शुक्ल यजुर्वेद
षोडशोऽध्यायः



विनियोग - पंधराव्या अध्यायांत चयनाचे मंत्र संपविले. या सोळाव्या अध्यायांत शतरुद्रियसंज्ञक होमाचे मंत्र सांगतात.


नम॑स्ते रुद्र मन्यव॑ऽ उतो तऽ इष॑वे नमः॑ । बाहुभ्या॑मुत ते नमः॑ ॥ १ ॥


अर्थ - हे दुःखनाशका रुद्रा, तुझ्या क्रोधाला, बाणांना व हस्तांना नमस्कार असो. ॥१॥





विनियोग -


या ते॑ रुद्र शिवा तनूरघोराऽपा॑पकाशिनी । तया॑ नस्तन्वा शन्त॑मया गिरि॑शंताभिचा॑कशीहि ॥ २ ॥


अर्थ - कैलासावर राहून जगाचें कल्याण करणार्‍या हे रुद्रा, जें तुझें मंगलप्रद, सौ‍म्य, केवल पुण्यप्रकाशक शरीर त्या अनंत सुखकारक शरीरानें आमच्याकडे अवलोकन कर. (आमचें रक्षण कर.) ॥२॥





विनियोग -


यामिषुं॑ गिरिशंत हस्ते॑ बिभर्ष्यस्त॑वे । शिवां गि॑रित्र तां कु॑रु मा हिँ॑सीः पुरु॑षं जग॑त् ॥ ३ ॥


अर्थ - कैलासावर राहून जगाचे कल्याण करणार्‍या, तसेंच मेघांत राहून वृष्टिरूपानें जगाचें रक्षण करणार्‍या व सर्वज्ञ रुद्रा, शत्रुनाशाकरितां जो बाण तूं हातांत धारण करतोस तो सर्वांचे कल्याण करणारा कर व जंगम जे पुत्रपौत्रादिक आणि गो, अश्व वगैरे यांचा नाश करूं नकोस. ॥३॥





विनियोग -


शिवेन वच॑सा त्वा गिरिशाच्छा॑ वदामसि । यथा॑ नः सर्वमिज्जग॑दयक्ष्मँ सुमनाऽ अस॑त् ॥ ४ ॥


अर्थ - हे कैलासस्थित रुद्रा, तुजप्रत आम्ही प्राप्त होण्याकरितां तुझी स्तुति करतों व तुला असें सांगतों कीं, आमचें जंगम जे पुत्रपौत्रादि व गो, अश्व वगैरे ते निरोगी व चांगल्या मनाचे होतील असें कर. ॥४॥





विनियोग -


अध्य॑वोचदधिवक्ता प्र॑थमो दैव्यो॑ भिषक् । अहीँ॑श्च सर्वा॑ञ्जम्भयन्त्सर्वा॑श्च यातुधान्योऽधराचीः परा॑ सुव ॥ ५ ॥


अर्थ - सर्वश्रेष्ठत्व देण्याचा ज्याचा स्वभाव आहे असा, सर्वश्रेष्ठ, देवहितकारी, रोगनाशक रुद्र मला सर्वश्रेष्ठत्व देवो. हे रुद्रा, सर्व सर्पव्याघ्रादिकांचा नाश करून अधोगमन करणार्‍या राक्षसींना आमच्यापासून दूर कर. ॥५॥





विनियोग -


असौ यस्ताम्रोऽ अ॑रुणऽ उत बभ्रुः सु॑मंगलः॑ । ये चै॑नँ रुद्राऽ अभितो॑ दिक्षु श्रिताः स॑हस्रशोऽवै॑षाँ हेड॑ऽ ईमहे ॥ ६ ॥


अर्थ - उदयसमयीं व अस्तसमयीं रक्तवर्णाचा व इतर वेळीं पिंगट वर्णाचा व सर्वमंगलप्रद रविरूपी रुद्र आहे. त्याचा दहा दिशांत असलेले हजारों रुद्र आश्रय करते झाले. त्यांचा आमच्यावर असलेला क्रोध आम्ही (भक्तीनें) दूर करतों. ॥६॥





विनियोग -


असौ यो॑ऽवसर्प॑ति नील॑ग्रीवो विलो॑हितः । उतैनं॑ गोपाऽ अ॑दृशन्नदृ॑शन्नुदहार्यः स दृष्टो मृ॑डयाति नः ॥ ७ ॥


अर्थ - ज्याला अज्ञानी असें गोप व पाणी भरणार्‍या मोलकरणी बाया हीं प्रत्यक्ष पाहूं शकतात, विषधारणामुळें ज्याचा कंठ नीळ वर्णाचा झालेला आहे व विशेषेंकरून रक्तवर्णाचा होऊन जो नेहमीं उदय व अस्त पावून सर्वदा गमन करतों तो सूर्यमण्डलस्थ रुद्र आम्हांला सुख देवो. ॥७॥





विनियोग -


नमो॑ऽस्तु नील॑ग्रीवाय सहस्राक्षाय॑ मीढुषे॑ । अथो येऽ अ॑स्य सत्वा॑नोऽहं तेभ्यो॑ऽकरं नमः॑ ॥ ८ ॥


अर्थ - नीलकण्ठ, सहस्रनेत्र इन्द्ररूपी व वृष्टि करणार्‍या रुद्राला माझा नमस्कार असो. तसेंच त्याचे जे भृत्य (सेवक) त्यांना मी नमस्कार करतों. ॥८॥





विनियोग -


प्रमुं॑च धन्व॑नस्त्वमुभयोरार्त्न्योर्ज्याम् । याश्च॑ ते हस्तऽ इष॑वः परा ता भ॑गवो वप ॥ ९ ॥


अर्थ - हे भगवन्, धनुष्याच्या दोन्ही टोकांत असलेल्या दोरीला तूं टाकून दे व तुझ्या हातांतील बाणही टाकून दे. ॥९॥





विनियोग -


विज्यं धनुः॑ कपर्दिनो विश॑ल्यो बाण॑वाँ२ऽ उत । अने॑शन्नस्य याऽ इष॑वऽ आभुर॑स्य निषङ्गधिः ॥ १० ॥


अर्थ - जटाजूट धारण करणार्‍या रुद्राचें धनुष्य मौर्वीरहित (दोरीशिवाय) असो. तसेंच भात्यांतील बाणांचीं टोकें नाहींशी होवोत व त्याचे बाण नष्ट होवोत, व त्याचें तरवारीचें म्यान रिकामें (तलवार नसलेलें) असो. ॥१०॥





विनियोग -


या ते॑ हेतिर्मीढु॑ष्टम हस्ते॑ बभूव॑ ते धनुः॑ । तयाऽस्मान्विश्वतस्त्वम॑यक्ष्मया परि॑ भुज ॥ ११ ॥


अर्थ - हे अत्यंत वृष्टि करणार्‍या रुद्रा, तुझ्या हातांत जें धनुष्य आहे त्या दृढ अशा धनुष्यानें आमचें सर्व बाजूंनीं रक्षण कर. ॥११॥





विनियोग -


परि॑ ते धन्व॑नो हेतिरस्मान्वृणक्तु विश्वतः॑ । अथो यऽ इ॑षुधिस्तवारेऽ अस्मान्नि धे॑हि तम् ॥ १२ ॥


अर्थ - हे रुद्रा, तुझें धनुष्यरूपी आयुध आमचा सर्व बाजूंनी परिहार करो. म्हणजे आम्हांस न मारो. तसेंच तुझा बाणांचा भाता आमच्यापासून दूर ठेव. ॥१२॥





विनियोग -


अवतत्य धनुष्ट्वँ सह॑स्राक्ष शते॑शुधे । निशीर्य॑ शल्यानां मुखा॑ शिवो नः॑ सुमना॑ भव ॥ १३ ॥


अर्थ - शंभर भाते व सहस्र नेत्र असलेल्या इंद्रा, धनुष्याची दोरी नाहींशी करून व बाणांचीं अग्रें मोडून तूं आमच्याविषयीं शांत व चांगली बुद्धि धारण करणारा असा हो. ॥१३॥





विनियोग -


नम॑स्तेऽ आयु॑धायाना॑तताय धृष्णवे॑ । उभाभ्या॑मुत ते नमो॑ बाहुभ्यां तव धन्व॑ने ॥ १४ ॥


अर्थ - हे रुद्रा, शत्रु मारण्यांत ज्यास धार्ष्टय आहे व धनुष्यावर स्थापन न केलेल्या अशा तुझ्या बाणाला नमस्कार असो. तसेंच दोन्ही बाहूंना व धनुष्यालाही नमस्कार असो. ॥१४॥





विनियोग -


मा नो॑ महान्त॑मुत मा नो॑ऽ अर्भकं मा नऽ उक्ष॑न्तमुत मा न॑ऽ उक्षितम् । मा नो॑ वधीः पितरं मोत मातरं मा नः॑ प्रियास्तन्वो रुद्र रीरीषः ॥ १५ ॥


अर्थ - हे रुद्रा, आमच्या म्हातार्‍या, तरुण व बालक अशा संबंधी जनांचा नाश करूं नकोस, तसेंच आमचे गर्भस्य असे संबंधी आणि बाप, आई व आवडते पुत्र-पौत्रादि यांचाही नाश करूं नकोस. ॥१५॥





विनियोग -


मा न॑स्तोके तन॑ये मा नऽ आयु॑षि मा नो गोषु मा नोऽ अश्वे॑षु रीरीषः । मा नो॑ वीरान् रु॑द्र भामिनो॑ वधीर्हविष्म॑न्तः सदमित् त्वा॑ हवामहे ॥ १६ ॥


अर्थ - हे रुद्रा, आमचे पुत्रपौत्र, आयुष्य, गाई व घोडे यांचा नाश करूं नकोस. तसेंच रागीट अशाही आमच्या नोकरांचा नाश करूं नकोस. आम्ही सर्वदाच हविर्धारण करून यज्ञांत तुला बोलावतों. ॥१६॥





विनियोग -


नमो हिर॑ण्यबाहवे सेनान्ये दिशां च पत॑ये नमो नमो॑ वृक्षेभ्यो हरि॑केशेभ्यः पशूनां पत॑ये नमो नमः॑ शष्पिञ्ज॑राय त्विषी॑मते पथीनां पत॑ये नमो नमो हरि॑केशायोपवीतिने॑ पुष्टानां पत॑ये नमो॑ ॥ १७ ॥


अर्थ - ज्याचे बाहू अलंकाररूपी आहेत, सेनापति, दिक्पालक, हिरवीं पानें असलेल्या वृक्षांचें रूप धारण करणारा, जीवांचें रक्षण करणारा, बालतृणाप्रमाणें पिवळसर व रक्तवर्णाचा, कांतिमान्, मार्गांचा रक्षक, कृष्णकेश असलेला, मंगलार्थ यज्ञोपवीत धारण करणारा, सर्व गुणयुक्त नरांचा अधिपति असा जो रुद्र त्याला नमस्कार असो. ॥१७॥





विनियोग -


नमो॑ बभ्लुशाय॑ व्याधिनेऽन्ना॑नां पत॑ये नमो नमो॑ भवस्य॑ हेत्यै जग॑तां पत॑ये नमो नमो॑ रुद्राया॑ततायिने क्षेत्रा॑णां पत॑ये नमो नमः॑ सूतायाह॑न्त्यै वना॑नां पत॑ये नमः॑ ॥ १८ ॥


अर्थ - कपिलवर्ण, शत्रुनाशक, अन्नपालक, संसारनाशक, आयुधस्वरूपी, जगत्पति, आततायी, क्षेत्रपालक, हनन न करणारा, सारथीरूपी, व वनांचा पालक जो रुद्र त्याला नमस्कार असो. ॥१८॥





विनियोग -


नमो रोहि॑ताय स्थपत॑ये वृक्षाणां पत॑ये नमो नमो॑ भुवन्तये॑ वारिवस्कृतायौष॑धीनां पत॑ये नमो नमो॑ मन्त्रिणे॑ वाणिजाय कक्षा॑णां पत॑ये नमो नम॑ऽ उच्चैर्घो॑षायाक्रन्दय॑ते पत्तीनां पत॑ये नमः॑ ॥ १९ ॥


अर्थ - लोहितवर्णाचा, विश्वकर्मरूपानें घरांचा कर्ता, वृक्षपालक, भूमंडळविस्तारक, द्रव्योत्पादक, गांवळी व रानटी अशा औषधींचें पालन करणारा, मंत्री, व्यापारी, रानांतील गवत व झुडपें वाढविणारा, उच्च व महाशब्द करणारा, आणि पायदळ सेनेचा अधिपति असा जो रुद्र त्याला नमस्कार असो. ॥१९॥





विनियोग -


नमः॑ कृत्स्नायतया धाव॑ते सत्व॑नां पत॑ये नमो नमः सह॑मानाय निव्याधिन॑ऽ आव्याधिनी॑नां पत॑ये नमो नमो॑ निषङ्‍गिणे॑ ककुभाय॑ स्तेनानां पत॑ये नमो नमो॑ निचेरवे॑ परिचरायार॑ण्यानां पत॑ये नमः॑ ॥ २० ॥


अर्थ - आकर्ण ओढलेले व दीर्घ धनुष्य घेऊन युद्धभूमीवर धांवत जाणारा, प्राणांचा अधिपति, शत्रूंचा पराजय करणारा व विशेषेंकरून त्यांचा नाश करणारा, शूर सेनेचा पालक, खङ्ग धारण करणारा महान् असा गुप्त चोरांचा पालक, चोरीच्या व अपहाराच्या बुद्धीनें ठिकठिकाणीं हिंडणारा जो चोर तत्स्वरूपी व अरण्यांचा अधिपति जो रुद्र त्याला नमस्कार असो. ॥२०॥





विनियोग -


नमो वञ्चते परिवञ्चते स्तायूनां पतये नमो नमो निषङ्‍गिणऽ इषुधिमते तस्कराणां पतये नमो नमः सृकायिभ्यो जिघाँसद्‍भ्यो मुष्णतां पतये नमो नमोऽसिमद्‍भ्यो नक्तञ्चरद्‍भ्यो विकृन्तानां पतये नमः ॥ २१ ॥


अर्थ - एकटयाचें अथवा पुष्कळांचें द्रव्य फसवून घेणारा जो तत्स्वरूपी, नकळत दुसर्‍यांचें द्रव्य हरण करणारे जे चोर तत्स्वरूपी, बाण व भाते धारण करणारा, उघड चोरी करणारे जे त्यांचा अधिपति, वज्र हस्तांत असलेले व शत्रूंचा नाश इच्छिणारे जे तत्स्वरूपी, लुटारूंचा अधिपति, खङ्गधारी व रात्रीं संचार करणार्‍यांचा व दुसर्‍याचा उच्छेद करून त्याचे द्रव्याचा अपहार करणार्‍यांचा अधिपति असा जो रुद्र त्याला नमस्कार असो. ॥२१॥





विनियोग -


नमऽ उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नमऽ इषुमद्भ्यो धन्वायिभ्यश्च वो नमो नमऽ आतन्वानेभ्यः प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नमऽ आयच्छद्भ्यो ऽस्यद्‍भ्यश्च वो नमः ॥ २२ ॥


अर्थ - पागोटें डोक्यावर असलेला, पर्वतादिदुर्गम स्थानांत फिरणारा, बारीक सारीक चोरी करणार्‍यांचा जो अधिपति रुद्र त्याला नमस्कार असो. तसेंच बाण व धनुष्य धारण करणारे, धनुष्यावर दोरी स्थापन करणारे, (धनुष्य सज्ज करणारे) धनुष्यानें बाण संधान करणारे, धनुष्य आकर्षण करणारे, व बाण टाकणारे असे जे रुद्र त्यांना नमस्कार असो. ॥२२॥





विनियोग -


नमो विसृजद्‍भ्यो विध्यद्‍भ्यश्च वो नमो नमः स्वपद्‍भ्यो जाग्रद्‍भ्यश्च वो नमो नमः शयानेभ्यऽ आसीनेभ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो धावद्‍भ्यश्च वो नमः ॥ २३ ॥


अर्थ - शत्रूंवर बाण टाकणारे, शत्रूंना वेध करणारे, स्वप्न, जागृति व सुषुप्ति अवस्था धारण करणारे, बसणारे, उठणारे व धावणारे जे रुद्र त्यांना नमस्कार असो. ॥२३॥





विनियोग -


नमः सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमोऽश्वेभ्यो ऽश्वपतिभ्यश्च वो नमो नमऽ आव्याधिनीभ्यो विविध्यन्तीभ्यश्च वो नमो नमऽ उगणाभ्यस्तृँहतीभ्यश्च वो नमः ॥ २४ ॥


अर्थ - सभा, सभापति, अश्व, अश्वपतिरूपी जे रुद्र त्यांना नमस्कार असो. सर्व बाजूंनीं व विशेषेंकरून वेध करणार्‍या, उत्कृष्ट सेवकसमूह ज्यांना आहे अशा व वधसमर्थ अशा ब्रह्मादि देवतांना नमस्कार असो. ॥२४॥





विनियोग -


नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गृत्सेभ्यो ग्रुत्सपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमः ॥ २५ ॥


अर्थ - भूतविशेषसंघ, देवानुचर समुदायांचे पालक, निरनिराळ्या जातींचे पालक, बुद्धिमान् व त्यांचे पालक, विकृत स्वरूपांचे व अश्वमुख वगैरे निरनिराळ्या रुपांचे जे रुद्र त्यांना नमस्कार असो. ॥२५॥





विनियोग -


नमः सेनाभ्यः सेनानिभ्यश्च वो नमो नमो रथिभ्योऽ अरथेभ्यश्च वो नमो नमः क्षत्तृभ्यः संग्रहीतृभ्यश्च वो नमो नमो महद्‍भ्योऽ अर्भकेभ्यश्च वो नमः ॥ २६ ॥


अर्थ - सेनारूपी, सेनापतिरूपी, रथांतून जाणारे व रथांतून न जाणारे, रथांचे स्वामी व सारथि, उत्तम जातिगुणविशिष्ट व अल्प प्रमाणाचे जे रुद्र त्यांना नमस्कार असो. ॥२६॥





विनियोग -


नमस्तक्षभ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नमो निषादेभ्यः पुञ्जिष्ठेभ्यश्च वो नमो नम श्वनिभ्यो म्रुगयुभ्यश्च वो नमः ॥ २७ ॥


अर्थ - सुतारकाम करणारे, रथ बनविणारे, कुंभार, लोहार, भील, कोळी, अंत्यज वगैरे कुत्र्यांच्या गळ्यांत बांधलेली दोरी धारण करणारे व पारधी एतत्स्वरूपी जे रुद्र त्यांना नमस्कार असो. ॥२७॥





विनियोग -


नमः श्वभ्यः श्वपतिभ्यश्च वो नमो नमो भवाय च रुद्राय च नमः शर्वाय च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च शितिकण्ठाय च ॥ २८ ॥


अर्थ - कुत्रे व त्यांचे पालन करणारे जे रुद्र त्यांना नमस्कार असो. सर्व प्राण्यांचा उत्पादक, दुःखनाशक, पाप दूर करणारा, अज्ञांचे पालन करणारा, विषभक्षणानें ज्याचे कण्ठाचा कांहीं भाग काळा झाला आहे व त्याच कंठाचा कांहीं भाग पांढरा आहे ज्याचा, अशा रुद्राला नमस्कार असो. ॥२८॥





विनियोग -


नमः कपर्दिने च व्युप्तकेशाय च नमः सहस्राक्षाय च शतधन्वने च नमो गिरिशयाय च शिपिविष्टाय च नमो मीढुष्टमाय चेषुमते च ॥ २९ ॥


अर्थ - जटा धारण करणारा, ज्याचे केशांचें मुंडन झालें आहे असा, हजार डोळे व शंभर धनुष्यें धारण करणारा, कैलासावर राहणारा, सर्व प्राण्यांचीं शरीरें व्यापून राहणारा, अत्यंत वृष्टि करणारा, व बाण जवळ असलेला जो रुद्र त्याला नमस्कार असो. ॥२९॥





विनियोग -


नमो ह्रस्वाय च वामनाय च नमो बृहते च वर्षीयसे च नमो वृद्धाय च सवृधे च नमोऽग्ऱ्याय च प्रथमाय च ॥ ३० ॥


अर्थ - लहान, ठेंगू, मोठा अधिक वयाचा, विद्याविनयादिगुणविशिष्ट अशा वृद्धाबरोबर राहणारा, सर्वांत श्रेष्ठ व प्रथम असा जो रुद्र त्याला नमस्कार असो. ॥३०॥





विनियोग -


नमऽ आशवे चाजिराय च नमः शीघ्र्याय च शीभ्याय च नमऽ ऊर्म्याय चावस्वन्याय च नमो नादेयाय च द्वीपाय च ॥ ३१ ॥


अर्थ - सर्वव्यापी, गतिशील, शीघ्रवस्तूंत राहणारा, जलप्रवाहांत राहणारा, लाटांत असलेला, स्थिर अशा जलांत किंवा खडडयांतील जलांत, नदींत व बेटांत राहणारा जो रुद्र त्याला नमस्कार असो. ॥३१॥





विनियोग -


नमो ज्येष्ठाय च कनिष्ठाय च नमः पूर्वजाय चापरजाय च नमो मध्यमाय चापगल्भाय च नमो जघन्याय च बुध्नियाय च ॥ ३२ ॥


अर्थ - सर्वांत वडील व सर्वांत धाकटा, जगाचे आरंभीं उत्पन्न झालेला, प्रलयकालीं व मध्यभागीं असलेला, अज्ञानी, गाई वगैरेंच्या जघन भागांतून उत्पन्न झालेला व झाडांचें बुंध्यांतून उत्पन्न झालेला जो रुद्र त्याला नमस्कार असो. ॥३२॥





विनियोग -


नमः सोभ्याय च प्रतिसर्याय च नमो याम्याय च क्षेम्याय च नमः श्लोक्याय चावसान्याय च नमऽ उर्वर्याय च खल्याय च ॥ ३३ ॥


अर्थ - गंधर्व नगरांत व अभिचार कर्मांत उत्पन्न झालेला, नरकपीडा करणारा, कुशलकर्मांत व वैदिकमंत्रांत असणारा, वेदांतांत आढळणारा, भूमींत धान्यरूपानें उत्पन्न होणारा व खळ्यांत असलेला जो रुद्र त्याला नमस्कार असो. ॥३३॥





विनियोग -


नमो वन्याय च कक्ष्याय च नमः श्रवाय च प्रतिश्रवाय च नमऽ आशुषेणाय चाशुरथाय च नमः शूराय चावभेदिने च ॥ ३४ ॥


अर्थ - वनांत व झुडपांत असणारा, ध्वनि व प्रतिध्वनिस्वरूपी, ज्याची सेना व रथ शीघ्रगामी आहे, शूर व शत्रुनाशक जो रुद्र त्याला नमस्कार असो. ॥३४॥





विनियोग -


नमो बिल्मिने च कवचिने च नमो वर्मिणे च वरूथिने च नमः श्रुताय च श्रुतसेनाय च नमो दुन्दुभ्याय चाहनन्याय च ॥ ३५ ॥


अर्थ - शिरस्त्राण, कापसाचा अंगरखा व लोखंडाचें कवच धारण करणारा, ज्याचे रथाला वरूथ (घुमट) आहे असा, जो स्वतः प्रसिद्ध असून ज्याची सेना प्रसिद्ध आहे असा, नगारा व तो वाजविण्याचे दंड यांत असणारा जो रुद्र त्याला नमस्कार असो. ॥३५॥





विनियोग -


नमो धृष्णवे च प्रमृशाय च नमो निषङ्‍गिणे चेषुधिमते च नमस्तीक्ष्णेषवे चायुधिने च नमः स्वायुधाय च सुधन्वने च ॥ ३६ ॥


अर्थ - प्रगल्भ, विचारशील, खङग, भाते, तीक्ष्ण बाण व आयुधें जवळ असलेला, त्रिशूळ व चांगलें धनुष्य धारण करणारा जो रुद्र त्याला नमस्कार असो. ॥३६॥





विनियोग -


नमः स्रुत्याय च पथ्याय च नमः काट्याय च नीप्याय च नमः कुल्याय च सरस्याय च नमो नादेयाय च वैशन्ताय च ॥ ३७ ॥


अर्थ - गल्लींत व मोठया रस्त्यांत तसेंच अडचणीचे मार्गांत, पर्वताचे सखल प्रदेशांत, पाटांवर (कालव्यांवर) अगर सर्व देहांत, सरोवरांत, नद्यांत व डबक्यांत असणार्‍या रुद्राला नमस्कार असो. ॥३७॥





विनियोग -


नमः कूप्याय चावट्याय च नमो वीध्र्याय चातप्याय च नमो मेघ्याय च विद्युत्याय च नमो वर्ष्याय चावर्ष्याय च ॥ ३८ ॥


अर्थ - विहिरी, खडडे, शरदऋतूंतील मेघ, ऊन, ढग, विजा, वृष्टि, अनावृष्टि या सर्वांत असणार्‍या रुद्राला नमस्कार असो. ॥३८॥





विनियोग -


नमो वात्याय च रेष्मियाय च नमो वास्तव्याय च वास्तुपाय च नमः सोमाय च रुद्राय च नमस्ताम्राय चारुणाय च ॥ ३९ ॥


अर्थ - वायु, प्रलयकाल, गृहें (घरें) यांत असणारा, गृहपालक, पार्वतीसह असणारा, दुःखनाशक, पूर्ण किंवा किंचित् ताम्र वर्णाचा जो रुद्र त्याला नमस्कार असो. ॥३९॥





विनियोग -


नमः शङ्‍गवे च पशुपतये च नमऽ उग्राय च भीमाय च नमोऽग्रेवधाय च दूरेवधाय च नमो हन्त्रे च हनीयसे च नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्यो नमस्ताराय ॥ ४० ॥


अर्थ - सुखस्वरूपी वाणी बोलणारा, प्राण्यांचा अधिपति, शस्त्रें उंच धारण करणारा, भयंकर, पुढें येणार्‍या व दूरस्थ शत्रूंचा नाश करणारा, एरव्हीं सामान्यरूपेंकरून मारणारा, व प्रलयकालीं विशेषेंकरून मारणारा असा जो रुद्र त्याला नमस्कार व हिरव्या वर्णाचे जे कल्पवृक्ष तद्रूपी रुद्रांना माझा नमस्कार असो व संसारतारक जो रुद्र त्यास नमस्कार असो. ॥४०॥





विनियोग -


नमः शम्भवाय च मयोभवाय च नमः शङ्कराय च मयस्कराय च नमः शिवाय च शिवतराय च ॥ ४१॥


अर्थ - संसार व मुक्तिस्वरूपी, सांसारिक व इतर ऐहिक आणि मोक्षसुखें देणारा, स्वतः निष्पाप व भक्तांना अत्यंत निष्पाप करणारा जो रुद्र त्याला नमस्कार असो. ॥४१॥





विनियोग -


नमः पार्याय चावार्याय च नमः प्रतरणाय चोत्तरणाय च नमस्तीर्थ्याय च कूल्याय च नमः शष्प्याय च फेन्याय च ॥ ४२ ॥


अर्थ - संसाराचे पलीकडे व संसारांत असणारा, पाप व संसार यांतून तरून जाण्यास कारणीभूत, प्रयागादि तीर्थे, त्यांचे तट, बालतृण व फेंस यांत असलेल्या रुद्राला नमस्कार असो. ॥४२॥





विनियोग -


नमः सिकत्याय च प्रवाह्याय च नमः किँशिलाय च क्षयणाय च नमः कपर्दिने च पुलस्तये च नमऽ इरिण्याय च प्रपथ्याय च ॥ ४३ ॥


अर्थ - रेती, जलप्रवाह, वाळू, ज्यांत पाणी स्थिर राहतें असा तलाव वगैरे प्रदेश यांत असणारा, जटा ज्यास आहेत असा सर्वांतर्यामी, खडकाळ (ऊपर जमीन) व मोठा राजमार्ग यांत राहणारा जो रुद्र त्याला नमस्कार असो. ॥४३॥





विनियोग -


नमो व्रज्याय च गोष्ठ्याय च नमस्तल्प्याय च गेह्याय च नमो हृदय्याय च निवेष्प्याय च नमः काट्याय च गह्वरेष्ठाय च ॥ ४४ ॥


अर्थ - गोसमुदाय, गोठा, अंथरूण, गृह, हृदय, पाण्यांतील भोवरा, गहन अरण्यांतील प्रदेश व गुहा यांत असणार्‍या रुद्राला नमस्कार असो. ॥४४॥





विनियोग -


नमः शुष्क्याय च हरित्याय च नमः पाँसव्याय च रजस्याय च नमो लोप्याय चोलप्याय च नमऽ ऊर्व्याय च सूर्म्याय च ॥ ४५ ॥


अर्थ - वाळलेलीं व ओलीं लांकडें, मोठी व बारीक धूळ, अगम्य प्रदेश, बल्वकसंज्ञक तृण, वडवानल, व प्रलय काळचा अग्नि यांत असणार्‍या रुद्राला नमस्कार असो. ॥४५॥





विनियोग -


नमः पर्ण्याय च पर्णशदाय च नमऽउद्‍गुरमाणाय चाभिघ्नते च नम आखिदते च प्रखिदते च नमऽ इषुकृद्भ्यो धनुष्कृभ्यश्च वो नमो नमो वः किरिकेभ्यो देवानाँ हृदयेभ्यो नमो विचिन्वत्केभ्यो नो विक्षिणत्केभ्यो नमऽ आनिर्हतेभ्यः ॥ ४६ ॥


अर्थ - पानें, तशीच पानें पडण्याची जागा, उद्योगी, शत्रुनाशक, अभक्तांना व पापी लोकांना सर्व बाजूंनीं दैन्य उत्पन्न करणारा जो रुद्र त्याला नमस्कार. तसेंच बाण व धनुष्य करणारे, वृष्टिद्वारा जगाची वृद्धि करणारे, हा पापी हा पुण्यवान् असा विभाग करणारे, नाना तर्‍हेनें हिंसा करणारे, सृष्टीच्या आरंभीं उत्पन्न झालेले असे व रुद्रांचे हृदयस्वरूपी असणारे अग्नि, वायु, व सूर्य असे जे रुद्र त्यांना माझा नमस्कार असो. ॥४६॥





विनियोग -


द्रापेऽ अन्धसस्पते दरिद्र नीललोहित । आसां प्रजानामेषां पशूनां मा भेर्मा रोङ्मो च नः किंचनाममत् ॥ ४७ ॥


अर्थ - पापी लोकांना वाईट गति देणारा, सोमाचा (सोमरसाचा) स्वामी, जवळ कोणताही परिग्रह नसलेला, ज्याचा गळा नीलवर्ण व इतर शरीर ताम्रवर्ण आहे अशा हे रुद्रा, शिवा, आमच्या पुत्रादि प्रजांना व गाई वगैरे पशूंना भीति दाखवूं नकोस, त्यांचा भंग करूं नको व त्यांना कोणताही रोग उत्पन्न करूं नकोस. ॥४७॥





विनियोग -


इमा रुद्राय तवसे कपर्दिने क्षयद्वीराय प्रभरामहे मतीः । यथा शमसद्‍द्विपदे चतुष्पदे विश्वं पुष्टं ग्रामेऽ अस्मिन्ननातुरम् ॥ ४८ ॥


अर्थ - आम्ही आपली बुद्धि रुद्राचे स्वाधीन करतों म्हणजे त्याचें स्मरण करतों. त्यायोगें आमच्या पुत्रपशूंना सुख होवो व आमच्या गांवांतील सर्व प्राणी पुष्ट व निरोगी होवोत. तो रुद्र बलवान्, जटाधारी, शत्रुनाशक असा आहे. ॥४८॥





विनियोग -


या ते रुद्र शिवा तनूः शिवा विश्वाहा भेषजी । शिवा रुतस्य भेषजी तया नो मृड जीवसे ॥ ४९ ॥


अर्थ - हे रुद्रा, तुझें सर्वकाळ कल्याणप्रद, व्याधि दूर करणारें जें औषधरूपी असें उत्तम शरीर आहे त्यायोगें आम्हांला वांचण्याकरितां सुखी ठेव. (वांचव व सुखी कर.) ॥४९॥





विनियोग -


परि नो रुद्रस्य हेतिर्वृणक्तु परि त्वेषस्य दुर्मतिरघायोः । अव स्थिरा मघवद्‍भ्यस्तनुष्व मीढ्वस्तोकाय तनयाय मृडय ॥ ५० ॥


अर्थ - हे रुद्रा, तुझें आयुध व रागावलेल्या द्वेषी पुरुषाची दुर्बुद्धि आम्हांला वर्ज्य करोत. म्हणजे त्यांची पीडा आम्हांला न होवो. इष्ट वस्तूंची वृष्टि करणार्‍या हे रुद्रा, तूं आपलीं दृढ धनुष्यें दोरीने रहित करून यजमानांचें भय दूर कर व पुत्रपौत्रांना सुखी कर. ॥५०॥





विनियोग -


मीढुष्टम शिवतम शिवो नः सुमना भव । परमे वृक्षऽ आयुधं निधाय कृत्तिं वसानऽ आचर पिनाकं विभ्रदागहि ॥ ५१ ॥


अर्थ - इष्टफलें व कल्याण यांची अतिशय वृष्टि करणार्‍या रुद्रा, आमच्यावर प्रसन्न हो व दूर असलेल्या झाडांवर त्रिशूलादिक आयुध ठेवून गजचर्म परिधान करून तप कर आणि केवल शोभेकरितां नुसतें धनुष्य घेऊन ये. ॥५१॥





विनियोग -


विकिरिद विलोहित नमस्तेऽ अस्तु भगवः । यास्ते सहस्रँ हेतयोऽन्यमस्मन्निवपन्तु ताः ॥ ५२ ॥


अर्थ - निरनिराळ्या उपद्रवांचा नाश करणार्‍या शुद्धस्वरूपी भगवान् रुद्रा, तुला नमस्कार असो. तुझीं जीं असंख्य आयुधें आहेत तीं आमच्याशिवाय दुसर्‍यावर पडोत. ॥५२॥





विनियोग -


सहस्राणि सहस्रशो बाह्वोस्तव हेतयः । तासामीशानो भगवः पराचीना मुखा कृधि ॥ ५३ ॥


अर्थ - जगाचा स्वामी अशा हे रुद्रा, तुझ्या हातांत जीं हजारों प्रकारची असंख्य आयुधें आहेत त्यांचीं तोंडें (अग्रभाग) आमच्या विरुद्ध दिशांकडे कर म्हणजे आयुधें आमच्यावर चालवूं नकोस. ॥५३॥





विनियोग -


असंख्याता सहस्राणि ये रुद्राऽ अधि भूम्याम् । तेषाँ सहस्रयोजनेऽवधन्वानि तन्मसि ॥ ५४ ॥


अर्थ - पृथ्वीवर जे असंख्य रुद्र हजारों प्रकारांनीं राहतात त्यांचीं असंख्य धनुष्यें आम्ही हजारों कोसांच्या पलीकडील मार्गावर नेऊन टाकतों. ॥५४॥





विनियोग -


अस्मिन् महत्यर्णवेऽन्तरिक्षे भवाऽ अधि । तेषाँ सहस्रयोजनेऽव धन्वानि तन्मसि ॥ ५५ ॥


अर्थ - मोठया व मेघमण्डलयुक्त आकाशांत जे रुद्र राहतात त्यांचीं असंख्य धनुष्यें आम्ही हजारों कोसांच्या पलीकडील मार्गावर नेऊन टाकतो. ॥५५॥





विनियोग -


नीलग्रीवाः शितिकण्ठाः दिवँरुद्राऽ उपश्रिताः । तेषाँ सहस्रयोजनेऽव धन्वानि तन्मसि ॥ ५६ ॥


अर्थ - कांहीं भागांत कृष्णवर्ण व कांहीं भागांत श्वेतवर्ण ज्यांचा कंठ आहे असे द्युलोकांत राहणारे जे रुद्र त्यांचीं असंख्य धनुष्यें हजारों कोसांच्या पलीकडील मार्गावर नेऊन टाकतों. (रुद्रांचे श्वेतकंठ विषभक्षणानें कांहीं भागांत काळे झाले आहेत.) ॥५६॥





विनियोग -


नीलग्रीवाः शितिकण्ठाः शर्वाऽ अधः क्षमाचराः । तेषाँ सहस्रयोजनेऽव धन्वानि तन्मसि ॥ ५७ ॥


अर्थ - कांहीं भागांत कृष्णवर्ण व कांहीं भागांत शुक्लवर्ण ज्यांचा कंठ आहे असे व भूमीचे अधोभागीं पाताळांत राहणारे जे रुद्र त्यांचीं असंख्य धनुष्यें आम्ही हजारों कोसांच्या पलीकडील मार्गावर नेऊन टाकतो. ॥५७॥





विनियोग -


ये वृक्षेषु शष्पिञ्जरा नीलग्रीवा विलोहिताः । तेषाँ सहस्रयोजनेऽव धन्वानि तन्मसि ॥ ५८ ॥


अर्थ - लहान गवताप्रमाणें हिरव्या वर्णाचे व कांहीं भागांत कृष्णवर्ण व कांहीं भागांत शुक्लवर्ण ज्यांचा कंठ आहे असे आणि रक्तरहित असे (रुद्र तेजोमय शरीराचे असल्यामुळें त्यांचे शरीरांत रक्तमांसादि नाहीं) व अश्वत्थादि वृक्षावर राहणारे जे रुद्र त्यांचीं धनुष्यें आम्ही हजारों कोसांच्या पलीकडील मार्गावर नेऊन टाकतो. ॥५८॥





विनियोग -


ये भूतानामधिपतयो विशिखासः कपर्दिनः । तेषाँ सहस्रयोजनेऽव धन्वानि तन्मसि ॥ ५९ ॥


अर्थ - शिरावर केस नसलेले, तसेंच जटाजूटधारीं असलेले व पिशाचांचे अधिपति जे रुद्र त्यांचीं धनुष्यें आम्ही हजारों कोसांच्या पलीकडील मार्गावर नेऊन टाकतों. ॥५९॥





विनियोग -


ये पथां पथिरक्षयऽ ऐलबृदाऽ आयुर्युधः । तेषाँ सहस्रयोजनेऽव धन्वानि तन्मसि ॥ ६० ॥


अर्थ - अन्न देऊन प्राण्यांचें पोषण करणारे व यावज्जीव युद्ध करणारे, लौकिक वैदिक मार्गांचे रक्षण करणारे अधिपति असे जे रुद्र त्यांचीं धनुष्यें आम्ही हजारों कोसांच्या पलीकडील मार्गावर नेऊन टाकतों. ॥६०॥





विनियोग -


ये तीर्थानि प्रचरन्ति सृकाहस्ता निषङ्‍गिणः । तेषाँ सहस्रयोजनेऽव धन्वानि तन्मसि ॥ ६१ ॥


अर्थ - आयुधें हातांत घेऊन व खङग धारण करून जे रुद्र तीर्थांवर गमन करतात त्यांचीं धनुष्यें आम्ही हजारों कोसांच्या पलीकडील मार्गावर नेऊन टाकतो. ॥६१॥





विनियोग -


येऽन्नेषु विविध्यन्ति पात्रेषु पिबतो जनान् । तेषाँ सहस्रयोजनेऽव धन्वानि तन्मसि ॥ ६२ ॥


अर्थ - अन्न खाल्ल्यावर व पाणी प्याल्यावर त्यांत असलेले जे रुद्र तें अन्न खाणार्‍या व तें पाणी पिणार्‍या प्राण्यांना पीडा करतात. त्यांचीं धनुष्यें आम्ही हजारों कोसांच्या पलीकडील मार्गावर नेऊन टाकतों. ॥६२॥





विनियोग -


यऽ एतावन्तश्च भूयाँसश्च दिशो रुद्रा वितस्थिरे । तेषाँ सहस्रयोजनेऽव धन्वानि तन्मसि ॥ ६३ ॥


अर्थ - दहा दिशा व्यापून राहणारे जे पुष्कळ व अतिशय रुद्र आहेत त्यांचीं धनुष्यें आम्ही हजारों कोसांच्या पलीकडील मार्गावर नेऊन टाकतों. ॥६३॥





विनियोग -


नमोऽस्तु रुद्रेभ्यो ये दिवि येषां वर्षमिषवः । तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर्दशोर्ध्वाः । तेभ्यो नमोऽअस्तु ते नोऽवन्तु ते नो मृडयन्तु ते यं द्विष्मो यश्च नो द्वेष्टि तमेषां जम्भे दध्मः ॥ ६४ ॥


अर्थ - जे रुद्र द्युलोकांत राहतात व ज्यांचे बाण वृष्टिरूपी आहेत त्यांना हात जोडून पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर व ऊर्ध्व या दिशांकडे आम्ही दहा अंगुळी करतों म्हणजे सर्व दिशांकडे हात जोडून आम्ही नमस्कार करतों. ते रुद्र आमचें रक्षण करोत व आम्हांला सुख देवोत. जो आमचा द्वेष करतों व आम्ही ज्याचा द्वेष करतों त्या शत्रूला आम्ही रुद्राच्या दाढेंत स्थापन करतों म्हणजे त्याचा नाश होवो. ॥६४॥





विनियोग -


नमोऽस्तु रुद्रेभ्यो येऽन्तरिक्षे येषां वातऽइषवः । तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर्दशोर्ध्वाः । तेभ्यो नमोऽअस्तु ते नोऽवन्तु ते नो मृडयन्तु ते यं द्विष्मो यश्च नो द्वेष्टि तमेषां जम्भे दध्मः ॥ ६५ ॥


अर्थ - जे रुद्र आकाशांत राहतात व ज्यांचे बाण वायुरूपी आहेत त्यांना हात जोडून पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर व ऊर्ध्व या दिशांकडे आम्ही दहा अंगुळी करतों. म्हणजे सर्व दिशांकडे हात जोडून आम्ही नमस्कार करतों. ते रुद्र आमचें रक्षण करोत व आम्हांला सुख देवोत. जो आमचा द्वेष करतों व आम्ही ज्याचा द्वेष करतों त्या शत्रूला आम्ही रुद्राच्या दाढेंत स्थापन करतों, म्हणजे त्याचा नाश होवो. ॥६५॥





विनियोग -


नमोऽस्तु रुद्रेभ्यो ये पृथिव्यां येषामन्नमिषवः । तेभ्यो दश प्राचीर्दश दक्षिणा दश प्रतीचीर्दशोदीचीर्दशोर्ध्वाः । तेभ्यो नमोऽ अस्तु ते नोऽवन्तु ते नो मृडयन्तु ते यं द्विष्मो यश्च नो द्वेष्टि तमेषां जम्भे दध्मः ॥ ६६ ॥


अर्थ - जे रुद्र पृथिवीवर राहतात व ज्यांचे बाण अन्नरूपी आहेत त्यांना हात जोडून पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर व ऊर्ध्व या दिशांकडे आम्ही दहा अंगुली करतों म्हणजे सर्व दिशांकडे हात जोडून आम्ही नमस्कार करतों. ते रुद्र आमचें रक्षण करोत व आम्हांला सुख देवोत. जो आमचा द्वेष करतों व आम्ही ज्याचा द्वेष करतों त्या शत्रूला आम्ही रुद्राचे दाढेंत स्थापन करतों म्हणजे त्याचा नाश होवो. ॥६६॥





॥ षोडशोऽध्यायः ॥
ॐ तत् सत्


GO TOP