शुक्ल यजुर्वेद
सप्तदशोऽध्यायः



विनियोग - सोळाव्या अध्यायांत शतरुद्रिय होम सांगितला. सतराव्या अध्यायांत चित्याग्नीच्या अभिषेकाचे वगैरे मंत्र सांगतात. 'अश्मन्नूर्जम्' या मंत्रानें चित्य अग्नीवर प्रदक्षिणक्रमानें जलधारा धरावी.


अश्मन्नूर्जं पर्वते शिश्रियाणामद्‍भ्यऽ ओषधीभ्यो वनस्पतिभ्योऽ अधि सम्भृतं पयः । तां नऽइषमूर्जं धत्त मरुतः सँरराणाऽअश्मँस्ते क्षुन्मयि तऽ ऊर्ग्यं द्विष्मस्तं ते शुगृच्छतु ॥ १ ॥


अर्थ - उत्तम दानशील अशा मरुद्देवांनो, तुम्ही आम्हांला अन्न व अन्नरस द्या. तें अन्न व तो रस हिमालयादि पर्वतावर राहणारा व बलाचें कारण असा आहे. तसेंच तो रस, जल, यवादि औषधि, अश्वत्थादिवृक्ष यांच्या संबंधानें धेनूपासून दुग्धद्वारा प्राप्त झाला आहे. हे सर्वभक्षक अग्ने, तुला क्षुधा उत्पन्न होवो. व तुझा सारभाग माझे ठायीं असो. हे अग्ने, आम्ही ज्याचा द्वेष करतों त्या पुरुषाकडे तुझा शोक जावो. ॥१॥





विनियोग - नंतर 'इमा मे' व 'अग्न इष्टकाः' या दोन मंत्रांचा जप करावा.


इमा मेऽअग्नऽइष्टका धेनवः सन्त्वेका च दश च दश च शतं च शतं च सहस्रं च सहस्रं चायुतं चायुतं च नियुतं च नियुतं च प्रयुतं चार्बुदं च न्यर्बुदं च समुद्रश्च मध्यं चांतश्च परार्धश्चैता मे ऽ अग्नऽइष्टका धेनवः सन्त्वमुत्रामुष्मिँल्लोके ॥ २ ॥


अर्थ - हे अग्ने, या पांच चितीवर मीं स्थापन केलेल्या इष्टका माझ्या इच्छा पूर्ण करणार्‍या होवोत. (या ठिकाणीं एकापासून परार्धपर्यंत संख्या सांगितली आहे. पहिल्या संख्येच्या दसपट दुसरी संख्या आहे) एक, दहा, शंभर, हजार, दहाहजार, लक्ष, दशलक्ष, कोटि, दशकोटि, अब्ज, खर्व, निखर्व, महापद्म, शंकु, समुद्र, मध्य, अन्त, आणि परार्ध (या अठरा संख्या यांत कांहींचीं नांवें सांगितलीं आहेत तीं अवशिष्ट संख्यांचीं उपलक्षण समजावीत.) हे अग्ने, एतत्संख्याक इष्टका अन्यजन्मांत व अन्यलोकांत इष्टफलें देणार्‍या होवोत. ॥२॥





विनियोग -


ऋतव स्थ ऽ ऋतावृध ऽ ऋतुष्ठा स्थ ऽ ऋतावृधः । घृतश्चुतो मधुश्चुतो विराजो नाम कामदुघा ऽ अक्षीयमाणाः ॥ ३ ॥


अर्थ - हे इष्टकांनो, तुम्ही आमच्या इच्छा पूर्ण करणार्‍या व्हा. तुम्ही वसंतादि ऋतुस्वरूपी, यज्ञ वाढविणार्‍या, वसंतादि ऋतूंत राहणार्‍या, घृत व मधु ज्यांतून गळतें अशा, विशेषेंकरून शोभणार्‍या, म्हणून प्रसिद्ध असलेल्या इष्टफल देणार्‍या व क्षय न पावणार्‍या अशा आहांत. ॥३॥





विनियोग - 'समुद्रस्य त्वा' इत्यादि सात मंत्रांनीं बांबूनें अग्नीचे जागीं सात रेघा ओढाव्या.


समुद्रस्य त्वावकयाग्ने परिव्ययामसि । पावकोऽअस्मभ्यँ शिवो भव ॥ ४ ॥


अर्थ - हे अग्ने, भिजविणारें जें जल त्याचे शेवाळानें आम्ही तुला सर्व बाजूंनीं वेष्टित करतों. तूं आम्हांला पवित्र करणारा व आमचें कल्याण करणारा हो. ॥४॥





विनियोग -


हिमस्य त्वा जरायुणाग्ने परिव्ययामसि । पावकोऽअस्मभ्यँ शिवो भव ॥ ५ ॥


अर्थ - जरायु (गर्भवेष्टन) प्रमाणें शैत्याचें उत्पत्तिस्थान जें शेवाळ त्यायोगें आम्ही तुझें सर्व बाजूंनीं वेष्टन करतों. तूं आम्हांला पवित्र करणारा व आमचें कल्याण करणारा हो. ॥५॥





विनियोग -


उप ज्मन्नुप वेतसेऽवतर नदीष्वा । अग्ने पित्तमपामसि मण्डूकि ताभिरागहि सेमं नो यज्ञं पावकवर्णँ शिवं कृधि ॥ ६ ॥


अर्थ - हे अग्ने, पृथिवीवर, वेताच्या शाखेवर व जलांत शेवाळावर उतर. कारण कीं, तूं जलांचें तेज आहेस. तसेंच हे मण्डूकि, त्या जलांसह येथें ये व आम्ही केलेल्या अग्नीप्रमाणें तेजस्वी अशा यज्ञाला सुखप्रद कर. ॥६॥





विनियोग -


अपामिदं न्ययनँ समुद्रस्य निवेशनम् । अन्याँस्तेऽअस्मत्तपन्तु हेतयः पावकोऽअस्मभ्यँ शिवो भव ॥ ७ ॥


अर्थ - हें चित्याग्निस्थान जलप्राप्तीचें साधन आहे. तसेंच तें समुद्राच्या घरासारखें आहे. अशा हे अग्ने, तुझ्या ज्वाला आमच्याहून इतर असे जे आमचे विरोधी त्यांना ताप देवोत व तूं आम्हांला पवित्र करणारा आणि शांत हो. ॥७॥





विनियोग - 'अग्ने पावक' या मंत्रानें पक्ष व पुच्छ यांवर रेघ ओढावी.


अग्ने पावक रोचिषा मन्द्रया देव जिह्वया । आ देवान्वक्षि यक्षि च ॥ ८ ॥


अर्थ - हे शुद्ध करणार्‍या प्रकाशक अग्ने, प्रकाशक अशा ज्वालासमुदायानें आहवनीयस्वरूपानें तूं स्थित आहेस. तूं देवांना बोलाव व त्यांचा याग कर. ॥८॥





विनियोग -


स नः पावक दीदिवोऽग्ने देवाँ२ऽ इहावह । उप यज्ञँ हविश्च नः ॥ ९ ॥


अर्थ - हे शुद्ध करणार्‍या दीप्तिमान् अग्ने, देवांना आमच्या यज्ञांत आण व यज्ञासमीप असलेलें हविर्द्रव्य देवांकडे ने. ॥९॥





विनियोग -


पावकया यश्चितयन्त्या कृपा क्षामन् रुरुचऽउषसो न भानुना । तूर्वन्न यामन्नेतशस्य नू रणऽआ यो घृणे न ततृषाणोऽ अजरः ॥ १० ॥


अर्थ - हे अग्ने, उषःकाल स्वप्रकाशानें शोभतात त्याप्रमाणें जो अग्नि शुद्ध करणार्‍या चेतनोत्पादक सामर्थ्यानें पृथ्वीवर शोभतो व जो दीप्तिमान् अग्नि गमनकुशल अशा अश्वाच्या नियमन करणार्‍या युद्धांत शत्रुसैन्यांचीं हिंसा करणारा असाच कीं काय शोभतो व जो पूर्णाहुतिविषयीं तहानलेला व जरारहित आहे त्या अग्नीचें आम्ही कर्षण करतों. ॥१०॥





विनियोग - 'नमस्ते' या मंत्रानें स्रुचेंतील आज्य व पात्री घेऊन अध्वर्यूनें चित्याग्नीवर आरोहण करावें.


नमस्ते हरसे शोचिषे नमस्तेऽ अस्त्वर्चिषे ।अन्याँस्ते अस्मत्तपन्तु हेतयः पावकोऽअस्मभ्यँ शिवो भव ॥ ११ ॥


अर्थ - हे अग्ने, सर्व रसांना हरण करणार्‍या व प्रकाशक अशा तुझ्या तेजाला नमस्कार असो. तसेंच पदार्थप्रकाशक अशा तुझ्या ज्वालेला नमस्कार असो. हे अग्ने, तुझ्या ज्वाला आमच्याहून इतर असे जे आमचे विरोधी त्यांना ताप देवोत व तूं आम्हांला पवित्र करणारा आणि शांत हो. ॥११॥





विनियोग - 'नृषदेवेट्' इत्यादि पांच मंत्रभागांनीं पांच आज्य आहुतींचा होम करावा.


नृपदे वेडप्सुषदे वेड् बर्हिषदे वेड् वनसदे वेट् स्वर्विदे वेट् ॥ १२ ॥


अर्थ - मनुष्यांमध्यें जठराग्निस्वरूपानें, जलांत और्व-अग्निस्वरूपानें, यज्ञांत आहवनीय अग्निस्वरूपानें, व वृक्षांत दावाग्निस्वरूपानें व स्वर्गांत आदित्यरूपानें रहाणार्‍या अग्नीला हें हवि, सुहुत असो. ॥१२॥





विनियोग - 'ये देवा' इत्यादि दोन मंत्रांनीं अग्नीवर प्रोक्षण करावें.


ये देवा देवानां यज्ञिया यज्ञियानाँ संवत्सरीणमुप भागमासते । अहुतादो हविषो यज्ञेऽ अस्मिन्त्स्वयं पिबन्तु मधुनो घृतस्य ॥ १३ ॥


अर्थ - हे प्राणरूपी देव या चयन यज्ञामध्यें मध व दही घृत एतद्‌रूपी हविर्भागाचें स्वतः सेवन करोत. हे प्राणादि देव अग्नींत दिलेलें हवि भक्षण करीत नाहींत; तर प्रत्यक्षच अन्न भक्षण करतात. तसेच ते संवत्सरपर्यंत उपभोग सेवन करितात व यज्ञार्ह देवांमध्यें ते विशेषेंकरून शोभणारे व यज्ञयोग्य असे आहेत. ॥१३॥





विनियोग -


ये देवा देवष्वधि देवत्वमायन्ये ब्रह्मणः पुरऽ एतारोऽ अस्य । येभ्यो नऽ ऋते पवते धाम किञ्चन न ते दिवो न पृथिव्याऽ अधि स्नुषु ॥ १४ ॥


अर्थ - जे प्राणदेव इंद्रादिकांच्या ठिकाणीं अधिष्ठाते होऊन देवत्व प्राप्त करते झाले व जे या देवाच्यापुढें गमन करतात व ज्यांच्या वांचून कोणतेंही शरीर हालचाल करूं शकत नाहीं, ते प्राणरूपी देव स्वर्गावर रहात नाहींत व पृथ्वीवरही रहात नाहींत तर चक्षुरादि इंद्रियांमध्यें राहतात. ॥१४॥





विनियोग - 'प्राणदा' या मंत्रानें अग्निवरून खालीं उतरावें.


प्राणदाऽ अपानदा व्यानदा वर्चोदा वरिवोदाः । अन्याँस्तेऽ अस्मत्तपन्तु हेतयः पावकोऽअस्मभ्यँ शिवो भव ॥ १५ ॥


अर्थ - हे अग्ने, तुझ्या ज्वाला आमच्याहून इतर असे जे आमचे विरोधी त्यांना ताप देवोत व तूं आम्हांला पवित्र करणारा आणि शांत हो. तूं यजमानाला प्राण, अपान, व्यान, बल व धन देणारा आहेस. ॥१५॥





विनियोग - 'अग्निस्तिग्मेन' या मंत्रानें अग्नींत घृताचा होम करावा.


अग्निस्तिग्मेन शोचिषा यासद्विश्वं न्यत्रिणम् । अग्निर्नो वनते रयिम् ॥ १६ ॥


अर्थ - अग्नि सर्व राक्षसांना आपल्या तीक्ष्ण तेजानें अतिशय क्षीण करो आणि तो अग्नि आम्हांला द्रव्य देवो. ॥१६॥





विनियोग - 'य इमा' या ऋचेपासून आठ ऋचांनीं आज्याचा अग्नीमध्यें होम करावा.


यऽ इमा विश्वा भुवनानि जुह्वदृपिर्होता न्यसीदत्पिता नः । सऽ आशिषा द्रविणमिच्छमानः प्रथमच्छदवराँ२ऽ आविवेश ॥ १७ ॥


अर्थ - जो विश्वकर्मा या सर्व भूतजातीचा संहार करून स्थित होता झाला तो अतींद्रियद्रष्टा संहाररूपी होमाचा कर्ता, आमचा पिता असा आहे. तो परमेश्वर 'बहु स्यां प्रजायेव' अशा रीतीनें सृष्टीची इच्छा करून जगद्रूपी धनाची अपेक्षा करून जीवरूपानें सर्व उपाधींत प्रविष्ट होता झाला. त्यानें प्रथम अद्वितीय स्वरूपाचें आच्छादन केलें व उत्कृष्ट रूपाचें आवरण करून तो त्यांत शिरला. ॥१७॥





विनियोग -


किँस्विदासीदधिष्ठानमारम्भणं कतमस्वित्कथासीत् । यतो भूमिं जनयन्विश्वकर्मा वि द्यामौर्णोन्महिना विश्वचक्षाः ॥ १८ ॥


अर्थ - (ईश्वराचा सृष्टीचा प्रकार प्रश्नोत्तररूपानें सांगतात) द्यावाभूमी निर्माण करणार्‍या विश्वकर्म्याचें अधिष्ठान म्हणजे बसावयाची जागा काय बरें असावी ? या जगाचें उपादान कारण काय असावें व निमित्तकारण कोणतें असावें, कारण ज्यावेळीं सर्वद्रष्टया विश्वकर्म्यानें भूमि व स्वर्ग उत्पन्न करून आपल्या सामर्थ्यानें द्यावापृथिवीचें आच्छादन केलें त्यावेळीं अधिष्ठान काय होतें वगैरे प्रश्न ॥१८॥





विनियोग -


विश्वतश्चक्षुरुत विश्वतोमुखो विश्वतोबाहुरुत विश्वतस्पात् । सं बाहुभ्यां धमति सं पतत्रैर्द्यावाभूमी जनयन्देवऽ एकः ॥ १९ ॥


अर्थ - उत्तर - एकटा विश्वकर्मा ईश्वर कोणाचेहीं साह्य न घेतां धर्माधर्मरूपी निमित्तकारणानें व अनित्य अशा पंच महाभूत उपादानकारणानें द्यावापृथ्वींना उत्पन्न करतो. तो सर्वद्रष्टा सर्व बाजूला मुखें, बाहू व पाय असलेला असा आहे. ॥१९॥





विनियोग -


किँस्विद्वनं कऽ उ स वृक्षऽ आस यतो द्यावापृथिवी निष्टतक्षुः । मनीषिणो मनसा पृच्छतेदु तद्यदध्यतिष्ठद्‍भुवनानि धारयन् ॥ २० ॥


अर्थ - पुनः प्रश्न - सुताराला घर निर्माण करण्याचे वेळीं रानांतील झाड लागतें त्याप्रमाणें या विश्वकर्म्यानें कोणतें अरण्य व कोणतें झाड घेतलें कीं, ज्यापासून यानें द्यावापृथिवी निर्माण केली. तसेंच विद्वानांनो, विश्वकर्म्यानें भुवनें धारण करतांना कोणत्या स्थानावर आरोहण केलें त्याविषयीचा प्रश्नही तुम्ही विचारपूर्वक विचारा. ॥२०॥





विनियोग -


या ते धामानि परमाणि यावमा या मध्यमा विश्वकर्मन्नुतेमा । शिक्षा सखिभ्यो हविषि स्वधावः स्वयं यजस्व तन्वं वृधानः ॥ २१ ॥


अर्थ - हे हविर्लक्षण अन्नवन्, विश्वकर्म्या, तुझीं उत्कृष्ट, कनिष्ठ व मध्यम स्थानें या मित्रभूत यजमानांना दे. यजमानाचें हविर्द्रव्य तुझ्यासंनिध उपस्थित झालें असतां आपलें शरीर वाढव व तूंच याग कर (कारण तुझा याग करण्याचें यजमानांना काय सामर्थ्य आहे? तूं तुझाच याग करून घे.) ॥२१॥





विनियोग -


विश्वकर्मन्हविषा वावृधानः स्वयं यजस्व पृथिवीमुत द्याम् । मुह्यन्त्वन्येऽ अभितः सपत्नाऽ इहास्माकं मघवा सूरिरस्तु ॥ २२ ॥


अर्थ - हे विश्वकर्म्या, मीं दिलेल्या हविर्द्रव्यानें वाढून म्हणजे हर्षयुक्त होऊन माझ्यावर कृपा करून माझ्या यज्ञांत पृथ्वीवरील व द्युलोकावरील भूतांचा याग कर. व तुझ्या प्रसादानें दुसरे सर्वत्र असलेले शत्रु मोह पावोत व या यज्ञांत इन्द्र आमचा ज्ञानोपदेशक गुरु असो. ॥२२॥





विनियोग -


वाचस्पतिं विश्वकर्माणमूतये मनोजुवं वाजेऽ अद्या हुवेम । स नो विश्वानि हवनानि जोषद्विश्वम्भूरवसे साधुकर्मा ॥ २३ ॥


अर्थ - आज मी अन्नप्राप्तीकरितां व रक्षणाकरितां इंद्राला बोलावतों तो इंद्र वाणीचा अधिपति, जगदुत्पत्त्यादि सर्व कर्मे करणारा व मनाप्रमाणें वेगवान् आहे. त्या जगत्कल्याणकारी व उत्तम कर्मे करणार्‍या इंद्रानें आमचीं सर्व बोलावणीं अन्नवृद्धीकरितां प्रीतीनें स्वीकारावींत. ॥२३॥





विनियोग -


विश्वकर्मन् हविषा वर्धनेन त्रातारमिन्द्रमकृणोरवध्यम् । तस्मै विशः समनमन्त पूर्वीरयमुग्रो विहव्यो यथासत् ॥ २४ ॥


अर्थ - हे विश्वकर्म्या, वृद्धि करणार्‍या हविर्द्रव्यानें तूं जगाच्या रक्षण करणार्‍या इंद्राला अवध्य केलेंस. त्या इंद्राला पूर्वीच्या प्रजांनीं व वशिष्ठादिकांनीं नमन केलें. कारण कीं, हा इंद्र उग्र असून विविध कार्यांत बोलविला जातो. ॥२४॥





विनियोग - 'चक्षुषः पिता' इत्यादि आठ ऋचांनीं अग्नींत आज्याचा होम करावा.


चक्षुषः पिता मनसा हि धीरो घृतमेनेऽ अजनन्नम्नमाने । यदेदन्ताऽ अददृहन्त पूर्वऽ आदिद्‍द्यावापृथिवीऽ अप्रथेताम् ॥ २५ ॥


अर्थ - पूर्वीच्या वसिष्ठादि मुनींनीं द्यावापृथिवींचे प्रांतभाग दृढ केल्याबरोबरच द्यावापृथिवी लोक विस्तीर्ण झाले. नंतर चक्षुरादि इंद्रियांच्या पालक अशा विश्वकर्म्यानें मनानें निश्चय करून नम्र होणार्‍या द्यावापृथिवींना आडवून धरलें व त्यांवर जलवृष्टि केली. ॥२५॥





विनियोग -


विश्वकर्मा विमनाऽ आद्विहाया धाता विधाता परमोत सन्दृक् । तेषामिष्टानि समिषा मदन्ति यत्रा सप्तऽ ऋषीन्परऽ एकमाहुः ॥ २६ ॥


अर्थ - (विश्वकर्म्याशीं ज्यांचें ऐक्य झालें त्याबद्दल सूज्ञ असें म्हणतात) सप्तर्षी ज्या लोकांत विश्वकर्म्याशीं एकत्वाला प्राप्त होतात; तेथें विश्वकर्म्याकडून पाहिल्या गेलेल्या अशा त्यांच्या अभीष्ट वस्तु आहुतिरसभूत अन्नासह वृद्धिंगत होतात. तो विश्वकर्मा विशिष्टज्ञानवान् व आकाशाप्रमाणें व्यापक आहे. तसेंच तो पोषण करणारा, उत्पादक व सर्वश्रेष्ठ आहे. ॥२६॥





विनियोग -


यो नः पिता जनिता यो विधाता धामानि वेद भुवनानि विश्वा । यो देवानां नामधाऽ एकऽ एव तँ सम्प्रश्नं भुवना यन्त्यन्या ॥ २७ ॥


अर्थ - जो विश्वकर्मा आमचा पालक, उत्पादक व विशेषेंकरून धारण करणारा आहे तो आमच्या सर्व स्थानांना जाणतो. जो अद्वितीय असून सर्व देवांचें नामकरण करतो; तसेंच बाकीचे भूतसमुदाय त्याला आपआपले अधिकार विचारण्यास येतात म्हणजे तोच त्यांना कामें नेमून देतो. ॥२७॥





विनियोग -


तऽ आयजन्त द्रविणँ समस्माऽ ऋषयः पूर्वे जरितारो न भूना । असूर्ते सूर्ते रजसि निषत्ते ये भूतानि समकृण्वन्निमानि ॥ २८ ॥


अर्थ - विश्वकर्म्यानें उत्पन्न केलेले असे वसिष्ठादि पूर्वऋषि सर्व प्राणिसमुदायाला जलरूपी द्रव्य युक्तिनें देते झाले त्यांनीं तें त्याला एकदम पुष्कळ देऊन टाकलें नाहीं. ते वसिष्ठादि ऋषि स्तुति करणारे, भूतावर जलवृष्टि करणारे, सप्तदशव्यवात्मक लिंगशरीर देऊन त्यांची प्रेरणा करणारे व विस्तीर्ण अशा अंतरिक्ष लोकांत स्थित होणारे असे आहेत. ॥२८॥





विनियोग -


परो दिवा परऽ एना पृथिव्या परो देवेभिरसुरैर्यदस्ति । कँस्विद् गर्भं प्रथमं दध्रऽ आपो यत्र देवाः समपश्यन्त पूर्वे ॥ २९ ॥


अर्थ - (यापुढें वेदान्तविषयक प्रश्नोत्तरें आहेत.) जें हें हृदयपुण्डरीकांत ईश्वरतत्त्व आहे; द्युलोक तसेंच देव व राक्षस यांपासून फारच दूर आहे म्हणजे या सर्वांपेक्षा हें अत्यंत विलक्षण आहे. जलांनीं प्रथम ज्यांत वसिष्ठादि पूर्वऋषींनीं जगत् पाहिलें असा कोणता गर्भ धारण केला बरें ? ॥२९॥





विनियोग -


तमिद्‍गर्भं प्रथमं दध्रऽ आपो यत्र देवाः समगच्छन्त विश्वे । अजस्य नाभावध्येकमर्पितं यस्मिन् विश्वानि भुवनानि तस्थुः ॥ ३० ॥


अर्थ - ज्यांत सर्व देव एकत्र होऊन राहतात असाच गर्भ जलांनीं धारण केला. जन्म रहित परमेश्वराच्या नाभींत (मध्यभागांत) परमेश्वराशीं अभिन्न असलेला असा एक गर्भ स्थापन केला आहे; त्यांत हीं सर्व भूतें स्थित आहेत. ॥३०॥





विनियोग -


न तं विदाथ यऽ इमा जजानान्यद्युष्माकमन्तरं बभूव । नीहारेण प्रावृता जल्प्या चासुतृपऽ उक्थशासश्चरन्ति ॥ ३१ ॥


अर्थ - हे जीवांनो, ज्यानें हें जग निर्माण केलें त्या विश्वकर्म्याला तुम्ही ओळखत नाही. कारण तुमचें परिचित जें जीवस्वरूप त्याचेही आंत तें आत्मस्वरूप आहे. तुम्हाला न कळण्याचें कारण कीं तुम्ही देवाप्रमाणें पसरलेल्या अज्ञानानें आवृत, मी व माझे या असत्य भाषणानें भरलेले व केवळ इंद्रिय उपभोगांत संतोष पावणारे आहांत. ॥३१॥





विनियोग -


विश्वकर्मा ह्यजनिष्ट देवऽ आदिद्‍गन्धर्वोऽ अभावद् द्वितीयः । तृतीयः पिता जनितौषधीनामपां गर्भं व्यदधात्पुरुत्रा ॥ ३२ ॥


अर्थ - ब्रह्माण्डोत्पत्तिसमयीं देवतीर्यगादि जगाचा स्रष्टा ब्रह्मदेव प्रथम उत्पन्न झाला. त्यापासूनच दुसरा पृथिवी धारण करणारा अग्नि उत्पन्न झाला. नंतर तिसर्‍यानें सर्वांचा पालक व औषधींचा उत्पादक असा पर्जन्य उत्पन्न झाला व तो पुष्कळ पदार्थ निर्माण करणारा जलांचा गर्भ धारण करतों. ॥३२॥





विनियोग -


आशुः शिशानो वृषभो न भीमो घनाघनः क्षोभणश्चर्षणीनाम् । संक्रन्दनोऽनिमिषऽ एकवीरः शतँ सेनाऽ अजयत्साकमिद्रः ॥ ३३ ॥


अर्थ - शीघ्रगामी, वज्र तीक्ष्ण करणारा, वृषभाप्रमाणें भयंकर, शत्रूंचा अत्यंत घातक, मनुष्यांना क्षुब्ध करणारा, शत्रूंना भयप्रद असा ध्वनि करणारा, डोळ्यांना पापण्या नसलेला, (देवांच्या डोळ्यांना पापण्या नसतात) व दुसर्‍यांच्या सहाय्यावांचून एकटाच शत्रू जिंकणारा, इंद्र एकदमच इतिसंख्याक शत्रुसेनेला जिंकतो. ॥३३॥





विनियोग -


संक्रन्दनेनानिमिषेण जिष्णुना युत्कारेण दुश्च्यवनेन धृष्णुना । तदिन्द्रेण जयत तत्सहध्वं युधो नरऽ इषुहस्तेन वृष्णा ॥ ३४ ॥


अर्थ - हे युद्ध करणार्‍या पुरुषांनों, इंद्राच्या सहाय्यानें तुम्ही शत्रुसैन्याचा पराजय करा व त्याचा नाश करा. तो इंद्र शब्द करणारा निमेषभरही दुर्लक्ष न करणारा, विजयी, युद्ध करणारा, अजय्य, भीतिरहित, वारुणादि आयुध विशिष्ट व इष्ट फलांची वृष्टि करणारा आहे. ॥३४॥





विनियोग -


सऽ इषुहस्तैः स निषङ्‍गिभिर्वशी सँस्रष्टा स युधऽ इन्द्रो गणेन । सँसृष्टजित्सोमपा बाहुशर्ध्युग्रधन्वा प्रतिहिताभिरस्ता ॥ ३५ ॥


अर्थ - बाण व भाते धारण करणार्‍या योध्यांशीं युक्त असलेला, शत्रूंना वश करणारा, रिपुसमुदायांबरोबर युद्ध करणारा, युद्धास आलेल्या शत्रूंचा पराजय करणारा, सोमपानकर्ता, ज्याचे बाहु बलयुक्त आहेत असा, उग्र धनुष्य धारण करणारा, धनुष्यानें बाणसंधान करून शत्रूंचा नाश करणारा इंद्र आमचें रक्षण करो. ॥३५॥





विनियोग -


बृहस्पते परिदीया रथेन रक्षोहामित्राँ२ऽ अपबाधमानः । प्रभञ्जन्त्सेनाः प्रमृणो युधा जयन्नस्माकमेध्यविता रथानाम् ॥ ३६ ॥


अर्थ - हे इंद्रा, तूं रथावर बसून गमन सर्वत्र कर व आमच्या रथांचें रक्षण कर. तूं राक्षसांना मारणारा, शत्रूंना पीडा करणारा, परकीय सेनांचा विनाशक व युद्धामध्यें हिंसकांचा पराजय करणारा आहेस. ॥३६॥





विनियोग -


बलविज्ञाय स्थविरः प्रवीरः सहस्वान् वाजी सहमानऽ उग्रः । अभिवीरोऽ अभिसत्वा सहोजा जैत्रमिन्द्र रथमातिष्ठ गोवित् ॥ ३७ ॥


अर्थ - हे इंद्रा, तूं विजयी रथावर आरोहण कर. तूं सैन्यावरून ओळखला जाणारा, पुरातन काळापासून सर्वांचा शिक्षक, अत्यंत शूर, बलवान्, अन्नवान्, शत्रूंचा पराजय करणारा, क्रूर, ज्याचे सर्व बाजूंनीं शूर असे योद्धे व परिचारक आहेत असा, केवळ बळापासूनच उत्पन्न झालेला म्हणूनच इतक्या बलानें युक्त व स्तुतिरूपी वाणी जाणणारा आहेस. ॥३७॥





विनियोग -


गोत्रभिदं गोविदं वज्रबाहुं जयन्तमज्म प्रमृणंतमोजसा । इमँ सजाताऽ अनु वीरयध्वमिन्द्रँ सखायोऽ अनु सँरभध्वम् ॥ ३८ ॥


अर्थ - हे इंद्राच्या मित्रभूत देवांनो, पराक्रम करणार्‍या इंद्राचें मागें जाऊन शौर्य करून त्याला प्रोत्साहन द्या व वेगवान् अशा त्याचे मागें जाऊन तुम्हीही वेगवान् व्हा. तो इंद्र मेघनाशक, पण्डित, वज्रहस्त, युद्धांत विजयी व बलानें शत्रूंचा नाश करणारा आहे. ॥३८॥





विनियोग -


अभि गोत्राणि सहसा गाहमानोऽदयो वीरः शतमन्युरिन्द्रः । दुश्च्यवनः पृतनाषाडयुध्योऽस्माकँ सेनाऽ अवतु प्र युत्सु ॥ ३९ ॥


अर्थ - इंद्र युद्धामध्यें आमच्या सेनांचें उत्तम तर्‍हेनें रक्षण करो. तो आसुरकुलनाशक, निर्दय, शूर, शंभर यज्ञ करणारा, अजेय, सेनेचा पराजय करणारा व कोणालाही युद्ध करण्यास कठीण असा आहे. ॥३९॥





विनियोग -


इन्द्रऽ आसां नेता बृहस्पतिर्दक्षिणा यज्ञः पुरऽ एतु सोमः । देवसेनानामभिभञ्जतीनां जयन्तीनां मरुतो यन्त्वग्रम् ॥ ४० ॥


अर्थ - इंद्र व बृहस्पति या शत्रूनाशक व विजयी देवसेनांना वाहून नेवो. यज्ञपुरुष विष्णु त्या सेनांचें दक्षिणेकडे, सोम त्यांचे पूर्वभागीं व मरुद्गण त्यांचे अग्रभागीं गमन करोत. ॥४०॥





विनियोग -


इंद्रस्य वृष्णो वरुणस्य राज्ञऽ आदित्यानां मरुताँ शर्धऽ उग्रम् । महामनसां भुवनच्यवानां घोषो देवानां जयतामुदस्थात् ॥ ४१ ॥


अर्थ - अभीष्टफल देणार्‍या इंद्राच्या, वरुणराजाच्या, द्वादश आदित्यांच्या व युद्धांत स्थिर चित्त असलेल्या, भुवनांचा भ्रंश करण्यास समर्थ आणि विजयी अशा मरुद्गणांचें सैन्य उठलें व त्यांतून 'जिंकले, जिंकले' असा मोठा शब्द उत्पन्न झाला. ॥४१॥





विनियोग -


उद्धर्षय मघवन्नायुधान्युत्सत्वनां मामकानां मनाँसि । उद्वृत्रहन् वाजिनां वाजिनान्युद्रथानां जयतां यन्तु घोषाः ॥ ४२ ॥


अर्थ - हे इंद्रा, आपलीं आयुधें व माझ्या योध्यांचीं मनें हर्षित कर. तसेंच वृत्रघातका, घोडयांना लवकर लवकर गमन करावयास लाव. जय मिळविणार्‍या रथांचे शब्द निघूं दे. ॥४२॥





विनियोग -


अस्माकमिंद्रः समृतेषु ध्वजेष्वस्माकं याऽ इषवस्ता जयन्तु । अस्माकं वीराऽ उत्तरे भवन्त्वस्माँ२ऽ उ देवाऽ अवता हवेषु ॥ ४३ ॥


अर्थ - आमचे व शत्रूंचे ध्वज एकत्र झाले असतां म्हणजे घनघोर लढाई सुरू असतां इंद्र आमचें रक्षण करो. त्यावेळीं आमच्या वीरांनीं सोडलेले बाण शत्रुसैन्यांना जिंकोत. आमचेकडील योद्धे शत्रुकडील योध्यांपेक्षां उत्कृष्ट ठरोत; आणि हे देवांनो, यज्ञांत आम्ही बोलावल्यावर आमचें रक्षण करा. ॥४३॥





विनियोग -


अमीषां चित्तं प्रतिलोभयन्ती गृहाणाङ्‍गान्यप्वे परेहि । अभि प्रेहि निर्दह हृत्सु शोकैरन्धेनामित्रास्तमसा सचन्ताम् ॥ ४४ ॥


अर्थ - हे व्याधिरूपी देवते, तूं शत्रूंच्या चित्तांत मोह उत्पन्न करून त्यांचीं गात्रें हरण करून घेऊन ये. पुन्हा दुसर्‍या शत्रूंना पकडण्याकरितां त्यांचे समुदायांत गमन कर व त्यांच्या हृदयात (धनपुत्रादिकांचा) शोक उत्पन्न करून त्यांना पीडा कर; व शत्रु गाढ अंधकारांत मग्न होवोत. ॥४४॥





विनियोग -


अवसृष्टा परातप शरव्ये ब्रह्मसँशिते । गच्छामित्रान्प्रपद्यस्व मामीषां कञ्चनोच्छिषः ॥ ४५ ॥


अर्थ - ब्रह्मदेवानें तीक्ष्ण केलेल्या हिंसक बाणरूपी शस्त्रा, आमच्या हातून सुटून तूं परसैन्यांत पतन पाव व शत्रूजवळ जाऊन त्यांचे शरीरांत प्रवेश कर व त्या शत्रूंपैकीं एकही मनुष्य शिल्लक ठेवूं नकोस, सर्वांस मार. ॥४५॥





विनियोग -


प्रेता जयता नरऽ इन्द्रोवः शर्म यच्छतु । उग्रा वः सन्तु बाहवोऽनाधृष्या यथासथ ॥ ४६ ॥


अर्थ - हे अस्मत्पक्षीय योध्यांनो, तुम्ही शत्रुसैन्यावर चाल करून जा व विजय मिळवा. इंद्र तुम्हांला विजय सुख देवो. तुमचा कोणीही तिरस्कार करणार नाही असे तुमचे बाहु उग्र होवोत. ॥४६॥





विनियोग -


असौ या सेना मरुतः परेषामभ्यैति नऽ ओजसा स्पर्धमाना । तां गूहत तमसापव्रतेन यथामीऽ अन्योऽ अन्यं न जानन् ॥ ४७ ॥


अर्थ - हे मरुद्गणांनो, बलानें स्पर्धा करणारी जी ही शत्रूंची सेना आमच्यावर चाल करून येत आहे, तिला गाढ अंधकारांत मग्न करा. ज्या अंधकारांत कोणतेंही कार्य सुचत नाहीं, अशा अंधकारांत शत्रुसैन्याला तुम्ही इतके बुडवून टाका कीं, ते शत्रुसैन्यांतील लोक एकमेकांना देखील ओळखूं शकणार नाहींत. ॥४७॥





विनियोग -


यत्र बाणाः सम्पतन्ति कुमारा विशिखाऽ इव । तन्नऽ इन्द्रो बृहस्पतिरदितिः शर्म यच्छतु विश्वाहा शर्म यच्छतु ॥ ४८ ॥


अर्थ - शिखा नसलेले म्हणजे ज्यांचें चौलकर्म झालें नाहीं अर्थात् तीन वर्षांचे आतील वयाचे बालक ज्याप्रमाणें चपळपणानें इकडे तिकडे धावतात; त्याप्रमाणें शत्रूंचे बाण सर्व बाजूंनीं ज्या युद्धांत पडतात त्या युद्धांमध्यें इन्द्र आम्हांला विजयजन्य सुख देवो. तो युद्धांतील अस्त्रांचे मंत्र जाणणारा, अखण्डितशक्ति व सर्व शत्रूंना मारणारा आहे. (आदर दाखविण्यांकरितां तो इन्द्र आम्हांस विजय देवो अशा अर्थाचे शब्द मंत्रांत पुन्हा आले आहेत.) ॥४८॥





विनियोग - 'मर्माणि ते' या मंत्रानें अध्वर्यूनें क्षत्रियाला कवच द्यावें.


मर्माणि ते वर्मणा छादयामि सोमस्त्वा राजामृतेनानुवस्ताम् । उरोर्वरीयो वरुणस्ते कृणोतु जयन्तं त्वानु देवा मदन्तु ॥ ४९ ॥


अर्थ - हे यजमाना, मी कवचाने तुझ्या स्थानांना झांकतों. सोमराजा मरणनिवारक कवचानें तुझें आच्छादन करो. तसेंच वरुण कवचाला अतिशय विस्तृत करो व देव जय मिळविण्याच्या कामीं तुला अनुकूल होवोत. ॥४९॥





विनियोग - 'उदेनम्' या तीन मंत्रांनीं तीन उंबरांच्या समिधांचा होम करावा.


उदेनमुत्तरां नयाग्ने घृतेनाहुत । रायस्पोषेण सँसृज प्रजया च बहुं कृधि ॥ ५० ॥


अर्थ - घृताच्या आहुति ज्यांत दिलेल्या आहेत अशा, हे अग्ने, या यजमानांना उत्कृष्ट ऐश्वर्य दे. त्याला पुष्कळ धनसमृद्धि व पुष्कळ प्रजा दे. ॥५०॥





विनियोग -


इन्द्रेमं प्रतरां नय सजातानामसद्वशी । समेनं वर्चसा सृज देवानां भागदाऽ असत् ॥ ५१ ॥


अर्थ - हे ऐश्वर्ययुक्त इंद्रा, या यजमानाला पुष्कळ ऐश्वर्य दे. हा यजमान आपल्या बरोबरीच्या मंडळींचें नियमन करणारा होवो. तसेंच तूं या यजमानाला तेजस्वी कर व हा यजमान यज्ञांत देवांना भाग देणारा होवो. ॥५१॥





विनियोग -


यस्य कुर्मो गृहे हविस्तमग्ने वर्धया त्वम् ॥ तस्मै देवाऽ अधिब्रुवन्नयं च ब्रह्मणस्पतिः ॥ ५२ ॥


अर्थ - हे अग्ने, ज्याचे घरीं आम्ही हविर्याग करतों त्या यजमानाला तूं वाढव. देव त्या यजमानाला हा सर्वांत अधिक आहे असें म्हणोत. व हा यजमान यज्ञकर्माचा पालक होवो. ॥५२॥





विनियोग - 'उदुत्वा' या मंत्रानें प्रतिप्रस्थात्यानें प्रज्वलित इध्म वर उचलावा.


उदु त्वा विश्वे देवाऽ अग्ने भरन्तु चित्तिभिः । स नो भव शिवस्त्वँ सुप्रतीको विभावसुः ॥ ५३ ॥


अर्थ - हे अग्ने, सर्व प्राणरूपी देव उद्योगप्रवीण अशा वृत्तींनीं तुला वर उचलून धरोत. चांगल्या मुखाचा व प्रकाश हेंच ज्याचें द्रव्य आहे अशा हे अग्ने, वर धारण केल्यावर आमचें कल्याण करणारा हो. ॥५३॥





विनियोग - 'पञ्चदिशः' इत्यादि पांच मंत्र म्हणून ब्रह्मा, होता, अध्वर्यु, प्रतिप्रस्थाता व यजमान या पाचांनीं चित्य अग्नीकडे जावें.


पञ्च दिशो दैवीर्यज्ञमवन्तु देवीरपामतिं दुर्मतिं बाधमानाः । रायस्पोषे यज्ञपतिमाभजन्ती रायस्पोषेऽ अधि यज्ञोऽ अस्थात् ॥ ५४ ॥


अर्थ - पूर्व, दक्षिण, पश्चिम, उत्तर व मध्य अशा पांच प्रकाशक दिशा आमच्या यज्ञाचें रक्षण करोत. त्या दिशा इंद्रयामवरूणसोम व ब्रह्मदेव एतत्संबंधीं आहेत. त्या आमच्या दुष्टबुद्धीचा नाश करणार्‍या व यजमानाच्या धनाची वृद्धि करणार्‍या आहेत; आणि यज्ञ आमच्या धनाच्या वृद्धीनें समृद्ध होवो. ॥५४॥





विनियोग -


समिद्धेऽ अग्नावधि मामहानऽ उक्थपत्रऽ ईड्यो गृभीतः । तप्तं घर्मं परिगृह्यायजन्तोर्जा यद्यज्ञमयजन्त देवाः ॥ ५५ ॥


अर्थ - ऋत्विज् प्रज्वलित प्रवर्ग्य घेऊन ज्यावेळीं हविर्द्रव्यानें याग करतात त्यावेळीं अग्नि प्रदीप्त झाल्यावर शस्त्रें हेंच ज्याचें वाहन आहे असा यज्ञ धारण केला जातो. तो यज्ञ स्तुत्य व देवांचा पूजक आहे. ॥५५॥





विनियोग -


दैव्याय धर्त्रे जोष्ट्रे देवश्रीः श्रीमनाः शतपयाः । परिगृह्य देवा यज्ञमायन् देवा देवेभ्योऽ अध्वर्यन्तोऽ अस्थुः ॥ ५६ ॥


अर्थ - देवांचें हित करणारा, जगाचा धारक, हविर्द्रव्याचें सेवन करणार्‍या अशा अग्नीला यज्ञ दिला जातो तो यज्ञ देवांचें सेवन करणारा, यजमानावर अनुग्रह करणारा व ज्यांत पय वगैरे शतसंख्याक हविर्द्रव्यें आहेत असा आहे. ऋत्विज् अशा यज्ञाग्नीला बरोबर घेऊन यज्ञाकडे येतात व ते प्रकाशमान ऋत्विज् देवाकरितां यज्ञ करण्याच्या इच्छेनें राहतात. ॥५६॥





विनियोग -


वीतँ हविः शमितँ शमिता यजध्यै तुरियो यज्ञो यत्र हव्यमेति । ततो वाकाऽ आशिषो नो जुषन्ताम् ॥ ५७ ॥


अर्थ - चतुर्थ असा यज्ञ ज्यावेळीं हविर्द्रव्याला प्राप्त होतो तेव्हां त्यापासून निघालेली ऋग्वेदाद्युक्त (प्रथम यजुर्जप, नंतर होत्रादि ऋचांचें पठण, त्यानंतर ब्रह्म्याचा अप्रतिरथ जप व चौथा यज्ञ) फलें आम्हांला प्राप्त होवोत. तें हविर्द्रव्य देवांना इष्ट आणि शमित्यानें यज्ञाकरितां संस्कृत केलें आहे. ॥५७॥





विनियोग -


सूर्यरश्मिर्हरिकेशः पुरस्तात्सविता ज्योतिरुदयाँ२ऽ अजस्रम् । तस्य पूषा प्रसवे याति विद्वान्त्सम्पश्यन्विश्वा भुवनानि गोपाः ॥ ५८ ॥


अर्थ - ज्योतीरूपी अग्नि रोज पूर्वेकडे आहवनीयरूपानें उदय पावतो. त्या अग्नीचें किरण सूर्यासारखे, ज्वाला सोन्यासारख्या आहेत; तो प्राण्यांचा प्रेरक आहे अशा ह्या अग्नीच्या आज्ञेनें सूर्य उदय व अस्त पावतो. तो सूर्य आपल्या अधिकाराचें कार्य जाणणारा, सर्व लोकांचें उत्तमप्रकारें करून अवलोकन करणारा, व धर्माचा रक्षक आहे. ॥५८॥





विनियोग - 'विमानऽएषः' इत्यादि दोन मंत्रांनीं अग्नीध्रस्थानाचे दक्षिणभागीं पाषाण स्थापन करावें.


विमानऽ एष दिवो मध्यऽ आस्तऽ आपप्रिवात्रोदसीऽ अन्तरिक्षम् । स विश्वाचीरभिचष्टे घृताचीरन्तरा पूर्वमपरं च केतुम् ॥ ५९ ॥


अर्थ - हा जगन्निर्माण करण्यांत समर्थ असा पाषाण, सूर्यरूपानें अंतरिक्षांत राहतो. या पाषाणानें द्यावापृथिवी व अन्तरिक्ष हे तेजानें पूर्ण केले. हा आदित्यरूपी अश्मा सर्व हविर्द्रव्यें ज्यांत ठेवलीं जातात अशा वेदी व ज्यांत घृत ठेवलें जातें अशा स्रुच्याकडे पहातो. तसेंच तो या ब्रह्माण्डांत होणार्‍या सूर्याच्या उदय व अस्तांना पाहतों. ॥५९॥





विनियोग -


उक्षा समुद्रोऽ अरुणः सुपर्णः पूर्वस्य योनिं पितुराविवेश । मध्ये दिवो निहितः पृश्निरश्मा विचक्रमे रजसस्पात्यन्तौ ॥ ६० ॥


अर्थ - जो आदित्य पूर्वेकडे असलेल्या द्युलोकस्थानांत प्रवेश करता झाला; तो वृष्टिद्वारां जलसिंचन करणारा, उदयसमयीं दंव पाडून जमीन भिजविणारा, रक्तवर्णाचा, उत्तम रीतीनें गमन करणारा, द्युलोकांत असलेला, नानाप्रकारच्या किरणांनीं युक्त व व्यापक असा आहे. असा तो आदित्य आकाशांत गमन करतों. अशा प्रकारें जात असतां तो लोकांच्या अंतिमभागांप्रत रक्षण करतों. ॥६०॥





विनियोग - या पाषाणाला एखाद्या गुप्त जागीं ठेवून 'इन्द्रं विश्वा' इत्यादि चार ऋचा म्हणून सर्वांनीं चयनस्थानाकडे जावें.


इन्द्रं विश्वाऽ अवीवृधन्त्समुद्रव्यचसं गिरः । रथीतमँ रथीनां वाजानाँ सत्पतिं पतिम् ॥ ६१ ॥


अर्थ - ऋग्यजुःसामरूपी सर्व स्तुति इंद्राला वाढवितात. तो इंद्र समुद्राप्रमाणें व्यापक, विविधगतिमान्, सर्व रथींत श्रेष्ठ, अन्नस्वामी, व धर्मनिष्ठ लोकांचा पालक आहे. ॥६१॥





विनियोग -


देवहूर्यज्ञऽ आ च वक्षत्सुम्नहूर्यज्ञऽ आ च वक्षत् । यक्षदग्निर्देवो देवाँ२ऽ आ च वक्षत् ॥ ६२ ॥


अर्थ - देवांना बोलावणारा, व सुखकारक यज्ञ देवांना बोलावो. व अग्निदेव देवांना बोलवो व त्यांचा यज्ञ करो. ॥६२॥





विनियोग -


वाजस्य मा प्रसवऽ उद्‍ग्राभेणोदग्रभीत् । अधा सपत्नानिन्द्रो मे निग्राभेणाधराँ२ऽ अकः ॥ ६३ ॥


अर्थ - अन्नाची प्रसूती मला दान देण्याकरितां उंच हात करायला लावो व इंद्र माझ्या शत्रूंना भिक्षा मागण्यांकरितां खालीं हात करावयास लावो. (म्हणजे मी दाता व्हावें व माझ्या शत्रूंनी अन्नाभावास्तव याचक व्हावें.) ॥६३॥





विनियोग -


उद्‍ग्राभं च निग्राभं च ब्रह्म देवाऽ अवीवृधन् । अधा सपत्नानिन्द्राग्नी मे विषूचीनाव्यस्यताम् ॥ ६४ ॥


अर्थ - देव आमचा उत्कर्ष, शत्रूंचा अपकर्ष व यज्ञविषयक तीन वेद यांस वाढवो. नंतर इंद्राग्नींनीं माझ्या शत्रूंना निरनिराळ्या दिशांकडे जावयास लावून त्याचा नाश करण्याकरितां व ते पुनः न येवोत याकरितां लांब फेकून द्यावे. ॥६४॥





विनियोग - 'क्रमध्वमग्निना' इत्यादि पांच मंत्रांनीं ऋत्विजांनीं चित्याग्नीवर आरोहण करावें.


क्रमध्वमग्निना नाकमुख्यँ हस्तेषु बिभ्रतः । दिवस्पृष्ठँ स्वर्गत्वा मिश्रा देवेभिराध्वम् ॥ ६५ ॥


अर्थ - हे ऋत्विग्यजमानांनो, उख्य अग्नीला हातांत धारण करून तुम्ही या अग्नीचें द्वारां स्वर्ग लोकांचें आक्रमण करा. नंतर अन्तरिक्षाच्या पृष्ठावर जाऊन देवांशीं युक्त होऊन स्वर्गावर उपवेशन करा. (बसा.) ॥६५॥





विनियोग -


प्राचीमनु प्रदिशं प्रेहि विद्वानग्नेरग्ने पुरोऽ अग्निर्भवेह । विश्वाऽ आशा दीद्यानो विभाह्यूर्जं नो धेहि द्विपदे चतुष्पदे ॥ ६६ ॥


अर्थ - आपला अधिकार जाणणार्‍या व आतां आणलेल्या हे उख्य अग्ने, पूर्व दिशेच्या धोरणानें जा, व इष्टकानिष्पादित अशा चितिरूपी अग्नीच्या सन्मुख रहा. तसेंच सर्व दिशांना प्रकाशित कर व तूंही विशेष रीतीनें प्रकाशित हो. नंतर आमच्या पुत्रादिकांना व पश्वादिकांना अन्न दे. ॥६६॥





विनियोग -


पृथिव्याऽ अहमुदन्तरिक्षमारुहमन्तरिक्षाद्दिवमारुहम् । दिवो नाकस्य पृष्ठात् स्वर्ज्योतिरगामहम् ॥ ६७ ॥


अर्थ - मी यजमान पृथ्वीलोकांतून वर जाऊन अन्तरिक्षांप्रत आरोहण करता झालों. तेथून द्युलोकाप्रत, तेथून दुःखरहित स्वर्गपृष्ठाप्रत प्राप्त झालो; व तेथून ऊर्ध्व अशा स्वर्गलोकस्थ तेजःस्थानाप्रत प्राप्त होईन. ॥६७॥





विनियोग -


स्वर्यन्तो नापेक्षन्तऽ आ द्याँ रोहन्ति रोदसी । यज्ञं ये विश्वतोधारँ सुविद्वाँसो वितेनिरे ॥ ६८ ॥


अर्थ - चांगले विद्वान् यज्ञाचें अनुष्ठान करतात तो यज्ञ सर्वत्र आहुति दक्षिणा व अन्नरूपी धारा आहेत ज्याच्या असा आहे. यज्ञ करणारे स्वर्गांत जात असतां पुत्रादिकांची अपेक्षा करीत नाहींत व ते जरामृत्यु वगैरेंना दूर करणार्‍या द्युलोकांप्रत आरोहण करतात. ॥६८॥





विनियोग -


अग्ने प्रेहि प्रथमो देवयतां चक्षुर्देवानामुत मर्त्यानाम् । इयक्षमाणा भृगुभिः सजोषाः स्वर्यन्तु यजमानाः स्वस्ति ॥ ६९ ॥


अर्थ - हे अग्ने, देवेच्छु यजमानांच्या अग्रभागीं विशेषेंकरून जा. कारण कीं, तूं देव व मनुष्यें यांच्या नेत्रांच्या स्थानीं आहेस. व भृगुगोत्रांतील उत्तम ब्राह्मणांवर प्रीति करणारे यज्ञ करण्याची इच्छा करणारे यजमान कल्याणकारक रीतीनें स्वर्गाप्रत जावोत. ॥६९॥





विनियोग - 'नक्तोषासा' या दोन ऋचांनीं अध्वर्यूनें स्वयमातृण्णासंज्ञक इष्टकेवर सिंचन करून इध्मस्थ अग्नीवर होम करावा.


नक्तोषासा समनसा विरूपे घापयेते शिशुमेकँ समीची । द्यावाक्षामा रुक्मोऽ अन्तर्विभाति देवाऽ अग्निं धारयन् द्रविणोदाः ॥ ७० ॥


अर्थ - आईबाप मुलांचें पोषण करतात त्याप्रमाणें रात्रि व दिवसा या एका अग्नीचा सायंप्रातर्होमादिकांनीं संतोष करतात. त्या रात्रीदिवसांचें रूप विचित्र आहे. तरी त्यांचें ऐकमत्य आहे. द्यावापृथिवीच्या मध्यभागीं अन्तरिक्षांत जो सुवर्णरूपी अग्नि प्रकाशतो त्याला मी नेतों. यागद्वारां धनरूप फल देणारे देव ज्या अग्नीला धारण करते झाले त्याला मी नेतों. ॥७०॥





विनियोग -


अग्ने सहस्राक्ष शतमूर्धञ्छतं ते प्राणाः सहस्रं व्यानाः । त्वँ साहस्रस्य रायऽ ईशिषे तस्मै ते विधेम वाजाय स्वाहा ॥ ७१ ॥


अर्थ - हिरण्यशकलरूपी सहस्र नेत्रांच्या व शंभर मस्तकांच्या अग्ने, तुझे प्राण व व्यान अपरिमित आहेत व तूं अपरिमित द्रव्यांचा स्वामी आहेस. अशा तुला आम्ही अन्नरूपी हवि देतों तें सुहुत असो. ॥७१॥





विनियोग - 'सुपर्णोऽसि' या दोन मंत्रांनीं स्वयमातृण्णा इष्टकेवर अग्नि स्थापन करावें.


सुपर्णोऽसि गरुत्मान् पृष्ठे पृथिव्याः सीद । भासान्तरिक्षमापृण ज्योतिषा दिवमुत्तभान तेजसा दिशऽ उद्‍दृँह ॥ ७२ ॥


अर्थ - हे अग्ने, तूं गरुडाच्या आकाराचा व अशनाया (भूक) वान् आहेस म्हणून पृथ्वीवर बैस व आपल्या प्रकाशानें अन्तरिक्षाला पूर्ण कर व आपल्या सामर्थ्यानें द्युलोकाला वर कर. व आपल्या तेजानें दिशांना दृढ कर. ॥७२॥





विनियोग -


आजुह्वानः सुप्रतीकः पुरस्तादग्ने स्वं योनिमासीद साधुया । अस्मिन्त्सधस्थेऽ अध्युत्तरस्मिन्विश्वे देवा यजमानश्च सीदत ॥ ७३ ॥


अर्थ - हे अग्ने, तूं आमच्याकडून बोलावला गेलेला शोभन मुखाचा होऊन पूर्व दिशेकडील आपल्या उत्तम स्थानाप्रत अधिष्ठित हो. हे विश्वेदेवांनो, तुम्ही व यजमानानें अग्नीसह अधिष्ठित होण्यास योग्य अशा पुढें असलेल्या उत्तम स्वर्गस्थानावर उपवेशन करा. ॥७३॥





विनियोग - अग्निस्थापनानंतर अध्वर्यूनें 'ता???सवितुः' इत्यादि तीन मंत्रांनीं तीन समिधांचा होम करावा.


ताँ सवितुर्वरेण्यस्य चित्रामाहं वृणे सुमतिं विश्वजन्याम् । यामस्य कण्वोऽ अदुहत्प्रपीनाँ सहस्रधारां पयसा महीं गाम् ॥ ७४ ॥


अर्थ - श्रेष्ठ अशा सवित्याच्या त्या सद्‌बुद्धीचा मी स्वीकार करतों. ती सद्‌बुद्धि आम्हांला इष्ट अशीं नानाविध फलें देणारी आहे व सर्व लोकांचें हित करणारी आहे. ज्या धेनुरूपी सद्‌बुद्धींचें कण्वमुनीनें दोहन केले; जी सद्‌बुद्धि धेनु दुग्धानें पूर्ण, क्षीराच्या सहस्रधारांनीं युक्त व सर्वसिद्धि देणारी म्हणून मोठी आहे. ॥७४॥





विनियोग -


विधेम ते परमे जन्मन्नग्ने विधेम स्तोमैरवरे सधस्थे । यस्माद्योनेरुदारिथा यजे तं प्र त्वे हवीँषि जुहुरे समिद्धे ॥ ७५ ॥


अर्थ - हे अग्ने, उत्कृष्ट जन्मांत म्हणजे द्युलोकांत सूर्यरूपानें स्थित अशा तुला आम्ही हविर्द्रव्य देतों. तसेंच द्युलोकाचे अधोभागीं अग्नीसह असलेल्या अन्तरिक्ष लोकांत विद्युद्रूपानें असलेल्या तुझी आम्ही स्तुति करतों. हे अग्ने, ज्या इष्टकाचयनरूपी स्थानांतून तूं उदय पावलास त्याची आम्ही पूजा करतों. नंतर प्रज्वलित झालेल्या अशा तुझ्या ठायीं ऋत्विज होम करतात. ॥७५॥





विनियोग -


प्रेद्धोऽ अग्ने दीदिहि पुरो नोऽजस्रया सूर्म्या यविष्ठ । त्वाँ शश्वन्तऽ उपयन्ति वाजाः ॥ ७६ ॥


अर्थ - हे तरुणतम अग्ने, आम्ही तुझ्यांत निरंतर समिधा घालतों व तूं आमच्या पुरोभागीं प्रदीप्त हो. कारण तुजकडे हविर्द्रव्यरूपी अन्नें निरंतर प्राप्त होतात. ॥७६॥





विनियोग - 'अग्ने तम्' इत्यादि दोन मंत्रांनीं दोन घृताहुतींचा अग्नींत होम करावा.


अग्ने तमद्याश्वं न स्तोमैः क्रतुं न भद्रँ हृदिस्पृशम् । ऋध्यामा तऽ ओहैः ॥ ७७ ॥


अर्थ - हे अग्ने, ज्याप्रमाणें ब्राह्मण स्तुति करून अश्वमेधांतील घोडयाला व तसेंच ते अत्यंत आवडत्या अशा आपल्या संकल्पाला पूर्ण करतात; त्याप्रमाणें फलदायी अशा सामसमुदायांनीं तुझ्या यज्ञाला आम्ही समृद्ध करतों. ॥७७॥





विनियोग -


चित्तिं जुहोमि मनसा घृतेन यथा देवाऽ इहागमन्वीतिहोत्राऽ ऋतावृधः । पत्ये विश्वस्य भूमनो जुहोमि विश्वकर्मणे विश्वाहादाभ्यँ हविः ॥ ७८ ॥


अर्थ - संशयात्मक तें मन, निश्चयात्मक तें चित्त आणि घृत यांचा मी अग्नीशीं असा संबंध करतों की, ज्यायोगें देव या यज्ञांत येतील. ते देव यज्ञेच्छु व सत्य वाढविणारे असे आहेत व रोज अक्षीण व मधुर अशा हविर्द्रव्याचा मी प्रजापतीला होम करतों. तो प्रजापति सर्वकार्यकर्ता व मोठया जगाचा स्वामी आहे. ॥७८॥





विनियोग - 'सप्त ते' इत्यादि मंत्रानें पूर्णाहुतीचा होम करावा.


सप्त तेऽ अग्ने समिधः सप्त जिह्वाः सप्तऽ ऋषयः सप्त धाम प्रियाणि । सप्त होत्राः सप्तधा त्वा यजन्ति सप्त योनीरापृणस्व घृतेन स्वाहा ॥ ७९ ॥


अर्थ - हे अग्ने, सात समिधा तुझे प्राण, सात ज्वाला तुझ्या जिव्हा, मरीच्यादि सात तुझे द्रष्टे ऋषि, गायत्र्यादि सप्त छन्द तुझीं स्थानें आहेत. तसेंच हे अग्ने, होता वगैरे सात ऋत्विज् अग्निष्टोमादि सप्त संस्थांनीं तुझें यजन करतात व तूं सप्त चितींना घृतानें पूर्ण कर. हें हवि सुहुत असो. ॥७९॥





विनियोग - 'शुक्रज्योतिश्च' वगैरे प्रत्येक मंत्रानें मरुत् देवताक पुरोडाशाचा होम करावा.


शुक्रज्योतिश्च चित्रज्योतिश्च सत्यज्योतिश्च ज्योतिष्माँश्च । शुक्रश्चऽ ऋतपाश्चात्यँहाः ॥ ८० ॥


अर्थ - शुक्रज्योतिनामक वगैरे एकोणपन्नास मरुद्देवतांनो, तुम्ही आज आमच्या या यज्ञांत या. १. ज्यांचें तेज शुद्ध आहे २. ज्याची ज्योति दर्शनीय आहे ३. ज्याचें तेज ब्रह्मरूपी आहे ४. तेजस्वी ५. प्रदीप्त ६. यज्ञरक्षक ७. पापांचें अतिक्रमण करणारा. ॥८०॥





विनियोग -


ईदृङ्‍ चान्यादृङ्‍ च सदृङ्‍ च प्रतिसदृङ्‍ च । मितश्च सम्मितश्च सभराः ॥ ८१ ॥


अर्थ - ८. या पुरोडाशाकडे पाहणारा ९. दुसर्‍याही पुरोडाशाकडे पाहणारा १०. सारखे पाहणारा ११. निरनिराळ्या पुरोडाशांकडे सारखें पाहणारा १२. मोजलेला १३. एकत्र मोजलेला १४. एकत्र धारण करणारा. ॥८१॥





विनियोग -


ऋतश्च सत्यश्च ध्रुवश्च धरुणश्च । धर्ता च विधर्ता च विधारयः ॥ ८२ ॥


अर्थ - १५. सत्यरूपी १६. सद्वस्तूंत राहणारा १७. स्थिर १८. स्वतः धारण करणारा १९. दुसर्‍याकडून धारण करविणारा २०. विशेषेंकरून धारण करविणारा २१. नानाप्रकारें करून धारण करविणारा. ॥८२॥





विनियोग -


ऋतजिच्च सत्यजिच्च सेनजिच्च सुषेणश्च । अन्तिमित्रश्च दूरेऽ अमित्रश्च गणः ॥ ८३ ॥


अर्थ - २२. यज्ञ जिंकणारा २३. सत्य जिंकणारा २४. शत्रुसेनेला जिंकणारा २५. उत्तम सेनायुक्त २६. ज्याचे मित्र समीप आहेत २७. ज्याचे शत्रु दूर आहेत २८. सर्वांना मोजणारा ॥८३॥





विनियोग -


ईदृक्षासऽ एतादृक्षासऽ ऊ षु णः सदृक्षासः प्रतिसदृक्षासऽ एतन । मितासश्च सम्मितासो नोऽ अद्य सभरसो मरुतो यज्ञेऽ अस्मिन् ॥ ८४ ॥


अर्थ - २९. जवळचे पाहणारे ३०. फारच जवळचें पाहणारे ३१. सारखे पाहणारे ३२. प्रत्येक वस्तूकडे सारखे पाहणारे ३३. प्रमाणानें मोजले गेलेले ३४. एकत्र होऊन मोजले गेलेले ३५. सारखे दागिने घालणारे. ॥८४॥ (या मंत्रांत आदरार्थी बहुवचन आहे.)





विनियोग -


स्वतवाँश्च प्रघासी च सान्तपनश्च गृहमेधी च । क्रीडी च शाकी चोज्जेषी ॥ ८५ ॥


अर्थ - ३६. स्वाधीनबलानें युक्त ३७. पुष्कळ पुरोडाश खाणारे ३८. सूर्यसंबंधीं ३९. गृहस्थधर्मवान् ४०. क्रीडाशील ४१. समर्थ ४२. उत्कृष्टजयशील (उग्रश्चया कंसांतील मंत्राचा अर्थ) ४३. उत्कृष्ट ४४. भीतिप्रद ४५. शत्रूंना अन्ध करणारा ४६. शत्रूंना कापविणारा ४७. शत्रुबल सहन करणारा ४८. भक्तांना सुखप्रद व ४९. शत्रुविनाशक. या एकोणपन्नास मरुद्देवतांना हें हवि सुहुत असो. ॥८५॥





विनियोग -


इन्द्रं दैवीर्विशो मरुतोऽनुवर्त्मानोऽभवन्यथेन्द्रं दैवीर्विशो मरुतोऽनुवर्त्मानोऽभवन् । एवमिमं यजमानं दैवीश्च विशो मानुषीश्चानुवर्त्मानो भवन्तु ॥ ८६ ॥


अर्थ - मरुद्रूपी देवप्रजा इंद्राचें अनुगमन करत्या झाल्या. ज्याप्रमाणें मरुद्रूपी दैवप्रजा इंद्राचें अनुगमन करत्या झाल्या त्याप्रमाणें दैव व मानुष प्रजा या यजमानाचें अनुगमन करोत. ॥८६॥





विनियोग - अध्वर्यूनें 'इम???स्तनम्' इत्यादि तेरा ऋचा यजमानाकडून म्हणवाव्या अथवा स्वतः म्हणाव्या.


इमँ स्तनमूर्जस्वन्तं धयापां प्रपीनमग्ने सरिरस्य मध्ये । उत्सं जुषस्वमधुमन्तमर्वन्त्समुद्रियँ सदनमाविशस्व ॥ ८७ ॥


अर्थ - हे अग्ने, या लोकांत राहून तूं या स्रुचेंतून पडणारी घृताची धारा पी. ती धारा विशिष्ट रसयुक्त घृतानें पूर्ण अशी आहे. हे सर्वत्र गमन करणार्‍या अग्ने, सर्वत्र उसळणार्‍या स्रुचारूपी कूपाचें सेवन कर. तो कूप मधुररसात्मक घृतानें युक्त असा आहे. तदनंतर हे अग्ने, तूं तृप्त होऊन चयनयागसंबंधीं अशा आपल्या घराचें सेवन कर. ॥८७॥





विनियोग -


घृतं मिमिक्षे घृतमस्य योनिर्घृते श्रितो घृतम्वस्य धाम । अनुष्वधमावह मादयस्व स्वाहाकृतं वृषभ वक्षि हव्यम् ॥ ८८ ॥


अर्थ - मी अग्निमुखांत घृताचा होम करण्याची इच्छा करतो; कारण घृत हें अग्नीचें उत्पत्तिस्थान आहे. तो अग्नि घृताचा आश्रय करतो; कारण घृतच त्याचें घर आहे. म्हणून हे अध्वर्यो, प्रथम तूं अन्न तयार करून ठेव व नंतर अग्नीला बोलाव. व त्याला संतुष्ट कर आणि सांग कीं, इष्ट वस्तूंची वृष्टि करणार्‍या हे अग्ने, स्वाहाकारानें होमलेलें हें हविर्द्रव्य तूं देवांकडे ने. ॥८८॥





विनियोग - या मंत्रांत अन्नाचा अध्यास करून घृताची व प्राणाचा अध्यास करून अग्नीची स्तुति केली आहे.


समुद्रादूर्मिर्मधुमाँ२ऽ उदारदुपाँशुना सममृतत्वमानट् । घृतस्य नाम गुह्यं यदस्ति जिह्वा देवानाममृतस्य नाभिः ॥ ८९ ॥


अर्थ - घृतमय समुद्रांतून रसवान् अशी एक लाट उत्पन्न झाली. नंतर ती लाट जगत्प्राणभूत अग्नीशीं एकत्र होऊन अमृतत्वाला (अविनाशित्वाला) प्राप्त होते. त्या घृताचें कोणाला ठाऊक नसलेलें गुप्त असें नांव म्हणजे देवांची जिव्हा असें आहे. म्हणजे घृत दिसल्याबरोबर त्याच्या अभिलाषानें देव आपली जिव्हा लांबवितात व त्याचें सर्वविदित असें नांव अमृताची नाभि असें आहे. ॥८९॥





विनियोग -


वयं नाम प्रब्रवामा घृतस्यास्मिन् यज्ञे धारयामा नमोभिः । उप ब्रह्मा शृणवच्छस्यमानं चतुःशृङ्‍गोऽवमीद्‍गौरऽ एतत् ॥ ९० ॥


अर्थ - घृताचें नामोच्चारण देखील देवांना आवडतें म्हणून त्या नांवाची आम्ही स्तुति करतों व अन्नांनीं यज्ञाचें धारण करतों व ब्रह्मा या ऋत्विजानें आम्ही स्तुत असें घृताचें नांव तसें ऐकावें; ज्यायोगें चार ऋत्विज ज्यांचे श्रृंगस्थानीय आहेत व जो शुद्ध आहे असा यज्ञ आम्हांला हें घृतयज्ञाचें फल देतों. ॥९०॥





विनियोग - या मंत्रांत पूर्वोक्त चतुःशृंगात्मक यज्ञाची वृषभरूपानें स्तुति आहे.


चत्वारि शृङ्‍गा त्रयोऽ अस्य पादा द्वे शीर्षे सप्त हस्तासोऽ अस्य । त्रिधा बद्धो वृषभो रोरवीति महो देवो मर्त्याँ२ऽ आविवेश ॥ ९१ ॥


अर्थ - अभीष्ट फलांची वृष्टि करणारा असा जो मोठा देव (यज्ञ) तो सर्व मनुष्यांच्या शरीरांत व्याप्त होऊन राहतो. त्याचे १. ब्रह्मा २. होता ३. अध्वर्यु ४. उद्गाता हीं चार शिंगें आहेत. ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद हे तीन पाय आहेत. हविर्धान व प्रवर्ग्य हीं दोन मस्तकें आहेत. सप्तच्छन्द त्याचे हात आहेत व तो प्रातःसवन, माध्यंदिनसवन व तृतीयसवन यांनीं बांधलेला आहे. ॥९१॥





विनियोग -


त्रिधा हितं पणिभिर्गुह्यमानं गवि देवासो घृतमन्वविन्दन् । इन्द्रऽ एकँ सूर्यऽ एकं जजान वेनादेकँ स्वधया निष्टतक्षुः ॥ ९२ ॥


अर्थ - देवांनीं क्रमेंकरून धेनूचे ठिकाणीं घृत मिळविलें. तें तीन प्रकारें करून या लोकांत स्थापन केलेलें, यज्ञाचा परिणाम असलेलें व असुरांनीं रक्षण केलेलें आहे. त्याचा एक भाग इंद्रानें उत्पन्न केला व दुसरा सूर्यानें उत्पन्न केला व द्विजातींनीं त्याचा तिसरा भाग यज्ञसाधनभूत अग्निपासून स्वधारूपी अन्नानें निर्माण केला. ॥९२॥





विनियोग -


एताऽ अर्षन्ति हृद्यात्समुद्रच्छतव्रजा रिपुणा नावचक्षे । घृतस्य धाराऽ अभिचाकशीमि हिरण्ययो वेतसो मध्यऽ आसाम् ॥ ९३ ॥


अर्थ - या वाणी श्रद्धारूपी उदकानें भरलेल्या देवतोपासनचिन्तनमय समुद्रांतून निघतात. त्या वाणींचे शेकडों अर्थ आहेत व कुतार्किकरूपी शत्रूंना त्या अर्थांना दोष देतां येत नाहीं. मी त्या वाणींना घृताच्या धारांप्रमाणें पहातो. तसेंच या वाणीमध्यें असलेला त्यांचा अधिष्ठाता जो प्रकाशमान अग्नि त्यालाही मी पाहतों. ॥९३॥





विनियोग -


सम्यक् स्रवन्ति सरितो न धेनाऽ अन्तर्हृदा मनसा पूयमानाः । एतेऽ अर्षन्त्यूर्मयो घृतस्य मृगाऽ इव क्षिपणोरीषमाणाः ॥ ९४ ॥


अर्थ - नद्यांप्रमाणें अविच्छिन्न प्रवाहानें त्या वाणी उत्तमरीतीनें पसरतात. त्या वाणी शरीरांतील हृदयानें व मनानें पवित्र केल्या आहेत; म्हणजे मनानें व हृदयानें त्या वाणींतील दोष काढून टाकले आहेत. बाण टाकणार्‍या व्याधापासून भिऊन पळणार्‍या मृगांप्रमाणें जे घृताचे ओघ स्रुचेंतून खालीं सांडतात; ते व वरील वाणी अग्नीचीच स्तुति करतात. ॥९४॥





विनियोग -


सिन्धोरिव प्राध्वने शूघनासो वातप्रमियः पतयन्ति यह्वाः । घृतस्य धाराऽ अरुषो न वाजी काष्ठा भिन्दन्नूर्मिभिः पिन्वमानः ॥ ९५ ॥


अर्थ - ज्याप्रमाणें शीघ्रगमन करणार्‍या वार्‍यानें फुटणार्‍या लाटा विषमप्रदेशांत जाऊन पडतात; तसेंच ज्याप्रमाणें संग्रामप्रदेशांचा भेद करणारा व श्रमजन्य घर्मोदिकांनीं भूमि भिजविणारा उत्तम जातीचा घोडा तृण भक्षण करतो, त्याप्रमाणें स्रुचेंतून खालीं सांडणार्‍या मोठया घृतधारांना अग्नि भक्षण करतों. ॥९५॥





विनियोग -


अभिप्रवन्त समनेव योषाः कल्याण्यः स्मयमानासोऽ अग्निम् । घृतस्य धाराः समिधो नसन्त ता जुषाणो हर्यति जातवेदाः ॥ ९६ ॥


अर्थ - पतीच्या मनाप्रमाणें वागणार्‍या, रूपयौवनसंपन्न व गालांतल्या गालांत हसणार्‍या स्त्रिया ज्याप्रमाणें पतिसमीप गमन करतात; त्याप्रमाणें प्रदीप्त करणार्‍या घृताच्या धारा अग्नीप्रत प्राप्त होऊन त्याला व्याप्त करतात व प्रज्ञानवान् असा अग्नि संतुष्ट होऊन त्या धारांना प्राप्त करतो व त्यांची इच्छा करतों. ॥९६॥





विनियोग -


कन्याऽ इव वहतुमेतवाऽ उऽ अञ्ज्यञ्जानाऽ अभिचाकशीमि । यत्र सोमः सूयते यत्र यज्ञो घृतस्य धाराऽ अभि तत्पवन्ते ॥ ९७ ॥


अर्थ - ज्याठिकाणीं सोमरसाचें कंडण होतें व जेथें सौत्रामणि यज्ञ होतो तेथें जाणार्‍या घृतधारांना मी पाहतों. त्या घृतधारा स्पष्ट स्त्रीचिन्ह धारण करणार्‍या व भर्त्याकडे जाणार्‍या कन्याप्रमाणें आहेत; म्हणजे वरील कन्या ज्याप्रमाणें भर्त्याकडे गमन करतात त्याप्रमाणें घृतधारा यज्ञाकडे जातात. ॥९७॥





विनियोग -


अभ्यर्षत सुष्टुतिं गव्यमाजिमस्मासु भद्रा द्रविणानि धत्त । इमं यज्ञं नयत देवता नो घृतस्य धारा मधुमत्पवन्ते ॥ ९८ ॥


अर्थ - हे देवांनो, तुम्ही स्तुति श्रवण करा व स्वर्ग देणार्‍या घृतयुक्त यज्ञाप्रत प्राप्त व्हा व तुम्ही यज्ञांत येऊन आम्हांला उत्तम द्रव्यें द्या व आमचा हा सौत्रामणी यज्ञ देवलोकांत न्या व या मधुर रसयुक्त पसरणार्‍या घृताच्या धाराही देवलोकांत न्या. ॥९८॥





विनियोग -


धामं ते विश्वं भुवनमधि श्रितमन्तः समुद्रे हृद्यन्तरायुषि । अपामनीके समिथे यऽ आभृतस्तमश्याम मधुमन्तं तऽ ऊर्मिम् ॥ ९९ ॥


अर्थ - हे अग्ने, संपूर्ण भूतसमुदाय तुझ्या विभूतीच्या आश्रयानें राहिला आहें. तसेंच समुद्रांत असणारीं, हृदयांत असणारीं, हिरण्यगर्भाच्या आयुष्यांत उत्पन्न होणारीं हीं सर्व भूतें तुझ्या विभूतीच्याच आश्रयानें राहिलीं आहेत. म्हणून आम्ही मधुररसयुक्त अशा तुझ्या घृतप्रवाहाचें भक्षण करतों. तो घृतप्रवाह जलाचे मुखांत असलेला राक्षसांशीं युद्ध करून देवांनीं आणला. ॥९९॥





॥ सप्तदशोऽध्यायः ॥
ॐ तत् सत्


GO TOP