![]() |
शुक्ल यजुर्वेद विनियोग - बाराव्या अध्यायांत उखाधारणादिकांचे मंत्र सांगितले. तेरावे अध्यायांत पुष्करपर्णादिकांचे उपधान मंत्र सांगतात. उत्तरवेदीच्या पश्चिमेकडे उभें राहून यजमानानें 'मयि गृह्णामि' या मंत्राचा जप करावा. मयि॑ गृ॒ह्णा॒म्यग्रे॑ अ॒ग्निँ रायस्पोषा॑य सुप्रजा॒स्त्वाय॑ सु॒वीर्या॑य । मामु॑ दे॒वताः॑ सचन्ताम् ॥ १ ॥ अर्थ - मी प्रथम आपल्या शरीरावर द्रव्यवृद्धि, उत्तम प्रजा व उत्तम वीर्यप्राप्तीकरितां अग्नि स्थापन करतों. देवताही मजशींच एकत्र होवोत. ॥१॥ विनियोग - उखासंभरणाप्रमाणें अध्वर्यूनें कुशस्तंभावर कमलिनीपत्र स्थापन करावें. अ॒पां पृष्ठम्॑असि॒ योनि॑र॒ग्नेः स॑मु॒द्रम॒भितः॒ पिन्व॑मानम् । वर्ध॑मानो म॒हाँ२ऽ आ च॒ पुष्क॑रे दिवो॒ मात्र॑या वरि॒म्णा प्र॑थस्व ॥ २ ॥ अर्थ - हे पुष्करपर्णा, तूं जलाचें पृष्ठ आहेस व या मृत्तिकापिंडाचें कारण आहेस. तसेच सर्व बाजूंनीं वाहणार्या या जलाची प्रीति करणारे आहेस व या कमलांत पुष्कळ प्रकारें तूं वृद्धिंगत होतेस. हे पुष्करपर्णा, द्युलोकाच्या प्रमाणानें व मोठेपणानें तूं विस्तृत हो. ॥२॥ विनियोग - त्या पुष्करपर्णावर 'ब्रह्मजज्ञानम्' या मंत्रानें गळ्यांतील सुवर्णालंकार ठेवावा. ब्रह्म॑ जज्ञा॒नं प्र॑थ॒मं पु॒रस्ता॒द्वि सी॑म॒तः सुरुचो॑ वे॒न आ॑वः । स बु॒ध्न्या॒ उप॒मा अ॑स्य वि॒ष्ठाः स॒तश्च॒ योनि॒मस॑तश्च॒ विवः॑ ॥ ३ ॥ अर्थ - हा मोठा सुवर्णरूपी आदित्य प्रथम पूर्वेकडे उदय पावला नंतर भूमर्यादेच्या पलीकडे प्रकाशमान असलेल्या लोकांना त्यानें आपल्या प्रकाशानें विस्तृत केलें. तो तेजस्वी सूर्य अन्तरिक्षांतील सर्व विस्तृत आणि जगाचे स्थानभूत अशा दिशा व घटपटादिमूर्त वस्तूंचें व वाखादिक अमूर्तवस्तूंचें जें उत्पत्तिस्थान त्यांस प्रकाशित करतो. ॥३॥ विनियोग - त्या सुवर्णावर दुसरी सुवर्णाची पुरुषप्रतिमा 'हिरण्यगर्भः' या दोन मंत्रांनीं स्थापन करावी. हि॒र॒ण्य॒ग॒र्भः सम॑वर्त॒ताग्रे॑ भू॒तस्य॑ जा॒तः पति॒रेक॑ऽ आसीत् । स दा॑धार पृथि॒वीं द्यामु॒तेमां कस्मै॑ दे॒वाय॑ ह॒विषा॑ विधेम ॥ ४ ॥ अर्थ - हिरण्यपुरुषरूपी ब्रह्माण्डांत गर्भरूपानें असणारा प्रजापति सर्व प्राणिसमुदायाच्या पूर्वी शरीरधारण करता झाला. तो एकटाच पुढें उत्पन्न होणार्या जगाचा स्वामी होता तोच ह्या भूलोक, अन्तरिक्षलोक व द्युलोकाला धारण करता झाला. त्या प्रजापति देवाला आम्ही हवि देतों. ॥४॥ विनियोग - द्र॒प्सश्च॑स्कन्द पृथि॒वीमनु॒ द्यामि॒मं च॒ योनि॒मनु॒ यश्च॒ पूर्वः॑ । स॒मा॒नं योनि॒मनु॑ स॒ञ्चर॑न्तं द्र॒प्सं जु॑हो॒म्यनु॑ स॒प्त होत्राः॑ ॥ ५ ॥ अर्थ - मुख्य आदित्य अन्तरिक्षलोक, द्युलोक व भूलोक यांप्रत गमन करतो. अशा रीतीनें सर्वांचें एकच उत्पत्तिस्थान तीनही लोकांत गमन करणार्या आदित्याचें मी सर्व दिशांत स्थापन करतों. ॥५॥ विनियोग - हिरण्यपुरुषाकडे पाहून यजमानानें 'नमोऽस्तु' इत्यादि तीन ऋचा म्हणाव्या. नमो॑ऽस्तु स॒र्पेभ्यो॒ ये के च॑ पृथि॒वीमनु॑ । येऽ अ॒न्तरि॑क्षे॒ ये दि॒वि तेभ्यः॑ स॒र्पेभ्यो॒ नमः॑ ॥ ६ ॥ अर्थ - पृथ्वीवर, अन्तरिक्षांत व द्युलोकांत जे लोक आहेत त्या सर्वांना नमस्कार असो. ॥६॥ विनियोग - याऽ इष॑वो यातु॒धाना॑नां॒ ये वा॒ वन॒स्पतीँ१ऽ रनु॑ । ये वा॑व॒टेषु॒ शेर॑ते॒ तेभ्य॑ह् स॒र्पेभ्यो॒ नमः॑ ॥ ७ ॥ अर्थ - दुःख देणार्या राक्षसरूपानें राहणार्या, बाणरूपानें राहणार्या, चन्दनादि वृक्षांना वेष्टन करणार्या व बिळांत शयन करणार्या ज्या सर्पजाति त्यांना नमस्कार असो. ॥७॥ विनियोग - ये वा॒मी रो॑च॒ने दि॒वो ये वा॒ सूर्य॑स्य र॒श्मिषु॑ । येषा॑म॒प्सु सद॑स्कृ॒तं तेभ्यः॑ स॒र्पेभ्यो॒ नमः॑ ॥ ८ ॥ अर्थ - द्युलोकाच्या दीप्तिस्थानांत असणारे, आम्हांला न दिसणारें व सूर्यकिरणांत राहणारे आणि जलांत ज्यांचें स्थान आहे अशा सर्पांना नमस्कार असो. ॥८॥ विनियोग - 'कृणुष्वपाजः' या पांच मंत्रांनीं प्रत्येक दिशेकडे जाऊन पुरुषावर पांच आहुती द्याव्या. कृ॒णु॒ष्व पाजः॒ प्रसि॑तिं॒ न पृ॒थ्वीं या॒हि राजे॒वाम॑वां॒२ऽ इभे॑न । तृ॒ष्वीमनु॒ प्रसि॑तिं द्रूणा॒नोऽस्ता॑ऽसि॒ विध्य॑ र॒क्षस॒स्तपि॑ष्ठैः ॥ ९ ॥ अर्थ - हे अग्ने, पक्षी पकडण्याकरितां पसरलेल्या जाळ्याप्रमाणें शत्रूंना पकडण्याकरितां तूं आपलें सामर्थ्य पसर. नंतर राजाप्रमाणें ससहाय होऊन हत्तीवर बसून शत्रूंप्रत गमन कर. हे अग्ने, तूं शत्रूंचा नाशक आहेस म्हणून ताप देणार्या आयुधांनीं राक्षसांना ताडन कर. तूं क्षिप्रकारी जाळ्यानें शत्रूचा नाश करणारा आहेस. ॥९॥ विनियोग - तव॑ भ्रमास॑ऽ आशु॒या प॑त॒न्त्यनु॑स्पृश धृष॒ता शोशु॑चानः । तपूँ॑ष्यग्ने जु॒ह्वा॒ पत॒ङ्गानस॑न्दितो॒ वि सृ॑ज॒ विष्व॑गु॒ल्काः ॥ १० ॥ अर्थ - हे अग्ने, तुझ्या ज्या शीघ्रगमन करणार्या व वार्यानें हलणार्या ज्वाला आहेत त्यायोगें ताप देणार्या राक्षसांना व उडया मारीत गमन करणार्या पिशाचांना जाळ. तूं प्रौढ अशा ज्वालासमुदायानें अत्यंत प्रकाशमान, स्रुचेनें होम केला जाणारा व अखण्डित असा होऊन ऊर्ध्वभागीं, अधोभागीं व आडव्या तिडव्या आपल्या ज्वालांना राक्षसांच्या नाशाकरितां पसर. ॥१०॥ विनियोग - प्रति॒ स्पशो॒ वि सृ॑ज॒ तूर्णि॑तमो॒ भवा॑ पा॒युर्वि॒शो अ॒श्या अद॑ब्धः । यो नो॑ दू॒रे अ॒घशँ॑सो॒ यो अन्त्यग्ने॒ मा कि॑ष्टे॒ व्यथि॒राद॑धर्षीत् ॥ ११ ॥ अर्थ - हे अग्ने, जो आमचा द्वेषी दूर राहतो व जवळ राहतो त्याला बांधण्याकरितां गुप्त दूत पाठव. या आमच्या प्रजेचें रक्षण कर. तूं अत्यंत वेगवान् व अहिंसित आहेस. हे अग्ने, अशा रीतीनें मजवर अनुग्रह करण्यास प्रवृत्त झालेल्या तुला कोणताही शत्रु पीडा न करो. ॥११॥ विनियोग - उद॑ग्ने तिष्ठ॒ प्रत्या त॑नुष्व॒ न्यमित्राँ॑२ऽ ओषतात्तिग्महेते । यो नो॒ऽ अरा॑तिँ समिधान च॒क्रे नी॒चा तं ध॑क्ष्यत॒सं न शुष्क॑म् ॥ १२ ॥ अर्थ - हे अग्ने, तूं ऊठ व ज्वाला पसर. हे तीक्ष्ण आयुधें धारण करणार्या तूं विशेषेंकरून शत्रूंना जाळ. हे दीप्यमान अग्ने, आम्हांला दान देत असतां जो निषेध करतो त्याला शुष्कवृक्षाप्रमाणें तूं जाळ. ॥१२॥ विनियोग - 'अग्नेष्ट्वा' या मंत्रानें व 'अग्निर्मूर्धा' या मंत्रानें सृचा ठेवावी. ऊर्ध्वो भ॑व॒ प्रति॑ वि॒ध्याध्य॒स्मदा॒विष्कृ॑णुष्व॒ दैव्या॑न्यग्ने । अव॑ स्थि॒रा त॑नुहि यातु॒जूनां॑ जा॒मिमजा॑मिं॒ प्रमृ॑णीहि॒ शत्रू॑न् । अग्नेष्ट्वा॒ तेज॑सा सादयामि ॥ १३ ॥ अर्थ - हे अग्ने, तूं उद्युक्त होऊन आमच्यावर ताबा चालविणार्या शत्रूंना ताडन कर व देवसंबंधी कर्मे प्रकट कर. शत्रूंच्या स्थिर धनुष्यांना खालीं ठेवव. एकदां अथवा पुनः पुनः मारून शत्रूंचा नाश कर. हे सृचे, अग्नीसंबंधीं तेजानें तुझें मी स्थापन करतों. ॥१३॥ विनियोग - 'इन्द्रस्य त्वा' या मंत्रानें औदुंबर सृचेचें स्थापन करावें. अ॒ग्निर्मू॒र्धा दि॒वः क॒कुत्पतिः॑ पृथि॒व्या अयम् । अ॒पाँ रेताँ॑सि जिन्वति । इन्द्र॑स्य॒ त्वौज॑सा सदयामि ॥ १४ ॥ अर्थ - हा अग्नि द्युलोकांतून पडणार्या जलांचे व्रीहियवादिरूपी सारभाग वाढवितो. तो अग्नि द्युलोकाचें मस्तक व वशिंड असून पृथ्वीचा पालक आहे. हे सृचे, इंद्राच्या तेजानें तुझें मी स्थापन करतों. ॥१४॥ विनियोग - भुवो॑ य॒ज्ञस्य॒ रज॑सश्च ने॒ता यत्रा॑ नि॒युद्भिः॒ सच॑से शि॒वाभिः॑ । दि॒वि मू॒र्धानं॑ दधिषे स्व॒र्षां जि॒ह्वाम॑ग्ने चकृषे हव्य॒वाह॑म् ॥ १५ ॥ अर्थ - हे अग्ने, तूं ज्यावेळीं हविर्द्रव्याची वहन करणारी ज्वाला पसरतोस त्यावेळीं द्रव्यदेवतायुक्त यागाचा व यज्ञपरिणामरूपी उदकाचा नेणारा होतोस. त्या स्थानामध्यें मंगलरूपी अश्वांनीं व अश्वस्त्रियांनीं तूं संबद्ध होतोस व द्युलोकांत स्वर्ग देणार्या सूर्याला धारण करतोस. ज्या तुझें हें सर्व कृत्य आहे त्या तुला सृचेच्यारूपानें स्थापन करतों. ॥१५॥ विनियोग - 'ध्रुवासि' या मंत्रानें 'स्वयमातृष्णा' संज्ञक इष्टकेचें स्थापन करावें. ध्रु॒वाऽसि॑ ध॒रुणाऽऽस्तृ॑ता वि॒श्वक॑र्मणा । मा त्वा॑ समु॒द्र उद्व॑धी॒न्मा सू॑प॒र्णोऽव्य॑थमाना पृथि॒वीं दृँ॑ह ॥ १६ ॥ अर्थ - हे स्वयमातृष्णे, तूं भूमिरूपानें विश्वाला धारण करणारीं सर्व कर्मे करणार्या अशा प्रजापतीनें स्थापन केलेली आहेस. रुक्म व पुरुष तुझा नाश न करोत. तूं चलित न होतां ह्या पृथ्वीला दृढ कर. ॥१६॥ विनियोग - प्र॒जाप॑तिष्ट्वा सादयत्व॒पां पृ॒ष्ठे स॑मु॒द्रस्येम॑न् व्यच॑स्वतीं॒ प्रथ॑स्वतीं॒ प्रथ॑स्व पृथि॒व्य॒सि ॥ १७ ॥ अर्थ - हे स्वयमातृष्णे, प्रजापति ह्या जलांच्या पृष्ठभागीं व जलसंघाच्या स्थानामध्यें तुझें स्थापन करो. तूं अभिव्यक्तीनें सहित विस्तारयुक्त अशी आहेस. तूं प्रजापतीनें स्थापित केलेली अशी होऊन ह्या चितीचा विस्तार कर. कारण तूं पृथ्वीस्वरूपी आहेस. ॥१७॥ विनियोग - भूर॑सि॒ भूमि॑र॒स्यदि॑तिरसि वि॒श्वधा॑या॒ विश्व॑स्य॒ भुव॑नस्य ध॒र्त्री । पृथि॒वीं य॑च्छ पृथि॒वीं दृँ॑ह पृथि॒वीं मा हिँ॑सीः ॥ १८ ॥ अर्थ - हे स्वयमातृष्णे, तूं सुखांना प्राप्त करून देणारी व पृथ्वीरूपी आहेस. तूं देवमाता असून विश्व धारण करणारी आहेस. सर्व भूतसमुदायांना धारण करणारी अशी तूं पृथ्वीला नियमित कर व तिला दृढ कर आणि तिची हिंसा करू नकोस. ॥१८॥ विनियोग - विश्व॑स्मै प्रा॒णाया॑पा॒नाय॑ व्या॒नायो॑दा॒नाय॑ प्रति॒ष्ठायै॑ च॒रित्रा॑य । अ॒ग्निष्ट्वा॒ऽभि पा॑तु म॒ह्या स्व॒स्त्या छ॒र्दिषा॒ शन्त॑मेन॒ तया॑ दे॒वत॑याऽङ्गिर॒स्वद् ध्रु॒वा सी॑द ॥ १९ ॥ अर्थ - हे स्वयमातृष्णे, सर्व प्राणापानव्यानोदानाख्य वृत्तिलाभ, कीर्ति व शास्त्रीय आचरण ह्या सर्वांकरितां मी तुझें स्थापन करतों व मोठया कल्याणानें व अत्यंत सुखकारक गृह देऊन अग्नि सर्व तर्हेनें तुझें रक्षण करो. त्या अग्निदेवाच्या अनुग्रहानें तूं स्थिर होऊन अंगिरो ऋषीच्या अनुष्ठानाप्रमाणें ह्या यज्ञांत स्थिर अशी स्थित हो. ॥१९॥ विनियोग - 'काण्डात् काण्डात्' या दोन मंत्रांनीं मूल व अग्रसहित दुर्वा स्वयमातृष्णासंज्ञक इष्टकेवर स्थापन करावी. काण्डा॑त्काण्डात्प्र॒रोह॑न्ती॒ परु॑षः-परुष॒स्परि॑ । ए॒वा नो॑ दूर्वे॒ प्र त॑नु स॒हस्रे॑ण श॒तेन॑ च ॥ २० ॥ अर्थ - हे दूर्वेष्टके, प्रत्येक काण्डांतून व प्रत्येक पेर्यांतून ज्याप्रमाणें तूं अंकुरयुक्त होऊन वाढतेस त्याप्रमाणें शतसाहस्त्रसंख्याक पुत्रपौत्र देऊन आम्हांला वाढव. ॥२०॥ विनियोग - या श॒तेन॑ प्र॒तनोषि॑ स॒हस्रे॑ण वि॒रोह॑सि । तस्या॑स्ते देवीष्टके वि॒धेम॑ ह॒विषा॑ व॒यम् ॥ २१ ॥ अर्थ - हे प्रकाशक इष्टके, ज्या शंभर काण्डांनीं तूं विस्तार पावतेस व सहस्त्र अंकुरांनीं तूं विविध रीतीनें वाढतेस त्या तुझ्या स्थानाची आम्ही हविर्द्रव्यानें परिचर्या करूं. ॥२१॥ विनियोग - 'यास्ते' इत्यादि दोन ऋचांनीं पद्यानामक इष्टकेचें स्थापन करावें. यास्ते॑ अग्ने॒ सूर्ये॒ रुचो॒ दिव॑मात॒न्वन्ति॑ र॒श्मिभिः॑ । ताभि॑र्नो अ॒द्य सर्वा॑भी रु॒चे जना॑य नस्कृधि ॥ २२ ॥ अर्थ - हे अग्ने, ज्या तुझ्या कांती सूर्यमंडलांत राहून आपल्या किरणांनीं द्युलोकाला प्रकाशित करतात त्या सर्वांच्या योगानें आज आमची शोभा वाढव व शोभायुक्त म्हणजे प्रसिद्ध असे पौत्रादिक आम्हांला दे. ॥२२॥ विनियोग - या वो॑ देवाः॒ सूर्ये॒ रुचो॒ गोष्वश्वे॑षु॒ या रुचः॑ । इन्द्रा॑ग्नी॒ ताभिः॒ सर्वा॑भी॒ रुचं॑ नो धत्त बृहस्पते ॥ २३ ॥ अर्थ - हे देवांनो, हे इंद्राग्नींनो, हे बृहस्पते, तुमच्यासंबंधीं ज्या कांती सूर्यमंडलांत व गो, अश्व यांत आहेत त्या सर्वांच्या योगानें आम्हांला कांति द्या. ॥२३॥ विनियोग - 'विराट् स्वराट्' या मंत्रांनीं दोन रेतःसिच् नांवाच्या दोन पद्येष्टकांचें स्थापन करावें. 'प्रजापति' या मंत्रानें विश्वज्योतिषसंज्ञक इष्टकेचें स्थापन करावें. वि॒राड्ज्योति॑रधारयत्स्व॒राड्ज्योति॑रधारयत् । प्र॒जाप॑तिष्ट्वा सादयतु पृ॒ष्ठे पृ॑थि॒व्या ज्योति॑ष्मतीम् । विश्व॑स्मै प्र॒णाया॑पा॒नाय॑ व्या॒नाय॒ विश्वं॒ ज्योति॑र्यच्छ । अ॒ग्निष्टेऽधि॑पति॒स्तया॑ दे॒वत॑याऽङ्गिर॒स्वद् ध्रुवा सी॑द ॥ २४ ॥ अर्थ - विशेषेंकरून शोभणारा हा भूलोक अग्निरूपी तेजाला धारण करतो व स्वयंप्रकाशवान् असा हा स्वर्गलोक आदित्यरूपी तेजाला धारण करतो. प्रजापति पृथ्वीच्या ऊर्ध्वभागीं ज्योतिष्मतीसंज्ञक तुज इष्टकेला सर्व प्राणादिसंपत्तीकरितां स्थापन करो. हे इष्टके, तूं सर्व तेजाला नियमित कर. तुझा स्वामी अग्नि आहे. त्या देवतेसह वर्तमान अंगिरो ऋषीच्या यज्ञाप्रमाणें या यज्ञांतही स्थिर होऊन बैस. ॥२४॥ विनियोग - 'मधुश्च माधवश्च' या मंत्रानें ऋतव्यसंज्ञक दोन इष्टकांचें स्थापन करावें. मधु॑श्च॒ माध॑वश्च॒ वास॑न्तिकावृ॒तू अ॒ग्नेर॑न्तःश्ले॒षो॒ऽसि कल्पे॑तां॒ द्यावा॑पृथि॒वी कल्प॑न्ता॒माप॒ऽ ओष॑धयः॒ कल्प॑न्ताम॒ग्नयः॒ पृथ॒ङ्मम ज्यैष्ठ्या॑य॒ सव्र॑ताः । ये अ॒ग्नयः॒ सम॑नसोऽन्त॒रा द्यावा॑पृथि॒वी इ॒मे । वास॑न्तिकावृ॒तू अ॑भि॒कल्प॑माना॒ऽ इन्द्र॑मिव दे॒वा अ॑भि॒संविशन्तु॒ तया॑ दे॒वत॑याऽङ्गिर॒स्वद् ध्रु॒वे सी॑दतम् ॥ २५ ॥ अर्थ - चैत्र, वैशाख हे दोन्ही वसंतसंबंधीं अवयव आहेत. हे वसंतऋतो, तूं या अग्नीच्या आंत राहून जोडणारा आहेस. म्हणून द्यावापृथिवींनीं अग्निचयन करणार्या माझें (यजमानाचें) ज्येष्ठत्व प्राप्त करण्याकरितां योग्य उपकार करावा. जल व औषधी आणि एकाच चयन यज्ञामध्यें कार्य करणारे निरनिराळे इष्टकारूपी अग्नि तुला ज्येष्ठत्व देण्याला समर्थ होवोत. ह्या द्यावापृथिवी व त्यांत असणारे एक चित्ताचे अग्नि तेही वासंतिक संपत्ति मिळवून या कर्माचा आश्रय करोत. यांस दृष्टांत - ज्याप्रमाणें देव इन्द्राच्या सेवेकरितां येतात त्याप्रमाणें अन्य इष्टका वसंताच्या सेवेकरितां येवोत. हे ऋतव्य इष्टकांनो, त्या देवतेनें स्थापित केलेल्या तुम्ही अंगिरस ऋषीच्या यज्ञाप्रमाणें या यज्ञांत येऊन स्थिर होऊन रहा. ॥२५॥ विनियोग - अषाढासंज्ञक इष्टका 'अषाढासी' या मंत्रानें स्थापन करावी. अषा॑ढाऽसि॒ सह॑माना॒ सह॒स्वारा॑तीः॒ सह॑स्व पृतनाय॒तः । स॒हस्र॑वीर्याऽसि॒ सा मा॑ जिन्व ॥ २६ ॥ अर्थ - हे इष्टके, तूं शत्रूंना सहन करणारी नाहींस व स्वभावतः शत्रूंचा पराजय करणारी आहेस म्हणून माझ्या दानस्वभावरहित प्रजेचा पराभव कर व संग्रामाची इच्छा करणार्या शत्रूंचाही पराजय कर. अशा बहु सामर्थ्यानें युक्त अशी तूं मला संतुष्ट कर. ॥२६॥ विनियोग - मधु॒ वाता॑ऽ ऋताय॒ते मधु॑ क्षरन्ति॒ सिन्ध॑वः । मार्ध्वी॑र्नः स॒न्त्वोष॑धीः ॥ २७ ॥ अर्थ - यज्ञाची इच्छा करणार्या यजमानांकरितां मधुररसयुक्त वारे वाहोत, तशाच वाहणार्या नद्या व समुद्र मधुर जलानें वाहोत व आमच्या औषधि मधुररसयुक्त होवोत. ॥२७॥ विनियोग - मधु॒ नक्त॑मु॒तोषसो॒ मधु॑म॒त्पार्थि॑वँ॒ रजः॑ । मधु॒ द्यौर॑स्तु नः पि॒ता ॥ २८ ॥ अर्थ - आमच्या रात्री व दिवस हीं मधुररसयुक्त होवोत. मातृभूत पृथ्वीलोक व पितृभूत द्युलोक हा मधुररसानें युक्त असो. ॥२८॥ विनियोग - मधु॑मान्नो॒ वन॒स्पति॒र्मधु॑माँ२ऽ अस्तु॒ सूर्यः॑ । माध्वी॒र्गावो॑ भवन्तु नः ॥ २९ ॥ अर्थ - आमचा अश्वत्थादि वृक्ष मधुररसयुक्त असो व सूर्य यज्ञसाधनांनी आमच्याकरितां मधुररसांनीं युक्त होवोत. ॥२९॥ विनियोग - 'अपां गम्भन्' ह्या तीन मंत्रांनीं कासवाचें स्थापन करावें. अ॒पां गम्भ॑न्त्सीद॒ मा त्वा॒ सूर्यो॒ऽभिता॑प्सी॒न्माऽग्निर्वै॑श्वान॒रः । अच्छि॑न्नपत्राः प्र॒जा अ॑नु॒वीक्ष॒स्वानु॑ त्वा दि॒व्या वृष्टिः॑ सचताम् ॥ ३० ॥ अर्थ - हे प्रजापते, जलांचें गंभीरस्थान जें रविमंडल त्यांत तूं बैस. तेथें बसलेल्या तुला सूर्य व वैश्वानर अग्नि संतप्त न करोत. तूं येथें राहून अखंडित अवयवांच्या इष्टकांना निरंतर पहा व द्युलोकांतील वृष्टि निरंतर तुझें सेवन करो. ॥३०॥ विनियोग - 'त्रीन् समुद्रान्' या ऋचेनें हातांतील कासवाला हलवावें. त्रीन्त्स॑मु॒द्रान्त्सम॑सृपत् स्व॒र्गान॒पां पति॑र्वृष॒भ इष्ट॑कानाम् । पूरीषं॒ वसा॑नः सुकृ॒तस्य॑ लो॒के तत्र॑ गच्छ॒ यत्र॒ पूर्वे॒ परे॑ताः ॥ ३१ ॥ अर्थ - हे कासवा, तूं उपभोगसाधन अशा तीन लोकांना प्राप्त होतोस. तूं जलांचा स्वामी व इष्टकावर सिंचन करणारा असा आहेस. तूं होमलेल्या पशूंचें आच्छादन करून ज्या ठिकाणीं पूर्वीचें कासव अग्निचयनाचे वेळीं गेलें त्या उत्तमचयन अग्नीच्या स्थानांमध्यें तूं गमन कर. ॥३१॥ विनियोग - म॒ही द्यौः पृ॑थि॒वी च॑ न इ॒मं य॒ज्ञं मि॑मिक्षताम् । पि॒पृ॒तां नो॒ भरी॑मभिः ॥ ३२ ॥ अर्थ - महान् अशा द्युलोक व पृथ्वी लोकांनीं आमचा यज्ञ आपआपल्या भागांनीं पूर्ण करावा, व त्यांनीं आमचें घर हिरण्य पशुधान्यादिरूपी आपल्या भागांनीं पूर्ण करावें. ॥३२॥ विनियोग - 'विष्णोः कर्माणि' या मंत्रानें उखळ व मुसळ ह्या दोघांचें एकदम स्थापन करावें. विष्णोः॒ कर्मा॑णि पश्यत॒ यतो॑ व्र॒तानि॑ पस्प॒शे । इन्द्र॑स्य॒ युज्यः॒ सखा॑ ॥ ३३ ॥ अर्थ - हे ऋत्विजांनो, यज्ञाधिष्ठाता जो विष्णु त्याचीं सृष्टिसंहारादि कर्में अवलोकन करा. ज्या योगें त्यानें लौकिक वैदिक कर्में निर्माण केली; तो विष्णु वृत्रवधारि कर्मांमध्यें इंद्राचा योग्य असा मित्र आहे. ॥३३॥ विनियोग - 'ध्रुवासि' या मंत्रानें उखेचें स्थापन करावें. ध्रु॒वाऽसि॑ ध॒रुणे॒तो ज॑ज्ञे प्रथ॒ममे॒भ्यो योनि॑भ्यो॒ऽ अधि॑ जा॒तवे॑दाः । स गा॑य॒त्र्या त्रि॒ष्टुभा॑ऽनु॒ष्टुभा॑ च दे॒वेभ्यो॑ ह॒व्यं व॑हतु प्रजा॒नन् ॥ ३४ ॥ अर्थ - हे उखे, तूं जगाचें धारण करणारी व स्थिर अशी आहेस. जो अग्नि पहिल्यानें प्रज्ञानयुक्त होऊन ह्या उखेपासून उत्पन्न झाला, नंतर अरणि वगैरे स्थानांतून झाला; तो आपला अधिकार ओळखून गायत्री, त्रिष्टुप् व अनुष्टुप् या छंदांनीं देवाकरितां हवि धारण करो. ॥३४॥ विनियोग - इ॒षे रा॒ये र॑मस्व॒ सह॑से द्यु॒म्न ऊ॒र्जे अप॑त्याय । स॒म्राड॑सि स्व॒राड॑सि सारस्व॒तौ त्वोत्सौ॒ प्राव॑ताम् ॥ ३५ ॥ अर्थ - हे उखे, तूं अन्न, धन, बल, यश, दूध, दही वगैरे स्निग्ध पदार्थ व पुत्रपौत्र देण्याकरितां येथें रममाण हो. तूं चांगल्या रीतीनें शोभणारी व स्वयं प्रकाशमान आहेस. अशा तुझें सरस्वतीसंबंधीं कूप (ऋग्वेदसामवेद) पालन करोत. ॥३५॥ विनियोग - 'अग्ने युक्ष्वादि' ह्या दोन मंत्रांनीं उखेमध्यें दोन आहुतींचा होम करावा. अग्ने॑ यु॒क्ष्वा हि ये तवाश्वा॑सो देव सा॒धवः॑ । अरं॒ वह॑न्ति म॒न्यवे॑ ॥ ३६ ॥ अर्थ - हे प्रकाशमान अग्ने, जे तुझें सुशिक्षित घोडे यज्ञाकरितां देवांना वाहून नेण्यास समर्थ आहेत तेच घोडे रथाला जोड. ॥३६॥ विनियोग - यु॒क्ष्वा हि दे॑व॒हूत॑मा@ं२ऽ अश्वाँ॑२ऽ अग्ने र॒थीरि॑व । नि होता॑ पू॒र्व्यः स॑दः ॥ ३७ ॥ अर्थ - हे अग्ने, तूं रथस्वामीप्रमाणें देवांचें अतिशयेंकरून आह्वान करणारे घोडे रथाला जोड. तूं पूर्वीचा होता आहेस. ह्या यागांत होतृषदनस्थानांवर बैस. ॥३७॥ विनियोग - 'सम्यक् स्रवन्ति' इत्यादि मंत्रानें एक एक सुवर्णशकल पंच पशूंच्या मुखांत घालावें. स॒म्यक् स्र॑वन्ति स॒रितो॒ न धेना॑ऽ अ॒न्तर्हृ॒दा मन॑सा पू॒यमा॑नाः । घृ॒तस्य॒ धारा॑ऽ अ॒भि चा॑कशीमि हिर॒ण्ययो॑ वेत॒सो मध्ये॑ अ॒ग्नेः ॥ ३८ ॥ अर्थ - नद्या समुद्रांत जातात त्याप्रमाणें जो हिरण्मय पुरुष अग्नीमध्यें निहित आहे; त्या हिरण्मय पुरुषाप्रत हविर्द्रव्यें गमन करतात. तीं हविर्द्रव्यें निश्चयात्मक व श्रद्धायुक्त अंतःकरणानें पवित्र केलीं गेलीं आहेत. तसेंच त्या पुरुषाकडे घृताच्या धाराही गमन करतात व तीं हविर्द्रव्यें व त्या धारा मी पाहतों. ॥३८॥ विनियोग - 'ऋचे त्वा' ह्या मंत्रानें दोन नासिकांत सुवर्णशकल ठेवावें. तसेंच 'भासे त्वा' या मंत्रानें दोन नेत्रांत व 'अभूत्' या मंत्रानें दोन कर्णांत सुवर्णशकल ठेवावें. ऋ॒चे त्वा॑ रु॒चे त्वा॑ भा॒से त्वा॒ ज्योति॑षे त्वा । अभू॑दि॒दं विश्व॑स्य॒ भुव॑नस्य॒ वाजि॑नम॒ग्नेर्वै॑श्वान॒रस्य॑ च ॥ ३९ ॥ अर्थ - हे हिरण्यशकला, ऋग्वेद हौत्रसिद्धि, दीप्ति, कांति, तेज यांकरितां तुझें मी स्थापन करतों. हे श्रोत्रेंद्रिय, सर्व प्राणिसमुदाय व सर्व मनुष्यांना हितकारक जो अग्नि त्याला जाणणारे आहेत म्हणून त्या श्रोत्रेंद्रियांत मी सुवर्णप्रक्षेप करतों. ॥३९॥ विनियोग - 'सहस्रदा' या मंत्रानें पुरुषाचें मस्तक घेऊन उखेमध्यें ठेवावें. अ॒ग्निर्ज्योति॑षा॒ ज्योति॑ष्मान् रु॒क्मो वर्च॑सा॒ वर्च॑स्वान् । स॒ह॒स्र॒दा अ॑सि स॒हस्रा॑य त्वा ॥ ४० ॥ अर्थ - हा अग्नि पशूच्या कर्णांतील सुवर्ण तेजानें तेजस्वी असो. प्रकाशमान अग्नि सुवर्णकांतिमान् असो. हे पुरुषा, तूं सहस्रसंख्य द्रव्य देणारा आहेस म्हणून सहस्रसंख्याक द्रव्य मिळविण्याकरितां तुला मी उचलून ठेवतों. ॥४०॥ विनियोग - 'आदित्यं गर्भम्' या पांच मंत्रांनीं पांच शिरांचें स्थापन करावें. आ॒दि॒त्यं गर्भं॒ पय॑सा॒ सम॑ङ्धि स॒हस्र॑स्य प्रति॒मां वि॒श्वरू॑पम् । परि॑वृङ्धि॒ हर॑सा॒ माऽभि मँ॑स्थाः श॒तायु॑षं कृणुहि ची॒यमा॑नः ॥ ४१ ॥ अर्थ - हे पुरुषशिरा, तूं आदित्यरूपी चित्याग्नीवर पय ओत. तो आदित्य पशूंना गर्भ प्राप्त करून देणारा, पुष्कळ देणारा, सर्वरूपप्रकाशक असा आहे. तसेंच तूं सर्ववीर्यापहारी ज्योतीनें, तेजानें यजमानाला दूर कर म्हणजे तें तेज त्यावर घालूं नकोस. तसेंच त्या यजमानाची हिंसा करूं नकोस. इष्टकाचयन झाल्यावर इष्टकाचयनाच्या योगें तूं यजमानाला शतायुषी कर. ॥४१॥ विनियोग - वात॑स्य जू॒तिं वरु॑णस्य॒ नाभि॒मश्वं॑ जज्ञा॒नँ स॑रि॒रस्य॒ मध्ये॑ । शिशुं॑ न॒दीनाँ॒ हरि॒मद्रि॑बुध्न॒मग्ने॒ मा हिँ॑सीः पर॒मे व्यो॑मन् ॥ ४२ ॥ अर्थ - हे चित्य अग्ने, तूं या अश्वाची हिंसा करूं नकोस. तो अश्व वायूप्रमाणें शीघ्र गमन करणारा, वायूचा आवडता, म्हणजे वरुणाच्या नाभीप्रमाणें रक्षणीय असा आहे. समुद्रांत उत्पन्न होणारा असल्यामुळें तो नद्यांचा बालक आहे व तो हरितवर्ण असून पर्वत त्याचें मूल कारण आहे व विस्तृत अशा या लोकांमध्यें तो राहतो. ॥४२॥ विनियोग - अज॑स्र॒मिन्दु॑मरु॒षं भु॑र॒ण्युम॒ग्निमी॑डे पू॒र्वचि॑त्तिं॒ नमो॑भिः । स पर्व॑भिर्ऋतु॒शः कल्प॑मानो॒ गां मा हिँ॑सी॒रदि॑तिं वि॒राज॑म् ॥ ४३ ॥ अर्थ - मी सर्वदा क्षीण न होणार्या अशा अग्नीचीं स्तुति करतों. तो अग्नि रोषरहित, व महर्षींनीं सेव्य व अन्नानें सर्वांचे पोषण करणारा आहे. अशा हे अग्ने, प्रत्येक अमावास्यादि पर्वावर व प्रत्येक ऋतूंत कर्म संपादन करणारा तूं या स्थापन केलेल्या गाईची हिंसा करूं नकोस. ती गाय अखण्डित व दुग्धदानानें विशेष शोभणारी आहे. ॥४३॥ विनियोग - वरू॑त्रीं॒ त्वष्टु॒र्वरु॑णस्य॒ नाभि॒मविं॑ जज्ञा॒नाँ रज॑सः॒ पर॑स्मात् । म॒हीँ सा॑ह॒स्रीमसु॑रस्य मा॒यामग्ने॒ मा हिँ॑सीः पर॒मे व्यो॑मन् ॥ ४४ ॥ अर्थ - हे अग्ने, उत्कृष्ट अशा या लोकांमध्यें स्थापन केलेल्या या बकरीची हिंसा करूं नकोस. ही बकरी त्वष्टयाच्या कृपेनें कांबळा देऊन सर्व लोकांचे रक्षण करणारी व वरुणाला नाभीप्रमाणें रक्षणीय, प्रजापतीच्या रजोगुणापासून उत्पन्न झालेली, मोठी, हजारों तर्हांनीं उपकार करण्यास समर्थ व सर्व प्राण्यांना बुद्धि देणारी अशी आहे. ॥४४॥ विनियोग - यो अ॒ग्निर॒ग्नेरध्यजा॑यत॒ शोका॑त्पृथि॒व्या उ॒त वा॑ दिव॒स्परि॑ । येन॑ प्र॒जा वि॒श्वक॑र्मा ज॒जान॒ तम॑ग्ने॒ हेडः॒ परि॑ ते वृणक्तु ॥ ४५ ॥ अर्थ - जो अग्निरूपी अज प्रजापतीच्या संतापापासून उत्पन्न झाला व द्युलोक, पृथिवीलोक यांच्याही शोकापासून उत्पन्न झाला व विश्वकर्मा प्रजापतिच ज्या वाग्रूपी अजाच्या योगानें प्रजा उत्पन्न करिता झाला. हे चित्य अग्ने, त्या अजावर (मेंढयावर) तूं रागावूं नकोस. ॥४५॥ विनियोग - 'चित्रं देवानाम्' या दोन अर्ध्या ऋचांनीं पुरुषाच्या शिरावर दोन आहुतींचा होम करावा. चि॒त्रं दे॒वाना॒मुद॑गा॒दनी॑कं॒ चक्षु॑र्मि॒त्रस्य॒ वरु॑णस्या॒ग्नेः । आऽप्रा॒ द्यावा॑पृथि॒वी अ॒न्तरि॑क्षँ॒ सूर्य॑ऽ आ॒त्मा जग॑तस्त॒स्थूष॑श्च ॥ ४६ ॥ अर्थ - आश्चर्याची गोष्ट - सूर्य उदय पावतो व उदय झाल्याबरोबर रात्रिगत अंधकाराचा नाश करतो. तो सूर्य किरणांचा आश्रयभूत मित्र वरुण व अग्नींचा प्रकाशक असा आहे. त्याचा उदय झाल्याबरोबर त्याने आपल्या तेजानें द्युलोक, पृथ्वीलोक व अंतरिक्ष लोकांना पूर्ण केलें, तो सूर्य स्थावर जंगमात्मक वस्तूंचा अंतर्यामी आत्मा आहे. ॥४६॥ विनियोग - अध्वर्यूनें 'इमं मा' इत्यादि पांच मंत्रांनीं पुरुषादिकांच्या पांच शिरांचें उपस्थान करावें. इ॒मं मा हिँ॑सीर्द्वि॒पादं॑ प॒शुँ स॑हस्रा॒क्षो मेधा॑य ची॒यमा॑नः । म॒युं प॒शुं मेध॑मग्ने जुषस्व॒ तेन॑ चिन्वा॒नस्त॒न्वो निषी॑द । म॒युं ते॒ शुगृ॑च्छतु॒ यं द्वि॒ष्मस्तं ते॒ शुगृ॑च्छतु ॥ ४७ ॥ अर्थ - हे अग्ने, हिरण्यशकलरूपी सहस्रनेत्राचा असा तूं यज्ञाकरितां चयनसंस्कारविशिष्ट होऊन या पुरुषरूपी पशूची हिंसा करूं नकोस. जर तुला भक्षणाची इच्छा असेल तर शुद्ध अशा किंपुरुष (अश्वमुखी गंधर्व) रूपी पशूचें भक्षण कर, त्या योगें तूं ज्वालारूपी शरीरांना पुष्ट करून या स्थानावर बैस. तुझा संताप अश्वमुख गंधर्वाकडे जावो व ज्याचा आम्ही द्वेष करतों त्याकडेही जावो. (म्हणजे तुझ्या संतापानें अश्वमुख किंनर व आमचा द्वेषी नष्ट होवो.) ॥४७॥ विनियोग - इ॒मं मा हिँ॑सी॒रेक॑शफं प॒शुं क॑निक्र॒दं वा॒जिनं॒ वाजि॑नेषु । गौ॒रमा॑र॒ण्यमनु॑ ते दिशामि॒ तेन॑ चिन्वा॒नस्त॒न्वो निषी॑द । गौ॒रं ते॒ शुगृ॑च्छतु॒ यं द्वि॒ष्मस्तं ते॒ शुगृ॑च्छतु ॥ ४८ ॥ अर्थ - हे अग्ने, या एक खुराच्या अश्वाची हिंसा करूं नकोस. तो अतिशय खिंकाळणारा व इतर वेगवान् घोडयांपेक्षां अधिक वेगवान् आहे. तुला मी रानांतील गौरवर्णाचा पशू देतों, त्यायोगें तूं ज्वालारूपी शरीरांना पुष्ट करून या स्थानावर बैस. तुझा संताप गौरमृगाकडे जावो व ज्याचा आम्हीं द्वेष करतों त्याकडेही जावो. (म्हणजे तुझ्या संतापानें गौरवर्णमृग व आमचा द्वेषी नष्ट होवो.) ॥४८॥ विनियोग - इ॒मँ सा॑ह॒स्रँ श॒तधा॑र॒मुत्सं॑ व्य॒च्यमा॑नँ सरि॒रस्य॒ मध्ये॑ । घृ॒तं दुहा॑ना॒मदि॑तिं॒ जना॒याग्ने॒ मा हिँ॑सीः पर॒मे व्यो॑मन् । ग॒व॒यमा॑र॒ण्यमनु॑ ते दिशामि॒ तेन॑ चिन्वा॒नस्त॒न्वो निषी॑द । ग॒व॒यं ते॒ शुगृ॑च्छतु॒ य द्वि॒ष्मस्तं ते॒ शुगृ॑च्छतु ॥ ४९ ॥ अर्थ - हे अग्ने, या उत्कृष्ट स्थानावर स्थित अशा गोरूपी पशूची तूं हिंसा करूं नकोस. तो गोरूपी पशु हजारों तर्हेनें उपकार करणारा, शेंकडों क्षीरधारांनीं युक्त व कूपाप्रमाणें पुष्कळ प्रवाहांनीं युक्त व या लोकांमध्यें लोकांची उपजीविका करून देणारा, सर्व लोकांकरितां दूध देणारा, अखंडित असा आहे. तुला मी रानांतील गवय नांवाचा पशू देतों, त्यायोगें तूं ज्वालारूपी शरीरांना पुष्ट करून या स्थानावर बैस. तुझा संताप त्या गवय पशूकडे आणि आम्ही ज्याचा द्वेष करतों त्याचेकडेही जावो. ॥४९॥ विनियोग - इ॒ममू॑र्णा॒युं वरु॑णस्य॒ नाभिं॒ त्वचं॑ पशू॒नां द्वि॒पदां॒ चतु॑ष्पदाम् । त्वष्टुः॑ प्र॒जानां॑ प्रथ॒मं ज॒नित्र॒मग्ने॒ मा हिँ॑सिः पर॒मे व्यो॑मन् । उष्ट्र॑मार॒ण्यमनु॑ ते दिशामि॒ तेन॑ चिन्वा॒नस्त॒न्वो निषी॑द । उष्ट्रं॑ ते॒ शुगृ॑च्छतु॒ यं द्वि॒ष्मस्तं ते॒ शुगृ॑च्छतु ॥ ५० ॥ अर्थ - हे अग्ने, या लोकांमध्यें स्थित अशा या बकरीची हिंसा करूं नकोस. ही बकरी कंबलाला साधनभूत, नाभीप्रमाणें वरुणाची रक्षणीय वस्तू व मनुष्यां-पश्वादिकांच्या शरीराचें रक्षण करणारी, व प्रजापतीच्या सृष्टींत पहिल्यानें उत्पन्न झालेली अशी आहे. मी तुला रानांत उत्पन्न होणारा उष्ट्र देतों त्यायोगें तूं ज्वालारूपी शरीरांना पुष्ट करून या स्थानावर बैस. तुझा संताप उष्ट्राकडे व आम्ही ज्याचा द्वेष करतों त्याचेकडे जावो. ॥५०॥ विनियोग - अ॒जो ह्य॒ग्नेरज॑निष्ट॒ शोका॒त्सोऽ अ॑पश्यज्जनि॒तार॒मग्रे॑ । तेन॑ दे॒वा दे॒वता॒मग्र॑मायँ॒स्तेन॒ रोह॑मय॒न्नुप॒ मेध्या॑सः । श॒र॒भमा॑र॒ण्यमनु॑ ते दिशामि॒ तेन॑ चिन्वा॒नस्त॒न्वो निषी॑द । श॒र॒भं ते॒ शुगृ॑च्छतु॒ य द्वि॒ष्मस्तं ते॒ शुगृ॑च्छतु ॥ ५१ ॥ अर्थ - तो अज प्रजापतीच्या संतापापासून उत्पन्न झाला व पहिल्यानें आपल्या उत्पन्न करणार्या प्रजापतीला अवलोकन केलें. अशा उत्तम अजाच्या सहाय्यानें देवांनीं पूर्वजन्मीं कर्म करून देवत्व मिळविलें. त्या अजाच्या सहाय्यानें हे यज्ञयोग्य यजमान स्वर्गास गमन करतात. मी तुला अरण्यांतला गेंडा देतों. त्यायोगें तूं ज्वालारूपी शरीरांना पुष्ट करून या स्थानावर बैस. तुझा संताप गेंडयाकडे व आम्ही ज्याचा द्वेष करतों त्याकडे जावो. ॥५१॥ विनियोग - 'त्वं यविष्ठ' या मंत्रानें चित्याग्नीचें उपस्थान करावें. त्वं य॑विष्ठ दा॒शुषो॒ नॄँः पा॑हि श्रृणु॒धी गिरः॑ । रक्षा॑ तो॒कमु॒त त्मना॑ ॥ ५२ ॥ अर्थ - हे तरुणतम अग्ने, आमच्या स्तुतिवाक्यांचें श्रवण कर व हविर्द्रव्यें देणार्या यजमानांचें रक्षण कर व तूं स्वतः यजमानापत्याचेंही रक्षण कर. ॥५२॥ विनियोग - 'अपां त्वेमन्' इत्यादि पांच मंत्रांनीं पांच अपस्यासंज्ञक इष्टकांचें स्थापन करावें. अ॒पां त्वेम॑न्त्सादयाम्य॒पां त्वोद्म॑न्त्सादयाम्य॒पां त्वा॒ भस्म॑न्त्सादयाम्य॒पां त्वा॒ ज्योति॑षि सादयाम्य॒पां त्वाऽय॑ने सादयाम्यर्ण॒वे त्वा॒ सद॑ने सादयामि समु॒द्रे त्वा॒ सद॑ने सादयामि सरि॒रे त्वा॒ सद॑ने सादयाम्य॒पां त्वा॒ क्षये॑ सादयाम्य॒पां त्वा॒ सधि॑षि सादयाम्य॒पां त्वा॒ सद॑ने सादयाम्य॒पां त्वा॑ स॒धस्थे॑ सादयाम्य॒पां त्वा॒ योनौ॑ सादयाम्य॒पां त्वा॒ पुरी॑षे सादयाम्य॒पां त्वा॒ पाथ॑सि सादयामि गाय॒त्रे॑ण त्वा॒ छन्द॑सा सादयामि॒ त्रैष्टु॑भेन त्वा॒ छन्द॑सा सादयामि॒ जाग॑तेन त्वा॒ छन्द॑सा सादया॒म्यानु॑ष्टुभेन त्वा॒ छन्द॑सा सादयामि॒ पाङ्क्ते॑न त्वा॒ छन्द॑सा सादयामि ॥ ५३ ॥ अर्थ - हे अपस्यासंज्ञक इष्टके, वायूमध्यें, औषधीमध्यें, भस्मांत, बिजेंत व भूमींत तसेंच प्राणरूपी, वाणीरूपी, चक्षुरूपी, श्रोत्ररूपी, द्युलोकरूपी, अन्तरिक्षरूपी जलांच्या स्थानांत आणि समुद्रांत, वाळूवर व अन्नांत तुझें स्थापन करतों. त्याचप्रमाणें गायत्र, त्रैष्टुभ, जागत, अनुष्टुभ, व पांक्त छन्दानें तुझें स्थापन करतों. ॥५३॥ विनियोग - 'अयं पुरः' इत्यादि दहा दहा मंत्रांनीं प्राणभृत्संज्ञक दहा इष्टकांचें स्थापन करावें. अ॒यं पु॒रो भुव॒स्तस्य॑ प्रा॒णो भौ॑वाय॒नो व॑स॒न्तः प्रा॑णाय॒नो गा॑य॒त्री वा॑स॒न्ती गा॑य॒त्रै गा॑य॒त्रं गा॑य॒त्रादु॑पाँ॒शुरु॑पाँ॒शोस्त्रि॒वृत् त्रि॒वृतो॑ रथन्त॒रं वसि॑ष्ठ॒ऽ ऋषिः॑ प्र॒जाप॑तिगृहीतया त्वया॑ प्रा॒णं गृ॑ह्णामि प्रा॒जाभ्यः॑ ॥ ५४ ॥ अर्थ - हे इष्टके, तूं पुरोभुव (पूर्वी स्थापन केला जाणारा) अग्नि आहेस. म्हणून त्या अग्निस्वरूपी तुझें मी स्थापन करतों. प्राण हा पुरोभुव अग्नीचें अपत्य आहे. वसंताचें अपत्य गायत्री छंद आहे. त्या गायत्रीपासून गायत्र साम उत्पन्न झालें. गायत्रसामापासून उपांशु ग्रह उत्पन्न झालें. उपांशु ग्रहांपासून त्रिवृत् स्तोम उत्पन्न झाला. त्रिवृत् स्तोमापासून रथंतर पृष्ठ निर्माण झालें व सर्वाधार व सर्वज्ञ जो प्राण या सर्वस्वरूपी इष्टकांचें मी स्थापन करतों. प्रजापतीनें निर्माण केलेल्या इष्टकांचें स्थापन करून मी सर्व प्रजेकरितां प्राणांचें ग्रहण करतों म्हणजे प्रजांच्या प्राणांच्या सिद्धीकरितां हे इष्टके, तुझें मी स्थापन करतों. ॥५४॥ विनियोग 'आयं दक्षिणा' वगैरे मंत्रांनीं दहा इष्टका स्थापन कराव्या. अ॒यं द॑क्षि॒णा वि॒श्वक॑र्मा॒ तस्य॒ मनो॑ वैश्वकर्म॒णं ग्री॒ष्मो मा॑न॒सस्त्रि॒ष्टुब्ग्रैष्मी॑ त्रि॒ष्टुभः॑ स्वा॒रँ स्वा॒रा॑दन्तर्या॒मो॒ऽन्तर्या॒मात्प॑ञ्चद॒शः प॑ञ्चद॒शाद् बृ॒हद् भ॒रद्वा॑ज॒ऽ ऋषिः॑ प्र॒जाप॑तिगृहीतया॒ त्वया॒ मनो॑ गृह्णामि प्र॒जाभ्यः॑ ॥ ५५ ॥ अर्थ - हा विश्वोत्पादक वायु आर्यावर्ताच्या दक्षिण दिशेकडे विशेषेंकरून वाहतो. त्याचें अपत्य मन हें आहे व मनाचें अपत्य ग्रीष्म ऋतु आहे. ग्रीष्मापासून त्रिष्टुप् छंद उत्पन्न झाला. त्रिष्टुपापासून स्वारसाम उत्पन्न झालें आणि स्वारसामापासून अंतर्याम ग्रह उत्पन्न झालें व अंतर्याम ग्रहांपासून पंचदश स्तोम व पंचदश स्तोमापासून बृहतृष्ठ निर्माण झालें. अन्नाचें धारण करणारा भरद्वाज ऋषि आहे. या सर्वस्वरूपी इष्टकांचें मी स्थापन करतों. प्रजापतीनें निर्माण केलेल्या इष्टकेचें स्थापन करून मी सर्व प्रजेकरितां मनाचें ग्रहण करतों म्हणजे प्रजांच्या मनाच्या सिद्धीकरितां हे इष्टके, तुझें मी स्थापन करतों. ॥५५॥ विनियोग - 'आयं पश्चात्' इत्यादि मंत्रांनीं दहा इष्टकांचें स्थापन करावें. अ॒यं प॒श्चाद्वि॒श्वव्य॑चा॒स्तस्य॒ चक्षु॑र्वैश्वव्यच॒सं व॒र्षाश्चा॑क्षु॒ष्यो जग॑ती वा॒र्षी जग॑त्या॒ऽ ऋक्स॑म॒मृक्स॑माच्छु॒कः शुक्रात्स॑प्तद॒शः स॑प्तद॒शाद्वै॑रू॒पं ज॒मद॑ग्नि॒र्ऋषिः॑ प्र॒जाप॑तिगृहीतया॒ त्वया॒ चक्षु॑र्गृह्णामि प्र॒जाभ्यः॑ ॥ ५६ ॥ अर्थ - पश्चिमेकडे जाणारा, सर्व विश्वाला प्रकाशित करणारा हा आदित्य आहे. त्यापासून नेत्र उत्पन्न झालें. व नेत्रापासून वर्षाऋतु उत्पन्न झाला. वर्षाऋतूपासून जगती छंद, जगतीछंदापासून ऋक्समसंज्ञ साम, त्यापासून शुक्र ग्रह, त्यापासून सप्तदश स्तोम, त्यापासून वैरूप पृष्ठ व जगाकडे पहात गमन करणारा जमदग्नि ऋषि या सर्वस्वरूपी इष्टकांचें मी स्थापन करतों. प्रजापतीनें निर्माण केलेल्या इष्टकेचें स्थापन करून मी सर्व प्रजेकरितां चक्षूंचें ग्रहण करतों म्हणजे प्रजांच्या चक्षूंचें सिद्धीकरितां हे इष्टके, मी तुझें स्थापन करतों. ॥५६॥ विनियोग - 'इदमुत्तरात्' इत्यादि दहा मंत्रांनीं इष्टकांचें स्थापन करावें. इदमु॑त्त॒रात् स्व॒स्तस्य॒ श्रोत्रँ॑ सौ॒वँ श॒रच्छ्रौ॒त्र्य॒नु॒ष्टुप् शा॑र॒द्य॒नु॒ष्टुभ॑ऽ ऐ॒डमै॒डान्म॒न्थी म॒न्थिन॑ऽ एकविँ॒शऽ ए॑कविँ॒शाद्वैरा॒जं वि॒श्वामि॑त्र॒ऽ ऋषिः॑ प्र॒जाप॑तिगृहीतया॒ त्वया॒ श्रोत्रं॑ गृह्णामि प्र॒जाभ्यः॑ ॥ ५७ ॥ अर्थ - सर्वांच्या उत्तरेकडे स्वर्ग लोक आहे. त्या स्वर्गाचें श्रोत्र हें अपत्य आहे. श्रोत्रेंद्रियापासून शरद्ऋतु उत्पन्न झाला. त्यापासून अनुष्टुप छंद, त्यापासून ऐडसाम, त्यापासून मंथीग्रह, त्यापासून एकविंश स्तोम व त्यापासून वैराजपृष्ठ उत्पन्न झालें. सर्व जगाचा मित्र जो ऋषि तद्रूपी श्रोत्रेंद्रिय झालें. या सर्वस्वरूपी इष्टकेचें मी स्थापन करतों. प्रजापतीनें निर्माण केलेल्या इष्टकेचें स्थापन करून मी सर्व प्रजेकरितां श्रोत्रेंद्रियांचें ग्रहण करतों. ॥५७॥ विनियोग - 'इयमुपरि' इत्यादि दहा मंत्रांनी दहा इष्टकांचें स्थापन करावें. आणि स्वयमातृण्णा इष्टकेवर 'इंद्रं' या मंत्रानें मृत्तिका घालावी. इ॒यमु॒परि॑ म॒तिस्तस्यै॒ वाङ्मा॒त्या हे॑म॒न्तो वा॒च्यः प॒ङ्क्तिर्है॑म॒न्ती प॒ङ्क्त्यै नि॒धन॑वन्नि॒धन॑वतऽ आग्रय॒णऽ आ॑ग्रय॒णात् त्रि॑णवत्रयस्त्रिँ॒शौ त्रि॑णवत्रयस्त्रिँ॒शाभ्याँ॑ शाक्वररैव॒ते वि॒श्वक॑र्म॒ऽ ऋषिः॑ प्र॒जाप॑तिगृहीतया॒ त्वया॒ वाचं॑ गृह्णामि प्र॒जाभ्यो॑ लो॒कं ताऽ इन्द्र॑म् ॥ ५८ ॥ अर्थ - वर असलेला चंद्र ही ज्ञापक अशी वाणीच आहे. म्हणजे वाणीच चंद्र होऊन ऊर्ध्वप्रदेशांत राहते. त्या चंद्रापासून ही वाणी उत्पन्न झाली. तिच्यापासून हेमंत ऋतु, त्यापासून पङ्क्तिछंद, त्यापासून निधनवत्साम, त्यापासून आग्रयण ग्रह, त्यापासून त्रिणव व त्रयस्रिंश असे दोन स्तोम, त्यापासून शाक्कर व रैवत अशीं दोन पृष्ठे व सर्व कर्म करणारा ऋषि या सर्वस्वरूपी इष्टकांचें मी स्थापन करतों. प्रजापतीनें निर्माण केलेल्या इष्टकेचें स्थापन करून मी सर्व प्रजेकरितां प्राणांचें ग्रहण करतों. (यापुढें तीन ऋचांचीं तीन प्रतीकें आहेत. 'लोकम्' १२-५४, 'ताः' १२-५५, 'इन्द्रम्' १२-५६) ॥५८॥ ॥ त्रयोदशोऽध्यायः ॥ |