश्विभ्यां न दुरो दिशः । इन्द्रो न रोदसीऽ उभे दुहे कामान्त्सरस्वती ॥ ६० ॥ अर्थ - अश्विनीकुमार, सरस्वती व इंद्र यांनीं द्युलोकांतून व पृथ्वीलोकांतून आपल्या इच्छा दोहन केल्या. तसेंच सच्छिद्र व अवकाशसहित अशा दिशांतून आपल्या इच्छा दोहन केल्या. ॥६०॥ विनियोग - उषासानक्तमश्विना दिवेन्द्रँ सायमिन्द्रियैः । सञ्जानाने सुपेशसा समञ्जाते सरस्वत्या ॥ ६१ ॥ अर्थ - हे अश्विनीकुमारांनो, रविप्रभा व रात्री यांनीं दिवसा व संध्याकाळीं सरस्वतीसह इंद्राला वीर्याशीं युक्त करतात. त्या रविप्रभा व रात्री एकामतानें चालणार्या आहेत. रविप्रभेचें रूप पांढरें व रात्रीचें रूप काळें आहे. ॥६१॥ विनियोग - पातं नोऽ अश्विना दिवा पाहि नक्तँ सरस्वति । दैव्या होतारा भिषजा पातमिन्द्रँ सचा सुते ॥ ६२ ॥ अर्थ - हे अश्विनीकुमारांनो, तुम्ही आमचें दिवसा रक्षण करा व हे सरस्वती, तूं आमचें रात्रीं रक्षण कर. हे वैद्य अशा देवांसंबंधीं होत्यांनो, सोमरसाचें कंडण झाल्यावर तुम्ही एकत्र होऊन इंद्राचें रक्षण करा. ॥६२॥ विनियोग - तिस्रस्त्रेधा सरस्वत्यश्विना भारतीडा । तीव्रं परिस्रुता सोममिन्द्राय सुषुवुर्मदम् ॥ ६३ ॥ अर्थ - इडा, सरस्वती व भारती या तीन देवता तीन ठिकाणीं असलेल्या पृथ्वी, मध्य (अंतरिक्ष) व द्युलोक या तीन ठिकाणीं असलेल्या व अश्विनीकुमार हुशारी देणारा व मदोत्पादक अशा सोमाचें सुरेसह इंद्राकरितां कंडण करिते झाले. ॥६३॥ विनियोग - अश्विना भेषजं मधु भेषजं नः सरस्वती । इन्द्रे त्वष्टा यशः श्रियँ रूपँ रूपमधुः सुते ॥ ६४ ॥ अर्थ - सोमरसाचें कंडण झाल्यावर अश्विनीकुमार आमची सरस्वती व प्रयाज देवता जी त्वष्टा, यांनीं इंद्रामध्यें साधें औषध व गोड असें औषध व कीर्ति, लक्ष्मी आणि नानाप्रकारचें रूप स्थापन केलें. ॥६४॥ विनियोग - ऋतुथेन्द्रो वनस्पतिः शशमानः परिस्रुता । कीलालमश्विभ्यां मधु दुहे धेनुः सरस्वती ॥ ६५ ॥ अर्थ - प्रयाजांचा देव जो वनस्पति तो स्तुति करून प्रत्येक ऋतूंत इंद्राकरितां सुरेसह अन्नरसाचें दोहन करितो व सरस्वती अश्विनीकुमारांसह धेनुरूप धारण करून इंद्राकरितां मध दोहन करिते. ॥६५॥ विनियोग - गोभिर्न सोममश्विना मासरेण परिस्रुता । समधातँ सरस्वत्या स्वाहेन्द्रे सुतं मधु ॥ ६६ ॥ अर्थ - हे अश्विनीकुमारांनो, तुम्ही सुरेसह व गोप्रभृति पशूंसह कांडलेला सोम व मध इंद्राचे ठायीं स्थापन करितां. हे होमलेल्या प्रयाज देवांनो, तुम्ही सरस्वतीसह इंद्राचें ठायीं कंडण केलेला रस स्थापन करितां. ॥६६॥ विनियोग - 'अश्विना हवि' या तीन ऋचा वपांच्या याज्या व पुरोनुवाक्या आहेत. अश्विना हविरिन्द्रियं नमुचेर्धिया सरस्वती । आ शुक्रमासुराद्वसु मघमिन्द्राय जभ्रिरे ॥ ६७ ॥ अर्थ - अश्विनीकुमार व सरस्वती बुद्धीच्या साह्यानें नमुचि राक्षसापासून इंद्राकरितां शुद्ध हविर्द्रव्य, वीर्य व पूज्य धन आणिते झाले. ॥६७॥ विनियोग - यमश्विना सरस्वती हविषेन्द्रमवर्धयन् । स बिभेद बलं मघं नमुचावासुरे सचा ॥ ६८ ॥ अर्थ - अश्विनीकुमार व सरस्वती हविर्द्रव्यानें ज्या इंद्राला वाढविते झाले तो इंद्र नमुचि राक्षसासह प्रशस्त अशा मेघांचें विदारण करिता झाला. ॥६८॥ विनियोग - तमिन्द्रं पशवः सचाश्विनोभा सरस्वती । दधानाऽ अभ्यनूषत हविषा यज्ञऽ इन्द्रियैः ॥ ६९ ॥ अर्थ - गो, मेष वगैरे कर्मांग पशू, अश्विनीकुमार आणि सरस्वती हे सर्व एक होऊन यज्ञामध्यें हविर्द्रव्यानें व सामर्थ्यानें पोषण करून त्या इंद्राला वाढवितात. ॥६९॥ विनियोग - 'य इंद्र' इत्यादि तीन ऋचा पशू पुरोडाशाच्या याज्या व अनुवाक्या आहेत. यऽ इन्द्रऽ इन्द्रियं दधुः सविता वरुणो भगः । स सुत्रामा हविष्पतिर्यजमानाय सश्चत ॥ ७० ॥ अर्थ - सविता, वरुण व भग हे तीन देव इंद्राचे ठायीं वीर्य स्थापन करिते झाले. तो उत्तम रक्षण करणारा हविर्द्रव्यांचा स्वामी इंद्र या यजमानास अभीष्ट देऊन सुखी करो. ॥७०॥ विनियोग - सविता वरुणो दधद्यजमानाय दाशुषे । आदत्त नमुचेर्वसु सुत्रामा बलमिन्द्रियम् ॥ ७१ ॥ अर्थ - संरक्षण करणार्या इंद्रानें नमुचि राक्षसापासून जें द्रव्य, वीर्य व बल आणलें; तें सविता, वरुण व भगरूपी देव हविर्भाग देणार्या या यजमानाला देवोत. ॥७१॥ विनियोग - वरुणः क्षत्रमिन्द्रियं भगेन सविता श्रियम् । सुत्रामा यशसा बलं दधाना यज्ञमाशत ॥ ७२ ॥ अर्थ - वरुण, सविता व संरक्षक इंद्र हे सौत्रामणी यज्ञाला व्याप्त करिते झाले. ते नाशापासून दूर करण्यांत समर्थ असें वीर्य, भाग्यासह लक्ष्मी व कीर्तीसह बल, क्रमेंकरून या यजमानाचें ठायीं स्थापन करणारे असे आहेत. ॥७२॥ विनियोग - 'अश्विना गोभिः' इत्यादि तीन ऋचा हविर्द्रव्याच्या याज्यानुवाक्या आहेत. अश्विना गोभिरिन्द्रियमश्वेभिर्वीर्यं बलम् । हविषेन्द्रँ सरस्वति यजमानमवर्धयन् ॥ ७३ ॥ अर्थ - अश्विनीकुमार व सरस्वती यांनीं इंद्राची व यजमानाची पुढील पदार्थांनीं वृद्धि केली. तें असें - गोप्रभृति पशु, इंद्रियसामर्थ्य, दक्षिणारूपी अश्व, मनःसामर्थ्य, शरीरसामर्थ्य व पशुपुरोडाशरूपी हविर्द्रव्य (इंद्राची वृद्धि म्हणजे त्याची तृप्ति व यजमानाची वृद्धि म्हणजे धन-पुत्रादिकांनीं त्याचें पोषण) ॥७३॥ विनियोग - ता नासत्या सुपेशसा हीरण्यवर्तनी नरा । सरस्वती हविष्मतीन्द्र कर्मसु नोऽवत ॥ ७४ ॥ अर्थ - अश्विनीकुमार आणि सरस्वती सौत्रामण्यादि यागामध्यें आमचें रक्षण करोत व हे इंद्रा, तूंहि पूर्वोक्त यागांत आमचें रक्षण कर. ते अश्विनीकुमार हिरण्ययुक्त मार्गानें जाणारे सुंदररूपयुक्त व मनुष्याकार आहेत व ती सरस्वती हविर्द्रव्ययुक्त आहे. ॥७४॥ विनियोग - ता भिषजा सुकर्मणा सा सुदुधा सरस्वती । स वृत्रहा शतक्रतुरिन्द्राय दधुरिन्द्रियम् ॥ ७५ ॥ अर्थ - ते प्रसिद्ध वैद्य अश्विनीकुमार आणि ती प्रसिद्ध सरस्वती व वृत्रासुराचा नाश करणारा, तसेंच शंभर यज्ञ करणारा इंद्र, या युगांतील इंद्राचें ठायीं वीर्य स्थापन करिते झाले. ॥७५॥ विनियोग - 'युवं' हा मंत्र पयोग्रह व सुराग्रह यांची पुरोनुवाक्या आहे. युवँ सुराममश्विना नमुचावासुरे सचा । विपिपानाः सरस्वतीन्द्रं कर्मस्वावत ॥ ७६ ॥ अर्थ - हे अश्विनीकुमारांनो, तुम्ही व सरस्वती एकत्र होऊन नमुचि राक्षसांत असलेला सुरामय ग्रह नाना तर्हेनें प्राशन करा व कर्मांमध्यें इंद्राचें सर्व बाजूंनी रक्षण करा. ॥७६॥ विनियोग - 'पुत्रमिव' ही ऋचा पयोग्रह व सुराग्रहाची याज्या आहे. पुत्रमिव पितरावश्विनोभेन्द्रावथुः काव्यैर्दँसनाभिः । यत्सुरामं व्यपिबः शचीभिः सरस्वती त्वा मघवन्नभिष्णक् ॥ ७७ ॥ अर्थ - हे इंद्रा, आईबाप मुलांचें रक्षण करितात, त्याप्रमाणें दोघांहि अश्विनीकुमारांनीं मंत्रांनीं व कर्मांनीं तुझें रक्षण केलें. कारण कीं, हे इंद्रा, तूं नमुचि राक्षसवधादि कर्मांनीं अत्यंत रमणीय असा सोम विशेषेंकरून प्यालास; आणखी दुसरे कारण असें कीं, सरस्वती देवी तुझी सेवा करिते म्हणजे तूं सोमपान केलेंस म्हणून व सरस्वती तुझी सेवा करिते म्हणून अश्विनीकुमारांनीं तुझें रक्षण केलें. ॥७७॥ विनियोग - 'यस्मिन् अश्वासः' ही स्विष्टकृत् यागांतील पुरोनुवाक्या आहे. व 'अहाव्यग्ने' ही पुढील ऋचा त्या यागाची याज्या आहे. यस्मिन्नश्वासऽ ऋषभासऽ उक्षणो वशा मेषाऽ अवसृष्टासऽ आहुताः । कीलालपे सोमपृष्ठाय वेधसे हृदा मतिं जनय चारुमग्नये ॥ ७८ ॥ अर्थ - हे अध्वर्यो, त्या अग्नीकरितां मन व बुद्धि शुद्ध कर. तो अग्नि अन्नरस पिणारा, पृष्टभागीं सोमरस वाहणारा, शुभ कार्य करणारा असा आहे. त्या अग्नीमध्यें अश्व, सामान्य वृषभ, सेचन समर्थ वृषभ, वंध्या गो व अज यांचा आदानपूर्वक होम केला जातो. ॥७८॥ विनियोग - अहाव्यग्ने हविरास्ये ते स्रुचीव घृतं चम्वीव सोमः । वाजसनिँ रयिमस्मे सुवीरं प्रशस्तं धेहि यशसं बृहन्तम् ॥ ७९ ॥ अर्थ - हे अग्ने, स्रुचेत असलेल्या घृताप्रमाणें व कंडणचर्मावर असलेल्या सोमाप्रमाणें सर्वदा तुझ्या मुखांत सर्व बाजूंनीं हविर्द्रव्याचा होम केला. हे अग्ने, असा तूं आमचे ठायीं अन्नाचा उपभोग, सुपुत्रयुक्त द्रव्य व सर्वलोकप्रसिद्ध कीर्ति स्थापन कर. ॥७९॥ विनियोग - 'अश्विना तेजसा' इत्यादि अकरा मंत्रांचे शस्त्र (स्तुतिवाक्य) आहे. अश्विना तेजसा चक्षुः प्राणेन सरस्वती वीर्यम् । वाचेन्द्रो बलेनेन्द्राय दधुरिन्द्रियम् ॥ ८० ॥ अर्थ - अश्विनीकुमार इंद्राकरितां सतेज चक्षुरिंद्रिय धारण करिते झाले. सरस्वती इंद्राकरितां सप्राण असें वीर्य धारण करिती झाली व युगांतरीय इंद्र या युगांतील इंद्राकरितां बलसहित इंद्रियसामर्थ्य धारण करिता झाला. ॥८०॥ विनियोग - गोमदू षु णासत्याश्वावद्यातमश्विना । वर्त्ती रुद्रा नृपाय्यम् ॥ ८१ ॥ अर्थ - हे शत्रूंना रडविणार्या अश्विनीकुमारांनो, तुम्ही मनुष्य ज्यात सोमपान करितात अशा यज्ञाप्रत गोयुक्त व अश्वयुक्त द्रव्य घेऊन मार्गाने जा. ॥८१॥ विनियोग - न यत्परो नान्तरऽ आदधर्षद्वृषण्वसू । दुःशँसो मर्त्यो रिपुः ॥ ८२ ॥ अर्थ - वृष्टि हेंच ज्यांचें द्रव्य आहे अशा अश्विनीकुमारांनो, अपवाद देणारा शत्रु, सामान्य मनुष्य, स्वकीय अथवा परकीय, संबद्ध अथवा असंबद्ध असाहि मनुष्य इंद्राचा पराभव न करो. ॥८२॥ विनियोग - ता नऽ आ वोढमश्विना रयिं पिशङ्गसन्दृशम् । धिष्ण्या वरिवोविदम् ॥ ८३ ॥ अर्थ - धिष्ण्य अग्निरूपी हे अश्विनीकुमारांनो, तुम्ही आमच्याकरितां पीतवर्णाचें सुवर्णरूपी व अन्य द्रव्याला हेतुभूत असें द्रव्य आणा. ॥८३॥ विनियोग - पावकाः नः सरस्वती वाजेभिर्वाजिनीवती । यज्ञं वष्टु धियावसुः ॥ ८४ ॥ अर्थ - सरस्वती आमच्या यज्ञाची इच्छा करो, म्हणजे आमच्या यज्ञांत येवो. ती पवित्र करणारी, यज्ञक्रियाधिष्ठात्री व कर्माचे सहाय्यानें द्रव्य प्राप्त करणारी अशी आहे. ॥८४॥ विनियोग - चोदयित्री सूनृतानां चेतन्ती सुमतीनाम् । यज्ञं दधे सरस्वती ॥ ८५ ॥ अर्थ - प्रियसत्य वाक्यात्मक अशा तीन वेदांची प्रेरणा करणारी, उत्तम बुद्धि देणारी सरस्वती आमच्या यज्ञाचें धारण करतें. ॥८५॥ विनियोग - महोऽ अर्णः सरस्वती प्र चेतयति केतुना । धियो विश्वा वि राजति ॥ ८६ ॥ अर्थ - सरस्वती कर्माच्या योगें मोठया उदकाची प्रेरणा करते म्हणजे वृष्टि करते व सर्व प्राण्यांच्या बुद्धींना प्रकाशित करते. आम्ही तिचें स्तवन करतों. ॥८६॥ विनियोग - इन्द्रा याहि चित्रभानो सुताऽ इमे त्वायवः । अण्वीभिस्तना पूतासः ॥ ८७ ॥ अर्थ - नानाविध प्रकाशयुक्त अशा हे इंद्रा, तूं ये. कारण तुझी इच्छा करणार्या या सोमलतांचें कंडण झालें आहे व ते सोम अंगुलींनीं आणि दशापवित्रांनीं शुद्ध केले गेले आहेत. ॥८७॥ विनियोग - इन्द्रा याहि धियेषितो विप्रजूतः सुतावतः । उप ब्रह्माणि वाघतः ॥ ८८ ॥ अर्थ - हे इंद्रा, तूं स्वयंप्रेरणेनें ये. तूं बुद्धिमान् ब्राह्मणांकडून सेवित आहेस व ज्यानें सोमाचें कंडण केलें, अशा यजमानाच्या हविर्द्रव्यांजवळ ऋत्विज् उभे आहेत म्हणजे सर्व तयारी आहे म्हणून. ॥८८॥ विनियोग - इन्द्रा याहि तूतुजानऽ उप ब्रह्माणि हरिवः । सुते दधिष्व नश्चनः ॥ ८९ ॥ अर्थ - हे अश्वयुक्त इंद्रा, त्वरायुक्त होऊन तूं या यजमानाच्या हविर्द्रव्यासमीप ये व सोमरसाचें कंडण झाल्यावर आमचें सोमरूपी अन्न उदरांत धारण कर. ॥८९॥ विनियोग - अश्विना पिबतां मधु सरस्वत्या सजोषसा । इन्द्रः सुत्रामा वृत्रहा जुषन्ताँ सोम्यं मधु ॥ ९० ॥ अर्थ - प्रीतियुक्त व सरस्वतीसहवर्तमान अश्विनीकुमार व संरक्षण करणारा वृत्रनाशक इंद्र मधुर व सोमरसयुक्त हविर्भागाचें सेवन करोत. ॥९०॥ ॥ इति विंशोऽध्यायः ॥ ॥ पूर्वार्धः समाप्तः ॥ |