![]() |
शुक्ल यजुर्वेद विनियोग - अकराव्या अध्यायांत उखाभरणाचे मंत्र गेले. बारावे अध्यायांत उखाधारणाचे मंत्र सांगतात. 'दृशानो रुक्मः' या मंत्रानें यजमानानें एक सोन्याचा अलंकार आपल्या गळ्यांत घालावा. दृ॒शा॒नो रुक्म उ॒र्व्या व्य॑द्यौद्दु॒र्मर्ष॒मायुः॑ श्रि॒ये रु॑चा॒नः । अग्निर॒मृतो॑ अभव॒द्वयो॑भि॒र्यदे॑नं॒ द्यौरज॑नयत्सु॒रेताः॑ ॥ १ ॥ अर्थ - यजमानाच्या गळ्यांत दिसणारा सोन्याचा दागिना लोकांना लक्ष्मी देण्याकरितां अखण्ड आयुष्याची इच्छा करणारा अतिशय कांतीनें प्रकाशतो. तो सुवर्णरूपी अग्नि पशुपुरोडाशादि अन्नांनीं अविनाशी झाला. कारण कीं त्या द्युलोकानें या अग्नीला उत्पन्न केलें, ज्या द्युलोकांत हा अग्नि गर्भरूपानें राहिला. ॥१॥ विनियोग - 'नक्तोषासा' या मंत्रभागानें उखेचें ग्रहण करावें. नंतर 'द्यावा' या मंत्रभागानें उखा आसंदीकडे न्यावी व 'देवाऽअग्निं' या मंत्रानें आसंदीवर तिचें स्थापन करावें. नक्तो॒षासा॒ सम॑नसा॒ विरू॑पे धा॒पये॑ते॒ शिशु॒मेकँ॑ समी॒ची । द्यावा॒क्षामा॑ रु॒क्मो अ॒न्तर्विभा॑ति दे॒वा अ॒ग्निं धा॑रयन्द्रविणो॒दाः ॥ २ ॥ अर्थ - आईबाप मुलाचें पोषण करतात त्याप्रमाणें रात्रि व दिवस या एका अग्नीचा सायंप्रातर्होमादिकांनीं संतोष करतात. त्या रात्रिदिवसांचें रूप विचित्र आहे तरी त्यांचें ऐक्यमत्य आहे. द्यावापृथिवींच्या मध्यभागीं अन्तरिक्षांत जो सुवर्णरूपी अग्नि प्रकाशतो त्याला मी नेतों. यागद्वारा धनरूप फल देणारे देव ज्या अग्नीला धारण करते झाले त्याला मी नेतों. ॥२॥ विनियोग - 'विश्वा रूपाणि' या मंत्रभागानें सहा दोर्यांचा फासा यजमानानें उखाग्नीचे कंठास बांधावा. विश्वा॑ रू॒पाणि॒ प्रति॑मुञ्चते क॒विः प्रासा॑वीद्भ॒द्रं॒ द्वि॒पदे॒ चतु॑ष्पदे । वि नाक॑मख्यत्सवि॒ता वरे॒ण्योऽनु॑ प्र॒याण॑मु॒षसो॒ वि रा॑जति ॥ ३ ॥ अर्थ - भूतवस्तु जाणणारा, सर्वप्रेरक, श्रेष्ठ सवितृदेव सर्व रूपांना द्रव्यामध्यें बांधतो म्हणजे तो सर्व द्रव्यांचीं रूपें प्रकाशित करतो. जो मनुष्य पशु वगैरेंना आपआपल्या कर्मांतील सामर्थ्य देतो, व जो स्वर्गाला प्रकाशित करतो; तसेंच जो उषःकाल संपल्यावर प्रातःकालीं विशेषेंकरून प्रकाशतो अशा सूर्यानें हा फासा बांधावा. ॥३॥ विनियोग - फासासहित उखेंतील अग्नि 'सुपर्णोऽसि' या मंत्रानें पूर्वेकडे वर धरावा. सु॒प॒र्णो॒ऽसि ग॒रुत्माँ॑स्त्रि॒वृत्ते॒ शिरो॑ गाय॒त्रं चक्षु॑र्बृहद्रथन्त॒रे प॒क्षौ । स्तोम॑ आ॒त्मा छन्दाँ॒स्यङ्गा॑नि॒ यजूँ॑षि॒ नाम॑ । साम॑ ते त॒नूर्वा॑मदे॒व्यं य॑ज्ञाय॒ज्ञियं॒ पुच्छं॒ धिष्ण्याः॑ श॒फाः । सु॒प॒र्णो॒ऽसि ग॒रुत्मा॒न्दिवं॑ गच्छ॒ स्वः॒ पत ॥ ४ ॥ अर्थ - हे अग्ने, तूं गरुडाप्रमाणें उत्तम पंखांचा आहेस. त्रिवृत् स्तोम तुझें मस्तक, गायत्रस्तोम तुझे चक्षु, बृहद्रथन्तरस्तोम तुझे पक्ष, पञ्चदशस्तोम तुझें अंतःकरण, गायत्र्यादि छन्द तुझे हृदयाद्यवयव, 'इषे त्वा' इत्यादि यजुर्मंत्र तुझीं नांवें, वामदेव्यसाम तुझें शरीर, यज्ञायज्ञिय साम तुझें पुच्छ व होत्रादि धिष्ण्यस्थ अग्नि तुझें खुर आहेत. असा तूं गरुडरूपी आहेस म्हणून हे अग्ने, तूं आकाशांत जा व तेथें स्वर्गलोकांप्रत प्राप्त हो. ॥४॥ विनियोग - 'विष्णोः क्रमोऽसि' इत्यादि मंत्रानें पादन्यास करावे म्हणजे चालावें. 'दिशोऽनुक्रमस्व' या मंत्रभागानें दिशांकडे पहावें. विष्णोः॒ क्रमो॑ऽसि सपत्न॒हा गा॑य॒त्रं छन्द॒ऽ आरो॑ह पृथि॒वीमनु॒ विक्र॑मस्व॒ विष्णोः॒ क्रमो॑ऽस्यभिमाति॒हा त्रै॑ष्टुभं॒ छन्द॒ऽ आ रो॑हा॒न्तरि॑क्ष॒मनु॒ विक्र॑मस्व॒ विष्णोः॒ क्रमो॑ऽस्यरातीय॒तो ह॒न्ता जाग॑तं॒ छन्द॒ऽ आरो॑ह॒ दिव॒मनु॒ विक्र॑मस्व॒ विष्णोः॒ क्रमो॑ऽसि शत्रूय॒तो ह॒न्ताऽऽनु॑ष्टुभं॒ छन्द॒ऽ आरो॑ह॒ दिशोऽनु॒ विक्र॑मस्व ॥ ५ ॥ अर्थ - हे प्रथम पावला, तूं अग्नीचा पादक्षेप असून शत्रुघातक आहेस, म्हणून गायत्री छन्दावर आरोहण कर व पृथिवीदेवतारूपी या प्रदेशाला विशेषेंकरून प्राप्त हो. हे द्वितीय पावला, तूं अग्नीचा पादक्षेप असून पापनाशक आहेस म्हणून त्रैष्टुभ छन्दावर आरोहण करून अन्तरिक्षदेवतारूपी या प्रदेशाला विशेषेंकरून प्राप्त हो. हे तृतीय पावला, तूं अग्नीचा पादन्यास आहेस व दान न देण्याची इच्छा करणार्याचा नाशक आहेस म्हणून जागतछन्दावर आरोहण करून द्युलोकदेवतारूपी या प्रदेशाला विशेषेंकरून प्राप्त हो. हे चतुर्थ पावला, तूं अग्नीचा पादक्षेप असून शत्रुत्वाची इच्छा करणार्याचा घातक आहेस म्हणून आनुष्टुभ छन्दावर आरोहण कर. हे अग्ने, तूं पूर्वादि दिशांना व्याप्त कर. ॥५॥ विनियोग - 'आक्रन्ददग्निः' या मंत्रानें ऊर्ध्वबाहु करून अग्नीचें ग्रहण करावें. अक्र॑न्दद॒ग्नि स्त॒नय॑न्निव॒ द्यौः क्षामा॒ रेरि॑हद्वी॒रुधः॑ सम॒ञ्जन् । स॒द्यो ज॑ज्ञा॒नो वि हीमि॒द्धो अख्य॒दा रोद॑सी भा॒नुना॑ भान्त्य॒न्तः ॥ ६ ॥ अर्थ - मेघाप्रमाणें शब्द करणारा, भूमीला व्याप्त करणारा व ज्वालांनीं औषधींना व्याप्त करणारा अग्नि वृद्धिंगत होतो. उत्पन्न झाल्याबरोबर प्रदीप्त होतो, म्हणून तो या सर्व विविध वस्तु प्रकाशित करतो. मेघ विद्युद्रूपानें द्यावापृथिवीमध्यें प्रकाशित होतो त्याप्रमाणें अग्नि रश्मींच्या योगानें द्यावापृथिवींच्या मध्यभागीं प्रकाशित होतो. ॥६॥ विनियोग - 'अग्नेऽभ्यावर्तिन्' इत्यादि चार ऋचांनीं उखास्थ अग्नीला आपल्याजवळ आणावें. अग्ने॑ऽभ्यावर्त्तिन्न॒भि मा॒ निव॑र्त॒स्वायु॑षा॒ वर्च॑सा प्र॒जया॒ धने॑न । स॒न्या मे॒धया॑ र॒य्या पोषे॑ण ॥ ७ ॥ अर्थ - ज्याचा स्वभाव आमच्याजवळ येण्याचा आहे अशा हे अग्ने, दीर्घजीवित, ब्रह्मवर्चस् तेज, पुत्रादिक प्रजा, धन, इष्टलाभ, धारणावती बुद्धि, सुवर्णालंकार व आयुष्यादिकांची वृद्धि यांसह आमच्याकडे ये. ॥७॥ विनियोग - अग्ने॑ अङ्गिरः श॒तं ते॑ सन्त्वा॒वृतः॑ स॒हस्रं॑ त उपा॒वृतः॑ । अधा पोष॑स्य॒ पोषे॑ण॒ पुन॑र्नो न॒ष्टमाकृ॑धि॒ पुन॑र्नो र॒यिमाकृ॑धि ॥ ८ ॥ अर्थ - सौंदर्यानें युक्त अवयवांच्या हे अग्ने, तूं आमच्यावर कृपा करून शंभर वेळां आमचेकडे ये व तुझे पुरुष अगर यज्ञिय वस्तु हजार वेळां आमचेकडे येवोत, व यापेक्षांहि जास्त वेळां म्हणजे दहाहजार अगर लक्ष वेळां तूं व तुझ्या पुरुषांनीं येऊन आमची वृद्धि करावी व त्यायोगें आमचें नष्टद्रव्य आम्हांला परत दे; व पूर्वी प्राप्त न झालेलें द्रव्य आम्हाला मिळवून दे. ॥८॥ विनियोग - पुन॑रू॒र्जा नि व॑र्त्तस्व॒ पुन॑रग्न इ॒षाऽऽयु॑षा । पुन॑र्नः पा॒ह्यँह॑सः ॥ ९ ॥ अर्थ - हे अग्ने, तूं क्षीरादिरस, अन्न व जीवन यांसह पुनः येथें ये व आम्हीं केलेल्या पापापासून आम्हाला दूर कर म्हणजे आमच्या पापाचा नाश कर. ॥९॥ विनियोग - स॒ह र॒य्या नि व॑र्त॒स्वाग्ने॒ पिन्व॑स्व॒ धार॑या । वि॒श्वप्स्न्या॑ वि॒श्वत॒स्परि॑ ॥ १० ॥ अर्थ - हे अग्ने, धनासह परत ये व वृष्टिरूपी जलधारेनें सर्व तृणादिकांना आर्द्र कर. ती जलधारा सर्वांनीं उपभोग्य अशी आहे. ॥१०॥ विनियोग - 'आ त्वाहार्षम्' या मंत्रानें अग्नीच्या नाभीच्या वरच्या जागीं अभिमंत्रण करावें. आ त्वा॑ऽहार्षम॒न्तर॑भूर्ध्रु॒वस्ति॒ष्ठावि॑चाचलिः । विश॑स्त्वा॒ सर्वा॑ वाञ्छन्तु॒ मा त्वद्रा॒ष्ट्रमधि॑भ्रशत् ॥ ११ ॥ अर्थ - हे अग्ने, मीं तुला आणलें. तूं उखेंत स्थित आहेस तेथें न ढळतां निश्चित रीतीनें स्थिर रहा. सर्व अन्नें तुजकडे येवोत. हें राष्ट्र तुझ्यापासून भ्रष्ट न होवो. ॥११॥ विनियोग - 'उदुत्तमं' या मंत्रानें गळ्यांतील सुवर्णाचा दोरा व उखेचा फासा वरच्या मार्गानें काढावा. उदु॑त्त॒मं व॑रुण॒ पाश॑म॒स्मदवा॑ध॒मं वि म॑ध्य॒मँ श्र॑थाय । अथा॑ व॒यमा॑दित्य व्र॒ते तवाना॑गसो॒ अदि॑तये स्याम ॥ १२ ॥ अर्थ - हे वरुणा, तुझ्या शिरांतील, मध्यभागांतील व अधःप्रदेशांतील (पायावरील) पाश (फासा) आमच्यापासून दूर करा व तोडा. नंतर हे अदितिपुत्रा वरुणा, निरपराधी असे आम्ही तुझें कर्म करीत असतां अखंडित होऊं. ॥१२॥ विनियोग - वर हात करून 'अग्ने बृहन्' या मंत्रानें अग्नीला वर धरावें. अग्रे॑ बृ॒हन्नु॒षसा॑मू॒र्ध्वो अ॑स्थान्निर्जग॒न्वान् तम॑सो॒ ज्योति॒षाऽऽगा॑त् । अ॒ग्निर्भा॒नुना॒ रुश॑ता॒ स्वङ्ग॒ आ जा॒तो विश्वा॒ सद्मा॑न्यप्राः ॥ १३ ॥ अर्थ - मोठा असा आदित्यात्मक अग्नि उषःकालांच्या अग्रभागीं म्हणजे प्रातःकालीं ऊर्ध्व स्थित झाला. जो रात्रीच्या अंधकारांतून निघून दिवसाच्या तेजानें युक्त झाला त्या अग्नीनें जन्मल्याबरोबरच आपल्या सर्व ग्रहांना पूर्ण केलें. तो तमोनाशक अशा किरणांनें युक्त व सुंदर शरीराचा आहे. ॥१३॥ विनियोग - 'हँसः' या मंत्रभागानें खालीं ठेवून 'बृहत्' या मंत्रभागानें त्यास आसंदीवर ठेवावें. हँ॒सः शु॑चि॒षद्वसु॑रन्तरिक्ष॒सद्धोता वेदि॒षदति॑थिर्दुरोण॒सत् । नृ॒षद्व॑र॒सदृ॑त॒सद् व्यो॑म॒सद॒ब्जा गो॒जा ऋ॑त॒जा अ॑द्रि॒जा ऋ॒तं बृ॒हत् ॥ १४ ॥ अर्थ - हे अग्ने, तूं पुढील विशेषणांनीं युक्त आहेस. तुला मी खाली ठेवतों. तो सूर्य अंधकाराचा नाशक, प्रकाशमान, सत्कर्मांत मनुष्यांची प्रेरणा करणारा, वायुरूपानें अन्तरिक्षांत राहणारा, देवांना बोलावणारा, अग्निरूपानें वेदीवर राहणारा, अतिथीप्रमाणें सर्वपूज्य, यज्ञगृहांत राहणारा, मनुष्यांत, उत्कृष्ट स्थानांत व यज्ञांत राहणारा आणि मण्डलरूपानें आकाशांत राहणारा आहेस. तसेंच तूं जलांत मत्स्यरूपानें, पृथ्वीवर जारज, अण्डज, स्वेदज व उद्भिज्जरूपानें, सत्यांत, मेघांत जलरूपानें, अगर पाषाणांत अग्निरूपानें राहणारा असून सर्वव्यापी व महत् अशा परब्रह्मरूपी आहेस. ॥१४॥ विनियोग - 'सीदत्वं' या मंत्रानें अग्नीचें उपस्थान करावें. सीद॒ त्वं मा॒तुर॒स्या उ॒पस्थे॒ विश्वा॑न्यग्ने व॒युना॑नि वि॒द्वान् । मैनां॒ तप॑सा॒ माऽर्चिषा॒ऽभि शो॑चीर॒न्तर॑स्याँ शु॒क्रज्योति॒॑र्विभा॑हि ॥ १५ ॥ अर्थ - हे अग्ने, सर्व पदार्थांचें ज्ञान असलेला असा तूं मातृसदृश अशा या उखेच्या उत्संगावर बैस व या उखेला उष्णतेनें व ज्वालेनें पीडा देऊं नकोस. आणि या उखेंत निर्मल प्रकाशानें प्रकाशित हो. ॥१५॥ विनियोग - अ॒न्तर॑ग्ने रु॒चा त्वमु॒खायाः॒ सद॑ने॒ स्वे । तस्या॒स्त्वँ हर॑सा॒ तप॒ञ्जात॑वेदः शि॒वो भ॑व ॥ १६ ॥ अर्थ - हे अग्ने, तूं उखेच्या आंत आपल्या स्थानावर प्रदीप्त होऊन रहा. हे सर्वज्ञ अग्ने, प्रकाशानें तप्त होणारा असा तूं उखेचें कल्याण कर व शांत हो. ॥१६॥ विनियोग - शि॒वो भू॒त्वा मह्य॑मग्ने॒ अथो॑ सीद शि॒वस्त्वम् । शि॒वाः कृ॒त्वा दिशः॒ सर्वाः॒ स्वं योनि॑मि॒हास॑दः ॥ १७ ॥ अर्थ - हे अग्ने, मजविषयीं शांति ठेव व सर्व तर्हेनें शांत होऊन या स्थानावर बैस. सर्व दिशांना शांत करून या उखेंतील आपल्या स्थानावर बैस. ॥१७॥ विनियोग - 'दिवस्परि' इत्यादि अकरा ऋचांच्या वात्सप्र अनुवाकानें अग्नीचें उपस्थान करावें. दि॒वस्परि॑ प्रथ॒मं ज॑ज्ञे अ॒ग्निर॒स्मद् द्वि॒तीयं॒ परि॑ जा॒तवे॑दाः । तृ॒तीय॑म॒प्सु नृ॒मणा॒ अज॑स्र॒मिन्धा॑न एनं जरते स्वा॒धीः ॥ १८ ॥ अर्थ - अग्नि प्रथम द्युलोकापासून सूर्यरूपानें उत्पन्न झाला व दुसर्या वेळीं ब्रह्म्यापासून अग्निरूपानें उत्पन्न झाला. नंतर मनुष्यांत ज्याचें लक्ष आहे अशा प्रजापतीनें त्याला तिसर्या वेळीं जलांत समुद्रांतील वडवानलस्वरूपानें उत्पन्न केलें. अशा या अग्नीला पुरोडाशानें प्रदीप्त करणारा, स्वाधीन चित्ताचा यजमान म्हातारपणापर्यंत निरंतर त्याची सेवा करतो. ॥१८॥ विनियोग - वि॒द्मा ते॑ऽ अग्ने त्रे॒धा त्र॒याणि॑ वि॒द्मा ते॒ धाम॒ विभृ॑ता पुरु॒त्रा । वि॒द्मा ते॒ नाम॑ पर॒मं गुहा॒ यद्वि॒द्मा तमुत्सं॒ यत॑ऽ आज॒गन्थ॑ ॥ १९ ॥ अर्थ - हे अग्ने, तीन लोकांतील तुझीं पूर्वोक्त तीन रूपें आम्हांस ठाऊक आहेत. तसेंच तुझीं निरनिराळ्या प्रदेशांत असलेलीं गार्हपत्यावहयीनादि स्थानेंही आम्हांला माहीत आहेत व तुझें गुह्य असें जें नांव तेंही आम्ही जाणतो. आणखी ज्या जलरूपी स्थानापासून तूं आलास तेंही आम्ही जाणतो. ॥१९॥ विनियोग - स॒मुद्रे त्वा॑ नृ॒मणा॑ऽ अ॒प्स्वन्तर्नृ॒चक्षा॑ऽ ईधे दि॒वो अ॑ग्न॒ऽ ऊध॑न् । तृ॒तीये॑ त्वा॒ रज॑सि तस्थि॒वाँस॑म॒पामु॒पस्थे॑ महि॒षा अ॑वर्धन् ॥ २० ॥ अर्थ - हे अग्ने, लोकांकडे लक्ष देऊन प्रजापतीनें समुद्रांत वडवानलरूपानें असलेल्या तुला प्रदीप्त केलें. मनुष्यें पठण करीत असतां स्पष्ट मंत्र म्हणणारा प्रजापति वृष्टिजलांत विद्युद्रूपानें राहणार्या तुला प्रदीप्त करता झाला. तसेंच द्युलोकाचें दुग्धस्थान (कांस) अशा लाल तेजोमण्डलांत आदित्यरूपानें राहणार्या तुला प्रजापतीनें प्रदीप्त केलें आणि मोठे प्राणनौकेंतील जलांत राहणार्या तुला वाढविते झाले. ॥२०॥ विनियोग - अक्र॑न्दद॒ग्नि स्त॒नय॑न्निव॒ द्यौः क्षामा॒ रेरि॑हद्वी॒रुधः॑ सम॒ञ्जन् । स॒द्यो ज॑ज्ञा॒नो वि हीमि॒द्धोऽ अख्य॒दा रोद॑सी भा॒नुना॑ भात्य॒न्तः ॥ २१ ॥ अर्थ - मेघांप्रमाणें गर्जना करणारा अग्नि वृद्धि पावतो. तसेंच तो मेघाप्रमाणें पृथ्वीला व्याप्त करून तिला चाटतो व स्वतः ज्वालांनीं वृक्षांनाही व्याप्त करतो. कारण कीं, उत्पन्न होतांच तो प्रदीप्त होऊन सर्व वस्तूंना प्रकाशित करतो व पर्जन्याप्रमाणें द्यावापृथिवीच्या मध्यभागीं स्वतः सर्व बाजूंनीं प्रकाशित होतो. ॥२१॥ विनियोग - श्री॒णामु॑दा॒रो ध॒रुणो॑ रयी॒णां म॑नी॒षाणां॒ प्रार्प॑णः॒ सोम॑गोपाः । वसुः॑ सू॒नुः सह॑सो अ॒प्सु राजा॒ विभा॒त्यग्र॑ऽ उ॒षसा॑मिधा॒नः ॥ २२ ॥ अर्थ - उत्कृष्ट गवाश्वादि संपत्ति देणारा, नानाविध द्रव्यें धारण करणारा, ईप्सित पदार्थ प्राप्त करून देणारा, सोमयज्ञाचें रक्षण करणारा, सर्व निवासस्थान, बलपूर्वक मंथन केलें असतां उत्पन्न होणारा, जलांत वरुणरूपानें असलेला व प्रातःकालीं आदित्यस्वरूपानें असणारा, प्रकाशणारा अग्नि विशेषेंकरून प्रकाश पावतो. ॥२२॥ विनियोग - विश्व॑स्य के॒तुर्भुव॑नस्य॒ गर्भ॒ऽ आ रोद॑सी अपृणा॒ज्जाय॑मानः । वी॒डुं चि॒दद्रि॑मभिनत् परा॒यञ्जना॒ यद॒ग्निमय॑जन्त॒ पञ्च॑ ॥ २३ ॥ अर्थ - तो सूर्यरूपानें प्रकट होणारा अग्नि सर्वत्र तेजानें द्युलोक व पृथिवीलोकाला भरून काढतो. तो सर्व प्राण्यांचें अग्निरूपी ज्ञानसाधन, सर्व प्राणिसमुदायांचा वायुरूपी गर्भ आहे. तो चंद्ररूपानें पश्चिमेकडे जात असतां सुदृढ अशा मेघमण्डलाचाही भेद करतो व ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र व निषाद असे पांचही वर्ण त्याची पूजा करतात. ॥२३॥ विनियोग - उ॒शिक्पा॑व॒को अ॑र॒तिः सु॑मे॒धा मर्त्ये॑ष्व॒ग्निर॒मृतो॒ नि धा॑यि । इय॑र्त्ति धू॒मम॑रु॒षं भरि॑भ्र॒दुच्छु॒क्रेण॑ शो॒चिषा॒ द्यामिन॑क्षन् ॥ २४ ॥ अर्थ - देवांनीं जो अग्नि मनुष्यांमध्यें स्थापन केला आहे तो अग्नि सुंदर, पवित्र करणारा, सर्व पदार्थ पुरे असें ज्याचे बुद्धीस वाटतें, महाबुद्धिमान्, अमरणधर्मा, जगाचा पोषक असून डोळ्यांना वगैरे पीडा न करणारा असा धूर वर सोडतो व निर्मल तेजानें आकाशाला व्याप्त करणारा आहे. ॥२४॥ विनियोग - दृ॒शा॒नो रु॒क्म उ॒र्व्या व्य॑द्यौद्दु॒र्मर्ष॒मायुः॑ श्रि॒ये रु॑चा॒नः । अ॒ग्निर॒मृतो॑ अभव॒द्वयो॑भि॒र्यदे॑नं॒ द्यौरज॑नयत्सु॒रेताः॑ ॥ २५ ॥ अर्थ - हा समोर दिसणारा सोन्याचा दागिना अधिक तेजानें प्रकाश पावतो. अग्निरूपी तो लोकांना संपत्ति देण्याकरितां त्यांना अतिरस्कार्य असें आयुष्य देण्याच्या इच्छेनें पशुपुरोडाशरूपी अन्नांनीं अमृतस्वरूपी झाला. कारण शोभन, वीर्यवान् द्युलोकवासी देवगण या अग्नीला उत्पन्न करता झाला. ॥२५॥ विनियोग - यस्ते॑ अ॒द्य कृ॒णव॑द्भद्रशोचेऽपू॒पं दे॑व घृ॒तव॑न्तमग्ने । प्र तं न॑य प्रत॒रं वस्यो॒ऽ अच्छा॒भि सु॒म्नं दे॒वभ॑क्तं यविष्ठः ॥ २६ ॥ अर्थ - हे शोभनदीप्ते अग्निदेवा, आज प्रतिपदेला जो पुरुष तुला व्रतमिश्रित पुरोडाश समर्पण करतो त्या यजमानाला हे तरुण अग्ने, तूं उत्तम लोकाला ने व सर्व तर्हेचें देवसेव्य सुख दे. ॥२६॥ विनियोग - आ तं भ॑ज सौश्रव॒सेष्व॑ग्न उ॒क्थ उ॑क्थ॒ आ भ॑ज श॒स्यमा॑ने । प्रि॒यः सूर्ये॑ प्रि॒यो अ॒ग्ना भ॑वा॒त्युज्जा॒तेन॑ भि॒नद॒दुज्जनि॑त्वैः ॥ २७ ॥ अर्थ - हे अग्ने, ज्यांत उत्तम यशस्कर कर्मे आहेत अशा यज्ञांत व प्रत्येक शस्याचे (स्तुतीचे) वेळीं या यजमानाला तूं प्रेरणा कर. अशा रीतीनें तूं प्रेरित केलेला तो यजमान सूर्याचा व अग्नीचा आवडता होवो व असलेल्या पुत्रानें त्याची वृद्धि होवो. तसेंच आणखी त्याला पुत्रपौत्र होऊन त्याची वृद्धि होवो. ॥२७॥ विनियोग - त्वाम॑ग्ने॒ यज॑माना॒ऽ अनु॒ द्यून् विश्वा॒ वसु॑ दधिरे॒ वार्या॑णि । त्वया॑ स॒ह द्रवि॑णमि॒च्छमा॑ना व्र॒जं गोम॑न्तमु॒शिजो॒ विव॑व्रुः ॥ २८ ॥ अर्थ - हे अग्ने, तुझी सेवा करणारे यजमान अपेक्षित सर्व गाई वगैरे द्रव्यें प्राप्त करतात. तसेंच यज्ञफलाच्या इच्छेनें तुझी सेवा करून राहणारे ते यजमान ज्ञानी होऊन सूर्यमंडल भेदून देवमार्गानें गमन करते झाले. ॥२८॥ विनियोग - अस्ता॑व्य॒ग्निर्न॒राँ सु॒शेवो॑ वैश्वान॒र ऋषि॑भिः॒ सोम॑गोपाः । अ॒द्वे॒षे द्यावा॑पृथि॒वी हु॑वेम॒ देवा॑ ध॒त्त र॒यिम॒स्मे सु॒वीर॑म् ॥ २९ ॥ अर्थ - यजमान व ऋत्विज यांनीं अग्नीची स्तुति केली - तो अग्नि मनुष्यांना सुख देणारा, सर्व मनुष्यांना हितकर, सोमाचें रक्षण करणारा असा आहे. अग्नीची स्तुति केली म्हणून आम्ही द्वेषरहित अशा द्यावापृथिवींना बोलावितो. हे अग्न्यादि देवतांनो, तुम्ही आम्हांला उत्तम पुत्रानें विशिष्ट असें द्रव्य द्या. ॥२९॥ विनियोग - यजमानानें 'समिधाग्निं' या मंत्रानें 'उख्य' (उखेंतील) अग्नीमध्यें समिधेचा होम करावा. स॒मिधा॒ऽग्निं दु॑वस्यत घृ॒तैर्बो॑धय॒ताति॑थिम् । आऽस्मि॑न् ह॒व्या जु॑होतन ॥ ३० ॥ अर्थ - हे ऋत्विग्ययजमानांनो, समिधेनें तुम्ही अग्नीची परिचर्या करा व या अतिथि अग्नीला घृतांनीं जागृत करा आणि या अग्नीमध्यें संपूर्णपणें हविर्द्रव्याचा होम करा. ॥३०॥ विनियोग - यजमानानें दक्षिणेस उभे राहून 'उदुत्वा' या मंत्रानें शकटावर 'उख्य' अग्नीचें स्थापन करावें. उदु॑ त्वा॒ विश्वे॑ दे॒वा अग्ने॒ भर॑न्तु॒ चित्ति॑भिः । स नो॑ भव शि॒वस्त्वँ सु॒प्रती॑को वि॒भाव॑सुः ॥ ३१ ॥ अर्थ - हे अग्ने, सर्व प्राणरूपी देव उद्योगप्रवीण अशा वृत्तींनीं तुला वर उचलून धरोत. चांगल्या मुखाचा व प्रकाश हेंच आहे द्रव्य ज्याचें अशा हे अग्ने, अन्न धारण केल्यावर आमचें कल्याण करणारा हो. ॥३१॥ विनियोग - 'प्रेदग्ने' या मंत्रानें पूर्व दिशेकडे जाऊन कार्य असलेल्या जागीं जावे. प्रेद॑ग्ने॒ ज्योति॑ष्मान् याहि शि॒वेभि॑र॒र्चिभि॒ष्ट्वम् । बृ॒हद्भि॑र्भा॒नुभि॒र्भास॒न्मा हिँ॑सीस्त॒न्वा॒ प्र॒जाः ॥ ३२ ॥ अर्थ - हे अग्ने, शांत ज्वालांनीं प्रकाशयुक्त असा तूं गमन कर आणि प्रौढ किरणांनीं जगाला प्रकाशित करणारा तूं आपल्या दाहक शरीराच्या योगानें माझ्या पुत्रादि प्रजांचा नाश करूं नकोस. ॥३२॥ विनियोग - आंखाचा (कण्याचा) शब्द होत असतां यजमानानें 'आक्रंददग्निः' हा मंत्र म्हणावा. अक्र॑न्दद॒ग्नि स्त॒नय॑ग्निव॒ द्यौः क्षामा॒ रेरि॑हद्वी॒रुधः॑ सम॒ञ्जन् । स॒द्यो ज॑ज्ञा॒नो वि हीमि॒द्धो अख्य॒दा रोद॑सी भा॒नुना॑ भात्य॒न्तः ॥ ३३ ॥ अर्थ - मेघांप्रमाणें शब्द करणारा, भूमीला व्याप्त करणारा व ज्वालांनीं औषधींना व्याप्त करणारा अग्नि वृद्धिंगत होतो. उत्पन्न झाल्याबरोबर प्रदीप्त होतो म्हणून तो या सर्व विविध वस्तू प्रकाशित करतो. मेघ विद्युद्रूपानें द्यावापृथिवीमध्यें प्रकाशित होतो त्याप्रमाणें अग्नि रश्मींच्या योगानें द्यावापृथिवींच्या मध्यभागीं प्रकाशित होतो. ॥३३॥ विनियोग - उत्तरदिशेकडे शकटावरून अग्नीला खालीं उतरावें आणि नंतर 'प्रप्रायं' या मंत्रानें अग्नींत समिधेचा होम करावा. प्र-प्रा॒यम॒ग्निर्भ॑र॒तस्य॑ श्रृण्वे॒ वि यत्सूर्यो॒ न रोच॑ते बृ॒हद्भाः । अ॒भि यः पू॒रं पृत॑नासु त॒स्थौ दी॒दाय॒ दैव्यो॒ऽ अति॑थि शि॒वो नः॑ ॥ ३४ ॥ अर्थ - हा अग्नि हविर्धारण करणार्या यजमानाचें आव्हान ऐको. जो अग्नि सूर्याप्रमाणें प्रकाशित होऊन अत्यंत प्रदीप्त होतो व जो संग्रामामध्यें पुरू नांवाच्या राक्षसाच्या सन्मुख उभा राहतो तो देवसंबंधीं अतिथि अग्नि आम्हांला मंगलप्रद असा प्रकाश पावतो. ॥३४॥ विनियोग - 'आपोदेवी' या मंत्रानें उखेंतील भस्म पाण्यांत टाकावें. आपो॑ देवीः॒ प्रति॑गृभ्णीत॒ भस्मै॒तत्स्यो॒ने कृ॑णुध्वँ सुर॒भा उ॑ लो॒के । तस्मै॑ नमतां॒ जन॑यः सु॒पत्नी॑र्मा॒तेव॑ पु॒त्रं बि॑भृता॒प्स्वे॒नत् ॥ ३५ ॥ अर्थ - हे प्रकाशमान जलांनो, तुम्ही या भस्माचें ग्रहण करा व सुखावह सुगंधी अशा स्थानांमध्यें हें भस्म ठेवा. वैरुणरूपी उत्तम पति ज्यांना आहे अशा अग्न्युत्पादक तुम्ही या भस्मरूपी अग्नीला नमस्कार करा. हे जलांनो, आई मुलाचें रक्षण करते त्याप्रमाणें तुम्हीं या जलाचें आपल्या शरीरांत रक्षण करा. ॥३५॥ विनियोग - नंतर 'अप्स्वग्नें व गर्भो असि' या दोन मंत्रांनीं दुसर्यांदा भस्म जलामध्यें टाकावें. अ॒प्स्व॒ग्ने॒ सधि॒ष्टव॒ सौष॑धी॒रनु॑ रुध्यसे । गर्भे॒ सञ्जा॑यसे॒ पुनः॑ ॥ ३६ ॥ अर्थ - हे अग्ने, जलांत तुझें स्थान आहे. तूं यवादि औषधींचा जठराग्निरूपानें स्वीकार करतोस व तूं अरणीमध्यें पुनः पुनः जन्माला येतोस. ॥३६॥ विनियोग - गर्भो॑ अ॒स्योष॑धीनां॒ गर्भो॒ वन॒स्पती॑नाम् । गर्भो॒ विश्व॑स्य भू॒तस्याग्ने॒ गर्भो॑ अ॒पाम॑सि ॥ ३७ ॥ अर्थ - हे अग्ने, तूं औषधींचा, वृक्षांचा, सर्व प्राणिसमुदायाचा व जलांचा गर्भ आहेस. ॥३७॥ विनियोग - 'प्रसह्य' इत्यादि चार ऋचांनीं जलांत टाकलेलें कांहीं भस्म अनामिकेनें ग्रहण करावें. प्र॒सह्य॒ भस्म॑ना॒ योनि॑म॒पश्च॑ पृथि॒वीम॑ग्ने । सँ॒सृज्य॑ मा॒तृभि॒ष्ट्वं ज्योति॑ष्मा॒न् पुन॒रा ऽस॑दः ॥ ३८ ॥ अर्थ - हे अग्ने, तूं भस्माच्या योगानें तुझें उत्पत्तिस्थान असलेलें जें पृथ्वी आणि जल यांस प्राप्त होऊन व जलांत पूर्ण मिसळून तेजस्वी होत्साता पुनः आपल्या स्थानावर बैस. ॥३८॥ विनियोग - पुन॑रा॒सद्य॒ सद॑नम॒पश्च॑ पृथि॒वीम॑ग्ने । शेषे॑ मा॒तुर्यथो॒पस्थे॒ऽन्तर॑स्याँ शि॒वत॑मः ॥ ३९ ॥ अर्थ - हे अग्ने, जलभूमीरूपी आपल्या स्थानाला प्राप्त होऊन पुनः आईच्या मांडीवर शिशु बसतो त्याप्रमाणें या उखेच्या मध्यभागीं कल्याणकारक असा तूं बसतोस. ॥३९॥ विनियोग - पुन॑रू॒र्जा नि व॑र्तस्व॒ पुन॑रग्न इ॒षाऽऽयु॑षा । पुन॑र्नः पा॒ह्यँह॑सः ॥ ४० ॥ अर्थ - हे अग्ने, तूं क्षीरादि रस, अन्न व जीवन यांसह पुनः येथें ये व आम्हीं केलेल्या पापांपासून आम्हांला दूर कर म्हणजे आमच्या पापांचा नाश कर. ॥४०॥ विनियोग - स॒ह र॒य्या नि व॑र्त्त॒स्वाग्ने॒ पिन्व॑स्व॒ धार॑या । वि॒श्वप्स्न्या॑ वि॒श्वत॒स्परि॑ ॥ ४१ ॥ अर्थ - हे अग्ने, धनासह निवृत्त हो व वृष्टिरूपी जलधारेनें सर्व तृणादिकांना आर्द्र कर. ती जलधारा सर्वांनीं उपभोग्य अशी आहे. ॥४१॥ विनियोग - 'बोधामे' इत्यादि दोन मंत्रांनीं उख्य अग्नीचें उपस्थान करावें. बोधा॑ मे अ॒स्य वच॑सो यविष्ठ॒ मँहि॑ष्ठस्य॒ प्रभृ॑तस्य स्वधावः । पीय॑ति त्वो॒ अनु॑ त्वो गृणाति व॒न्दारु॑ष्टे त॒न्वं॒ वन्देऽ अग्ने ॥ ४२ ॥ अर्थ - हे अन्नयुक्त व तरुणतम अशा अग्ने, माझ्या वाक्याच्या अभिप्रायाकडे लक्ष दे. तें वाक्य फार मोठें व तुला ऐकूं जाईल असें आदरानें उच्चारलेलें आहे. हे अग्ने, कोणी पुरुष तुझी निंदा करतो तर कोणी तुझी स्तुति करतो. (निंदा स्तुति करणें हा लोकांचा स्वभाव आहे) हे अग्ने, मी तर तुझ्या शरीरास वंदन करतों व नमस्कार करतों कारण माझा स्वभाव वंदन करणें हा आहे. ॥४२॥ विनियोग - 'विश्वकर्मणे' या मंत्रानें उख्य अग्नीमध्यें समिधेनें घेतलेल्या घृताचा होम करावा. स बो॑धि सू॒रिर्म॒घवा॒ वसु॑पते॒ वसु॑दावन् । यु॒यो॒ध्यस्मद् द्वेषाँ॑सि वि॒श्वक॑र्मणे॒ स्वाहा३ ॥ ४३ ॥ अर्थ - हे धनपते, द्रव्य देणार्या अग्ने, तूं आमचें तात्पर्य समज. तूं विद्वान् आणि धनवान आहेस. संतुष्ट होऊन आमचीं दौर्भाग्यें दूर कर. जगाची उत्पत्ति स्थिति वगैरे कर्मे करणार्या तुला हें हवि सुहुत असो. ॥४३॥ विनियोग - नंतर यजमानानें उभे राहून उख्य अग्नीमध्यें त्याच समिधेचा 'पुनस्त्वा' या मंत्रानें होम करावा. पुन॑स्त्वाऽऽदि॒त्या रु॒द्रा वस॑वः॒ समिन्ध॒तां पुन॑र्ब्र॒ह्माणो॑ वसुनीथ य॒ज्ञैः । घृतेन॒ त्वं त॒न्वं॒ वर्धयस्व स॒त्याः स॑न्तु॒ यज॑मानस्य॒ कामाः॑ ॥ ४४ ॥ अर्थ - हे अग्ने, आदित्य, रुद्र व वसु तुला शांत रीतीनें प्रकाशित करोत. द्रव्यनिमित्त ज्याची स्तुति होते अशा हे अग्ने, ऋत्विग्यजमान यज्ञांनीं तुला प्रकाशित करो व तूं आपले शरीर घृतानें वाढव व तुझे शरीराची वृद्धि झाल्यावर यजमानाच्या इच्छा पूर्ण होवोत. ॥४४॥ विनियोग - 'अपेतवीत' या मंत्रांतील प्रत्येक पादानें प्रत्येक दिशेकडील भूमीवर पडलेलें तृणादिक पलाशशाखेनें दूर करावें. अपे॑त॒ वी॒त॒ वि च॑ सर्प॒तातो॒ येऽत्र॒ स्थ पु॑रा॒णा ये च॒ नूत॑नाः । अदा॑द्य॒मो॒ऽव॒सानं॑ पृथि॒व्या अक्र॑न्नि॒मं पि॒तरो॑ लो॒कम॑स्मै ॥ ४५ ॥ अर्थ - हे यमभृत्यांनों, पूर्वी असलेले व आतांचे तुम्ही या स्थानावरून निघून जा व अतिशय दूर गमन करा, व वेगळे वेगळे व्हा. संघ करून राहूं नका. कारण कीं, पृथिवीचें हें स्थान यमदेवानें या यजमानाला दिलें आहे. तसेंच पितरांनींही हें स्थान यजमानाला दिलें आहे. ॥४५॥ विनियोग - 'संज्ञानं' या मंत्रानें उखा गार्हपत्य चितीचे जागीं स्थापन करावी. 'अग्नेर्भस्म' या मंत्रानें त्या ठिकाणीं बारीक रेती पसरावी. नंतर 'चितःस्थ' या मंत्रानें एकवीस परिश्रितांनीं गार्हपत्याच्या स्थानाचें वेष्टण करावें. सं॒ज्ञान॑मसि काम॒धर॑णं॒ मयि॑ ते काम॒धर॑णं भूयात् । अ॒ग्नेर्भस्मा॑स्य॒ग्नेः पुरी॑षमसि॒ चित॑ स्थ परि॒चित॑ ऊर्ध्व॒चितः॑ श्रयध्वम् ॥ ४६ ॥ अर्थ - हे ऊषस्वरूपा, तूं पशूंना उत्तम तर्हेनें ज्ञान करून देणारे व इच्छा पूर्ण करणारें आहेस म्हणून तुझें इच्छा पूर्ण करण्याचें सामर्थ्य माझे ठिकाणी असो. हे सिकतास्वरूपा, तूं अग्नीचें प्रकाशक व पूरक आहेस. हे शर्करांनो, मी तुम्हांला जमिनींवर टाकतों व तुम्ही सर्वत्र स्थापित व्हा व उंच तर्हेनें स्थापन केल्या गेलेल्या तुम्ही या गार्हपत्य स्थानाचें सेवन करा. ॥४६॥ विनियोग - अध्वर्यूनें मण्डलाच्या दक्षिणेकडे उत्तराभिमुख बसून मध्यभागीं चार इष्टका 'अयं सो' या चार ऋचांनीं स्थापन कराव्या. अ॒यँ सो अ॒ग्निर्यस्मि॒न्त्सोम॒मिन्द्रः॑ सु॒तं द॒धे ज॒ठरे॑ वावशा॒नः । स॒ह॒स्रियं॒ वाज॒मत्यं॒ न सप्तिँ॑ सस॒वान्त्सन्त्स्तू॑यसे जातवेदः ॥ ४७ ॥ अर्थ - हा गार्हपत्य अग्नि इष्टकांनीं चित केला जातो. या अग्नीचें चयन झाल्यावर इंद्र कांडलेल्या सोमरसाला उदरांत धारण करतो. तो इंद्र इच्छा करणारा आहे व सोमरस पुष्कळांची तृप्ति करणारा, खाल्ल्याबरोबर मद उत्पन्न करणारा, व तृप्ति करणारा असा अन्नस्वरूपी आहे. हे अग्ने, द्रव्योत्पादक असा तूं हविर्द्रव्याचा विभाग करणारा ऐसा होत्साता स्तुति केला जातोस. ॥४७॥ विनियोग - अग्ने॒ यत्ते॑ दि॒वि वर्चः॑ पृथि॒व्यां यदोष॑धीष्व॒प्स्वा य॑जत्र । येना॒न्तरि॑क्षमु॒र्वा॒त॒तन्थ॑ त्वे॒षः स भा॒नुर॑र्ण॒वो नृ॒चक्षाः॑ ॥ ४८ ॥ अर्थ - मर्यादेनें याग करण्यास योग्य अशा हे अग्ने, तुझें द्युलोकांत सूर्यरूपी व पृथ्वीवर अग्निरूपी जें तेज आहे व जें औषधींत आणि जलांत स्थित आहे व ज्या तेजानें तूं विस्तीर्ण अंतरिक्षाला व्याप्त करतोस तें प्रदीप्त तेज सर्व विश्वाला प्रकाशित करतें. प्रसरणशील व शुभाशुभकर्मदर्शी अशा तुझ्या त्या दीप्तीचें मी इष्टका स्वरूपानें स्थापन करतों. ॥४८॥ विनियोग - अग्ने॑ दि॒वो अर्ण॒मच्छा॑ जिगा॒स्यच्छा॑ दे॒वाँ२ऽ ऊ॑चिषे॒ धिष्ण्या॒ ये । या रो॑च॒ने प॒रस्ता॒त् सूर्य॑स्य॒ याश्चा॒वस्ता॑दुप॒तिष्ठ॑न्त॒ऽ आपः॑ ॥ ४९ ॥ अर्थ - हे अग्ने, द्युलोकसंबंधीं जलाच्या सन्मुख तूं गमन करतोस. ज्या देवांना बुद्धीन्द्रिय प्रेरक असें म्हणतात, त्या देवांच्या सन्मुखही तूं गमन करतोस व प्रकाशक मंडलामध्यें राहणार्या सूर्याच्या पलीकडे व अलीकडे असलेल्या जलांच्या सन्मुखही तूं गमन करतोस. ॥४९॥ विनियोग - पुरी॒ष्या॒सोऽ अ॒ग्नयः॑ प्राव॒णेभिः॑ स॒जोष॑सः । जु॒षन्तां॑ य॒ज्ञम॒द्रुहो॑ऽनमी॒वा इषो॑ म॒हीः ॥ ५० ॥ अर्थ - हे इष्टकास्वरूपी अग्नि आमच्या यज्ञाचें सेवन करोत, व अग्नि क्षुधातृष्णानिवारक व मोठया अशा अन्नभागांचें सेवन करोत. ते अग्नि पशूंना हितकर व प्रीतियुक्त मनाचे परस्पराचा द्वेष न करणारे असे आहेत. ॥५०॥ विनियोग - 'इडामग्ने' या दोन मंत्रांनीं दोन इष्टका स्थापन कराव्या. इडा॑मग्ने पुरु॒दँसँ॑ स॒निं गोः श॑श्वत्त॒मँ हव॑मानाय साध । स्यान्नः॑ सू॒नुस्तन॑यो वि॒जावाग्ने॒ सा ते॑ सुम॒तिर्भू॑त्व॒स्मे ॥ ५१ ॥ अर्थ - हे अग्ने, देवाला बोलावणार्या यजमानाला अन्न दे. तें अन्न पुष्कळ कर्मांना साधनभूत व चिरंतन व धेनुसंबंधीं असें आहे व आमच्या यजमानाला औरस पुत्र होवो व तो प्रजावान् असावा. हे अग्ने, तुझी अन्न-गो-पुत्र-दान विषयक सद्बुद्धि आमचे ठायीं होवो. ॥५१॥ विनियोग - अ॒यं ते॒ योनि॑र्ऋ॒त्वियो॒ यतो॑ जा॒तो अरो॑चथाः । तं जा॒नन्न॑ग्न॒ आ रो॒हाथा॑ नो वर्धया र॒यिम् ॥ ५२ ॥ अर्थ - हे अग्ने, हें तुझें उत्पत्तिस्थान आहे. तूं सायंप्रातःकालीं उत्पत्तीला योग्य आहेस; कारण तूं गार्हपत्यांतून उत्पन्न होऊन प्रकाशित झालास. हे अग्ने, त्या आपल्या पित्याला ओळखून कर्माचे शेवटीं त्यांत प्रवेश कर व आमच्याकरितां धनवृद्धि कर. ॥५२॥ विनियोग - 'चिदसि' या मंत्रानें उत्तरेकडे व 'परिचिदसि' या मंत्रानें दक्षिणेकडे इष्टका स्थापन करावी. चिद॑सि॒ तया॑ दे॒वतयाऽङ्गिर॒स्वद् ध्रु॒वा सी॑द परि॒चिद॑सि॒ तया॑ दे॒वत॑याऽङ्गिर॒स्वद् ध्रु॒वा सी॑द ॥ ५३ ॥ अर्थ - हे इष्टके, तुझें स्थापन झालें आहे. तूं त्या वाणीरूपी देवतेच्या द्वारा स्थापित होऊन प्राणाप्रमाणें निश्चल रहा. हे द्वितीय इष्टके, तूं सर्व बाजूंनीं स्थापन केली गेली आहेस. तूं त्या वाणीरूपी देवतेच्या द्वारा स्थापित होऊन प्राणांप्रमाणें निश्चल रहा. ॥५३॥ विनियोग - नंतर एकवीस इष्टका स्थापन कराव्या. लो॒कं पृ॑ण छि॒द्रं पृ॒णाथो॑ सीद ध्रु॒वा त्वम् । इ॒न्द्रा॒ग्नी त्वा॒ बृह॒स्पति॑र॒स्मिन् योना॑वसीषदन् ॥ ५४ ॥ अर्थ - हे लोकंपृणेष्टके, तूं गार्हपत्य-चयनस्थानीं रिकाम्या असलेल्या जागीं स्थित हो व चिकटून बैस. छिद्र दिसणार नाही अशा रीतीनें चिकटून बैस व दृढ रहा. इंद्र, अग्नि, आणि बृहस्पति यांनीं तुला या स्थानीं स्थापन केलें. ॥५४॥ विनियोग - 'ता अस्य' या मंत्रानें सूद दोहस यासंबंधीं भाषण. ता अ॑स्य॒ सूद॑दोहसः॒ सोमँ॑ श्रीणन्ति॒ पृश्न॑यः । जन्म॑न्दे॒वानां॒ विश॑स्त्रि॒ष्वा रो॑च॒ने दि॒वः ॥ ५५ ॥ अर्थ - द्युलोकसंबंधीं नानाप्रकारची जलें व अन्नें प्रत्येक वर्षी तीनही सवनांमध्यें या यज्ञांतील सोमाला शिजवितात. ॥५५॥ विनियोग - 'इंद्रं विश्वा' या मंत्रानें गार्हपत्य चितीवर चात्वालावरील मृत्तिका स्थापन करावी. इन्द्रं॒ विश्वा॑ अवीवृधन्त्समु॒द्रव्य॑चसं॒ गिरः॑ । र॒थीत॑मँ र॒थीनां॒ वाजा॑नाँ॒ सत्प॑तिं॒ पति॑म् ॥ ५६ ॥ अर्थ - ऋग्यजुःसामरूपी सर्व स्तुती इन्द्राला वाढवितात. तो इन्द्र समुद्राप्रमाणें व्यापक, विविधगतिमान्, सर्व रथींत श्रेष्ठ, अन्नस्वामी व धर्मनिष्ठ लोकांचा पालक आहे. ॥५६॥ विनियोग - 'समितं' इत्यादि चार मंत्रांनीं उख्य अग्नीचें स्थापन करावें. समि॑तँ॒ संक॑ल्पेथाँ॒ संप्रि॑यौ रोचि॒ष्णू सु॑मन॒स्यमानौ । इष॒मूर्ज॑म॒भि सं॒वसा॑नौ ॥ ५७ ॥ अर्थ - हे चित्थ व उख्य अग्नी, तुम्ही दोघे मिळून या व एक विचारानें रहा. तुम्ही परस्पर-प्रीतियुक्त, प्रकाशमान, एकमेकांविषयीं सन्मत असलेले, अन्न व घृत भक्षण करणारे आहां. ॥५७॥ विनियोग - सं वां॒ मनाँ॑सि॒ सं व्र॒ता समु॑ चि॒त्तान्याक॑रम् । अग्ने॑ पुरीष्याधि॒पा भ॑व॒ त्वं न॒ इष॒मूर्जं॒ यज॑मानाय धेहि ॥ ५८ ॥ अर्थ - हे पूर्वोक्त अग्नींनो, तुमचें मन, बुद्धि, अहंकार व कर्मे यांस मी एकत्र करतों व मनोगत संस्कारांनाही एकत्र करतों. हे पशुपालक अग्ने, तूं आमचें पालन कर व आमच्या यजमानाला अन्न व दधि घृत वगैरे दे. ॥५८॥ विनियोग - अग्ने॒ त्वं पु॑री॒ष्यो॒ रयि॒मान् पु॑ष्टि॒माँ२ऽ अ॑सि । शि॒वाः कृ॒त्वा दिशः॒ सर्वाः॒ स्वं योनि॑मि॒हाऽस॑दः ॥ ५९ ॥ अर्थ - हे अग्ने, तूं पशुहितकर, धनवान्, पुष्टियुक्त आहेस. म्हणून सर्व दिशांना शांत करून या चयन यागांत आपल्या स्थानावर बैस. ॥५९॥ विनियोग - भव॑तं नः॒ सम॑नसौ॒ सचे॑तसावरे॒पसौ॑ । मा य॒ज्ञँ हिँ॑सिष्टं॒ मा य॒ज्ञप॑तिं जातवेदसौ शि॒वौ भ॑वतम॒द्य नः॑ ॥ ६० ॥ अर्थ - हे अग्नींनो, तुम्ही आमच्यावर एकचित्तानें अनुग्रह करा. तसेंच आम्हीं अपराध केला तरी तुम्ही आमच्यावर रागावूं नका. आमच्या यज्ञकर्माची व यजमानाची हिंसा करूं नका. तसेंच आज (अनुष्ठानदिवशीं) आमचें कल्याण करा. ॥६०॥ विनियोग - 'मा ते व' या मंत्रानें उखेचा फास बाजूला करून गार्हपत्य चितीवर उम्मा स्थापन करून तिच्यांत दुग्धसिंचन करावें. मा॒तेव॑ पुत्रं पृ॑थिवी पु॑री॒ष्य॒म॒ग्निँ स्वे योना॑वभारु॒खा । तां विश्वै॑दे॒वैर्ऋ॒तुभिः॑ संविदा॒नः प्र॒जाप॑तिर्वि॒श्वक॑र्मा॒ वि मु॑ञ्चतु ॥ ६१ ॥ अर्थ - आई मुलाचें धारण करते त्याप्रमाणें ही पृथ्वीरूपी मृण्मय उखा पशुहितकर, अग्नीचें आपल्या गर्भस्थानीं धारण करिती झाली. प्रजापतीनें त्या उखेला पाशापासून मुक्त करावें. तो प्रजापति सर्व देव आणि ऋषि यांच्याबरोबर ऐकमत्य असलेला व सृष्टयादि सर्व कर्मे करणारा आहे. ॥६१॥ विनियोग - 'असुन्वन्तं' इत्यादि तीन मंत्रांनीं तीन इष्टका स्थापन कराव्या. असु॑न्वन्त॒मय॑जमानमिच्छ स्ते॒नस्ये॒त्यामन्वि॑हि॒ तस्क॑रस्य । अ॒न्यमस्म॒दि॑च्छ॒ सा त॑ऽ इ॒त्या नमो॑ देवि निर्ऋते॒ तुभ्य॑मस्तु ॥ ६२ ॥ अर्थ - हे निर्ऋते, सोमयाग व इतर कोणताही याग न करणार्याकडे तूं जा. तसेंच गुप्त चोर आणि प्रकट चोर जातात तिकडेही तूं जा. यज्ञ न करणार्या अशा आमच्याहून दुसर्या कोणाचीही तूं इच्छा कर. आमची इच्छा करूं नको कारण तुझें गमन म्हणजे दुष्टांची शिक्षा आहे. हे देवि निर्ऋते, अशा तुला नमस्कार असो. ॥६२॥ विनियोग - नमः॒ सु ते॑ निर्ऋते तिग्मतेजोऽय॒स्मयं॒ विचृ॑ता ब॒न्धमे॒॑तम् । य॒मेन॒ त्वं य॒म्या सं॑विदा॒नोत्त॒मे नाके॒ अधि॑रोहयैनम् ॥ ६३ ॥ अर्थ - हे तीक्ष्णतेजोयुक्त, निर्ऋते, तुला पुष्कळ नमस्कार असो. तूं लोहपाशाप्रमाणें दृढ अशा ह्या संसारबंधाला तोड व यम, अग्नि, व पृथ्वी यांशीं ऐकमत्य करून उत्कृष्ट व सर्वसुखयुक्त स्वर्गामध्यें या यजमानाला ने. ॥६३॥ विनियोग - यस्या॑स्ते घोर आ॒सञ्जु॒होम्ये॒षां ब॒न्धाना॑मव॒सर्ज॑नाय । यां त्वा॒ जनो॒ भूमि॒रिति॑ प्र॒मन्द॑ते॒ निर्ऋ॑तिं त्वा॒ऽहं परि॑वेद वि॒श्वतः॑ ॥ ६४ ॥ अर्थ - 'हे क्रूर अशा निर्ऋते देवि', यजमानाच्या स्वर्गप्राप्तिप्रतिबंधक पापांच्या निवृत्तीकरितां ज्या तुझ्या मुखांत मी होम करतों व ज्या तुला सामान्य अज्ञ लोक भूमि म्हणून समजतात त्या तुला मी सर्व तर्हेनें तूं खरोखर निर्ऋति आहेस असें जाणतों. निर्ऋति म्हणजे सर्व देव जिथें रहातात त्यापेक्षां वेगळ्या जागीं असणारी. ॥६४॥ विनियोग - 'यं ते' या मंत्रानें शिक्य, रुक्मपाश वगैरे पदार्थ निर्ऋति इष्टकेच्या पलीकडे अगर पश्चद्भागीं टाकावें. नंतर आपल्या व निर्र्ऋति इष्टकांच्या मध्यें जलपूर्ण चमस ठेवावा व 'नमः' हा मंत्र म्हणून यांनीं उठावें. यं ते॑ दे॒वी निर्ऋ॑तिराब॒बन्ध॒ पाशं॑ ग्री॒वास्व॑विचृ॒त्यम् । तं ते॒ विष्या॒म्यायु॑षो॒ न मध्या॒दथै॒तं पि॒तुम॑द्धि॒ प्रसू॑तः । नमो॒ भूत्यै॒ येदं च॒कार॑ ॥ ६५ ॥ अर्थ - हे यजमाना, निर्ऋति देवीनें तुझ्या गळ्याभोवतीं अच्छेद्य असा जो पाश बांधला त्याला मी ह्या मंत्रानें सोडतों. तो पाश मी आतांच अग्नीच्या मध्यापासून दूर करतों. नंतर निर्ऋतिच्या आज्ञेमुळें अग्निरूपाचा आश्रय करून हे यजमाना, हें अन्न तूं भक्षण कर. ज्या देवीनें हे अग्निकर्म केलें त्या श्रीरूपिणी देवीला नमस्कार असो. ॥६५॥ विनियोग - 'निवेशनः' या मंत्रानें अध्वर्यूनें गार्हपत्यचितीरूप अग्नीचें उपस्थान करावें. नि॒वेश॑नः स॒ङ्गम॑नो॒ वसू॑नां॒ विश्वा॑ रू॒पाऽभिच॑ष्टे॒ शची॑भिः । दे॒व इ॑व सवि॒ता स॒त्यध॒र्मेन्द्रो॒ न त॑स्थौ सम॒रे प्॑अथी॒नाम् ॥ ६६ ॥ अर्थ - सवितृदेवाप्रमाणें हा अग्नि आपापल्या कर्मांनीं युक्त अशीं आहवनीयादि सर्व रूपें पहातो. तो यजमानाला आपल्या घरांत ठेवणारा, धनें प्राप्त करून देणारा, अवश्यफलयुक्त धर्माचा स्वामी असा आहे. तसेंच तो अग्नि संग्रामामध्यें इंद्राप्रमाणें शत्रुसन्मुख उभा राहतो. ॥६६॥ विनियोग - 'सीरा युजान्ति' या दोन मंत्रांनीं अध्वर्यूनें उंबराच्या नांगराचें अभिमंत्रण करावें. सीरा॑ युञ्जन्ति क॒वयो॑ यु॒गा वित॑न्वते॒ पृथ॑क् । धीरा॑ दे॒वेषु॑ सुम्न॒या ॥ ६७ ॥ अर्थ - बुद्धिमान् असे कृषिकर्माभिज्ञ पुरुष देवांना सुख देण्याकरितां नांगराला बैल जुंपतात व निरनिराळ्या तर्हेनें चालवितात. ॥६७॥ विनियोग - यु॒नक्त॒ सीरा॒ वि यु॒गा त॑नुध्वं कृ॒ते योनौ॑ वपते॒ह बीज॑म् । गि॒रा च॑ श्रु॒ष्टि सभ॑रा॒ऽ अस॑न्नो॒ नेदी॑य॒ऽ इत्सृण्यः॒ प॒क्वमेया॑त् ॥ ६८ ॥ अर्थ - हे नांगरणार्यांनो, नांगरांना जोडा व त्यांना शिवळा वगैरेंनीं विस्तृत करा. नंतर नांगरलेल्या या स्थानावर तुम्ही व्रीहि वगैरे बीं वेदवाणीनें पेरा व व्रीह्यादिक अन्नें फलवृद्धीनें पुष्ट होवोत. पक्व झालेलें धान्य कापणीनें (कापण्याचें साधन) कापल्यानंतर थोडयाच वेळांत आमच्या घरी येवो. ॥६८॥ विनियोग - चितिस्थानावर 'शु॒नँ सु फाला॒' या चार मंत्रांनीं चार नांगराच्या रेघा ओढाव्या किंवा चार वेळां नांगर फिरवावा. शु॒नँ सु फाला॒ वि कृ॑षन्तु॒ भूमिँ॑ शु॒नं की॒नाशा॑ऽ अ॒भिय॑न्तु वा॒हैः । शुना॑सीरा ह॒विषा॒ तोश॑माना सुपिप्प॒लाऽ ओष॑धीः कर्तना॒स्मै ॥ ६९ ॥ अर्थ - चांगले फाळ ज्यांना आहेत असे नांगर सुखानें भूमि नांगरोत. तसेंच नांगरणारें लोक सुखानें बैलांसह गमन करोत. हे वारवादित्यांनो, तुम्ही आमच्या व्रीह्यादिक औषधी उत्तम फलानें युक्त करा. तुम्ही जलानें भूमीला भिजविणारे आहांत. ॥६९॥ विनियोग - घृतेन॒ सीता॒ मधु॑ना॒ सम॑ज्यतां॒ विश्वै॑र्दे॒वैरनु॑मता म॒रुद्भिः॑ । ऊर्ज॑स्वती॒ पय॑सा॒ पिन्व॑माना॒स्मान्त्सी॑ते॒ पय॑सा॒ऽभ्याव॑वृत्स्व ॥ ७० ॥ अर्थ - नांगराची रेष मधुर अशा उदकानें आर्द्र होवो. ती रेघ विश्वेदेवांनीं व मरुतांनीं अंगीकृत केली आहे. हे सीते, अन्नवती अशी तूं दूध दहीं वगैरेंनीं दिशांना पूर्ण करून दुग्धादिकांसह वर्तमान आम्हांकडे परत ये. ॥७०॥ विनियोग - लाङ्ग॑लं॒ पवीरवत्सु॒शेवँ॑ सोम॒पित्स॑रु । तदुद्व॑पति॒ गामाविं॑ प्रफ॒र्व्यं॒ च॒ पीव॑रीं प्र॒स्थाव॑द्रथ॒वाह॑णम् ॥ ७१ ॥ अर्थ - हा नांगर अत्यंत वेगवती व पुष्ट अशी धेनू व असा छाग व रथवाहक, प्रयाणसमर्थ अश्वादिक यांना प्राप्त करून देतो. तो नांगर फाळानें युक्त, सुखकर सोमपायी यजमानाकरितां भूमि खणणारा आहे. ॥७१॥ विनियोग - कामं॑ कामदुधे धुक्ष्व मि॒त्राय॒ वरु॑णाय च । इन्द्रा॑या॒श्विभ्यां॑ पू॒ष्णे प्र॒जाभ्य॒ऽ ओष॑धीभ्यः ॥ ७२ ॥ अर्थ - हे इच्छा परिपूर्ण करणार्या लांगलपद्धते, मित्र, वरुण, इंद्र, अश्विनीकुमार व पूषा या देवतांकरितां व प्रजेकरितां आणि औषधि उत्पन्न होण्याकरितां मला अभीष्ट असा भोग्य पदार्थ दे. ॥७२॥ विनियोग - 'विमुच्यध्वम्' या मंत्रानें बैलांना नांगरापासून अध्वर्यूनें सोडावें. विमु॑च्यध्वमघ्न्या देवयाना॒ऽ अग॑न्म॒ तम॑सस्पा॒रम॒स्य । ज्योति॑रापाम ॥ ७३ ॥ अर्थ - हे देवतार्थ कर्म करणार्या, अवध्य अशा बलावर्दांनो, तुम्ही भुक्त व्हा. आम्ही क्षुत्पिपासानिमित्त अशा या दुःखाच्या पार गेलों व परमात्मलक्षण तेजाला प्राप्त झालों. ॥७३॥ विनियोग - 'सजूरब्दः' या मंत्रानें होम करावा. स॒जूरब्दो॒ऽ अय॑वोभिः स॒जूरु॒षा अरु॑णीभिः । स॒जोष॑साव॒श्विना॒ दँसो॑भिः स॒जूः सूर॒ऽ एत॑शेन स॒जूर्वै॑श्वान॒र इड॑या घृतेन॒ स्वाहा॑ ॥ ७४ ॥ अर्थ - पक्षमास यांनीं युक्त संवत्सर, रक्तवर्ण गाईंनीं प्रीतियुक्त प्रातःकालाची अधिष्ठात्री देवता, चिकित्सादिकर्मांनीं संतुष्ट होणारे अश्विनीकुमार, या अश्वानें संतुष्ट होणारा सूर्य, या पृथ्वीवर प्रेम करणारा वैश्वानर, अग्नि, यांना हें घृतरूपी हवि सुहुत असो. ॥७४॥ विनियोग - तीन ऋचांना तृच् म्हणतात. अशा पांच तृचांनीं म्हणजे 'या ओषधीः' इत्यादि पंधरा मंत्रांनीं सर्व औषधें नांगराच्या रेघांवर ओतावीं. या ओष॑धीः॒ पूर्वा॑ जा॒ता दे॒वभ्य॑स्त्रियु॒गम् पु॒रा । मनै॒ नु ब॒भ्रूणा॑म॒हँ श॒तं धामा॑नि स॒प्त च॑ ॥ ७५ ॥ अर्थ - सृष्टीच्या आरंभीं ज्या औषधी ऋतूंकरितां उत्पन्न झाल्या त्या जगत्पोषणसमर्थ औषधींच्या शंभर आणि सात स्थानांना मी जाणतोंच, म्हणजे औषधींच्या ग्राम्य व आरण्य अशा पुष्कळ जाती मला माहीत आहेत. ॥७५॥ विनियोग - श॒तं वो॑ अम्ब॒ धामा॑नि स॒हस्र॑मु॒त वो॒ रुहः॑ । अधा॑ शतक्रत्वो यूयमि॒मं मे॑ अग॒दं कृ॑त ॥ ७६ ॥ अर्थ - हे मातृस्थानरूपी औषधींनो, तुमच्या शंभर जाती आहेत व तुमचे हजार अंकुर आहेत. आणि शंभर कार्ये करणार्या हे औषधींनो, तुम्ही या माझ्या यजमानाला क्षुत्पिपासादि रोगरहित करा. ॥७६॥ विनियोग - ओष॑धीः॒ प्रति॑मोदध्वं॒ पुष्प॑वतिः प्र॒सूव॑रीः । अश्वा॑ इव स॒जित्व॑रीर्वीरु॒धः॑ पारयि॒ष्णवः॒ ॥ ७७ ॥ अर्थ - हे औषधींनो, तुम्ही पुष्पफलयुक्त होऊन आनंदित व्हा व तुम्ही अश्वाप्रमाणें जयशील आहांत. तशाच तुम्ही पुष्कळ वाढून बरेच दिवसपर्यंत फलोत्पत्त्यनंतरही राहणार्या आहांत. ॥७७॥ विनियोग - ओष॑धी॒रिति॑ मातर॒स्तद्वो॑ देवी॒रुप॑ब्रुवे । स॒नेय॒मश्वं॒ गां वास॑ऽ आ॒त्मानं॒ तव॑ पूरुष ॥ ७८ ॥ अर्थ - जगन्निर्माण करणार्या प्रकाशक अशा औषधींनो, मी तुम्हांला माझा पुढीलप्रमाणें अभीष्ट वर मागतों तो हा की, हे यज्ञपुरुषा तुझ्या प्रसादानें मला घोडा, गाय, वस्त्र व उत्तम शरीर प्राप्त होवो. (मी यज्ञपुरुषाकडे मागतों तें तुम्ही कबूल करावें असें वरील म्हणण्याचे तात्पर्य.) ॥७८॥ विनियोग - अ॒श्व॒त्थे वो॑ नि॒षद॑नं प॒र्णे वो॑ वस॒तिष्कृ॒ता । गोभाज॒ऽ इत्किला॑सथ॒ यत्स॒नव॑थ॒ पूरु॑षम् ॥ ७९ ॥ अर्थ - हे औषधींनो, अश्वत्थ स्रुचेमध्यें तुमचें स्थान आहे व तुम्हांला पळसाच्या जुहूमध्येंही जागा दिली आहे. हे हविर्भूत औषधींनो, अग्नींत होम केलेल्या तुम्ही आदित्याचें सेवन करणार्या व्हा. तुम्ही यजमानाचें अन्नदानानें पोषण करतां म्हणून तुम्हांला वरील स्थानें दिलीं आहेत. ॥७९॥ विनियोग - यत्रोष॑धीः स॒मग्म॑त॒ राजा॑नः॒ समि॑ताविव । विप्रः॒ स उ॑च्यते भि॒षग्र॑क्षो॒हामी॑व॒चात॑नः ॥ ८० ॥ अर्थ - हे ओषधींनो, राजे युद्धांत शत्रूला जिंकण्याकरितां येतात त्याप्रमाणें तुम्ही या ब्राह्मणाचे ठिकाणीं रोग जिंकण्याकरितां या. तुमच्या आश्रयानें या ब्राह्मणाला वैद्य म्हणतात. तो पुरोडाशद्वारा राक्षसांचा नाश करणारा व औषधांनीं रोगांचा नाश करणारा आहे. ॥८०॥ विनियोग - अ॒श्वा॒व॒तीँ सो॑माव॒तीमू॒र्जय॑न्ती॒मुदो॑जसम् । आऽवि॑त्सि॒ सर्वा॒ ओष॑धीर॒स्मा अ॑रि॒ष्टता॑तये ॥ ८१ ॥ अर्थ - या यजमानाच्या अमंगलाचा नाश करण्याकरितां मी सर्व औषधींना सर्व तर्हेनें जाणतों. त्यांतली एक औषधी अश्व मिळवून देणारी, दुसरी सोम मिळवून देणारी, तिसरी बळ देणारी व चौथी तेज देणारी आहे. (अशा प्रकारच्या नाना कार्ये करणार्या सर्व औषधि मी जाणतों.) ॥८१॥ विनियोग - उच्छुष्मा॒ ओष॑धीनां॒ गावो॑ गो॒ष्ठादि॑वेरते । धनँ॑ सनि॒ष्यन्ती॑नामा॒त्मानं॒ तव॑ पूरुष ॥ ८२ ॥ अर्थ - हे यज्ञपुरुषा, धन देणार्या औषधींची सामर्थ्ये ज्याप्रमाणें गोठयांतील गाई अरण्यांत जातात त्याप्रमाणें तुझ्या शरीराकडे येतात. ॥८२॥ विनियोग - इष्कृ॑ति॒र्नाम॑ वो मा॒ताऽथो॑ यू॒यं स्थ॒ निष्कृ॑तीः । सी॒राः प॑त॒त्रिणी॑ स्थन॒ यदा॒मय॑ति॒ निष्कृ॑थ ॥ ८३ ॥ अर्थ - हे औषधींनो, तुमची इष्कृती नांवाची आई व्याधींचें निवारण करणारी आहे व तुम्हीही व्याधी निराकरण करणार्या आहांत. तशाच अन्न देणार्या, प्रसरणशील आहांत म्हणून या रोग्याच्या शरीरांतील रोगांचा नाश करा. ॥८३॥ विनियोग - अति॒ विश्वाः॑ परि॒ष्ठा स्ते॒न इ॑व व्र॒जम॑क्रमुः । ओष॑धीः॒ प्राचु॑च्यवु॒र्यत्किं च॑ त॒न्वो रपः॑ ॥ ८४ ॥ अर्थ - रोगाला नष्ट करणार्या सर्व औषधी, चोर गोठयांत येतो त्याप्रमाणें देहाला व्याप्त करतात व शरीरांत व्याप्त झाल्यानंतर जें कांहीं शिरोव्यथारूपी पापफल असतें त्याचा नाश करतात. ॥८४॥ विनियोग - यदि॒मा वा॒जय॑न्न॒हमोष॑धी॒र्हस्त॑ऽ आद॒धे । आ॒त्मा यक्ष्म॑स्य नश्यति पु॒रा जी॑व॒गृभो॑ यथा ॥ ८५ ॥ अर्थ - जिवंतपणीं ज्याला फांशी देण्याकरितां वधस्थानाकडे नेतात त्या पुरुषाला वधाच्या पूर्वीच असें वाटतें कीं मी मेलों आहें व त्याचें शरीर त्यावेळीं नष्टप्राय होते; त्याप्रमाणें ज्यावेळीं ह्या औषधी सन्मानपूर्वक मी हातांत धारण करतों, त्यावेळींच भक्षणाचे पूर्वीच रोगाचें शरीर नष्ट होतें म्हणजे खाण्याकरितां हातांत धरल्याबरोबर औषधि रोग दूर करते. मग भक्षण केल्यावर करीलच करील. ॥८५॥ विनियोग - यस्यौ॑षधीः प्र॒सर्प॒थाङ्ग॑मङ्गं॒ परु॑ष्परुः । ततो॒ यक्ष्मं॒ वि बा॑धध्व उ॒ग्रो म॑ध्यम॒शीरि॑व ॥ ८६ ॥ अर्थ - हे औषधींनो, ज्या रोग्याच्या सर्व अंगांत व ज्या ज्या प्रत्येक पेर्यांत तुम्ही गमन करतां तेथून तेथून रोगाला नष्ट करतां. याला दृष्टांत - ज्याप्रमाणें मर्मघातक व उग्र क्षत्रिय शत्रूला नष्ट करतो त्याप्रमाणें रोग्याच्या शरीरांत शिरलेले व्याधि नष्ट करतां. ॥८६॥ विनियोग - अ॒व॒पत॑न्तीरवदन्दि॒व ओष॑धय॒स्परि॑ । यं जी॒वम॒श्नवा॑महै॒ न स रि॑ष्याति॒ पूरु॑षः ॥ ९१ ॥ अर्थ - द्युलोकांतून भूमीवर येणार्या औषधी परस्परांना बोलल्या कीं, ज्या जिवंत पुरुषाला आम्ही व्याप्त करतों तो नष्ट होत नाही. ॥९१॥ विनियोग - याऽ ओष॑धीः॒ सोम॑राज्ञीर्ब॒ह्वीः श॒तवि॑चक्षणाः । तासा॑म॒सि त्वमु॑त्त॒मारं॒ कामा॑य॒ शँ हृ॒दे ॥ ९२ ॥ अर्थ - सोमप्रमुख अशा ज्या पुष्कळ प्रभूतवीर्यसंपन्न अशा औषधी उपलब्ध आहेत त्यांमधील, रे औषधे, तूं उत्तम आहेस म्हणून आमच्या कार्यसिद्धीला पुरेशी हो व हृदयाला सुखकर हो. ॥९२॥ विनियोग - या ओष॑धीः॒ सोम॑राज्ञी॒र्विष्ठि॑ताः पृथि॒वीमनु॑ । बृह॒स्पति॑प्रसूता अ॒स्यै संद॑त्त वीर्य॒म् ॥ ९३ ॥ अर्थ - सोमप्रमुख, पृथ्वीवर नानाप्रकारेंकरून स्थित अशा ज्या औषधी त्या बृहस्पतीच्या प्रेरणेनें मीं घेतलेल्या औषधीला सामर्थ्य देवोत. ॥९३॥ विनियोग - याश्चे॒दमु॑पशृण्वन्ति॒ याश्च॑ दू॒रं परा॑गताः । सर्वाः॑ सं॒गत्य॑ वीरुधो॒ऽस्यै संद॑त्त वी॒र्य॒म् ॥ ९४ ॥ अर्थ - माझी प्रार्थना जवळ असल्यामुळें पूर्ण तर्हेनें ज्या ऐकतात व ज्या दूर असल्यामुळें किंचित् ऐकतात अशा हे औषधींनो, तुम्ही विविधरीतीनें वाढणार्या अशा सर्व एकत्र होऊन मीं घेतलेल्या या औषधीला सामर्थ्य द्या. ॥९४॥ विनियोग - मा वो॑ रिषत् खनि॒ता यस्मै॑ चा॒हं खना॑मि वः । द्वि॒पाच्चतु॑ष्पाद॒स्माकँ॒ सर्व॑मस्त्वनातु॒रम् ॥ ९५ ॥ अर्थ - हे औषधींनो, चिकित्सा करण्याकरितां तुम्हांला मुळापासून उपटणारा पुरुष नष्ट न होवो व ज्याच्या चिकित्सेकरितां मी तुमचें मूळ उपटतों तोही नष्ट न होवो. आमचेसंबंधीं स्त्रीपुरुष, गाई वगैरे सर्व द्विपाद् व चतुष्पाद् प्राणी रोगरहित होवोत. ॥९५॥ विनियोग - ओष॑धयः॒ सम॑वदन्त॒ सोमे॑न स॒ह राज्ञा॑ । यस्मै॑ कृ॒णोति॑ ब्राह्म॒णस्तँ रा॑जन् पारयामसि ॥ ९६ ॥ अर्थ - सोमराजाबरोबर औषधी भाषण करत्या झाल्या कीं, हे सोमा, ब्राह्मण ज्या रोग्याची चिकित्सा आमचें मूळ घेऊन करतो त्या रोग्याला आम्ही रोगाच्या पलीकडे नेतों. (रोगाचा नाश करतों.) ॥९६॥ विनियोग - ना॒श॒यि॒त्री ब॒लास॒स्यार्श॑स उप॒चिता॑मसि । अथो॑ श॒तस्य॒ यक्ष्मा॑णां पाका॒रोर॑सि॒ नाश॑नी ॥ ९७ ॥ अर्थ - हे औषधे, तूं क्षयव्याधीचा व मूळव्याधीचा आणि सूज वगैरे व्याधींचा नाश करणारी आहेस. तसेंच पुष्कळ व्याधि व तोंड येणें, व्रण वगैरे रोगांचा नाश करणारी आहेस. ॥९७॥ विनियोग - त्वां ग॑न्ध॒र्वा अ॑खनँ॒स्त्वामिन्द्र॒स्त्वाः बृह॒स्पतिः॑ । त्वामो॑षधे॒ सोमो॒ राजा॑ वि॒द्वान् यक्ष्मा॑दमुच्यत ॥ ९८ ॥ अर्थ - हे औषधींनो, गंधर्व, इंद्र, बृहस्पति यांनीं तुमचें खनन केलें. हे औषधे, सोमराजा तुमच्या सामर्थ्याचा ज्ञानपूर्वक उपयोग करून महाव्याधीपासून मुक्त झाला. ॥९८॥ विनियोग - सहस्व मे॒ अरा॑तीः॒ सह॑स्व पृतनाय॒तः । सह॑स्व॒ सर्वं॑ पा॒प्मानँ॒ सह॑मानास्योषधे ॥ ९९ ॥ अर्थ - हे औषधे, तूं शत्रूंचा पराजय करणारी आहेस म्हणून माझ्या दानरहित शत्रुसेनांचा पराजय कर व संग्रामेच्छु जे त्यांचाही नाश कर. तसेंच माझ्या सर्व अशुभ कृत्यांचा नाश कर. ॥९९॥ विनियोग - दी॒र्घायु॑स्त ओषधे खनि॒ता यस्मै॑ च त्वा॒ खना॑म्य॒हम् । अथो॒ त्वं दी॒र्घायु॑र्भू॒त्वा श॒तव॑ल्शा॒ विरो॑हतात् ॥ १०० ॥ अर्थ - हे औषधे, तुला उपटणारा व ज्या रोग्यांकरितां तुला मी उपटतों ते दोघेही शतायु होवोत. व तूंही दीर्घायु होऊन शंभर अंकुरांनीं युक्त अशी वाढ. ॥१००॥ विनियोग - त्वमु॑त्त॒मास्यो॑षधे॒ तव॑ वृ॒क्षा उप॑स्तयः । उप॑स्तिरस्तु॒ सोऽस्माकं॒ यो अ॒स्माँ२ऽ अ॑भि॒दास॑ति ॥ १०१ ॥ अर्थ - हे औषधे, तूं उत्कृष्ट आहेस. शालतमालादिक वृक्ष जवळ राहून उपद्रव निराकरण करून तुझी सेवा करोत. जो मनुष्य आम्हांला मारतो तोही समीप राहून आमचा उपासक होवो. ॥१०१॥ विनियोग - अध्वर्यूनें प्रत्येक दिशेला 'मा मा हिंसीद्' इत्यादि प्रत्येक ऋचेनें चार मृत्तिकेचे खंड स्थापन करावें. मा मा॑ हिँसीज्जनि॒ता यः पृ॑थि॒व्या यो वा॒ दिवँ॑ स॒त्यध॑र्मा॒ व्यान॑ट् । यश्चा॒पश्च॒न्द्राः प्र॑थ॒मो ज॒जान॒ कस्मै॑ दे॒वाय॑ ह॒विषा॑ विधेम ॥ १०२ ॥ अर्थ - जो प्रजापति पृथ्वीचा उत्पादक आहे व सत्याचा धारण करणारा, ज्यानें द्युलोकाला उत्पन्न केलें तसेंच अगोदर उत्पन्न होऊन ज्यानें आनंद देणार्या जलाला उत्पन्न केलें तो प्रजापति माझी हिंसा न करो म्हणून मी प्रजापति देवाला हविर्भाग देतों. ॥१०२॥ विनियोग - इष्टकोआधान करावें. अ॒भ्या व॑र्तस्व पृथिवि य॒ज्ञेन॒ पय॑सा स॒ह । व॒पां ते॑ऽ अ॒ग्निरि॑षि॒तो अ॑रोहत् ॥ १०३ ॥ अर्थ - हे पृथ्वी, आम्हांला करावयाचा यज्ञ व त्याचें फल जो दुग्धादि उपयोग त्यांसह आमचेकडे ये. प्रजापतीने प्रेरित असा अग्नि तुझ्या वपेवर (वपासदृश प्रदेशावर) आरोहण करो. ॥१०३॥ विनियोग - अग्ने॒ यत्ते॑ शु॒क्रं यच्च॒न्द्रं यत्पू॒तं यच्च॑ य॒ज्ञिय॑म् । तद्दे॒वेभ्यो॑ भरामसि ॥ १०४ ॥ अर्थ - हे अग्ने, जें तुझें शुद्ध, आल्हाददायक, पवित्र आणि यज्ञार्ह अंग आहे ते सर्व आम्ही देवांकरितां संपादित करतों. ॥१०४॥ विनियोग - या मंत्रानें इष्टकावरून वाळू खालीं पाडावी. इष॒मूर्ज॑म॒हमि॒त आद॑मृ॒तस्य॒ योनिं॑ महि॒षस्य॒ धारा॑म् । आ मा॒ गोषु॑ विश॒त्वा त॒नूषु॒ जहा॑मि से॒दिमनि॑रा॒ममी॑वाम् ॥ १०५ ॥ अर्थ - मी अन्न, दधि, सत्याचें स्थान अशा मोठया व इच्छा करणार्या अग्नीच्या आहुतीप्रत या प्रदेशाच्या उत्तर दिशेकडून भक्षण करतों व हें सर्व इडादिक अन्न माझे शरीरांत व माझ्या पुत्रांच्या व पशूंच्या शरीरांत प्रवेश करो आणि अन्नरहित व व्याधिरहित अशी शरीराची क्षीणता मी टाकतो. (म्हणजे माझें शरीर क्षीण न होवो.) ॥१०५॥ विनियोग - 'अग्ने तव' इत्यादि सहा ऋचांनीं वाळू पसरावी व त्यायोगें पुच्छपक्षरहित शरीर झांकावें. अग्ने॒ तव॒ श्रवो॒ वयो महि॑ भ्राजन्ते अ॒र्चयो॑ विभावसो । बृह॑द्भानो॒ शव॑सा॒ वाज॑मु॒क्थ्यं दधा॑सि दा॒शुषे॑ कवे ॥ १०६ ॥ अर्थ - प्रकाशरूपी द्रव्यवान् हे अग्ने, देवांना कर्माचें ज्ञान करून देणारा तुझा मोठा धूम व ज्वाला प्रकाशित होतात. महाकिरणवान् भूतज्ञ हे अग्ने, हविर्द्रव्य देणार्या यजमानाला यज्ञपर्याप्त अन्न बलांसह तूं देतोस. ॥१०६॥ विनियोग - पा॒व॒कव॑र्चाः शु॒क्रव॑र्चा॒ अनू॑नवर्चा॒ऽ उदि॑यर्षि भा॒नुना॑ । पु॒त्रो मा॒तरा॑ वि॒चर॒न्नुपा॑वसि पृ॒णक्षि॒ रोद॑सीऽ उ॒भे ॥ १०७ ॥ अर्थ - हे अग्ने, तूं मोठया प्रकाशानें उत्कर्ष पावतोस. तुझी दीप्ति शक्ति पवित्र करणारी आहे. तुझें तेज निर्मल आहे व पूर्ण आहे. मुलगा म्हातारपणीं आईबापांचें रक्षण करतो त्याप्रमाणें हे अग्ने, तूं संचार करून देवमनुष्यसहित जगाचें रक्षण करतोस व हविर्द्रव्यानें द्युलोकाला आणि वृष्टीनें भूमीला पूर्ण करतोस. अशा तुझी मी स्तुति करतो. ॥१०७॥ विनियोग - ऊर्जो॑ नपाज्जातवेदः सुश॒स्तिभि॒र्मन्द॑स्व धी॒तिभि॑र्हि॒तः । त्वे इषः॒ सन्द॑धु॒र्भूरि॑वर्पसश्चि॒त्रोत॑यो वा॒मज॑ताः ॥ १०८ ॥ अर्थ - अन्नाचा नाश न करणार्या व प्रज्ञानवान् अशा हे अग्ने, कर्मानिमित्तानें स्थापन केलेला असा तूं चांगल्या स्तुतींनीं आनंदित हो; कारण कीं यजमान तुझ्या ठिकाणीं हविर्द्रव्यरूपी अन्नांचा होम करतात. ते यजमान नानारूपी आहेत व नाना तर्हेची त्यांचीं अन्नें आहेत व ते उत्तम जन्माला आलेले आहेत. ॥१०८॥ विनियोग - इ॒र॒ज्यन्न॑ग्ने प्रथयस्व ज॒न्तुभि॑र॒स्मे रायो॑ऽ अमर्त्य । स द॑र्श॒तस्य॒ वपु॑षो॒ वि रा॑जसि पृ॒णक्षि॑ सानाअसिं क्रतु॑म् ॥ १०९ ॥ अर्थ - हे अमरणधर्मन् अग्ने, आमच्या ठिकाणीं तूं द्रव्यांचा विस्तार कर. तूं अध्वर्यूप्रभृतींनीं दीप्यमान आहेस व दर्शनीय चित्याग्निरूपी शरीरामध्यें विशेषेंकरून शोभणारा आहेस. तसेंच तूं आमच्या पुष्कळ दिवसांच्या इच्छेला पूर्ण करतोस. ॥१०९॥ विनियोग - इ॒ष्क॒र्तार॑मध्व॒रस्य॒ प्रचे॑तसं॒ क्षय॑न्तँ॒ राध॑सो म॒हः । रा॒तिं वा॒मस्य॑ सु॒भगां॑ म॒हीमिषं॒ दधा॑सि सान॒सिँ र॒यिम् ॥ ११० ॥ अर्थ - हे अग्ने, यज्ञाचा उत्पादक, चांगल्या चित्तानें युक्त, विशिष्ट स्थानीं राहणार्या यजमानाला तूं पुष्कळ द्रव्य देतोस व स्पृहणीय असें पुष्कळ धन व प्राचीन द्रव्य देतोस. ॥११०॥ विनियोग - ऋ॒तावा॑नं महि॒षं वि॒श्वद॑र्शतम॒ग्निँ सु॒म्नाय॑ दधिरे पु॒रो जनाः॑ । श्रुत्क॑र्णँ स॒प्रथ॑स्तमं त्वा गि॒रा दैव्यं॒ मानु॑षा यु॒गा ॥ १११ ॥ अर्थ - हे अग्ने, ऋत्विग् व यजमान दर्शपौर्णमासादि कालीं यज्ञाकरितां वेदवाणीनें तुझी अग्रभागीं स्थापना करतात. तूं सत्ययुक्त, मोठा, सर्वांत सुंदर, ऐकलेलें सत्य करणारा, अत्यंत कीर्तिमान् व देवांचा हितकर्ता आहेस. ॥१११॥ विनियोग - 'आप्यायस्व' इत्यादि दोन मंत्रांनीं पसरलेल्या वाळूला स्पर्श करावा. आ प्याय॑स्व॒ समे॑तु ते वि॒श्वतः॑ सोम॒ वृष्ण्य॑म् । भवा॒ वाज॑स्य सङ्ग॒थे ॥ ११२ ॥ अर्थ - हे सोमा, सर्व बाजूंनीं तुझेकडे सर्व प्राण्यांची उत्पत्ति करणारें सामर्थ्य येवो. त्यायोगें तूं सर्व तर्हेनें वाढ व आम्हाला अन्नाची संगति करणारा हो. ॥११२॥ विनियोग - सं ते॒ पयाँ॑सि॒ समु॑ यन्तु॒ वाजाः॒ सं वृष्ण्या॑न्यभिमाति॒षाहः॑ । आ॒प्याय॑मानो अ॒मृता॑य सोम दि॒वि श्रवाँ॑स्युत्त॒मानि॑ धिष्व ॥ ११३ ॥ अर्थ - हे सोमा, पेयरस, अन्नें व वीर्ये शत्रुनाशक अशा तुझ्याशीं एकत्र होवोत. हे सोमा, पय वगैरेंनीं वाढणारा तूं यजमानाला मरणरहित पुत्रादि प्रजा दे व द्युलोकांत उत्तम अन्नांचें धारण करणारा हो. ॥११३॥ विनियोग - आप्या॑यस्व मदिन्तम॒ सोम॒विश्वे॑भिरँ॒शुभिः॑ । भवा॑ नः स॒प्रथ॑स्तमः॒ सखा॑ वृ॒धे ॥ ११४ ॥ अर्थ - अतिशयेंकरून संतुष्ट करणार्या अशा हे सोमा, सर्व सूक्ष्मांशांनीं तूं वृद्धि पाव व तसा तूं आमच्या वृद्धीचा साहायक हो. तूं अत्यंत कीर्तिमान् आहेस. ॥११४॥ विनियोग - अग्नि नेले जात असतां होत्यानें 'आ ते' इत्यादि तीन ऋचा म्हणाव्या. आ ते॑ व॒त्सो मनो॑ यमत्पर॒माच्चि॑त्स॒धस्था॑त् । अग्ने॒ त्वाङ्का॑मया गि॒रा ॥ ११५ ॥ अर्थ - हे अग्ने, मुलाप्रमाणें तुला आवडणारा हा यजमान उत्कृष्ट अशाही देवयुक्त अशा द्युलोकांतून तुझ्या स्तुतीच्या इच्छेनें विशिष्ट अशा वेदवाणीनें आवरून मनाचा निग्रह करतो. ॥११५॥ विनियोग - तुभ्यं॒ ता अ॑ङ्गिरस्तम॒ विश्वाः॑ सुक्षि॒तयः॒ पृथ॑क् । अग्ने॒ कामा॑य येमिरे ॥ ११६ ॥ अर्थ - अतिशयेंकरून अन्न भक्षण करणार्या हे अग्ने, यजमान इच्छापूर्तीकरतां स्वर्गादि शुभस्थानें देणार्या अशा निरनिराळ्या तुझ्या स्तुति करतात. ॥११६॥ विनियोग - अ॒ग्निः प्रि॒येषु॒ धाम॑सु॒ कामो॑ भू॒तस्य॒ भव्य॑स्य । स॒म्राडेको॒ विरा॑जति ॥ ११७ ॥ अर्थ - अग्नि एकटाच आपल्या आवडत्या स्थानांवर विशेष प्रकाशतो. तो अग्नि उत्पन्न झालेल्या व भविष्यकालीन जनांच्या इच्छा पूर्ण करणारा व उत्तम शोभणारा आहे. ॥११७॥ ॥ द्वादशोऽध्यायः ॥ |