शुक्ल यजुर्वेद
पञ्चदशोऽध्यायः



विनियोग - चौदाव्या अध्यायांत दुसर्‍या, तिसर्‍या व चौथ्या चितींचें मंत्र सांगितले. पंधराव्या अध्यायांत पांचव्या चितीचे मंत्र सांगतात. 'अग्ने जातान्' इत्यादि मंत्रांनीं पांच असपत्‍न इष्टकांचें स्थापन करावें.


अग्ने॑ जा॒तान्प्रणु॑दा नः स॒पत्ना॒न्प्रत्यजा॑तान्नुद जातवेदः । अधि॑ नो ब्रूहि सु॒मना॒ऽ अहे॑डँ॒स्तव॑ स्याम॒ शर्मँ॑ स्त्रि॒वरू॑थऽ उ॒द्‍भौ ॥ १ ॥


अर्थ - हे अग्ने, यापूर्वी उत्पन्न झालेले व प्रजावान् अग्ने, भविष्यकालीं उत्पन्न होणारे जे आमचे शत्रु त्यांचा तूं नाश कर. तूं न रागावता आम्हांला यज्ञाची इतिकर्तव्यता शिकव व आमच्याविषयीं सद्‍बुद्धि धारण कर. हे अग्ने, तुझ्या सदोमण्डप, हविर्धानमण्डप, अग्नीध्रमण्डप या तीन मण्डपांनीं युक्त सुखाचें स्थान अशा शालेमध्यें आम्ही यज्ञ करूं. ती यज्ञशाला पुरुष, पशु, धनधान्य यांनीं समृद्ध आहे. ॥१॥





विनियोग -


सह॑सा जा॒तान्प्रणु॑दा नः स॒पत्ना॒न्प्रत्यजा॑ताञ्जातवेदो नुदस्व । अधि॑ नो ब्रूहि सुमन॒स्यमा॑नो व॒यँ स्या॑म॒ प्रणु॑दा नः स॒पत्ना॑न् ॥ २ ॥


अर्थ - बलासहवर्तमान उत्पन्न झालेल्या व पुढें उत्पन्न होणार्‍या आमच्या शत्रूंचा तूं नाश कर. हे प्रज्ञावान् अग्ने, तूं आमच्याविषयीं सद्‍बुद्धि धारण करून आम्ही शत्रूंपेक्षां अधिक होऊं असें म्हण. व तुझ्या कृपेनें आम्ही शत्रूंपेक्षां अधिक होऊं. ॥२॥





विनियोग -


षो॒डशी स्तोम॒ऽ ओजो॒ द्रवि॑णं चतुश्चत्वारिँ॒श स्तोमो॒ वर्चो॒ द्रवि॑णम् । अ॒ग्नेः पुरी॑षम॒स्यप्सो॒ नाम॒ तां त्वा॒ विश्वे॑ऽ अ॒भिगृ॑णन्तु दे॒वाः । स्तोम॑पृष्ठा घृ॒तव॑ती॒ह सी॑द प्र॒जाव॑द॒स्मे द्रवि॒णाय॑जस्व ॥ ३ ॥


अर्थ - हे इष्टके, तूं षोडशस्तोमाचें व ओजोरूपी द्रव्याचें स्वरूप धारण करणारी आहेस. तसेंच चव्हेचाळीस आवृत्तींनीं युक्त स्तोम व बलरूपी धन यांचें स्वरूप धारण करणारी आहेस. हे इष्टके, रक्षक असा जो अग्नि त्याला पूर्ण करणारी तूं आहेस. विश्वेदेव तुझी स्तुति करोत. स्तोम व पृष्ठ यांनीं युक्त व घृतसहित अशी तूं चौथ्या चितीमध्यें बैस व आमचे ठायीं पुत्रयुक्त द्रव्य आम्हांला दे. (या सर्व इष्टकांचें मी स्थापन करतों.)





विनियोग - विराट् संज्ञक दहा दहा इष्टका प्रत्येक दिशेला 'एवश्छन्दः' वगैरे मंत्रांनीं स्थापन कराव्या.


एव॒श्छन्दो॒ वरि॑व॒श्छन्दः श॒म्भूश्छन्दः॑ परि॒भूश्छन्द॑ऽ आ॒च्छच्छन्दो॒ मन॒श्छन्दो॒ व्यच॒श्छन्दः॒ सिन्धु॒श्छन्दः॑ समु॒द्रश्छन्दः॑ सरि॒रं छन्दः॑ क॒कुप्छन्द॑ स्त्रिक॒कुप्छन्दः॑ का॒व्यं छन्दो॑ऽ अङ्‍कु॒पं छन्दो॒ऽ क्षरपङ्‍क्ति॒श्छन्दः॑ प॒दप॑ङ्‍क्ति॒श्छन्दो॑ विष्टा॒रप॑ङ्‍क्ति॒श्छन्दः॑ क्षु॒रोभ्रज॒श्छन्दः॑ ॥ ४ ॥


अर्थ - हे इष्टके, तूं पृथ्वीलोक, अंतरिक्षलोक, द्युलोक, दिशा, अन्न, मान, सर्वव्यापक आदित्य, प्राणवायु, विकल्पोत्पादक मन, वाणी, प्राण, उदान, तीन वेद, जल, नाशरहित असा द्युलोक, भूलोक, दिशा, तीव्र व प्रकाशमान आदित्य, एकच्छंदरूपी आहेस. ॥४॥





विनियोग -


आ॒च्छच्छन्दः॑ प्र॒च्छ्च्छन्दः॑ सं॒यच्छन्दो॑ वि॒यच्छन्दो॑ बृ॒हच्छन्दो॑ रथन्त॒रञ्छन्दो॑ निका॒यश्छन्दो॑ विव॒धश्छन्दो॒ गिर॒श्छन्दो॒ भ्रज॒श्छन्दः॑ सँ॒स्तुप्छन्दो॑ऽनु॒ष्टु॒प्छन्द॒ऽ एव॒श्छन्दो॒ वरि॑व॒श्छन्दो॒ वय॒श्छन्दो॑ वय॒स्कृच्छन्दो॒ विष्प॑र्धा॒श्छन्दो॑ विशा॒लं छन्द॑श्छ॒दिश्छन्दो॑ दूरोह॒णं छन्द॑स्त॒न्द्रं छन्दो॑ऽ अङ्‍का॒ङ्‍कं छन्दः॑ ॥ ५ ॥


अर्थ - आच्छादन करणारें व विशेषेंकरून आच्छादन करणारें असें अन्न, सर्व व्यापार निर्वृत्त करणारी अशी रात्रि, व ज्यावेळीं व्यापाराकरितां लोक इकडे तिकडे जातात तो दिवस, विस्तीर्ण स्वर्गलोक, भूमण्डल, वायुमण्डल, नानाप्रकारानें जेथें पापाचें फळ मिळतें असा अंतरिक्षलोक अन्न व अग्नि, अनुष्टुप् छंद, वाणी, भूलोक, अंतरिक्षलोक, अन्न, बाल्यादिवयोत्पादक जठराग्नि, नाना प्रकारेकरून जेथें स्पर्धा चालते असा स्वर्ग, विशाल असें भूतल, अंतरिक्ष, विशेष कष्टानेंही चढण्यास कठीण असें रविस्थान, स्थानसंकोचानें जेथें चढतां येत नाहीं अशी पङ्क्ति, ज्यांत खांचखळगे, पाषाण वगैरेंचें चिन्ह आहे असें जल, एतच्छन्दरूपी आहेस. एतद्रूपी इष्टकांनो, तुमचें मी स्थापन करतों. ॥५॥





विनियोग - 'रश्मिना सत्याय' वगैरे एकूणचाळीस मंत्रांनीं स्तोमभागसंज्ञक इष्टकांचें स्थापन करावें.


र॒श्मिना॑ स॒त्याय॑ स॒त्यं जि॑न्व प्रेति॑ना॒ धर्म॑णा॒ धर्मं॑ जि॒न्वान्वि॑त्या दि॒वा दिवं॑ जिन्व स॒न्धिना॒ऽन्तरि॑क्षेणा॒न्तरि॑क्षं जिन्व प्रति॒धिना॑ पृथि॒व्या पृ॑थि॒वीं जि॑न्व विष्ट॒म्भेन॒ वृष्ट्या॒ वृष्टिं॑ जिन्व प्र॒वयाऽह्नाऽह॑र्जिन्वाँनु॒या रात्र्या॒ रात्रीं॑ जिन्वो॒शिजा॒ वसु॑भ्यो॒ वसू॑ञ्जिन्व प्रके॒तेना॑दि॒त्येभ्य॑ऽ आदि॒त्याञ्जि॑न्व ॥ ६ ॥


अर्थ - हे इष्टके, तूं अन्नानें सत्याकरितां स्थापन केली आहेस. सत्यवाक्याची वृद्धि कर. हे इष्टके, तूं विशेषेंकरून अन्नाच्या योगानें धर्माकरितां स्थापन केली गेली आहेस. धर्माची वृद्धि कर. अन्नाच्या योगानें द्युलोकांकरितां, उत्तम बलादिकांना धारण करणार्‍या अन्नानें अंतरिक्षाकरितां, स्थापन केल्या जाणार्‍या अन्नानें पृथ्वीकरितां, देहधारक अन्नानें वृष्टीकरितां, विशेषेंकरून देहगामी अन्नानें दिवसांकरितां, देहान्तर्गत नाडींनीं गमन करणार्‍या अन्नानें रात्रीकरितां, स्पृहणीय अशा अन्नानें वसुदेवाकरितां, सुख मिळवून देणार्‍या अन्नानें आदित्याकरितां तुझें स्थापन केलें आहे म्हणून तूं द्युलोक, अंतरिक्ष वगैरेंना संतुष्ट कर. ॥६॥





विनियोग -


तन्तु॑ना रा॒यस्पोषे॑ण रा॒यस्पोषं॑ जिन्व सँस॒र्पेण॑ श्रु॒ताय॑ श्रु॒तं जि॑न्वै॒डेनौष॑धीभि॒रोषधीर्जिन्वोतत॒मेन॑ त॒नूभि॑स्त॒नूर्जि॑न्व वयो॒धसाधी॑ते॒नाधी॑तं जिन्वाभि॒जिता॒ तेज॑सा॒ तेजो॑ जिन्व ॥ ७ ॥


अर्थ - विस्तार पावणार्‍या अन्नानें धनाच्या वृद्धीकरितां, देहांत पसरणार्‍या अन्नानें शास्त्राकरितां व इडारूप अन्नानें औषधीकरितां, अत्यंत उत्कृष्ट अन्नानें शरीराकरितां, बाल्यादि वय वाढविणार्‍या अन्नानें अध्ययनांकरितां, सर्वजयहेतुभूत अन्नानें तेजाकरितां तुझें मी स्थापन केलें आहे. तूं धनपुष्टि, शास्त्र, औषधी, शरीर, अध्ययन व तेज यांना संतुष्ट कर. ॥७॥





विनियोग -


प्रति॒पद॑सि प्रति॒पदे॑ त्वाऽनु॒पद॑स्यनु॒पदे॑ त्वा स॒म्पद॑सि स॒म्पदे॑ त्वा॒ तेजो॑ऽसि॒ तेज॑से त्वा ॥ ८ ॥


अर्थ - (प्रतिपद् अन्न म्हणजे जीवनप्रापक अन्न, अनुपद् अन्न म्हणजे प्रतिदिनीं भक्षिलें जाणारें अन्न, संपदन्न म्हणजे संपत्ति देणारे अन्न व तेजोऽन्न म्हणजे तेज देणारें अन्न) हे इष्टके, तूं प्रतिपद् अन्नरूपी, अनुपद् अन्नरूपी, संपदन्नरूपी, तेजोऽन्नरूपी आहेस. प्रतिपदादि अन्न, संपत्ति, व तेज यांचें प्राप्तीकरितां तुझें मी स्थापन करतों. ॥८॥





विनियोग -


त्रि॒वृद॑सि त्रि॒वृते॑ त्वा प्र॒वृद॑सि प्र॒वृते॑ त्वा वि॒वृद॑सि वि॒वृते॑ त्वा स॒वृद॑सि स॒वृते॑ त्वाऽऽक्र॒मो॒ऽस्याक्र॒माय॑ त्वा संक्र॒मो॒ऽसि संक्र॒माय॑ त्वोत्क्र॒मो॒ऽस्युत्क्र॒माय॒ त्वोत्क्रा॑न्तिर॒स्युत्क्रा॑न्त्यै॒ त्वाऽधि॑पतिनो॒र्जोजं॑ जिन्व ॥ ९ ॥


अर्थ - कृषि, वृष्टि व बीज या तीन रूपानें अन्न तीन तर्‍हेनें राहते. त्यांस 'त्रिवृत्' म्हणावें. तद्रूपी तुझें मी त्रिवृदन्नाकरितां स्थापन करतों. भूतांना आच्छादक जें अन्न त्यास 'प्रवृत्' म्हणावें. त्या 'प्रवृत्' अन्नाकरितां तुझें मी स्थापन करतों. भूतांना विशेषेंकरून राहणार्‍या अन्नाला 'विवृत्' म्हणावें. सह राहणार्‍या अन्नाला 'सवृत्' म्हणावें. क्षुधेचें आक्रमण करणार्‍या अन्नाला 'आक्रम' म्हणावें. देहांत संक्रमण करणार्‍या अन्नाला 'संक्रम' म्हणावें. संतानोत्पत्तीकरितां बीजरूपानें परिणाम पावणार्‍या अन्नाला 'उत्क्राम' म्हणावें. उत्कृष्ट गमन करणार्‍या अन्नाला 'उत्क्रान्ति' असें म्हणावें. हे इष्टके, एतत्सर्वस्वरूपी जें अन्न तद्रूपिणी तूं आहेस. व त्या त्या त्रिवृत्, प्रवृत् वगैरे अन्नांकरितां तुझें मी स्थापन करतों. हे इष्टके, अधिक तर्‍हेनें संरक्षण करणार्‍या अन्नरसानें अन्नरसाला संतुष्ट कर. ॥९॥





विनियोग - 'राज्ञ्यसि' इत्यादि पांच मंत्रांनीं नाकसत् संज्ञक इष्टकांचें स्थापन करावें.


राज्ञ॑सि॒ प्राची॒ दिग्वस॑वस्ते दे॒वाऽ अधि॑पतयो॒ऽग्निर्हे॑ती॒नां प्र॑तिध॒र्ता त्रि॒वृत् त्वा॒ स्तोमः॑ पृथि॒व्याँ श्र॑य॒त्वाज्य॑मु॒क्थमव्य॑थायै स्तभ्नातु रथन्त॒रँ साम॒ प्रति॑ष्ठित्याऽ अ॒न्तरि॑क्ष॒ऽ ऋष॑यस्त्वा प्रथम॒जा दे॒वेषु॑ दि॒वो मात्र॑या वरि॒म्णा प्र॑थन्तु विध॒र्ता चा॒यमधि॑पतिश्च॒ ते त्वा॒ सर्वे॑ संविदा॒ना नाक॑स्य पृ॒ष्ठे स्व॒र्गे लो॒के यज॑मानं च सादयन्तु ॥ १० ॥


अर्थ - हे इष्टके, तूं शोभणारी पूर्वदिशा आहेस. अष्टवसु विशेषेंकरून तुझें पालन करतात, अग्नि तुला उपद्रव देणार्‍या शत्रुशस्त्रांचें निराकरण करणारा आहे, पृथिवीवर त्रिवृत् स्तोम तुझा आश्रय करो, तुझें चलन न व्हावें म्हणून आज्यसंज्ञक शस्त्र तुला दृढ करो, तसेंच तुझी अन्तरिक्षांत प्रतिष्ठा (स्थिति) व्हावी म्हणून रथन्तरसाम तुला दृढ करो, प्रथमोत्पन्न प्राण देवलोकांत आकाशाच्या परिमाणानें व विस्तारानें तुला विशाल करोत, इष्टका निर्माण करणारा व इष्टकापालक तुला विस्तीर्ण करोत. ते सर्व वसु, अग्निप्रभृति देव ऐकमत्य करून या यजमानाला स्वर्गलोकांत व इष्टके, तुला या यज्ञांत स्थापन करोत. ॥१०॥





विनियोग -


वि॒राड॑सि॒ दक्षि॑णा॒ दिग्रु॒द्रास्ते॑ दे॒वाऽ अधि॑पतय॒ इन्द्रो॑ हेती॒नां प्र॑तिध॒र्ता प॑ञ्चद॒शस्त्वा॒ स्तोमः॑ पृथि॒व्याँ श्र॑यतु प्रऽउ॑गमु॒क्थमव्य॑थायै स्तभ्नातु बृहत्साम॒ प्रति॑ष्ठित्याऽ अ॒न्तरि॑क्ष॒ऽ ऋष॑यस्त्वा प्रथम॒जा दे॒वेषु॑ दि॒वो मात्र॑या वरि॒म्णा प्र॑थन्तु विध॒र्ता चा॒यमाधि॑पतिश्च॒ ते त्वा॒ सर्वे॑ संविदा॒ना नाक॑स्य पृ॒ष्ठे स्व॒र्गे लो॒के यज॑मानं च सादयन्तु ॥ ११ ॥


अर्थ - हे इष्टके, तूं विशेषेंकरून शोभणारी दक्षिण दिशा आहेस, रुद्रदेव तुझें पालन करतात, इन्द्र तुला उपद्रव देणार्‍या शत्रुशस्त्रांचें निराकरण करणारा आहे, पृथ्वीवर पंचदश स्तोम तुझा आश्रय करो, तुझें चलन न व्हावें म्हणून प्रउगसंज्ञक शस्त्र तुला दृढ करो, तुझी अन्तरिक्षांत स्थिति व्हावी म्हणून बृहत्साम तुला दृढ करो, प्रथमोत्पन्न प्राण देवलोकांत आकाशाच्या परिमाणानें व विस्तारानें तुला विशाल करोत, इष्टका निर्माण करणारा व इष्टकापालक तुझें पालन करोत. ते सर्व रुद्र, इंद्रप्रभृति देव ऐकमत्य करून या यजमानाला स्वर्गलोकांत व तुला या यज्ञांत स्थापन करोत. ॥११॥





विनियोग -


स॒म्राड॑सि प्र॒तीची॒ दिगा॑दि॒त्यास्ते॑ दे॒वाऽ अधि॑पतयो॒ वरु॑णो हेती॒नां प्र॑तिध॒र्ता स॑प्तद॒शस्त्वा॒ स्तोमः॑ पृथि॒व्याँ श्र॑यतु मरुत्व॒तीय॑मु॒क्थमव्य॑थायै स्तभ्नातु वै॒रूपँ साम॒ प्रति॑ष्ठित्याऽ अ॒न्तरि॑क्ष॒ऽ ऋष॑यस्त्वा प्रथम॒जा दे॒वेषु॑ दि॒वो मात्र॑या वरि॒म्णा प्र॑थन्तु विध॒र्ता चा॒यमधि॑पतिश्च॒ ते त्वा॒ सर्वे॑ संविदा॒ना नाक॑स्य पृ॒ष्ठे स्व॒र्गे लो॒के यज॑मानं च सादयन्तु ॥ १२ ॥


अर्थ - हे इष्टके, तूं उत्तम शोभणारी पश्चिम दिशा आहेस. आदित्यदेव तुझें पालन करतात, वरुण तुला उपद्रव देणार्‍या शत्रुशस्त्रांचें निराकरण करणारा आहे, पृथिवीवर सप्तदश स्तोम तुझा आश्रय करो, तुझें चलन न व्हावें म्हणून मरुत्वतीयसंज्ञक शस्त्र तुला दृढ करो, तुझी अन्तरिक्षांत स्थिति व्हावी म्हणून वैरूपसाम तुला दृढ करो, प्रथमोत्पन्न प्राण देवलोकांत आकाशाच्या परिमाणानें व विस्तारानें तुला विशाल करोत, इष्टका निर्माण करणारा तुझें पालन करो. ते सर्व आदित्य, वरुणप्रभृति देव ऐकमत्य करून या यजमानाला स्वर्गलोकांत व तुला या यज्ञांत स्थापन करोत. ॥१२॥





विनियोग -


स्व॒राड॒स्युदी॑ची॒ दिङ् म॒रुत॑स्ते दे॒वाऽ अधि॑पतयः॒ सोमो॑ हेती॒नां प्र॑तिध॒र्तैक॑विँ॒शस्त्वा॒ स्तोमः॑ पृथि॒व्याँ श्र॑यतु॒ निष्के॑वल्यमु॒क्थमव्य॑थायै स्तभ्नातु वैरा॒जँ साम॒ प्रति॑ष्ठित्याऽ अ॒न्तरि॑क्ष॒ऽ ऋष॑यस्त्वा प्रथम॒जा दे॒वेषु॑ दि॒वो मात्र॑या वरि॒म्णा प्र॑थन्तु विध॒र्ता चा॒यमधि॑पतिश्च॒ ते त्वा॒ सर्वे॑ संविदा॒ना नाक॑स्य पृ॒ष्ठे स्व॒र्गे लो॒के यज॑मानं च सादयन्तु ॥ १३ ॥


अर्थ - हे इष्टके, तूं स्वयंशोभणारी उत्तर दिशा आहेस. मरुत् देव तुझे अधिपति आहेत, सोम तुला उपद्रव देणार्‍या शत्रुशस्त्रांचा निराकरण करणारा आहे, पृथिवीवर एकविंश स्तोम तुझा आश्रय करो, तुझें चलन न व्हावें म्हणून निष्केवल्यसंज्ञक शस्त्र तुला दृढ करो, तुझी अन्तरिक्षांत स्थिति व्हावी म्हणून वैराज साम तुला दृढ करो, प्रथमोत्पन्न प्राण देवलोकांत आकाशाच्या परिमाणानें व विस्तारानें तुला विशाल करोत, इष्टका निर्माण करणारा तुझें पालन करो, ते सर्व मरुत् सोम प्रभृति देव ऐकमत्य करून या यजमानाला स्वर्गलोकांत व तुला या यज्ञांत स्थापन करोत. ॥१३॥





विनियोग -


अधि॑पत्न्यासि बृ॒हती दिग्विश्वे॑ ते दे॒वाऽ अधि॑पतयो॒ बृह॒स्पति॑र्हेती॒नां प्र॑तिध॒र्ता त्रि॑णवत्रयस्त्रिँ॒शौ त्वा॒ स्तोमौ॑ पृथि॒व्याँ श्र॑यतां वैश्वदेवाग्निमारु॒तेऽ उ॒क्थेऽ अव्य॑थायै स्तभ्निताँ शाक्वररैव॒ते साम॑नी॒ प्रति॑ष्ठित्याऽ अ॒न्तरि॑क्ष॒ऽ ऋष॑यस्त्वा प्रथम॒जा दे॒वेषु॑ दि॒वो मात्र॑या वरि॒म्णा प्र॑थन्तु विध॒र्ता चा॒यमधि॑पतिश्च॒ ते त्वा॒ सर्वे॑ संविदा॒ना नाक॑स्य पृ॒ष्ठे स्व॒र्गे लो॒के यज॑मानं च सादयन्तु ॥ १४ ॥


अर्थ - हे मध्यदेशांतील इष्टके, तूं अतिशयेंकरून पालन करणारी प्रौढ अशी ऊर्ध्व दिशा आहेस, विश्वेदेव तुझे अधिपति आहेत, बृहस्पति तुला उपद्रव देणार्‍या शत्रुशस्त्रांचा निराकरण करणारा आहे. पृथिवीवर त्रिणव व त्रयस्रिंश हे दोन स्तोम तुझा आश्रय करोत, तुझें चलन न व्हावें म्हणून विश्वेदेव व अग्निमारुत उक्थें तुला दृढ करोत, शाक्कर व रैवत सामें तुझी अंतरिक्षांत स्थिति व्हावी म्हणून तुला दृढ करोत. प्रथमोत्पन्न प्राण देवलोकांत आकाशाच्या परिमाणानें व विस्तारानें तुला विशाल करोत, इष्टका निर्माण करणारा तुझें पालन करो. ते सर्व विश्वेदेव बृहस्पतिप्रभृति देव ऐकमत्य करून या यजमानाला स्वर्गलोकांत व तुला या यज्ञांत स्थापन करोत. ॥१४॥





विनियोग - 'अयं पुरः' इत्यादि पांच मंत्रांनीं पञ्चचूडासंज्ञक पांच इष्टकांचें स्थापन करावें.


अ॒यं पु॒रो हरि॑केशः॒ सूर्य॑रश्मि॒स्तस्य॑ रथगृ॒त्सश्च॒ रथौ॑जाश्च सेनानीग्राम॒ण्यौ॒ । पु॒ञ्जि॒क॒स्थ॒ला च॑ क्रतुस्थ॒ला चा॑प्स॒रसौ॑ द॒ङ्क्ष्णवः॑ पश॒वो॑ हे॒तिः पौरु॑षेयो व॒धः प्रहे॑ति॒स्तेभ्यो॒ नमो॑ऽ अस्तु॒ ते नो॑ऽवन्तु॒ ते नो॑ मृडयन्तु॒ ते यं द्वि॒ष्मो यश्च॑ नो॒ द्वेष्टि॒ तमे॑षां॒ जम्भे॑ दध्मः ॥ १५ ॥


अर्थ - हा पुढें असलेला अग्नि हरिकेश म्हणजे सुवर्ण ज्वालांनीं युक्त, सूर्यरश्मि म्हणजे सूर्याप्रमाणें ज्याचे किरण आहेत असा, रथगृत्स म्हणजे रथकार्यांत कुशल, रथौजाः म्हणजे रथयुद्धकुशल, सेनानी म्हणजे सेनापति, ग्रामणी म्हणजे गांव चालविणारा गांवचा पुढारी, पुञ्जिकस्थला म्हणजे रूपलावण्यादिकांना आधारभूत, क्रतुस्थला म्हणजे रूपादिज्ञानांचें स्थान, दंक्ष्यु म्हणजे दंश करण्याचा (चावण्याचा) ज्यांचा स्वभाव आहे असे, पौरुषेय वध म्हणजे जें अस्त्र सोडलें असतां शत्रु आपसांतच युद्ध करून मरतात हा जो पूर्वेकडील अग्नि तो हरिकेश व सूर्यरश्मि आहे. रथगृत्स व रथौजा (वासंतिक मास) हे त्याचे सेनापति आणि ग्रामनायक आहेत. पुञ्जिकस्थला व क्रतुस्थला या त्याच्या दोन परिचारिका अप्सरा आहेत. दंश करणारे व्याघ्रादि पशु त्याचें शस्त्र आहे. पौरुषेयबल त्याचें प्रकृष्ट शस्त्र आहे. या सर्वांना नमस्कार असो. ते आमचें रक्षण करोत व आम्हांला सुख देवोत. ज्याचा आम्ही द्वेष करतों व जो आमचा द्वेष करतो त्याला आम्ही हरिकेशादिकांच्या मुखांत (दाढेंत) स्थापन करतों. ॥१५॥





विनियोग -


अ॒यं द॑क्षि॒णा वि॒श्वक॑र्मा॒ तस्य॑ रथस्व॒नश्च॒ रथे॑चित्रश्च सेनानीग्राम॒ण्यौ॒ । मे॒न॒का च॑ सहज॒न्या चा॑प्स॒रसौ॑ यातु॒धाना॑ हे॒ती रक्षाँ॑सि॒ प्रहे॑ति॒स्तेभ्यो॒ नमो॑ऽ अस्तु॒ ते नो॑ऽवन्तु॒ ते नो॑ मृडयन्तु॒ ते यं द्वि॒ष्मो यश्च॑ नो॒ द्वेष्टि॒ तमे॑षां॒ जम्भे॑ दध्मः ॥ १६ ॥


अर्थ - विश्वकर्मा - सर्व कर्मे करणारा, रथस्वनः - रथांत बसून शब्द करणारा, रथेचित्रः - रथांत बसून आश्चर्यकारक कर्मे करणारा, मेनका - जिला सर्व लोक मान देतात ती, सहजन्या - सर्व लोकोपयोगी हा दक्षिण दिशेकडील अग्नि विश्वकर्मा आहे. रथेस्वन व रथेचित्र (ग्रीष्मऋतूचे अवयव) हे त्याचे सेनापति व ग्रामनायक आहेत. मेनका व सहजन्या या त्याच्या अप्सरा आहेत. यातुधान जातीचे राक्षस हें त्याचें शस्त्र व राक्षस हें त्याचें उत्कृष्ट शस्त्र आहे. या सर्वांना नमस्कार असो. ते आमचें रक्षण करोत व आम्हांला सुख देवोत. ज्याचा आम्ही द्वेष करतों व जो आमचा द्वेष करतो त्याला आम्ही विश्वकर्मादिकांच्या मुखांत (दाढेंत) स्थापन करतों. ॥१६॥





विनियोग -


अ॒यं प॒श्चाद्वि॒श्वव्य॑चा॒स्तस्य॒ रथ॑प्रोत॒श्चास॑मरथश्च सेनानीग्राम॒ण्यौ॒ । प्र॒म्लोच॑न्ती चानु॒म्लोच॑न्ती चाप्स॒रसौ॑ व्या॒घ्रा हे॒तिः स॒र्पाः प्रहे॑ति॒स्तेभ्यो॒ नमो॑ऽ अस्तु॒ ते नो॑ऽवन्तु॒ ते नो॑ मृडयन्तु॒ ते यं द्वि॒ष्मो यश्च॑ नो॒ द्वेष्टि॒ तमे॑षां॒ जम्भे॑ दध्मः ॥ १७ ॥


अर्थ - विश्वव्यचा - उदय पावून सर्वांना प्रकाशित करणारा, रथप्रोत - रथांत शिवून टाकल्याप्रमाणें असलेला, असमरथ - ज्याचा रथ दुसर्‍यासारखा नसून अर्धिक आहे, (हे दोन वर्षाऋतूचे अवयव) प्रम्लोचन्ती - पुरुषाला आपलें शरीर दाखविणारी, अनुम्लोचन्ती - वारंवार शरीर दाखविणारी, हा पश्चिम दिशेकडील अग्नि विश्वव्यचा आहे, रथप्रोत हा त्याचा सेनापति व असमरथ त्याचा ग्रामनायक आहे, प्रम्लोचन्ती व अनुम्लोचन्ती या त्याच्या परिचारिणी अप्सरा आहेत. व्याघ्र हें त्याचे शस्त्र व सर्प उत्कृष्ट शस्त्र आहे. या सर्वांना नमस्कार असो. ते आमचें रक्षण करोत व आम्हांला सुख देवोत. ज्याचा आम्ही द्वेष करतों व जो आमचा द्वेष करतों त्याला आम्ही विश्वव्यचा प्रभृतींच्या दाढेंत स्थापन करतों. ॥१७॥





विनियोग -


अ॒यमु॑त्त॒रात्सं॒यद्व॑सु॒स्तस्य॒ तार्क्ष्य॒श्चारि॑ष्टनेमिश्च सेनानीग्राम॒ण्यौ॒ । वि॒श्वाची॑ च घृ॒ताची॑ चाप्स॒रसा॒वापो॑ हे॒तिर्वातः॒ प्रहे॑ति॒स्तेभ्यो॒ नमो॑ऽ अस्तु॒ ते नो॑ऽवन्तु॒ ते नो॑ मृडयन्तु॒ ते यं द्वि॒ष्मो यश्च॑ नो॒ द्वेष्टि॒ तमे॑षां॒ जम्भे॑ दध्मः ॥ १८ ॥


अर्थ - संयद्वसुः - ज्यांप्रत द्रव्यप्राप्तीकरितां लोक गमन करतात तो यज्ञ, तार्क्ष्य - तीक्ष्ण असे पक्ष अन्तरिक्षांत स्थापन करणारा, अरिष्टनेमिः - ज्याचें आयुध अहिंसित आहे, विश्वाची - सर्व विश्वांत गमन करणारी, घृताची - घृतभक्षण करणारी, हा उत्तर दिशेकडील संयद्वसु नांवाचा अग्नि आहे, तार्क्ष्य त्याचा सेनापति व अरिष्टनेमि त्याचा ग्रामनायक आहे, (हे शरदऋतूचे अवयव आहेत) विश्वाची व घृताची या त्याच्या परिचारिका अप्सरा आहेत. जलसमूह हें त्याचें शस्त्र व वायु हें उत्कृष्ट शस्त्र आहे. या सर्वांना नमस्कार असो. ते आमचें रक्षण करोत व आम्हांला सुख देवोत. ज्याचा आम्ही द्वेष करतों व जो आमचा द्वेष करतो त्याला आम्ही संयद्वसुप्रभृतींच्या दाढेंत स्थापन करतों. ॥१८॥





विनियोग -


अ॒यमु॒पर्य॒र्वाग्व॑सु॒स्तस्य॑ सेन॒जिच्च॑ सु॒षेण॑श्च सेनानीग्राम॒ण्यौ॒ । उ॒र्वशी॑ च पू॒र्वचि॑त्तिश्चाप्स॒रसा॑वव॒स्फूर्ज॑न्हे॒तिर्वि॒द्युत्प्रहे॑ति॒स्तेभ्यो॒ नमो॑ऽ अस्तु॒ ते नो॑ऽवन्तु॒ ते नो॑ मृडयन्तु॒ ते यं द्वि॒ष्मो यश्च॑ नो॒ द्वेष्टि॒ तमे॑षां॒ जम्भे॑ दध्मः ॥ १९ ॥


अर्थ - अर्वाग्वसु - अधोभागीं जलवृष्टि करणारा पर्जन्य, सेनजित् - पर्जन्याची सेना जिंकणारा, सुषेण - ज्याची सेना उत्तम आहे असा (हे हेमंतऋतुचे अवयव), उर्वशी - विशेषेंकरून वश करणारी, पूर्वचित्ति - प्रथमच पुरुषाचें मन हरण करणारी, स्फूर्जन् - मेघाचा शब्द हा ऊर्ध्वदेशावर राहणारा अर्वाग्वसुनामक अग्नि आहे. सेनजित् हा त्याचा सेनापति व सुषेण हा त्याचा ग्रामनायक आहे. ऊर्वशी व पूर्वचित्ति या त्याच्या परिचारिका अप्सरा आहेत, मेघाचा शब्द हें त्याचें शस्त्र व वीज हें त्याचें उत्कृष्ट शस्त्र आहे. या सर्वांना नमस्कार असो. ते आमचें रक्षण करोत व आम्हांला सुख देवोत. ज्याचा आम्ही द्वेष करतों व जो आमचा द्वेष करतों त्याला आम्ही अर्वाग्वसुप्रभृतींच्या दाढेंत स्थापन करतों. ॥१९॥





विनियोग - 'अग्निर्मूर्धा' इत्यादि मंत्रांनीं छन्दस्यासंज्ञक इष्टकांचें स्थापन करावे.


अ॒ग्निर्मू॒र्धा दि॒वः क॒कुत्पतिः॑ पृथि॒व्याऽ अ॒यम् । अ॒पाँ रेताँ॑सि जिन्वति ॥ २० ॥


अर्थ - हा अग्नि द्युलोकांतून पडणार्‍या जलांचे व्रीहियवादिरूपी सारभाग वाढवितो. तो अग्नि द्युलोकांचें मस्तक व वशिंड असून पृथ्वीचा पालक आहे. ॥२०॥





विनियोग -


अ॒यम॒ग्निः स॑ह॒स्रिणो॒ वाज॑स्य श॒तिन॒स्पतिः॑ । मू॒र्धा क॒वी र॑यी॒णाम् ॥ २१ ॥


अर्थ - सहस्त्र व शतसंख्याक अन्नाचा स्वामी व विद्वान् आणि सर्व धनांत श्रेष्ठ जो अग्नि त्याची मी स्तुति करतों. ॥२१॥





विनियोग -


त्वाम॑ग्ने॒ पुष्क॑रा॒दध्यथ॑र्वा॒ निर॑मन्थत । मू॒र्ध्नो विश्व॑स्य वा॒घतः॑ ॥ २२ ॥


अर्थ - हे अग्ने, अथर्वऋषीनें उदकांपासून तुझें मंथन केलें, व सर्व जगांतील ऋत्विजांनीं अरणींतून तुझें मंथन केलें. ॥२२॥





विनियोग - 'भुवोयज्ञस्य' इत्यादि तीन ऋचांनीं त्रिष्टुप्‌संज्ञक इष्टकांचें स्थापन करावें.


भुवो॑ य॒ज्ञस्य॒ रज॑सश्च ने॒ता यत्रा॑ नि॒युद्‍भिः॒ सच॑से शि॒वाभिः॑ । दि॒वि मू॒र्धानं॑ दधिषे स्व॒र्षां जि॒ह्वाम॑ग्ने चकृषे हव्य॒वाह॑म् ॥ २३ ॥


अर्थ - हे अग्ने, तूं ज्यावेळीं हविर्द्रव्याचें वहन करणारी ज्वाला पसरतोस त्यावेळीं द्रव्यदेवतायुक्त यागाचा व यज्ञपरिणामरूपी उदकाला नेतोस. त्या स्थानांमध्यें मंगलरूपी अश्वांनीं व अश्वस्त्रियांनीं तूं युक्त होतोस व द्युलोकांत स्वर्ग देणार्‍या सूर्याला धारण करतोस. ज्या तुझें हें सर्व कृत्य आहे त्या तुला इष्टकेच्या रूपानें मी स्थापन करतों. ॥२३॥





विनियोग -


अबो॑ध्य॒ग्निः स॒मिधा॒ जना॑नां॒ प्रति॑ धे॒नुमि॑वाय॒तीमु॒षास॑म् । य॒ह्वाऽ इ॑व॒ प्र व॒यामु॒ज्जिहानाः॒ प्र भा॒नवः॑ सिस्रते॒ नाक॒मच्छ॑ ॥ २४ ॥


अर्थ - गाय आली म्हणजे वत्स जागृत होतें, सकाळ झाली म्हणजे लोक जागे होतात, त्याप्रमाणें अग्निहोत्रीलोकांनीं प्रदीप्त केल्यामुळें अग्नि जागृत होतो. तसेंच पंख फुटलेले पक्षी वृक्षशाखेकडे जात असतां आकाशांत पसरतात त्याप्रमाणें अग्नीचें किरण स्वर्गाकडे पसरतात. ॥२४॥





विनियोग -


अवो॑चाम क॒वये॒ मेध्या॑य॒ वचो॑ व॒न्दारु॑ वृष॒भाय॒ वृष्णे॑ । गवि॑ष्ठिरो॒ नम॑सा॒ स्तोम॑म॒ग्नौ दि॒वी॒व रु॒क्ममु॑रु॒व्यञ्च॑मश्रेत् ॥ २५ ॥


अर्थ - (उद्गाते म्हणतात) आम्ही भूतवस्तुदर्शी अग्नीची वन्दनयुक्त स्तुति केली. तो अग्नि यज्ञार्ह, तरुण व कामनांचीं वृष्टि करणारा असा आहे. अस्खलित वाणी बोलणारा होता. याज्यानुवाक्या अस्खलित वाणीनें उच्चारून द्युलोकांत प्रकाशमान व विशेषस्तुतियुक्त आदित्याप्रमाणें अग्नीशीं हविर्द्रव्य संबद्ध करतों. ॥२५॥





विनियोग - 'अयमिह' या मंत्रांनीं तीन जगतीसंज्ञक इष्टका स्थापन कराव्या.


अ॒यमि॒ह प्र॑थ॒मो धा॑यि धा॒तृभि॒र्होता॒ यजि॑ष्ठोऽ अध्व॒रेष्वीड्यः॑ । यमप्न॑वानो॒ भृग॑वो विरुरु॒चुर्वने॑षु चि॒त्रं विभ्वं॒ वि॒शे-वि॑शे ॥ २६ ॥


अर्थ - हा अग्नि प्रथम असल्यानें स्थापन करणार्‍यांनीं त्याचें स्थापन केलें. हा देवांना बोलावणारा, अतिशय पूज्य, सोमादियागांत ऋत्विजांनीं स्तुति केला गेलेला असा आहे. तसेंच पुत्रवान् अशा भृगुवंशोत्पन्न मुनींनीं याला प्रत्येक यजमानाच्या कल्याणाकरितां ग्रामाचे बाहेर अरण्य-प्रदेशांत प्रदीप्त केले. तो विविधकर्मोपयोगी असल्यानें आश्चर्यकारक व म्हणूनच व्यापक-शक्तियुक्त असा आहे. ॥२६॥





विनियोग -


जन॑स्य गो॒पाऽ अ॑जनिष्ट॒ जागृ॑विर॒ग्निः सु॒दक्षः॑ सुवि॒ताय॒ नव्य॑से । घृतप्र॑तीको बृह॒ता दि॑वि॒स्पृशा॑ द्यु॒मद्विभा॑ति भर॒तेभ्यः॒ शुचिः॑ ॥ २७ ॥


अर्थ - जो अग्नि नवीन अशा यज्ञकर्माकरितां ऋत्विजांनीं मंथन करून उत्पन्न केला व तो द्युलोकास स्पर्श करणार्‍या मोठया ज्वालासमूहानें प्रदीप्त केला तो अग्नि लोकांचें रक्षण करणारा, कर्मांत जागा राहणारा, अत्यंत उत्साही, व ज्याचें मुखांत घृत होमलें जात असूनही उष्टा न होणारा पवित्र असा आहे. ॥२७॥





विनियोग -


त्वाम॑ग्ने॒ऽ अङ्‍गि॑रसो॒ गुहा॑ हि॒तमन्व॑विन्दञ्छिश्रिया॒णं वने॑-वने । स जा॑यसे म॒थ्यमा॑नः॒ सहो॑ म॒हत्त्वामा॑हुः॒ सह॑सस्पु॒त्रम॑ङ्‍गिरः ॥ २८ ॥


अर्थ - हे अग्ने, अंगिरोवंशांतील ऋषि गूढ प्रदेशांत राहणार्‍या (पाण्यांत असलेला) व निरनिराळ्या वनस्पतींचा आश्रय करून राहणार्‍या अशा तुला शोधून काढते झाले. असा तूं अरणींतून उत्पन्न होतोस. मोठया जोरानें तुझें मंथन करतात म्हणून हे अंगिरो अग्ने, तुला बलाचा पुत्र म्हणतात. ॥२८॥





विनियोग - 'सखायः सम्' इत्यादि तीन ऋचांनीं तीन अनुष्टुप्‌संज्ञक इष्टका स्थापन कराव्या.


सखा॑यः॒ सं वः॑ स॒म्यञ्च॒मिषँ॒ स्तोमं॑ चा॒ग्नये॑ । वर्षि॑ष्ठाय क्षिती॒नामू॒र्जो नप्त्रे॒ सह॑स्वते ॥ २९ ॥


अर्थ - यजमान ऋत्विजांना म्हणतो - हे ऋत्विजांनो, तुम्ही अग्नीकरितां उत्तम हविरूपी अन्न व त्रिवृत् पंचदशादि स्तोमाचें संपादन करावें. तूं सर्व मनुष्य़ांत अत्यंत वृद्ध आहेस व जलांचा पौत्र व बलवान् आहेस. ॥२९॥





विनियोग -


सँस॒मिद्यु॑वसे वृष॒न्नग्ने॒ विश्वा॑न्य॒र्यऽ आ । इडस्प॒दे समि॑ध्यसे॒ स नो॒ वसू॒न्याभ॑र ॥ ३० ॥


अर्थ - हे सिंचन करणार्‍या अग्ने, तूं फलांचा स्वामी असल्यानें सर्व फलें सर्व बाजूंनीं यजमानाला देतोस. व तूं पृथ्वीच्या उत्तर वेदीस्थानांवर प्रदीप्त केला जातोस. असा तूं आम्हांला द्रव्ये दे. ॥३०॥





विनियोग -


त्वां चि॑त्रश्रवस्तम॒ हव॑न्ते विक्षु ज॒न्तवः॑ । शो॒चिष्के॑शं पुरुप्रि॒याग्ने॑ ह॒व्याय॒ वोढ॑वे ॥ ३१ ॥


अर्थ - ज्याची कीर्ति अतिशयेंकरून आश्चर्यकारक आहे व पुष्कळ यजमानांना प्रिय अशा हे अग्ने, ऋत्विग्यजमान हविर्द्रव्य वहन करण्याकरितां ज्याच्या ज्वाला प्रदीप्त आहेत अशा तुला बोलावतात. ॥३१॥





विनियोग - 'एना वः' इत्यादि तीन मंत्रांनीं बृहतीसंज्ञक तीन इष्टकांचें स्थापन करावें.


ए॒ना वो॑ऽ अ॒ग्निं नम॑सो॒र्जो नपा॑त॒माहु॑वे । प्रि॒यं चेति॑ष्ठम॒रतिँ स्व॑ध्व॒रं विश्व॑स्य दू॒तम॒मृत॑म् ॥ ३२ ॥


अर्थ - हे ऋत्विग्यजमानांनो, तुमच्या या हविर्द्रव्यरूपी अन्नानें मी अग्नीला बोलावतों. तो अग्नि जलांचा पौत्र, यजमानांचा आवडता, अतिशयेंकरून चेतना उत्पन्न करणारा, सर्वदा उद्योगी व उत्तम यज्ञांनीं युक्त असा सर्व यजमानांचा दूत व अमर असा आहे. ॥३२॥





विनियोग -


विश्व॑स्य दू॒तम॒मृतं॒ विश्व॑स्य दू॒तम॒मृत॑म् । स यो॑जतेऽ अरु॒षा वि॒श्वभो॑जसा॒ स दु॑द्रव॒त्स्वा॒हुतः ॥ ३३ ॥


अर्थ - तो अग्नि विशेषेंकरून सर्वांचे घरीं दूतकार्य करणारा व अविनाशी आहे. उत्तम प्रकारें बोलविला जाणारा तो अग्नि रोषरहित व सर्वभक्षक घोडे रथाला जोडतो व जातो. ॥३३॥





विनियोग -


स दु॑द्रव॒त् स्वा॒हुतः॒ स दु॑द्रव॒त् स्वा॒हुतः । सु॒ब्रह्मा॑ य॒ज्ञः सु॒शमी॒ वसू॑नां दे॒वँ राधो॒ जना॑नाम् ॥ ३४ ॥


अर्थ - तोच अग्नि रथावर बसून उत्तम प्रकारें बोलावला जाणारा असा होत्साता जेथें वसुरुद्रादित्ययुक्त सवनत्रयविशिष्ट यज्ञ होतो व जेथें यजमानांचें हविरूपी धन आहे व जेथें उत्तम कर्में होतात व जेथें चांगला ब्रह्मा आहे तेथें (यज्ञांत) जातो. ॥३४॥





विनियोग - 'अग्ने वाजस्य' इत्यादि तीन मंत्रांनीं उष्णिक्‌संज्ञक तीन इष्टका स्थापन कराव्या.


अग्ने॒ वाज॑स्य॒ गोम॑त॒ऽ ईशा॑नः सहसो यहो । अ॒स्मे धे॑हि जातवेदो॒ महि॒ श्रवः॑ ॥ ३५ ॥


अर्थ - हे बलपुत्र अग्ने, हे प्रज्ञावान्, आम्हांला पुष्कळ द्रव्य दे. तूं धेनुयुक्त अन्नाचा अधिपति आहेस. ॥३५॥





विनियोग -


सऽ इ॑धा॒नो वसु॑ष्क॒विर॒ग्निरी॒डेन्यो॑ गि॒रा । रे॒वद॒स्मभ्यं॑ पुर्वणीक दीदिहि ॥ ३६ ॥


अर्थ - हे बहुमुखाचे अग्ने, आमच्याकरितां धन देणारा होत्साता प्रदीप्त हो. तूं दीप्यमान, निवासहेतु, भूतदर्शी, यज्ञाचा प्रथम प्रवर्तक व वेदत्रयात्मक वाणीनें स्तुत्य आहेस. ॥३६॥





विनियोग -


क्ष॒पो रा॑जन्नु॒त त्मनाऽग्ने वस्तो॑रु॒तोषसः॑ । स ति॑ग्मजम्भ र॒क्षसो॑ दह॒ प्रति॑ ॥ ३७ ॥


अर्थ - हे प्रकाशमान, तीक्ष्णदंष्ट्र अग्ने, परस्परसंबंधीं व उषःकालसंबंधीं प्रत्येक राक्षसाला तूं जाळ. तूं स्वभावतःच राक्षसांचा नाशक आहेस. ॥३७॥





विनियोग - 'भद्रोनः' इत्यादि तीन मंत्रांनीं ककुप्‌संज्ञक तीन इष्टकांचें स्थापन करावें.


भद्रो नो॑ऽ अग्निराहु॑तो भ॒द्रा रा॒तिः सु॑भग भ॒द्रोऽ अ॑ध्व॒रः । भ॒द्राऽ उ॒त प्रश॑स्तयः ॥ ३८ ॥


अर्थ - हे सर्वैश्वर्ययुक्त चैत्य अग्ने, ऋत्विजांनीं बोलावलेला अग्नि आमचें कल्याण करणारा होवों. तुझें दान, यज्ञ तशाच प्रशस्त कीर्तीही कल्याणकारक होवोत. ॥३८॥





विनियोग -


भ॒द्राऽ उ॒त प्रश॑स्तयो भ॒द्रं मनः॑ कृणुष्व वृत्र॒तूर्ये॑ । येना॑ स॒मत्सु॑ सा॒सहः॑ ॥ ३९ ॥


अर्थ - हे अग्ने, ज्या मनानें तूं संग्रामांत शत्रू जिंकतोस तें तुझें मन आमच्या पापांचा नाश व कल्याण करो. ॥३९॥





विनियोग -


येना॑ स॒मुत्सु॑ सा॒सहोऽव॑ स्थि॒रा त॑नुहि॒ भूरि॒ शर्ध॑ताम् । व॒नेमा॑ तेऽ अ॒भिष्टि॑भिः ॥ ४० ॥


अर्थ - हे अग्ने, ज्या मनानें तूं संग्रामांत शत्रू जिंकतोस तें तुझें मन बलवंतांचीं धनुष्यें रज्जुरहित करो व तुझ्या मार्गांनीं आम्ही उपभोग्य वस्तूंचें सेवन करूं. ॥४०॥





विनियोग - 'अग्निं तम्' इत्यादि तीन मंत्रांनीं पंक्तिसंज्ञक तीन इष्टकांचें स्थापन करावें.


अ॒ग्निं तं म॑न्ये॒ यो वसु॒रस्तं॒ यं यन्ति॑ धे॒नवः॑ । अस्त॒मर्व॑न्तऽ आ॒शवोऽस्तं॒ नित्या॑सो वा॒जिन॒ऽ इषँ॑ स्तो॒तृभ्य॒ऽ आभ॑र ॥ ४१ ॥


अर्थ - निवास करविणारा जो अग्नि त्याला मी पुढील प्रकारेंकरून ओळखतों. त्याचें उद्धरण झालें कीं हा आपला दोहनकाल आहे असें समजून गाई घरीं येतात, व शीघ्रगामी अश्वही अग्नीला पाहून यजमानाचें घरीं येतात. सर्वकाल राहणारे बलवान् व सिंधु देशांतील घोडे ज्याला पाहून यजमानाचे घरीं येतात अशा हे अग्ने, स्तुति करणार्‍या यजमानांना अन्न दे. ॥४१॥





विनियोग -


सोऽ अ॒ग्निर्यो वसु॑र्गृ॒णे सं यमा॒यन्ति॑ धे॒नवः॑ । समर्व॑न्तो रघु॒द्रुवः॒ सँ सु॑जा॒तासः॑ सूरय॒ऽ इषँ॑ स्तो॒तृभ्य॒ऽ आभ॑र ॥ ४२ ॥


अर्थ - जो अग्नि निवास करविणारा आहे त्याची स्तुति करतों. ज्या अग्निकडे धेनु व क्षिप्रगामी घोडे येतात, व विद्वान्, उत्तम कुलांत जन्मलेले ऋत्विज् ज्याचें सेवन करतात अशा हे अग्ने, तूं स्तुति करणार्‍या यजमानांना अन्न दे. ॥४२॥





विनियोग -


उ॒भे सु॑श्चन्द्र स॒र्पिषो॒ दर्वी॑ श्रीणीष आ॒सनि॑ । उ॒तो न॒ऽ उत्पु॑पूर्याऽ उ॒क्थेषु॑ शवसस्पत॒ऽ इषँ॑ऽ स्तो॒तृभ्य॒ऽ आभ॑र ॥ ४३ ॥


अर्थ - हे सुवर्णोत्पादक अग्ने, तूं घृतपानांकरितां दर्वीच्या आकाराचे दोन हात तोंडांत स्थापन करतोस. आणखी हे बलाधिपते, शस्त्रयुक्त यज्ञामध्यें धन देऊन आमचा उत्कर्ष कर व स्तोत्यांना अन्न दे. ॥४३॥





विनियोग - 'अग्ने तम्' इत्यादि तीन मंत्रांनीं पदपंक्तिसंज्ञक तीन इष्टका स्थापन कराव्या.


अग्ने॒ तम॒द्याश्वं॒ न स्तोमैः॒ क्रतुं॒ न भ॒द्रँ हृ॑दि॒स्पृश॑म् । ऋ॒ध्यामा॑ त॒ऽ ओहैः॑ ॥ ४४ ॥


अर्थ - हे अग्ने, ज्याप्रमाणें ब्राह्मण स्तुति करून अश्वमेधांतील घोडयाला व तसेंच ते अत्यंत आवडत्या अशा आपल्या कल्याणकारक संकल्पाला पूर्ण करतात, त्याप्रमाणें फलदायी अशा सामसमुदायांनीं तुझ्या यज्ञाला आज आम्हीं समृद्ध करावें. ॥४४॥





विनियोग -


अधा॒ ह्य॒ग्ने॒ क्रतो॑र्भ॒द्रस्य॒ दक्ष॑स्य सा॒धोः । र॒थीर्‍ऋ॒तस्य॑ बृह॒तो ब॒भूथ॑ ॥ ४५ ॥


अर्थ - हे अग्ने, सारथी यज्ञ चालवितो त्याप्रमाणें तूं आमच्या यज्ञाला नंतर संपन्न कर. तो यज्ञ कल्याणरूपी, समृद्ध, उत्तम रीतीनें सिद्ध होणारा, अमोघफलाचा व प्रौढ असा आहे. ॥४५॥





विनियोग -


ए॒भिर्नो॑ऽ अ॒र्कैर्भवा॑ नो अ॒र्वाङ्‍ स्व॒र्ण ज्योतिः॑ । अग्ने॒ विश्वे॑भिः सु॒मना॒ऽ अनी॑कैः ॥ ४६ ॥


अर्थ - ज्याप्रमाणें स्तुति केलेलें आदित्यरूपी तेज प्राण्यांच्या सन्मुख येतें, त्याप्रमाणें पूज्य अशा मंत्रांनीं तूं प्रसन्न होऊन सर्व मुखांनीं आमच्या सन्मुख होऊन आमच्यावर अनुग्रह कर. ॥४६॥





विनियोग - 'अग्निं होतारम्' या मंत्रानें अतिछन्दस् संज्ञक इष्टकेचें स्थापन करावें.


अ॒ग्निँ होता॑रं मन्ये॒ दास्व॑न्तं॒ वसुँ॑ सू॒नुँ सह॑सो जा॒तवे॑दसं॒ विप्रं॒ न जा॒तवे॑दसम् । यऽ ऊ॒र्ध्वया॑ स्वध्व॒रो दे॒वो दे॒वाच्या॑ कृ॒पा । घृ॒तस्य॒ विभ्रा॑ष्टि॒मनु॑वष्टि शो॒चिषा॒ऽऽजुह्वा॑नस्य स॒र्पिषः॑ ॥ ४७ ॥


अर्थ - दानादिगुणयुक्त असा जो अग्नि देवाकडे जाण्यास समर्थ अशा आपल्या उंच ज्वालेनें सर्वत्र पसरणार्‍या व होमल्या जाणार्‍या घृताच्या पडणार्‍या थेंबाची वाट पाहतो तो अग्नि पुढील गुणांनीं विशिष्ट आहे असें मी समजतों. तो देवांना बोलावणारा, दाता, चांगले यज्ञ करणारा, निवास करविणारा, बलानें मंथन केल्यामुळें उत्पन्न झालेला व ब्राह्मणाप्रमाणें ज्याला ज्ञान प्राप्त झालें असा आहे. ॥४७॥





विनियोग - 'अग्नेत्वं नो' इत्यादि तीन मंत्रभागांनीं द्विपदासंज्ञक तीन इष्टकांचें स्थापन करावें.


अग्ने॒ त्वं नो॒ऽ अन्त॑मऽ उ॒त त्रा॒ता शि॒वो भ॑वा वरू॒थ्यः॒ । वसू॑र॒ग्निर्वसु॑श्रवा॒ऽ अच्छा॑ नक्षि द्यु॒मत्त॑मँ र॒यिंदाः॑ । तं त्वा॑ शोचिष्ठ दीदिवः सु॒म्नाय॑ नूनमी॑महे सखि॑भ्यः ॥ ४८ ॥


अर्थ - हे अग्ने, तूं सर्वदा आमच्याजवळ राहून आमचें पालन कर व कल्याण कर व आमच्या पुत्रादि समुदायांचें हित कर. तूं लोकांना निवास करविणारा, गमनशील, द्रव्यदाता म्हणून प्रसिद्ध असा आहेस. हे निर्मळ अग्ने, तूं आमच्या होमशाळेंत ये व अत्यंत प्रकाशमान धन दे. हे प्रकाशमान व सर्वदीपक अग्ने, पूर्वोक्तगुणविशिष्ट अशा तुजकडे आम्ही मित्रांकरितां निश्चयात्मक सुख मागतों. ॥४८॥





विनियोग - 'येन' इत्यादि आठ ऋचांनीं पुनः चिति करावी म्हणजे इष्टका स्थापन करावें.


येन॒ऽ ऋष॑य॒स्तप॑सा स॒त्रमाय॒न्निन्धा॑ना अ॒ग्निँ स्व॑रा॒भर॑न्तः । तस्मि॑न्न॒हं निद॑धे॒ नाके॑ऽ अ॒ग्निं यमा॒हुर्मन॑व स्ती॒र्णब॑र्हिषम् ॥ ४९ ॥


अर्थ - मुनि एकाग्र अन्तःकरणानें यज्ञ करण्यास तयार झाले ते अग्नि प्रदीप्त करणारे, स्वर्गाप्रत जाणारे असे आहेत. त्या तपाचे योगें स्वर्गलोकाचे निमित्तानें मी अग्नीचें स्थापन करतों. त्या अग्नीला मनन करणारे ऋषी ज्यांत दर्भ पसरले आहेत असा यज्ञाचा साधक समजतात. ॥४९॥





विनियोग -


तं पत्नी॑भि॒रनु॑गच्छेम देवाः पु॒त्रैर्भ्रातृ॑भिरु॒त वा॒ हिर॑ण्यैः । नाकं॑ गृभ्णा॒नाः सु॑कृ॒तस्य॑ लो॒के तृ॒तीये॑ पृ॒ष्ठे अधि॑ रोच॒ने दि॒वः ॥ ५० ॥


अर्थ - हे प्रकाशमान ऋत्विजांनो, कलत्र, पुत्र, बंधु व सुवर्ण यांसह आम्ही त्या अग्नीचें अनुगमन करतों. आम्ही प्रकाशमान व पुण्यफलभूत अशा द्युलोकांत स्वर्गाची इच्छा करणारे आहों. ॥५०॥





विनियोग -


आ वा॒चो मध्य॑मरुहद्‍भुर॒ण्यर॒यम॒ग्निः सत्प॑ति॒श्चेकि॑तानः । पृ॒ष्ठे पृ॑थि॒व्या निहि॑तो॒ दवि॑द्युतदधस्प॒दं कृ॑णुतां॒ ये पृ॑त॒न्यवः॑ ॥ ५१ ॥


अर्थ - ज्या अग्नीनें चयनस्थानांवर आरोहण केलें तो अग्नि युद्धेच्छु पापी लोकांना पायाखालीं चिरडून टाको. तो अग्नि जगाचा पोषक, साधूंचा पालक, ज्ञान देणारा, अतिशय प्रकाशणारा, व पृथ्वीवर स्थापन केलेला असा आहे. ॥५१॥





विनियोग -


अ॒यम॒ग्निर्वी॒रत॑मो वयो॒धाः स॑ह॒स्रियो॑ द्योतता॒मप्र॑युच्छन् । वि॒भ्राज॑मानः सरि॒रस्य॒ मध्य॒ऽ उप॒ प्रया॑हि दि॒व्यानि॒ धाम॑ ॥ ५२ ॥


अर्थ - हा अग्नि प्रकाशित होवो व दिव्यस्थानांना जावो. तो अतिशय पराक्रमी, हविर्द्रव्य धारण करणारा, हजार इष्टकांनीं मोजला गेलेला, कर्मांत न चुकतां तीनही लोकांत प्रकाशमान असा आहे. ॥५२॥





विनियोग -


स॒म्प्रच्य॑वध्व॒मुप॑ स॒म्प्रया॒ताग्ने॑ प॒थो दे॑व॒याना॑न् कृणुध्वम् । पुनः॑ कृण्वा॒ना पि॒तरा॒ युवा॑ना॒ऽन्वाताँ॑सी॒त् त्वयि॒ तन्तु॑मे॒तम् ॥ ५३ ॥


अर्थ - हे ऋषींनो, या अग्नीजवळ येऊन त्याला उत्तम रीतीनें प्राप्त व्हा. हे अग्ने, तूं देवलोक प्राप्त करून देणारे मार्ग दे. कारण या ऋषींनीं हा यज्ञ केला आहे ते ऋषि वाणी व मनांना तरुण व नियमित करणारे आहेत म्हणजे जितेंद्रिय आहेत. ॥५३॥





विनियोग -


उद्‍बु॑ध्यस्वाग्ने॒ प्रति॑जागृहि॒ त्वमि॑ष्टापू॒र्ते सँसृ॑जेथाम॒यं च॑ । अ॒स्मिन्त्स॒धस्थे॒ऽ अध्युत्त॑रस्मि॒न् विश्वे॑ दे॒वा यज॑मानश्च सीदत ॥ ५४ ॥


अर्थ - हे अग्ने, तूं सावधान हो व या यजमानाला रोज सावधान कर. नंतर इष्टापूर्त कर्में यजमानाशीं युक्त होवोत व हा यजमान इष्टापूर्त कर्मांशी युक्त होवो. हे विश्वेदेवांनो, तुम्ही व हा इष्टापूर्तकारी यजमान देवांसह असणार्‍या या अत्युत्कृष्ट द्युलोकांत राहो. ॥५४॥





विनियोग -


येन॒ वह॑सि स॒हस्रं॒ येना॑ग्ने सर्ववेद॒सम् । तेने॒मं य॒ज्ञं नो॑ नय॒ स्व॒र्दे॒वेषु॒ गन्त॑वे ॥ ५५ ॥


अर्थ - हे अग्ने, ज्या सामर्थ्यानें तूं सहस्त्रदक्षिणायुक्त व सर्वस्वदक्षिणायुक्त यज्ञ धारण करतोस त्याच सामर्थ्यानें आमच्या यज्ञाला देवांकडे जाण्याकरितां स्वर्गांत ने. ॥५५॥





विनियोग -


अ॒यं ते॒ योनि॑र्‍ऋ॒त्वियो॒ यतो जा॒तो॑ऽ अरो॑चथाः । तं जा॒नन्न॑ग्न॒ऽ आरो॒हाथा॑ नो वर्धया र॒यिम् ॥ ५६ ॥


अर्थ - हे अग्ने, हें तुझें उत्पत्तिस्थान आहे. तूं सायंकालीं व प्रातःकालीं उत्पन्न होण्यास योग्य आहेस. कारण तूं गार्हपत्यांतून उत्पन्न होऊन प्रकाशित झालास. हे अग्ने, त्या आपल्या पित्याला ओळखून कर्माचे शेवटीं त्यांत प्रवेश कर व आमच्याकरितां धनवृद्धि कर. ॥५६॥





विनियोग - 'तपश्च तपस्यश्च' या मंत्रानें ऋतव्यसंज्ञक दोन पद्येष्टकांचें स्थापन करावें.


तप॑श्च तप॒स्य॒श्च शैशि॒रावृ॒तूऽ अ॒ग्नेर॑न्तःश्ले॒षो॒ऽसि॒ कल्पे॑तां॒ द्यावापृथि॒वी कल्प॑न्ता॒माप॒ऽ ओष॑धयः॒ कल्प॑न्ताम॒ग्नयः॒ पृथ॒ङ्‍ मम॒ ज्यैष्ठ्या॑य॒ सव्र॑ताः । येऽ अ॒ग्नयः॒ सम॑नसोऽन्त॒रा द्यावा॑पृथि॒वीऽ इ॒मे । शै॒शि॒रावृ॒तूऽ अ॑भि॒कल्प॑माना॒ऽ इन्द्र॑मिव दे॒वाऽ अ॑भि॒संवि॑शन्तु॒ तया॑ दे॒वत॑याऽङ्‍गिर॒स्वद्‍ध्रु॒वे सी॑दतम् ॥ ५७ ॥


अर्थ - माघ व फाल्गुन हे दोन्ही शिशिरऋतूसंबंधीं अवयव आहेत. हे शिशिरऋतो तूं या अग्नीच्या आंत राहून जोडणारा आहेस म्हणून द्यावापृथिवींनीं अग्निचयन करणार्‍या माझें (यजमानाचें) ज्येष्ठत्व प्राप्त करण्याकरितां योग्य उपकार करावा. जल व औषधि आणि एकाच चयनयज्ञामध्यें कार्य करणारे निरनिराळें इष्टकारूपी अग्नि तुला ज्येष्ठत्व देण्याला समर्थ होवोत. ह्या द्यावापृथिवी व त्यांत असणारे एकचित्ताचे अग्नि तेही शिशिरऋतूंतील संपत्ति मिळवून या कर्माचा आश्रय करोत. यास दृष्टान्त - ज्याप्रमाणें देव इंद्राच्या सेवेकरितां येतात त्याप्रमाणें अन्य इष्टका शिशिरऋतूच्या सेवेकरतां येवोत. हे ऋतव्य इष्टकांनो, त्या देवतेनें स्थापित केलेल्या तुम्ही अंगिरस् ऋषीच्या यज्ञाप्रमाणें या यज्ञांत येऊन स्थिर होऊन रहा. ॥५७॥





विनियोग - 'परमेष्ठी त्वा' या मंत्रानें विश्वज्योतिष्‌संज्ञक इष्टकेचें स्थापन करावें.


प॒र॒मे॒ष्ठी त्वा॑ सादयतु दि॒वस्पृ॒ष्ठे ज्योति॑ष्मतीम् । विश्व॑स्मै प्रा॒णाया॑पा॒नाय॑ व्या॒नाय विश्वं॒ ज्योति॑र्यच्छ । सूर्य॒स्तेऽधि॑पति॒स्तया॑ दे॒वत॑याऽङ्‍गिर॒स्वद् ध्रु॒वा सी॑द ॥ ५८ ॥


अर्थ - हे इष्टके, परमेष्ठी सूर्यरूपी तुला द्युलोकाचे पृष्ठभागीं स्थापन करो. सर्व प्राणापानव्यानवृत्तींच्या लाभाकरितां तूं मला तेज दे. सूर्य तुझा अधिपति आहे. तुझ्या अधिष्ठात्री देवतेनें अनुगृहीत झालेली अशी तूं अंगिरोऋषीच्या यज्ञाप्रमाणें या यज्ञांत स्थिर होऊन रहा. ॥५८॥





विनियोग - 'लोकं पृण' इत्यादि मंत्रांनीं लोकंपृणसंज्ञक इष्टकांचें स्थापन करावें.


लो॒कं पृ॑ण छि॒द्रं पृ॒णाथो॑ सीद ध्रु॒वा त्वम् । इ॒न्द्रा॒ग्नी त्वा॒ बृह॒स्पति॑र॒स्मिन् योना॑वसीषदन् ॥ ५९ ॥


अर्थ - हे लोकंपृणेष्टके, तूं गार्हपत्यचयनस्थानीं रिकाम्या असलेल्या जागीं स्थित हो व चिकटून बैस. छिद्र दिसणार नाही अशा रीतीनें चिकटून बैस व दृढ रहा. इंद्र, अग्नि आणि बृहस्पति यांनीं तुला या स्थानीं स्थापन केलें. ॥५९॥





विनियोग -


ताऽ अ॑स्य॒ सूद॑दोहसः॒ सोमँ॑ श्रीणन्ति॒ पृश्न॑यः । जन्म॑न्दे॒वानां॒ विश॑स्त्रि॒ष्वारो॑च॒ने दि॒वः ॥ ६० ॥


अर्थ - द्युलोकसंबंधीं नाना प्रकारचीं अन्नें व जलें प्रत्येक वर्षी तीनही सवनांमध्यें या यज्ञांतील सोमाला शिजवितात. ॥६०॥





विनियोग -


इन्द्रं॒ विश्वा॑ऽ अवीवृधन्त्समु॒द्रव्य॑चसं॒ गिरः॑ । र॒थीत॑मँ र॒थीनां॒ वाजा॑नाँ॒ सत्प॑तिं॒ पति॑म् ॥ ६१ ॥


अर्थ - ऋग्यजुःसामरूपी सर्व स्तुति इंद्राला वाढवितात. तो इंद्र समुद्राप्रमाणें व्यापक, विविधगतिमान्, सर्व रथींत श्रेष्ठ, अन्नस्वामी व धर्मनिष्ठ लोकांचा पालक आहे. ॥६१॥





विनियोग - 'प्रोथदश्वः' इत्यादि मंत्रानें विकर्णीसंज्ञक इष्टकेचें स्थापन करावें.


प्रोथ॒दश्वो॒ न यव॑सेऽवि॒ष्यन्य॒दा म॒हः सं॒वर॑णा॒द्‍व्यस्था॑त् । आद॑स्य॒ वातो॒ऽ अनु॑वाति शो॒चिरध॑ स्म ते॒ व्रज॑नं कृ॒ष्णम॑स्ति ॥ ६२ ॥


अर्थ - पुढील वाक्य मथ्यमान अग्नीला म्हटले आहे. गवत खाण्याचे पूर्वी घोडा खिंकाळतों त्याप्रमाणें अग्नि अरणिकाष्ठांतून निघतो त्यावेळीं शब्द करतों. अग्नीनें प्रज्वलनाचा शब्द केल्यानंतर त्या धोरणानें तो वायुही पसरतो. तो वायु अग्नीचा प्रदीपक आहे. नंतर वायूनें अग्नि प्रदीप्त केल्यावर त्याचें गमनस्थान कृष्णवर्णाचें होतें. ॥६२॥





विनियोग - 'आयोष्ट्वा' या मंत्रानें स्वयमातृण्णासंज्ञक इष्टकेचें स्थापन करावें.


आ॒योष्ट्वा॒ सद॑ने सादया॒म्यव॑तश्छा॒यायाँ॑ समु॒द्रस्य॒ हृद॑ये । र॒श्मी॒वतीं॒ भास्व॑ती॒मा या द्यां भास्यापृ॑थि॒वीमोर्व॒न्तरि॑क्षम् ॥ ६३ ॥


अर्थ - हे स्वयमातृण्णे, मी सूर्याच्या आश्रयभूत व प्रधान अशा स्थानीं तुझें स्थापन करतों. तो सूर्य जगाचें पालन करणारा, वृष्टीच्या योगें सर्व जग भिजविणारा असा आहे. हे इष्टके, तूं द्युलोक, पृथ्वीलोक व विस्तीर्ण अशा अंतरिक्ष लोकांस प्रकाशित करतेस, अशा किरणयुक्त म्हणून शोभणार्‍या तुला मी स्थापन करतों. ॥६३॥





विनियोग -


प॒र॒मे॒ष्ठी त्वा॑ सादयतु दि॒वस्पृ॒ष्ठे व्यच॑स्वतीं॒ प्रथ॑स्वतीं॒ दिवं॑ यच्छ॒ दिवं॑ दृँह॒ दिवं॒ मा हिँ॑सीः । विश्व॑स्मै प्रा॒णाया॑पा॒नाय॑ व्या॒नायो॑दा॒नाय॑ प्रति॒ष्ठायै॑ च॒रित्रा॑य । सूर्य॑स्त्वा॒ऽभिपा॑तु म॒ह्या स्व॒स्त्या छ॒र्दिषा॒ शन्त॑मेन॒ तया दे॒वत॑याऽङ्‍गिर॒स्वद् ध्रु॒वे सी॑दतम् ॥ ६४ ॥


अर्थ - हे इष्टके, परमेष्ठी अंतरिक्षाच्या पृष्ठभागीं तुझें स्थापन करो. तूं अभिव्यक्तियुक्त व विस्तारयुक्त आहेस. तूं अंतरिक्षाचें नियमन कर व त्याला दृढ कर. सर्व प्राणादिकांची वृत्ति, स्वगृहस्थिति व शास्त्रीय आचरण यांकरितां त्या अंतरिक्षाची हिंसा करूं नकोस. मोठया योगक्षेमकर, अत्यंत शुभकारी तेजोविशेषानें सूर्य तुझें सर्व बाजूनें रक्षण करो. अंगिरोऋषींच्या यज्ञाप्रमाणें या यज्ञांत तुझ्या अधिष्ठात्री देवतेच्या अनुग्रहाने तूं स्थिर हो. ॥६४॥





विनियोग - 'सहस्रस्य' इत्यादि प्रत्येक मंत्रानें इष्टकाचित पक्षपुच्छसहित अग्नीच्या पश्चात् व उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिम अशा पांच ठिकाणीं उभे राहून सोदक दोनशें दोनशें वेळां प्रकिरण करावें म्हणजे पसरावें व जलसिंचन करावें.


स॒हस्र॑स्य प्र॒माऽसि॑ स॒हस्र॑स्य प्रति॒माऽसि॑ स॒हस्र॑स्यो॒न्माऽसि॑ साह॒स्रो॒ऽसि स॒हस्रा॑य त्व ॥ ६५ ॥


अर्थ - हे अग्ने, तूं सहस्र इष्टकांचें प्रमाण आहेस व तूं सहस्र इष्टकांचा प्रतिनिधि आहेस. तूं हजार इष्टकांची तुला आहेस व तूं सहस्र इष्टकांना योग्य आहेस म्हणून अनन्त फलप्राप्तीकरितां तुझें मी प्रोक्षण करतों. ॥६५॥





॥ पञ्चदशोऽध्यायः ॥
ॐ तत् सत्


GO TOP