शुक्ल यजुर्वेद
चतुर्दशोऽध्यायः



विनियोग - तेराव्या अध्यायांत भूलोकस्वरूपी प्रथम चिति सांगितली. चौदाव्या अध्यायांत द्वितीया, तृतीया व चतुर्थी अशा तीन चिती सांगतात. 'ध्रुवक्षितिः' इत्यादि पांच मंत्रांनीं पांच इष्टका स्थापन कराव्या.


ध्रु॒वक्षि॑तिर्ध्रु॒वयो॑निर्ध्रु॒वाऽसि॒ ध्रु॒वं योनिमासी॑द साधु॒या । उख्य॑स्य के॒तुं प्र॑थ॒मं जु॑षाणा॒श्विना॑ऽध्व॒र्यू सा॑दयतामि॒ह त्वा॑ ॥ १ ॥


अर्थ - हे इष्टके, तूं स्थिर आहेस म्हणून या स्थिर व श्रेष्ठ अशा स्थानावर बैस. तूं निश्चल निवास करणारी व अचल कारण असलेली उख्य अग्नीच्या पहिल्या स्थानाला सेवन करणारी अशी आहेस. हे इष्टके, देवांचे अध्वर्यु जे अश्विनीकुमार ते तुला या स्थानावर स्थापन करोत. ॥१॥





विनियोग -


कुला॒यिनी॑ घृ॒तव॑ती॒ पुर॑न्धिः स्यो॒ने सी॑द॒ सद॑ने पृथि॒व्याः । अ॒भि त्वा॑ रु॒द्रा वस॑वो गृणन्त्वि॒मा ब्रह्म॑ पीपिहि॒ सौभ॑गाया॒श्विना॑ऽध्व॒र्यू सा॑दयतामि॒ह त्वा॑ ॥ २ ॥


अर्थ - हे इष्टके, पृथ्वीच्या सुखस्वरूपी प्रथमचिति स्थानांवर तूं बैस. तूं घराच्या आकाराची आहेस. घृतानें युक्त, पुष्कळ इष्टकांना धारण करणारी अशी आहेस. रुद्र, वसु प्रभृति सर्व देव तुझी स्तुति करोत. आणि ऐश्वर्यप्राप्तीकरितां या मंत्रांना तूं प्राप्त हो. देवांचे अध्वर्यू अश्विनीकुमार तुला या स्थानावर स्थापन करोत. ॥२॥





विनियोग -


स्वैर्दक्षै॒दक्ष॑पिते॒ह सी॒द दे॒वानाँ॑ सु॒म्ने बृ॑ह॒ते रणा॑य । पि॒तेवै॑धि सू॒नव॒ऽ आ सु॒शेवा॑ स्ववे॒शा त॒न्वा संवि॑शस्वा॒श्विना॑ऽध्व॒र्यू सा॑दयतामि॒ह त्वा॑ ॥ ३ ॥


अर्थ - हे इष्टके, वीर्य पालन करणारी अशी तूं आपल्या सामर्थ्यासह रमणीय व मोठया सुखाच्या निमित्तानें या दुसर्‍या चितीवर बैस. बाप मुलाला सुख देतो त्याप्रमाणें तूं सर्व तर्‍हेनें सर्वदा सुख देणारी हो. सुखप्रवेशयुक्त अशा शरीरानें येथें स्थिति कर. देवांचे अध्वर्यु अश्विनीकुमार तुला या स्थानावर स्थापन करोत. ॥३॥





विनियोग -


पृथि॒व्याः पुरी॑षम॒स्यप्सो॒ नाम॒ तां त्वा॒ विश्वे॑ऽ अ॒भिगृ॑णन्तु दे॒वाः । स्तोम॑पृष्ठा घृ॒तव॑ती॒ह सी॑द प्र॒जाव॑द॒स्मे द्रवि॒णाऽऽय॑जस्वा॒श्विना॑ऽध्व॒र्यू सा॑दयतामि॒ह त्वा॑ ॥ ४ ॥


अर्थ - हे इष्टके, तूं पृथ्वीच्या म्हणजे प्रथम चितीचें पूर्ण करणारें द्रव्य आहेस. व जलाला कारणीभूत अशा रसरूपी आहेस. सर्व देव सर्व तर्‍हेनें तुझी स्तुति करोत. तुझ्या स्थापनाच्या वेळीं त्रिवृदादिस्तोम आणि रथंतरादि पृष्ठें बोललीं जातात. तूं घृतयुक्त आहेस म्हणून पुत्रपौत्रादियुक्त धन या यजमानाला दे. देवांचे अध्वर्यु जे अश्विनीकुमार ते तुला या स्थानावर स्थापन करोत. ॥४॥





विनियोग -


अदि॑त्यास्त्वा पृ॒ष्ठे सा॑दयाम्य॒न्तरि॑क्षस्य ध॒र्त्रीं वि॒ष्टम्भ॑नीं दि॒शामधि॑पत्नीं॒ भुव॑नानाम् । ऊ॒र्मिर्द्र॒प्सोऽ अ॒पाम॑सि वि॒श्वक॑र्मा त॒ऽ ऋषि॑र॒श्विना॑ऽध्व॒र्यू सा॑दयतामि॒ह त्वा॑ ॥ ५ ॥


अर्थ - हे इष्टके, प्रथम चितिरूप पृथ्वीवर, तुझें स्थापन करतों. तूं भूवर्लोकाची धारण करणारी, पूर्वादि दिशांना स्तंभन करणारी, सर्व प्राणिसमुदायांची स्वामिनी अशी आहेस. रसरूपी ऊर्मि म्हणजे जलांची लाट ही तूं आहेस. विश्वकर्मा प्रजापति तुझा द्रष्टा आहे. देवांचे अध्वर्यु अश्विनीकुमार तुला या स्थानावर स्थापन करोत. ॥५॥





विनियोग - 'शुक्रस्य शुचिश्व' या मंत्रानें दोन क्रतव्य इष्टकांचें स्थापन करावें.


शु॒क्रश्च॒ शुचि॑श्च॒ ग्रैष्मा॑वृ॒तूऽ अ॒ग्नेर॑न्तःश्ले॒षो॒ऽसि॒ कल्पे॑तां॒ द्यावा॑पृ॒थिवी कल्प॑न्ता॒माप॒ऽ ओष॑धयः॒ कल्प॑न्ताम॒ग्नयः॒ पृथ॒ङ् मम॒ ज्यैष्ठ्या॑य॒ सव्र॑ताः । येऽ अ॒ग्नयः॒ सम॑नसोऽन्त॒रा द्यावा॑पृथि॒वीऽ इ॒मे । ग्रैष्मा॑वृ॒तू अ॑भि॒कल्प॑माना॒ऽ इन्द्र॑मिव दे॒वाऽ अ॑भि॒संवि॒शन्तु॒ तया॑ दे॒वत॑याऽङ्‍गिर॒स्वद् ध्रु॒वे सी॑दतम् ॥ ६ ॥


अर्थ - ज्येष्ठ व आषाढ हे ग्रीष्म ऋतूचे अवयव आहेत. हे ग्रीष्मऋतो, तूं या अग्नीच्या आंत राहून जोडणारा आहेस म्हणून द्यावापृथिवींनीं अग्निचयन करणार्‍या माझें (यजमानाचें) ज्येष्ठत्व प्राप्त करण्याकरितां योग्य उपकार करावा. जल व औषधी आणि एकाच चयनयज्ञामध्यें कार्य करणारे निरनिराळे इष्टकारूपी अग्नि तुला ज्येष्ठत्व देण्याला समर्थ होवोत. या द्यावापृथिवी व त्यांत असणारे एक चित्ताचे अग्नी तेही ग्रीष्मसंपत्ति मिळवून या कर्माचा आश्रय करोत. यास दृष्टान्तः - ज्याप्रमाणें देव इंद्राच्या सेवेकरितां येतात, त्याप्रमाणें अन्य इष्टका ग्रीष्माच्या सेवेकरितां येवोत. हे ऋतव्य इष्टकांनो, त्या देवतेनें स्थापित केलेल्या तुम्ही अंगिरस् ऋषीच्या यज्ञाप्रमाणें या यज्ञांत येऊन स्थिर होऊन रहा. ॥६॥





विनियोग - 'सजूर्‍ऋतुभिः' इत्यादि पांच मंत्रांनीं पांच वैश्वदेवी इष्टकांचें स्थापन करावें.


स॒जूर्‍ऋ॒तुभिः॑ स॒जूर्वि॒धाभिः॑ सजूर्देवैः स॒जूर्दे॒वैर्व॑योना॒धैर॒ग्नये॑ त्वा वैश्वान॒राया॒श्विना॑ऽध्व॒र्यू सा॑दयतामि॒ह त्वा॑ स॒जूर्‍ऋ॒तुभिः॑ स॒जूर्वि॒धाभिः॑ स॒जूर्वसु॑भिः स॒जूर्दे॒वैर्व॑योना॒धैर॒ग्नये॑ त्वा वैश्वान॒राया॒श्विना॑ऽध्व॒र्यू सा॑दयतामि॒ह त्वा स॒जूर्‍ऋ॒तुभिः॑ स॒जूर्वि॒धाभिः॑ स॒जू रु॒द्रैः स॒जूर्दे॒वैर्व॑योना॒धैर॒ग्नये॑ त्वा वैश्वान॒राया॒श्विना॑ऽध्व॒र्यू सा॑दयतामि॒ह त्वा॑ स॒जूर्‍ऋ॒तुभिः॑ स॒जूर्वि॒धाभिः॑ स॒जूरा॑दि॒त्यैः स॒जूर्दे॒वैर्व॑योना॒धैर॒ग्नये॑ त्वा वैश्वान॒राया॒श्विना॑ऽध्व॒र्यू सा॑दयतामि॒ह त्वा॑ स॒जूर्‍ऋ॒तुभिः॑ स॒जूर्वि॒धाभिः॑ स॒जूर्विश्वै॑र्दे॒वैः स॒जूर्दे॒वैर्व॑योना॒धैर॒ग्नये॑ त्वा वैश्वान॒राया॒श्विना॑ऽध्व॒र्यू सा॑दयतामि॒ह त्वा॑ ॥ ७ ॥


अर्थ - हे इष्टके, देवांचे अध्वर्यु अश्विनीकुमार या द्वितीय चितिस्थानावर सर्वलोकहितकारी अग्नीच्या तृप्तीकरितां तुझें स्थापन करते झालें. तूं वसंतादिऋतूंनीं, जलांनीं, इंद्रादिदेवांनीं व बाल्यादिवयांशीं युक्त होणार्‍या प्राणांनीं संतुष्ट होणारी आहेस. मी तुझें स्थापन करतों. हे इष्टके, देवांचे अध्वर्यु अश्विनीकुमार या तृतीय चितिस्थानावर सर्व लोकहितकारी अग्नीच्या तृप्तीकरितां तुझें स्थापन करते झालें. तूं वसंतादिऋतूंनीं, जलांनीं, अष्टवसूंनीं, इंद्रादिदेवांनीं व बाल्यादिवयाशीं युक्त होणार्‍या प्राणांनीं संतुष्ट होणारी आहेस. मी तुझें स्थापन करतों. हे इष्टके, देवांचें अध्वर्यु अश्विनीकुमार या चतुर्थचितिस्थानावर सर्वलोकहितकारी अग्नीचे तृप्तीकरितां तुझें स्थापन करते झालें. तूं वसंतादिऋतूंनीं, जलांनीं, रुद्रांनीं, इंद्रादिदेवांनीं व बाल्यादिवयाशीं युक्त होणार्‍या प्राणांनीं संतुष्ट होणारी आहेस. मीं तुझें स्थापन करतों. हे इष्टके, देवांचे अध्वर्यू अश्विनीकुमार तुझें या पंचमचितिस्थानावर सर्व लोकहितकारी अग्नीच्या तृप्तीकरितां तुझें स्थापन करते झालें. तूं वसंतादिऋतूंनीं, जलांनीं, आदित्यांनीं, इंद्रादिदेवांनीं व बाल्यादिवयाशीं युक्त होणार्‍या प्राणांनीं संतुष्ट होणारी आहेस. मी तुझें स्थापन करतों. हे इष्टके, देवांचे अध्वर्यू अश्विनीकुमार या षष्ठचितिस्थानावर सर्वलोकहितकारी अग्नीच्या तृप्तीकरितां तुझें स्थापन करते झालें. तूं वसंतादिऋतूंनीं, जलांनीं, विश्वेदेवांनीं, इंद्रादिदेवांनीं व बाल्यादि वयांशीं युक्त होणार्‍या प्राणांनीं संतुष्ट होणारी आहेस. मीं तुझें स्थापन करतों. ॥७॥





विनियोग - 'प्राणं मे' या पांच मंत्रभागांनीं प्राणभृ‍त्संज्ञक पांच इष्टकांचें स्थापन करावें. 'अपः पिन्व' या पांच मंत्रांनीं अपस्यासंज्ञक पांच इष्टकांचें स्थापन करावें.


प्रा॒णं मे॑ पाह्यपा॒नं मे॑ पाहि व्या॒नं मे॑ पाहि॒ चक्षु॑र्मऽ उ॒र्व्या विभा॑हि॒ श्रोत्रं॑ मे श्लोकय । अ॒पः पि॒न्वौष॑धीर्जिन्व द्वि॒पाद॑व॒ चतु॑ष्पात् पाहि दि॒वो वृष्टि॒मेर॑य ॥ ८ ॥


अर्थ - हे इष्टके, तूं माझा प्राण, अपान, व्यान वायूंचें रक्षण कर व विस्तीर्ण दृष्टींनीं माझ्या नेत्रांला प्रकाशित कर व माझे कान पुष्कळ श्रवण करण्यास समर्थ कर. हे इष्टके, तूं जलसिंचन कर, औषधींना संतुष्ट कर. मनुष्यशरीरांचें व पशुशरीरांचें रक्षण कर व द्युलोकांतून वृष्टीला प्रवृत्त कर. ॥८॥





विनियोग - 'मूर्धा वयः' इत्यादि मंत्रांनीं वयस्यासंज्ञक इष्टकांचें स्थापन करावें.


मू॒र्धा वयः॑ प्र॒जाप॑ति॒श्छन्दः॒ क्ष॒त्रं वयो॒ मय॑न्दं॒ छन्दो॑ विष्ट॒म्भो वयोऽधि॑पति॒श्छन्दो॑ विश्व॒क॑र्मा॒ वयः॑ परमे॒ष्ठी छन्दो॑ ब॒स्तो वयो॑ विव॒लं छन्दो॒ वृष्णि॒र्वयो॑ विशा॒लं छन्दः॒ पुरु॑षो॒ वय॑स्त॒न्द्रं छन्दो॑ व्या॒घ्रो वयोऽना॑धृष्टं॒ छन्दः॑ सिँ॒हो वय॑वश्छ॒दिश्छन्दः॑ पष्ठ॒वाड्वयो॑ बृह॒ती छन्द॑ऽ उ॒क्षा वयः॑ क॒कुप् छन्द॑ऽ ऋष॒भो वयः॑ स॒तोबृ॑ह॒ती छन्दः॑ ॥ ९ ॥


अर्थ - [पूर्वी सृष्टिसमयीं प्रजापति गडबडींत असतां त्यानें उत्पन्न केलेले पशू छन्दांचें रूप धारण करून तेथून निघून गेले. त्यावेळीं प्रजापतीनेंही गायत्रीछन्दाचें रूप धारण केलें व वयाच्या निरनिराळ्या अवस्थेंत त्यानें त्या त्या पशूच्या स्वरूपांत प्रवेश केला ही गोष्ट या मंत्रांत सांगितली आहे.] मूर्धप्रधान प्रजापति गायत्रीछन्दरूपी होऊन त्या त्या वयाच्या अवस्थेनें पशूंत प्रवेश करता झाला. तसेंच प्रजापति नाशापासून संरक्षण करणार्‍या शरीरावस्थेंत सुख देणार्‍या मयन्द नांवाच्या छन्दाचें रूप धारण करता झाला. तसेंच पालक व जगाचा प्रतिबंध करणारा प्रजापति त्या वयोवस्थेचा छन्द बनला. तसेंच परमपदांत राहणारा सर्वस्रष्टा प्रजापति त्या वयोवस्थेचा छन्द बनला. याप्रमाणें प्रजापतीनें सर्व छन्दांचें मूलभूत असें गायत्रीछन्दाचें रूप धारण केलें. नंतर त्या प्रजापतीनें त्या त्या वयोवस्थेनें दुसर्‍या पंधरा पशूंवर अनुग्रह केला. त्यानें उत्कृष्ट अशा एकपदछन्दानें अजावर, द्विपदा गायत्रीछन्दानें सेचनसमर्थ मेषावर, पंक्तिछन्द होऊन पुरुषपशूवर, विराट्छन्द होऊन व्याघ्रावर, अतिछन्दाछन्द होऊन सिंहावर, बृहतीछन्द होऊन पांच वर्षे वयाच्या पशूवर, ककुप् छन्द होऊन वीर्यसेचनसमर्थ पशूवर व सत्तोबृहती छन्द होऊन ऋषभपशूवर अनुग्रह केला. ॥९॥





विनियोग -


अ॒नड्वान्वयः॑ प॒ङ्‍क्तिश्छन्दो॑ धे॒नुर्वयो॒ जग॑ती छन्द॒स्त्र्यवि॒र्वय॑स्त्रि॒ष्टुप् छन्दो॑ दित्य॒वाड्वयो॑ वि॒राट् छन्दः॒ पञ्चा॑वि॒र्वयो॑ गाय॒त्री छन्द॑स्त्रिव॒त्सो वय॑ऽ उ॒ष्णिक् छन्द॑स्तुर्यं॒वाड्वयो॑ऽनु॒ष्टुप छन्दो॑ लो॒कं ताऽ इन्द्र॑म् ॥ १० ॥


अर्थ - त्यानें पंक्तिछन्द होऊन बलीवर्दावर, जगतीछन्द होऊन धेनूवर, त्रिष्टुप् छन्द होऊन अठरा महिन्यांच्या पशूवर, विराट् छन्द होऊन दोन वर्षांच्या पशूवर, गायत्री छन्द होऊन अडीच वर्षांच्या पशूवर, उष्णिक् छन्द होऊन तीन वर्षांच्या पशूवर व अनुष्टुप् छन्द होऊन चार वर्षांच्या पशूवर अनुग्रह केला. या सर्व इष्टकांचें मी स्थापन करतों. अध्याय १२ मं. ५४।५५।५६ या तीन मंत्रांचीं प्रतीकें क्रमेंकरून 'लोकम्' 'ताः' 'इन्द्रम्' हीं आहेत. ॥१०॥





विनियोग - तिसर्‍या चितीवर स्वयमातृण्णा या इष्टकेचें 'इंद्राग्नी' या मंत्रानें स्थापन करावें.


इन्द्रा॑ग्नी॒ऽ अव्य॑थमाना॒मिष्ट॑कां दृँहतं यु॒वम् । पृष्ठेन॒ द्यावा॒पृथि॒वीऽ अ॒न्तरि॑क्षं च॒ विबा॑धसे ॥ ११ ॥


अर्थ - हे इंद्राग्नींनो, तुम्ही न ढळणार्‍या स्वयमातृण्णा नांवाच्या इष्टकेला दृढ करा. हे स्वयमातृण्णे, आपल्या पृष्ठानें द्यावापृथिवी व अंतरिक्ष या तीनही लोकांचें तूं आक्रमण करतेस. ॥११॥





विनियोग -


वि॒श्वक॑र्मा त्वा सादयत्व॒न्तरि॑क्षस्य पृ॒ष्ठे व्यच॑स्वतीं॒ प्रथ॑स्वतीम॒न्तरि॑क्षं यच्छा॒न्तरि॑क्षं दृँहा॒न्तरि॑क्षं॒ मा हिँ॑सीः । विश्व॑स्मै प्रा॒णाया॑पा॒नाय॑ व्या॒नायो॑दा॒नाय॑ प्रति॒ष्ठायै॑ च॒रित्रा॑य । वा॒युष्ट्वा॒ऽभिपा॑तु मह्या स्व॒स्त्या छ॒र्दिषा॒ शन्त॑मेन॒ तया॑ देवत॑याऽङ्‍गिर॒स्वद् ध्रु॒वा सी॑द ॥ १२ ॥


अर्थ - हे स्वयमातृण्णे, विश्वकर्मा प्रजापति अंतरिक्षाच्या पृष्ठभागीं तुझें स्थापन करो. तूं अभिव्यक्तियुक्त व विस्तारयुक्त आहेस. तूं अंतरिक्षाचें नियमन कर व त्याला दृढ कर. सर्व प्राणादिकांची वृत्ति, स्वगृहस्थिति व शास्त्रीय आचरण यांकरितां त्या अंतरिक्षाची हिंसा करूं नकोस. मोठया योगक्षेमकर अत्यंत शुभकारी तेजोविशेषानें वायु तुझें सर्व बाजूनें रक्षण करो. अंगिरोऋषींच्या यज्ञाप्रमाणें या यज्ञांत तुझ्या अधिष्ठात्री देवतेच्या अनुग्रहानें तूं स्थिर हो. ॥१२॥





विनियोग - 'राज्ञ्यसि' वगैरे पांच मंत्रांनीं पांच दिश्या नांवाच्या इष्टका स्थापन कराव्या.


राज्ञय॑सि॒ प्रची॒ दिग्वि॒राड॑सि॒ दक्षि॑णा॒ दिक् स॒म्राड॑सि प्र॒तीची॒ दिक् स्व॒राड॒स्युदी॑ची॒ दिगधि॑पत्न्यासि बृ॒हती दिक् ॥ १३ ॥


अर्थ - हे इष्टके, तूं शोभणारी, अशी पूर्व दिशा गायत्रीरूपी आहेस. तूं विशेषेंकरून शोभणारी दक्षिण दिशा त्रिष्टुब्‍रूपी आहेस. चांगल्या तर्‍हेनें शोभणारी पश्चिम दिशा जगतीछंदरूपी आहेस. स्वयंशोभमान अशी उत्तर दिशा अनुष्टुभ् छंदरूपी आहेस. अधिक परिपालन करणारी मोठी ऊर्ध्व दिशा पङ्क्ति-छंदरूपी आहेस. अशा तर्‍हेनें दिशा व छंद स्वरूपिणी तुझें मी स्थापन करतों. ॥१३॥





विनियोग - 'विश्वकर्मा' या मंत्रानें विश्वज्योतिस् संज्ञक इष्टकेचें स्थापन करावें.


वि॒श्वक॑र्मा त्वा सादयत्व॒न्तरि॑क्षस्य पृ॒ष्ठे ज्योति॑ष्मतीम् । विश्व॑स्मै प्रा॒णाया॑पा॒नाय॑ व्या॒नाय॒ विश्वं॒ ज्योति॑र्यच्छ । वा॒युष्टेऽधि॑पति॒स्तया॑ दे॒वत॑याऽङ्‍गिर॒स्वद् ध्रु॒वा सी॑द ॥ १४ ॥


अर्थ - हे इष्टके, वायुरूपी तुला विश्वकर्मा अंतरिक्षाचें पृष्ठभागीं स्थापन करो. सर्व प्राणापानव्यान वृत्तींच्या लाभाकरितां तूं मला सर्व तेज दे. वायु तुझा अधिपति आहे. तुझ्या अधिष्ठात्री देवतेनें अनुग्रहीत झालेली अशी तूं अंगिरोऋषीच्या यज्ञाप्रमाणें या यज्ञांत स्थिर होऊन रहा. ॥१४॥





विनियोग - 'नभश्च नभस्यश्च' या मंत्रानें दोन ऋतव्य इष्टकांचें स्थापन करावें.


नभ॑श्च नभ॒स्य॒श्च॒ वार्षि॑कावृ॒तूऽ अ॒ग्नेर॑न्तःश्ले॒षो॒ऽसि कल्पे॑तां॒ द्यावा॑पृथि॒वी कल्प॑न्ता॒माप॒ऽ ओष॑धयः॒ कल्प॑न्ताम॒ग्नयः॒ पृथ॒ङ् मम॒ ज्यैष्ठ्या॑य॒ सव्र॑ताः । येऽ अ॒ग्नयः॒ सम॑नसोऽन्त॒रा द्यावा॑पृथि॒वीऽ इ॒मे । वार्षि॑कावृ॒तूऽ अ॑भि॒कल्प॑माना॒ऽ इन्द्र॑मिव दे॒वाऽ अ॑भि॒संवि॑शन्तु तया॑ दे॒वत॑याऽङ्‍गिर॒स्वद् ध्रु॒वे सी॑दतम् ॥ १५ ॥


अर्थ - श्रावण व भाद्रपद वर्षाऋतूंतील महिने आहेत. हे वर्षाऋतो, तूं या अग्नीच्या आंत राहून जोडणारा आहेस म्हणून अग्निचयन करणार्‍या माझें (यजमानाचें) ज्येष्ठत्व प्राप्त करण्याकरितां योग्य उपकार करावा. जल व औषधी आणि एकाच चयन यज्ञामध्यें कार्य करणारे निरनिराळे इष्टकारूपी अग्नि तुला ज्येष्ठत्व देण्याला समर्थ होवोत. या द्यावापृथिवी व त्यांत असणारे एक चित्ताचे अग्नि व तेही वर्षाऋतूंतील संपत्ति मिळवून या कर्माचा आश्रय करोत. यांस दृष्टांत - ज्याप्रमाणें देव इंद्राच्या सेवेकरितां येतात; त्याप्रमाणें अन्य इष्टका वर्षाऋतूच्या सेवेकरितां येवोत. हे ऋतव्य इष्टकांनो, त्या देवतेनें स्थापित केलेल्या तुम्ही अंगिरस् ऋषीच्या यज्ञाप्रमाणें या यज्ञांत स्थिर होऊन रहा. ॥१५॥





विनियोग -


इषश्चो॒र्जश्च॑ शार॒दावृ॒तूऽ अ॒ग्नेर॑न्तःश्ले॒षोऽसि॒ कल्पे॑तां॒ द्यावा॑पृथि॒वी कल्प॑न्ता॒माप॒ऽ ओष॑धयः॒ कल्प॑न्ताम॒ग्नयः॒ पृथ॒ङ् मम॒ ज्यैष्ठ्या॑य॒ सव्र॑ताः । येऽ अ॒ग्नयः॒ सम॑नसोऽन्तरा द्यावा॑पृथि॒वीऽ इ॒मे । शा॒र॒दावृ॒तूऽ अ॑भि॒कल्प॑माना॒ऽ इन्द्र॑मिव दे॒वाऽ अ॑भि॒संवि॑शन्तु॒ तया॑ दे॒वत॑याऽङ्‍गिर॒स्वद् ध्रु॒वे सी॑दतम् ॥ १६ ॥


अर्थ - आश्विन व कार्तिक हे दोन्ही शरदऋतूचे अवयव आहेत. हे शरदऋतो, तूं या अग्नीच्या आंत राहून जोडणारा आहेस म्हणून द्यावापृथिवींनीं अग्निचयन करणार्‍या माझें (यजमानाचें) ज्येष्ठत्व प्राप्त करण्याकरितां योग्य उपकार करावा. जल व औषधि आणि एकाच चयनयज्ञामध्यें कार्य करणारे इष्टकारूपी अग्नि तुला ज्येष्ठत्व देण्याला समर्थ होवोत. या द्यावापृथिवी व त्यांत असणारे एक चित्ताचे अग्नि व तेही शरदऋतूंतील संपत्ति मिळवून या कर्माचा आश्रय करोत. यास दृष्टांत - ज्याप्रमाणें देव इन्द्राच्या सेवेकरितां येतात; त्याप्रमाणें अन्व‍इष्टका शरद् ऋतूच्या सेवेकरितां येवोत. हे ऋतव्य इष्टकांनो, त्या देवतेनें स्थापित केलेल्या तुम्ही अंगिरस् ऋषीच्या यज्ञाप्रमाणें या यज्ञांत येऊन स्थिर होऊन रहा. ॥१६॥





विनियोग - 'आयुर्मे' इत्यादि दहा मंत्रांनीं दहा प्राणभृत्-संज्ञक इष्टकांचें स्थापन करावें.


आयु॑र्मे पाहि प्रा॒णं मे॑ पाह्यपा॒नं मे॑ पाहि व्या॒नं मे॑ पाहि॒ चक्षु॑र्मे पाहि॒ श्रोत्रं॑ मे पाहि॒ वाचं॑ मे पिन्व॒ मनो॑ मे जिन्वा॒त्मानं॑ मे पाहि॒ ज्योति॑र्मे यच्छ ॥ १७ ॥


अर्थ - हे इष्टके, तूं माझें आयुष्य, प्राण, अपान, व्यान, चक्षु, श्रोत्र यांचें रक्षण कर. माझी वाणी इच्छांनीं पूर्ण कर. मन संतुष्ट कर. माझ्या जिवाचें रक्षण कर व तेज दे. ॥१७॥





विनियोग - 'मा छंदः' या मंत्रानें छंदस्य संज्ञक बारा बारा इष्टका स्थापन कराव्या.


मा छन्दः॑ प्र॒मा छन्दः॑ प्रति॒मा छन्दो॑ऽ अस्त्री॒वय॒श्छन्दः॑ प॒ङ्‍क्तिश्छन्द॑ऽ उ॒ष्णिक् छन्दो॑ बृ॒हती छन्दो॑ऽनु॒ष्टुप् छन्दो॑ वि॒राट् छन्दो॑ गाय॒त्री छन्द॑स्त्रि॒ष्टुप् छन्दो॒ जग॑ती॒ छन्दः॑ ॥ १८ ॥


अर्थ - हे इष्टके, तूं पृथिवीलोक, अंतरिक्षलोक, द्युलोक व त्रिलोक, पङ्क्ति, उष्णिक्, बृहती, अनुष्टुभ्, विराट्, गायत्री, त्रिष्टुभ् व जगती छंद एतत्स्वरूपी आहेस. ॥१८॥





विनियोग -


पृथि॒वी छन्दो॒ऽतरि॑क्षं॒ छन्दो॒ द्यौश्छन्दः॒ समा॒श्छन्दो॒ नक्ष॑त्राणि॒ छन्दो॒ वाक् छन्दो॒ मन॒श्छन्दः॑ कृ॒षिश्छन्दो॒ हिर॑ण्यं॒ छन्दो॒ गौश्छन्दो॒ऽजाश्छन्दोऽश्व॒श्छन्दः॑ ॥ १९ ॥


अर्थ - हे इष्टके, पृथ्वी, अंतरिक्ष, द्यौः, समा, नक्षत्र, वाणी, मन, कृषि, सुवर्ण, गो, अजा, आणि अश्व या देवतांच्या छंदरूपी तूं आहेस. ॥१९॥





विनियोग -


अ॒ग्निर्दे॒वता॒ वातो॑ दे॒वता॒ सूर्यो॑ दे॒वता॑ च॒न्द्रमा॑ दे॒वता॒ वस॑वो दे॒वता॑ रु॒द्रा दे॒वता॑ऽऽदि॒त्या दे॒वता॑ म॒रुतो॑ दे॒वता॒ विश्वे॑ दे॒वा दे॒वता॒ बृह॒स्पति॑र्दे॒वतेन्द्रो॑ दे॒वता॒ वरु॑णो दे॒वता॑ ॥ २० ॥


अर्थ - हे इष्टके, तूं अग्नि, वात, सूर्य, चंद्रमा, वसु, रुद्र, आदित्य, मरुत्, विश्वेदेव, बृहस्पति, इंद्र व वरुणदेवता एतद्रूपी आहेस. ॥२०॥





विनियोग - 'मूर्धासि' इत्यादि सात मंत्रांनीं व 'यंत्री' इत्यादि सात मंत्रांनीं वालखिल्या संज्ञक इष्टकांचें स्थापन करावें.


मू॒र्धासि॒ राड् ध्रु॒वाऽसि॑ ध॒रुणा॑ ध॒र्त्र्य॒सि॒ धर॑णी । आयु॑षे त्वा॒ वर्च॑से त्वा कृ॒ष्यै त्वा॒ क्षेमा॑य त्वा ॥ २१ ॥


अर्थ - हे इष्टके, तूं मस्तकाप्रमाणें उत्तम व शोभणारी आहेस. हे इष्टके, तूं स्थिर व धारण करणारी आहेस. हे इष्टके, तूं धारण करणारी व भूमिरूपी आहेस. तुला मी आयुष्याची वृद्धि, कांति, धान्याची उत्पत्ति व मिळविलेल्या धनाचें रक्षण याकरितां स्थापन करतों. ॥२१॥





विनियोग - प्रथमचितीप्रमाणें लोकंपृणा इष्टकांचें स्थापन करावें.


यन्त्री॒ राड् य॒न्त्र्य॒सि॒ यम॑नी ध्रु॒वाऽसि॒ धरि॑त्री । इ॒षे त्वो॒र्जे त्वा॑ र॒य्यै त्वा॒ पोषा॑य त्वा लो॒कं ताऽ इन्द्र॑म् ॥ २२ ॥


अर्थ - हे इष्टके, तूं नियमानें युक्त व शोभणारी आहेस व स्वतः नियमित होऊन सर्वांचे नियमन करणारी आहेस व स्थिर होऊन भूमिस्वरूपी आहेस. हे इष्टके, अन्न, बल, व धनवृद्धि यांकरितां तुझें मी स्थापन करतों. अ. १२-मं. ५४,५५,५६ या मंत्रांचीं प्रतीकें क्रमेंकरून 'लोकम्' 'ताः' आणि 'इंद्रम्' हीं आहेत. ॥२२॥





विनियोग - आशुस्रिवृत् इत्यादि मंत्रांनीं चतुर्थी चिति करावी.


आ॒शुस्त्रि॒वृद्‍भा॒न्तः प॑ञ्चद॒शो व्यो॑मा सप्तद॒शो ध॒रुण॑ऽ एकविँ॒शः प्रतू॑र्तिरष्टाद॒शस्तपो॑ नवद॒शो॒ऽभीव॒र्त्तः स॑विँ॒शो वर्चो॑ द्वाविँ॒शः स्॒अम्भर॑णस्त्रयोविँ॒शो योनि॑श्चतुर्विँ॒शो गर्भाः॑ पञ्चविँ॒शऽ ओज॑स्त्रिण॒वः क्रतु॑रेकत्रिँ॒शः प्र॑ति॒ष्ठा त्र॑यस्त्रिँ॒शो ब्र॒ध्नस्य॑ वि॒ष्टपं॑ चतुस्त्रिँ॒शो नाकः॑ षट्त्रिँ॒शो वि॑व॒र्त्तो॒ऽष्टाचत्वारिँ॒शो ध॒र्त्रं च॑तुष्टो॒मः ॥ २३ ॥


अर्थ - हे इष्टके, तूं त्रिवृत्स्तोमरूपी व व्यापक अशी आहेस. हे इष्टके, तूं वज्ररूपी पंचदशस्तोम आहेस. हे इष्टके, तूं विशेषेंकरून रक्षण करणारा प्रजापति व सप्तदशस्तोमरूपी आहेस. हे इष्टके, तूं प्रतिष्ठाभूत व एकविंशति स्वरूपिणी आहेस. हे इष्टके, तूं त्वरावान् व अष्टादशस्तोमरूपिणी आहेस. हे इष्टके, तूं तपोरूपी नवदशस्तोमरूपिणी आहेस. हे इष्टके, तूं समावृत्ति, सविंशस्तोमरूपिणी आहेस. हे इष्टके, तूं बलप्रद तेज व द्वाविंशस्तोमरूपिणी आहेस. हे इष्टके, तूं उत्तम पोषण करणारी त्रयोविंशस्तोमरूपिणी आहेस. हे इष्टके, तूं प्रजोत्पादक व चतुविंशस्तोमरूपिणी आहेस. हे इष्टके, तूं सामगर्भ व पंचविंशस्तोमरूपिणी आहेस. हे इष्टके, तूं तेजोरूप व त्रिणवस्तोमरूपिणी आहेस. हे इष्टके, तूं यज्ञोपयोगी व एकत्रिंशस्तोमरूपिणी आहेस. हे इष्टके, तूं प्रतिष्ठा व त्रयस्त्रिंशस्तोमस्वरूपिणी आहेस. हे इष्टके, तूं सूर्य व स्वाराज्य देणारा जो त्या चतुस्त्रिंशस्तोम तद्रूपी आहेस. हे इष्टके, तूं स्वर्गप्रद षट्‌‍त्रिंशस्तोमरूपिणी आहेस. हे इष्टके, तूं ज्यांत सामाची आवृत्ति आहे अशा अष्टाचत्वारिंशस्तोमरूपिणी आहेस. हे इष्टके, तूं धारण करणार्‍या चतुष्टोमस्वरूपी आहेस. या सर्वरूपी इष्टकांचें मी स्थापन करतों. ॥२३॥





विनियोग - 'अग्नेर्भागोऽसि' इत्यादि दहा मंत्रांनीं स्पृत्संज्ञक दहा इष्टकांचें स्थापन करावें.


अ॒ग्नेर्भा॒गो॒ऽसि दी॒क्षा॒या॒ऽ आधिपत्यं॒ ब्रह्म॑ स्पृ॒तं त्रि॒वृत्स्तोमऽ इन्द्र॑स्य भागो॒ऽसि॒ विष्णो॒रा॑धिपत्यं क्ष॒त्रँ स्पृ॒तं प॑ञ्चद॒श स्तोमो॑ नृ॒चक्ष॑सां भा॒गो॒ऽसि धा॒तुराधि॑पत्यं ज॒नित्रँ॑ स्पृ॒तँ स॑प्तद॒श स्तोमो॑ मि॒त्रस्य॑ भा॒गो॒ऽसि॒ वरु॑ण॒स्याधि॑पत्यं दि॒वो वृष्टि॒र्वात॑ स्पृ॒तऽ ए॑कविँ॒श स्तोमः॑ ॥ २४ ॥


अर्थ - हे इष्टके, तूं अग्नीचा भाग आहेस, तुझें ठायीं वाणीचें आधिपत्य आहे व त्रिवृत् स्तोमस्वरूपी तुझ्या योगानें मृत्यूपासून ब्राह्मणांचें रक्षण झालें; त्या तुझें मी स्थापन करतों. तसेंच तूं इंद्राचा, शुभाशुभ करणार्‍यांना पहाणार्‍या देवांचा व मित्राचा भाग आहेस, तुझे ठायीं विष्णु, धाता व वरुणांचें आधिपत्य आहे, व पञ्चदशस्तोमस्वरूपी तुझ्या योगानें क्षत्रियत्वाचें, सप्तदशस्तोमस्वरूपी तुझ्या योगानें वैश्यजातीचें मृत्यूपासून रक्षण केलें गेलें व एकविंशस्तोमरूपी अशा तुझ्या योगें द्युलोकसंबंधीं वृष्टि व वायु रक्षण केलें गेलें; अशा हे इष्टकांनो, तुमचें मी स्थापन करतों. ॥२४॥





विनियोग - 'वसूनां भागः' वगैरे सहा मंत्रांनीं सहा पद्यानामक इष्टकांचें स्थापन करावें. (२६) 'सहश्च सहस्यश्च' या मंत्रानें ऋतव्य इष्टकांचें स्थापन करावें.


वसू॑नां भा॒गो॒ऽसि रु॒द्राणा॒माधि॑पत्यं॒ चतु॑ष्पात् स्पृ॒तं च॑तुर्विँ॒शऽ स्तोम॑ऽ आदि॒त्यानां॑ भा॒गो॒ऽसि म॒रुता॒माधि॑पत्यं॒ गर्भा॑ स्पृ॒ताः प॑ञ्चविँ॒श स्तोमोऽदि॑त्यै भा॒गो॒ऽसि॒ पू॒ष्णऽ आधि॑पत्य॒मोज॑ स्पृ॒तं त्रि॑ण॒व स्तोमो॑ दे॒वस्य॑ सवि॒तुर्भा॒गो॒ऽसि॒ बृह॒स्पते॒राधि॑पत्यँ स॒मीची॒र्दिश॑ स्पृ॒ताश्च॑तुष्टो॒म स्तोमः॑ ॥ २५ ॥ यवा॑नां भा॒गोऽस्यय॑वाना॒माधि॑पत्यं प्र॒जा स्पृ॒ताश्च॑त्वारिँ॒श स्तोम॑ऽ ऋभू॒णां भा॒गो॒ऽसि॒ विश्वे॑षां दे॒वाना॒माधि॑पत्यं भू॒तँ स्पृ॒तं त्र॑यस्त्रिँ॒श स्तोमः॑ ॥ २६ ॥


अर्थ - हे इष्टके, तूं वसु, आदित्य, अदिति, सवितृदेव, शुक्लपक्ष व ऋभुदेव यांचा भाग आहेस. तुझे ठायीं रुद्र, मरुत्, पूषा, बृहस्पति, उत्तर (कृष्ण) पक्ष व विश्वेदेव यांचें आधिपत्य आहे व तूं चतुर्विंशस्तोमरूपानें चतुष्पादांचें, पञ्चविंशस्तोमरूपानें गर्भांचें, त्रिणवस्तोमरूपानें तेजाचें, चतुष्टोमरूपानें विस्तारयुक्त अशा दिशांचें, चतुश्चत्वारिंशस्तोमरूपानें प्रजांचें व त्रयस्त्रिंशस्तोमरूपानें सर्व भूतांचें मृत्यूपासून रक्षण केलें. त्या सर्व इष्टकांचें मी स्थापन करतों. ॥२५-२६॥





विनियोग -


सह॑श्च सह॒स्य॒श्च॒ हैम॑न्तिकावृ॒तूऽ अ॒ग्नेर॑न्तः श्ले॒षो॒ऽसि॒ कल्पे॑तां॒ द्यावा॑पृथि॒वी कल्प॑न्ता॒माप॒ऽ ओष॑धयः॒ कल्प॑न्ताम॒ग्नयः॒ पृथ॒ङ् मम॒ ज्यैष्ठ्या॑य॒ सव्र॑ताः । येऽ अ॒ग्नयः॒ सम॑नसोऽन्त॒रा द्यावा॑पृथि॒वीऽ इ॒मे । हैम॑न्तिकावृ॒तूऽ अ॑भि॒कल्प॑माना॒ऽ इन्द्र॑मिव दे॒वाऽ अ॑भि॒संवि॑शन्तु॒ तया॑ दे॒वत॑याऽङ्‍गिर॒स्वद् ध्रु॒वे सी॑दतम् ॥ २७ ॥


अर्थ - मार्गशीर्ष व पौष हे हेमंत ऋतूचे अवयव आहेत. हे हेमंत ऋतो, तूं या अग्नीच्या आंत राहून जोडणारा आहेस म्हणून द्यावापृथिवींनीं अग्निचयन करणार्‍या माझें (यजमानाचें) ज्येष्ठत्व प्राप्त करण्याकरितां योग्य उपकार करावा. जल व औषधि आणि एकाच चयनयज्ञामध्यें कार्य करणारे निरनिराळे इष्टकारूपी अग्नि तुला ज्येष्ठत्व देण्याला समर्थ होवोत. ह्या द्यावापृथिवी व त्यांत असणारे एकचित्ताचे अग्नि हेही हेमंत ऋतूसंबंधीं संपत्ति मिळवून या कर्माचा आश्रय करोत. यास दृष्टांत - ज्याप्रमाणें देव इंद्राच्या सेवेकरितां येतात त्याप्रमाणें अन्य इष्टका हेमंताच्या सेवेकरितां येवोत. हे ऋतव्य इष्टकांनो, त्या देवतेनें स्थापित केलेल्या तुम्ही अंगिरस् ऋषीच्या यज्ञाप्रमाणें या यज्ञांत येऊन स्थिर होऊन रहा. ॥२७॥





विनियोग - 'एकयास्तुवत' इत्यादि मंत्रांनी सतरा इष्टकांचें स्थापन करावें.


एक॑याऽस्तुवत प्र॒जाऽ अ॑धीयन्त प्र॒जाप॑ति॒रधि॑पतिरासीत् ति॒सृभि॑रस्तुवत॒ ब्रह्मा॑सृज्यत॒ ब्रह्म॑ण॒स्पति॒रधि॑पतिरासीत् प॒ञ्चभि॑रस्तुवत भू॒तान्य॑सृज्यन्त भू॒तानां॒ पति॒रधि॑पतिरासीत् स॒प्तभि॑रस्तुवत सप्तऽ ऋ॒षयो॑ऽसृज्यन्त धा॒ताऽधि॑पतिरासीत् ॥ २८ ॥


अर्थ - प्रजापतीनें एका वाणींसह आपली स्तुति केली, प्रजा उत्पन्न केल्या व तो त्यांचा अधिपति झाला. ब्रह्मदेवानें प्राणोपानव्यानांसह आपली स्तुति केली व ब्राह्मण जाति उत्पन्न केली व तो तिचा स्वामी झाला. भूताधिपतीनें, पंच प्राणांनीं आपली स्तुति केली व पंचमहाभूतें उत्पन्न केलीं आणि तो त्यांचा स्वामी झाला. जगत्स्रष्टयानें श्रोत्र, चक्षु, नासिका व वाक् यांचेसह आपली स्तुति केली व सात चक्षुरादिक उत्पन्न केले व तो त्यांचा स्वामी झाला. ॥२८॥





विनियोग -


न॒वभि॑रस्तुवत पि॒तरो॑ऽसृज्य॒न्तादि॑ति॒रधि॑पत्न्यासीत् एकाद॒शभि॑रस्तुवतऽ ऋ॒तवो॑ऽसृज्यन्तार्त॒वाऽ अधि॑पतयऽ आसँस्त्रयोद॒शभि॑रस्तुवत॒ मासा॑ऽ असृज्यन्त संवत्स॒रोऽधि॑पतिरासीत् पञ्चद॒शभि॑रस्तुवतऽ क्ष॒त्रम॑सृज्य॒तेन्द्रोऽधि॑पतिरासीत् सप्तद॒शभि॑रस्तुवत ग्रा॒म्याः प॒शवो॑ऽसृज्यन्त॒ बृह॒स्पति॒रधि॑पतिरासीत् ॥ २९ ॥


अर्थ - प्रजापतीनें नऊ प्राणादिछिद्रांसह आपली स्तुति केली व अग्निष्वात्तादि पितर निर्माण केले व अखण्डित-शक्ति-विशिष्ट अशी प्रजापतीची शक्ति उत्पन्न केलेल्या पितरांची स्वामिनी झाली. त्या प्रजापतीनें एकादश प्राणांसह आपली स्तुति केली, वसंतादिऋतु निर्माण केले, ऋतुपालक देव स्वामी झाले. त्यानें त्रयोदश अवयवांनीं आपली स्तुति केली. त्यापासून चैत्रादि महिने निर्माण झाले व संवत्सर त्यांचा अधिपति झाला. प्रजापतीनें पंधरा अवयवांसह आपली स्तुति केली. त्यापासून क्षत्रिय जाति निर्माण झाली व ऐश्वर्यशाली इन्द्र त्यांचा स्वामी झाला. प्रजापतीनें सप्तदश अवयवांनीं आपली स्तुति केली व गो वगैरे ग्राम्य पशू निर्माण केले आणि बृहस्पति त्यांचा स्वामी झाला. ॥२९॥





विनियोग -


न॒व॒द॒शभि॑रस्तुवत शूद्रा॒र्याव॑सृज्येतामहोरा॒त्रेऽ अधि॑पत्नीऽ आस्ता॒मेक॑विँशत्यास्तुव॒तैक॑शफाः प॒शवो॑ऽसृज्यन्त॒ वरु॒णोऽधि॑पतिरासी॒त् त्रयो॑विँशत्यास्तुवत क्षु॒द्राः प॒शवो॑ऽसृज्यन्त पू॒षाऽधि॑पतिरासी॒त् पञ्च॑विँशत्यास्तुवतार॒ण्याः प॒शवो॑ऽसृज्यन्त वा॒युरधि॑पतिरासीत् स॒प्तविँ॑शत्यास्तुवत॒ द्यावा॑पृथि॒वी व्यै॑तां॒ वस॑वो रु॒द्राऽ आ॑दि॒त्याऽ अ॑नु॒व्या॒यँ॒स्तऽ ए॒वाधि॑पतयऽ आसन् ॥ ३० ॥


अर्थ - प्रजापतीनें एकोणीस अवयवांसह आपली स्तुति केली. त्यापासून शूद्र व वैश्य निर्माण झाले व अहोरात्र त्यांचे स्वामी बनले. प्रजापतीनें एकवीस अवयवांसह आपली स्तुति केली, त्यापासून एका खुराचे अश्व वगैरे पशु उत्पन्न झाले व वरुण त्यांचा अधिपति झाला. प्रजापतीनें तेवीस अवयवांसह आपली स्तुति केली, त्यापासून अज वगैरे क्षुद्र पशु उत्पन्न झाले व पूषा त्यांचा अधिपति झाला. प्रजापतीनें पंचवीस अवयवांसह आपली स्तुति केली, त्यापासून कृष्णमृगप्रभृति आरण्य पशु निर्माण झाले, वायु त्यांचा अधिपति झाला. प्रजापतीनें सत्तावीस अवयवांसह आपली स्तुति केली. त्यापासून द्यावापृथिवी उत्पन्न झाले, त्यांचें अष्ट वसु, एकादश रुद्र व आदित्यांनीं अनुगमन केलें व तेच त्यांचे स्वामी बनले. ॥३०॥





विनियोग -


नव॑विँशत्याऽस्तुवत॒ वन॒स्पत॑योऽसृज्यन्त॒ सोमोऽधिपतिरासी॒देक॑त्रिँशताऽस्तुवत प्र॒जाऽ अ॑सृज्यन्त॒ यवा॒श्चाय॑वा॒श्चाधि॑पतयऽ आसँ॒स्त्रय॑स्त्रिँशताऽस्तुवत भू॒तान्य॑शाम्यन् प्र॒जाप॑तिः परमे॒ष्ठ्यधि॑पतिरासील्लो॒कं ताऽ इन्द्र॑म् ॥ ३१ ॥


अर्थ - प्रजापतीनें एकूणतीस अवयवांसह आपली स्तुति केली व वनस्पति निर्माण केल्या. सोम त्यांचा अधिपति झाला. प्रजापतीनें एकतीस अवयवांसह आपली स्तुति केली, त्यापासून प्रजा निर्माण झाल्या. शुक्ल पक्ष व कृष्ण पक्ष हे त्यांचे अधिपति झाले. प्रजापतीनें तेहतीस अवयवांसह आपली स्तुति केली. त्यायोगें सर्व प्राणी सुखी बनले. सत्यलोकांत राहणारा प्रजापति त्यांचा स्वामी झाला. बाराव्या अध्यायांतील ५४, ५५, व ५६ या मंत्रांचीं प्रतीकें क्रमेंकरून लोकम्-ताः-इन्द्रम् अशीं आहेत. ॥३१॥





॥ चतुर्दशोऽध्यायः ॥
ॐ तत् सत्


GO TOP