ॐ श्रीपरमात्मने नमः

श्रीविष्णुसहस्रनामस्तोत्र - नाममहिमा

भूमिका ..

सहस्र-भूमिका

(१) वैदिक वाङ्मय आणि सहस्रनाम कोणतीही व्यक्ति सर्वस्वी एकाकी असू शकत नाही. तिच्या मागे आणि पुढे एक प्रवाह असतो. त्या प्रवाहांत ती व्यक्ति बिन्दुवत् वा ओघवत् वाहत असते. व्यक्तीप्रमाणेच दर्शन विचार, वा ग्रंथ यांच्या संबंधींहि म्हणतां येईल. त्यांची अभिव्यक्ति ही कुठल्या तरी परंपरेंत झालेली असते. त्या परंपरेचा तो एक अंश असतो, तें एक अंग असते. अंश कितीहि स्वतंत्र भासले तरी त्यांचा विचार अंशीच्या अनुषंगानेच करावा लागतो. त्यावांचून त्याचा अन्वयार्थ नीट लागत नाही.

हे विष्णूचे नामसहस्र उघडच वैदिक परंपरेचे आहे. वैदिक-वाङ्मय-वृक्षाचें तें शेंडेफळ आहे असेंहि म्हणता येईल. ऋग्, यजुस्, साम आणि अथर्व या चार संहिता आणि (१) पाणिनीय शिक्षा, (२) कल्पसूत्रे, (३) पाणिनिकृत अष्टाध्यायी-व्याकरण, (४) यास्ककृत निरुक्त (आणि निघण्टु), (५) वराहमिहिरकृत ज्योतिष आणि (६) पिंगलकृत छन्दःशास्त्र ही वेदाची षडङ्गे मिळून दशग्रंथ होतात. हे दशग्रंथ वैदिक वाङ्मयाचा गाभा असून हे ग्रंथ पढलेल्या विद्वानाला दशग्रंथी ब्राह्मण म्हणतात. पण वैदिक वाङ्मय एवढेच नाहीं. ऐतरेयादि ब्राह्मणे, बृहदादि आरण्यकें, ईशादि उपनिषदें, पूर्वोत्तर मीमांसादि दर्शनें, मन्वादि स्मृति, भारतादि इतिहास, भागवतादि पुराणे, रामायणादि काव्ये आणि त्यावरील सायण-शाबर-शांकरादि भाष्ये, नीलकण्ठ्यादि टीका आणि सहस्रावधि निबन्ध प्रबन्ध हा सगळा वैदिक वाङ्मयाचा अफाट विस्तार आहे. या सगळ्यांचे आलोडन एका जन्मांत होणे कठिण. म्हणून म्हटले आहे -

अनन्तपारं किल शब्द-शास्त्रं स्वल्पं तथायुर् बहवश् च विघ्नाः।
सारं ततो ग्राह्यम् अपास्य फल्गु हंसो यथा क्षीरम् इवाम्बुमध्यात् ।।

पञ्चतन्त्र कथामुख या विचाराने वैदिक वाङ्मयाचें मन्थन करून अनेकांनी अनेक सारे काढली आहेत. पैकी दोन सारें लोकविख्यात असून तितकीच ती लोकप्रियहि आहेत. एक म्हणजे भगवद्गीता आणि दुसरें हें नामसहस्र. शंकराचार्यांसारख्या जगद्गुरूंनी त्यांच्यावर भाष्य लिहिली असून 'गेयं गीता-नामसहस्रम्' म्हणून त्यांची सर्वजनांना भलावण केली आहे.

वैदिक परंपरा ही अतिप्राचीन असून वाङ्मयीन प्रमाणांच्या दृष्टीने तीहून प्राचीनतर प्रमाण वा पुरावा अद्याप उपलब्ध झालेला नाही. भारतीय आर्य या परंपरेला सनातन म्हणतात. सनातन म्हणजे अनादि व अनन्त आणि म्हणून चिरस्थायी. अतिप्राचीन कालापासून ती अखंड चालत आलेली आहे आणि आजहि विद्यमान आहे म्हणून सनातन ह्या विशेषणास ती.पात्र आहे यात शंकाच नाही. म्हणूनच एका हिन्दुस्थानी कवीने म्हटले आहे :

'कुछ बात है कि हस्ती मिटती नहीं हमारी ।
सदियों रहा है दुश्मन दौरेज़मां हमारा ।।
यूनानो मिस्र रूमा सब मिट गये जहांसे ।
अबतक मगर है बाकी नामोनिशां हमारा ।।'

ती आपल्या परंपरेला सनातनत्व देणारी 'कुछ बात कोणती आहे ? नूसते ज्येष्ठत्व श्रेष्ठत्वाचे प्रमाण होऊ शकत नाही. पांढरी नि लांब दाढी जीर्णत्वाचे लक्षण आहे, वृद्धत्वा वा ज्ञानाचे नव्हे. म्हणून भारतीय परंपरेला नुसती आपली दाढी दाखवून भागणार नाही. तिला आपलें सत्त्व, ती आपली 'कुछ बात' अन्यत्रच शोधली पाहिजे. पण ती शोधायला लांब जायला नको. तीहि आपल्या परंपरेंत फार पूर्वीच सांगून टाकली आहे. 'न तेन वृद्धो भवति येनास्य पलितं शिरः। ' यो वै युवाप्यधीयानस् तं देवा: स्थविरं विदुः।।' जो वयाने लहान असला तरी ज्ञानोपासक आहे, तो महान् होय, तो वृद्ध होय. अर्थात् ज्ञानोपासना म्हणजेच सत्योपासना हे भारतीय आर्य परंपरेच्या दीर्घ जीवित्वाचे नि महत्तेचे रहस्य होय. सनातन सत्याचा अखंड शोध हाच वैदिक ऋषींचा धर्म आणि त्यासाठी कुठल्याहि ठरीव आचाराला वा विचाराला आपल्याला कायमचे बांधून न घेणे, सत्याचे ग्रहण करायला बुद्धि सदैव खुली राखणे हाच त्यांचा संप्रदाय. 'बुद्धेः फलं अनाग्रहः' हे त्या सत्योपासकांचेच सूत्र होय आणि तेच सनातनत्वाचे मर्म.

या सत्यग्राही नि अनाग्रही वृत्तीचाच परिणाम हा की, या हिन्दु धर्माचे, संस्कृतीचे नि परंपरेचे अमुक एक लक्षण सांगणे अशक्य आहे. ईश्वराला मानणे हे हिंदु धर्माचें व्यावर्तक लक्षण आहे काय ? नाही. सांख्यवादी नि पूर्वमीमांसक ईश्वर मानीत नसूनहि ते हिंदु आहेत. विष्णुनामसहस्रांत एवढ्याचसाठी ‘महर्षि: कपिलाचार्य:' असें नांव येऊ शकले. वेदांना प्रमाण मानणे हे हिंदु धर्माचे लक्षण आहे काय? नाही. सांख्यवादी, चार्वाकवादी (लोकायतिक), योगवादी, जैन, बौद्ध हे सर्व हिंदु असून ते वेदांना मानीत नाहीत. वेदान्तीहि वैदिक यज्ञकांडाला मानीत नसल्यामुळे तेहि वस्तुतः अवैदिकच होत. वर्णाश्रम धर्म मानणे हे हिंदु धर्माचे लक्षण आहे काय? नाहीं. जैन, बौद्धच नव्हेत तर महानुभाव, शीख, ब्राह्मसमाजी इत्यादिहि वर्णाश्रम धर्म मानीत नाहीत. तरी ते सर्व हिंदुच होत. अमुक एका गुरूला मानणे हे हिंदु धर्माचे लक्षण आहे काय? नाही. कोणी कोणालाही गुरु मानावें नि भजावें. त्याला प्रतिबंध नाही. पीराला भजणारे हिंदु आहेत. महंमदाला व खिस्ताला गुरु मानणारेहि हिंदू असू शकतात. दयानंद रामकृष्णादि अवतारांना मानीत नाहीत तरी ते हिंदूच आणि दयानंदांनाच मानणारे आर्यसमाजीहि हिंदुच. गोभक्ति हे हिंदु धर्माचे लक्षण आहे काय? नाही. गाईला एक पशु, कदाचित् भक्ष्यहि मानणारे, सावरकर हि हिंदुच होत. यज्ञ, याग, व्रत, उपवास, तीर्थयात्रा, दान इत्यादि अमुक एक आचार करणे हे हिंदु धर्माचे लक्षण आहे काय? नाही. कोणताही विशिष्ट विधि करणे वा न करणे हे हिंदु धर्माचें लक्षणं नाही. यज्ञ, दान, तप आणि स्वाध्याय न करणारे हिंदु आहेत. विशिष्ट चिह्न, यज्ञोपवीत, शिखा, भस्म, गंध इत्यादि वा लंगोटी, पंचा, धोतर, साडी वगैरे पोषाख हिंदु धर्माचे लक्षण आहे काय? नाही. कोणतेंहि चिह्न वा पोषाख धारण करणे वा न करणे हिंदु धर्माचे लक्षण नाही. बिनशेंडीचा, बिन जानव्याचा, भस्म वा गंध न लावणारा, हवा तो पोषाख केलेला हिंदु असू शकतो. भारत देशाचा अभिमान बाळगणे वा भारतांतच वास्तव्य करणे हे हिंदु धर्माचे लक्षण आहे काय? नाही. 'स्वदेशो भुवनत्रयम् 'म्हणणारे शंकराचार्य हिंदूच होते आणि अनेक लोक परदेशांत जन्मलेले आणि मेलेले हिंदुच होते आणि आहेत. तात्पर्य, कोणत्याहि व्याख्येत हिंदु धर्म बसवता येत नाही. व्यवहारतः जो कोणी आपल्याला हिंदु म्हणेल तो हिंदु अशी व्याख्या होऊ शकेल आणि तत्त्वत: जो कोणी सत्यग्राही नि अनाग्रही वृत्ति बाळगून अग्राम्य नि अननार्य जीवनांत उत्तरोत्तर निरन्तर आरोहण करण्याचा सोत्साह पराक्रम करील तोच हिंदु म्हटला पाहिजे, आर्य म्हटला पाहिजे. आणि अशा आर्यत्वाची जगाला दीक्षा देण्याची पात्रता हि त्याच्याच ठाईं संभवते. 'कृण्वन्तो विश्वं आर्यम्' विश्वाला आर्यत्वाची दीक्षा देत असे आत्मे जगांत सदेह वा विदेह संचरत असतात. अशा दीक्षागुरूंच्या चिंतनाचा एक नमूना म्हणजे हे नामसहस्र होय.

(२) महाभारत आणि नामसहस्र आर्यांचा धर्म, तत्त्वज्ञान, संस्कृति, किंबहुना संपूर्ण लौकिक व पारलौकिक जीवन, यांचे मूळ वेद होत. म्हणून त्यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यांचा अस्वीकार आणि अनादर करणाऱ्या भल्याभल्यांना, त्यांचा विचारांश मान्य करूनहि, भारतीय आर्यांनी फेक्न दिले आहे. जैन आणि बौद्ध संप्रदायांच्या प्रवर्तकांचे, त्यांच्या वाङ्मयाचे आणि अनुयायी वर्गाचे भारतांतून जवळपास उच्चाटन होण्याचे मुख्य कारण हेच होय. "अतुलित महिमा वेद की तुलसी कियो विचार। जो निन्दत निन्दित भये बिदित बुद्ध अवतार।।'' अशा या वेदांचा विस्तार म्हणजे महाभारत होय. म्हणून त्याला 'पंचम वेद' असे गौरवपूर्ण अपर नामाभिधान लाभले आहे. 'महत्त्वाद् भारतत्त्वाच्च महाभारतमुच्यते।' महाभारताचे 'हे' महत्त्व आणि 'हा' भार लक्षणीय होय. अशा या महाभारताच्या अनुशासनपर्वांत हे सहस्र आलेले आहे. भांडारकर प्राच्य विद्या संशोधन मंदिराने प्रकाशित केलेल्या महाभारताच्या चिकित्सित आवृत्तीत अनुशासन पर्वाचा १३५ वा अध्याय म्हणजे विष्णुसहस्रनामस्तोत्रच होय. प्रास्ताविक आणि उपसंहारात्मक भाग अनुक्रमें श्लोक १ ते १३ आणि श्लोक १२१ ते १४२ वगळतां प्रत्यक्ष नामसहस्र श्लोक १४ ते १२० ह्या १०७ श्लोकांत आलेले आहे.

या ग्रंथाला जरी सामान्यतः विष्णु नाम वा विष्णुसहस्रनाम-स्तोत्र म्हणण्याचा प्रघात असा तरी त्याचे नाम स्वतः त्या ग्रंथांतच नाम-सहस्र म्हणूनच आलेलें आहे. (पहा श्लोक ४, १२, १२१, १२५, १२९). शंकराचार्यहि त्याचा उल्लेख नाम-सहम्र असाच करतात. पहा 'गेयं गीता-नामसहस्रम्'. या १४२ श्लोकांत कुठेही सहस्रनाम, विष्णु-सहस्रनाम अथवा विष्णुसहस्रनामस्तोत्र असा उल्लेख आलेला नाही. जयाचें भारत आणि भारताचे महाभारत होतांना ह्या नामसहस्रांत कांहीं प्रक्षेप करणे शक्य झाले नसावें. कारण ते संख्याबद्ध आहे. तथापि प्रास्ताविक आणि उपसंहाररूप भागांत असा प्रक्षेप झाला असावा. शक्य तिथे प्रक्षेपाने ग्रंथ-विस्तार केल्यावांचून भारताचे महाभारत झालेलें नाहीं हे उघड आहे. प्रास्ताविकांत युधिष्ठिराचा प्रश्न आणि त्याला दिलेलें विशृंखल उत्तर पाहिलें म्हणजे इथे प्रक्षेप झाला असावा असा संशय येतो. त्याचप्रमाणे उपसंहारांत एकदां फलश्रुति सांगून संपविल्यानंतर परत वासुदेव-माहात्म्य वर्जून हे त्या वासुदेवाचे नामसहस्र जो गाईल त्याला विपुल यश मिळेल इत्यादि फलश्रुति आली आहे. हा प्रक्षेप विस्तार दिसतो. वासुदेव हे नाम नारायणाहून अर्वाचीन आहे आणि विष्णुहून तर बरेंच अर्वाचीन आहे, असे म्हणता येईल. विष्णु वैदिक नाम आहे, नारायण पौराणिक आहे आणि वासूदेव ऐतिहासिक आहे असें स्थूल मानाने म्हणणे शक्य आहे. प्राचीन वाङ्मयांत ह्या नामांच्या अभ्यासावरून वा पौन:पुन्यावरून (frequency) त्यांच्या कालानुक्रमाचें असें अनुमान करायला जागा आहे. 'इतीदं' 'य इदं' इथें इदं हे नपुंसकलिंगी सर्वनाम 'सहस्रम्' करितां आले आहे. पुढे 'इमं स्तवं अधीयानः' इत्यादि पुंल्लिंगी प्रयोग आला आहे. कदाचित् प्रक्षेपामुळे ह्याची गरज उत्पन्न झाली असेल. पण ते कसेंहि असो, इतकें बरीक खरें की प्रक्षेप मूळ नामसहस्राच्या संहितेंत झालेला नाही. पाठभेद वा अपपाठ त्यांत असू शकतील, पण प्रक्षेप नाहींत. तथापि भारताचे महाभारत करण्यांत ज्या कांहीं युक्त्या, क्लृप्त्या योजिल्या आहेत त्यांत नलरामादिकांची नाना आख्याने कणिकविदुरादि नीति, यक्षप्रश्नादि संवाद, गीतानुगीतादि उपदेश आणि नामसहस्रादि स्तोत्रे अशा आधीच स्वतंत्रपणे अस्तित्वांत असलेल्या कृतींचा समावेश करणे ही युक्ति विशेष उपयोगी पडलेली आहे असे म्हणता येईल. अर्थात् सबंधचें सबंध नामसहस्रच महाभारतांत एक प्रक्षेप असू शकेल.

महाभारत ही एक शतसहस्र संहिता आहे. तिचे मुख्य भाग दोन : १) आख्यायिका, २) तात्पर्य. फळांत एक कवच असते आणि दुसरें असतें सार. आपण सार घेऊन कवच फेकून देतो. भारताचे सार भारतसावित्री म्हणून प्रसिद्ध आहे. गायत्री मंत्र तो वेदसावित्री तशी ही भारत-सावित्री. आणि तिचेच परोपरीने केलेले समर्थन आणि उपबृंहण म्हणजे महाभारतांत ठाई ठाईं आलेले असंख्य तत्त्वोपदेश होत. गीता त्या सर्व तत्त्वोपदेशाचा अर्क आहे आणि विष्णुनामसहस्र त्याचा भावानुवाद. शब्द गोवत् स्थूल होत. त्यांचा अर्थ दुग्धवत् सूक्ष्म म्हणावयाचा. पण भाव हा घृतवत् सूक्ष्मतर वा अव्यक्त म्हटला पाहिजे. त्या भावाचे गायन म्हणजे हे नामसहस्र होय. भावमय होऊनच तें गुणगुणायचे आणि त्यांतच आपल्याला विसरून जायचे. हाच त्याचा विनियोग. जो अशी नित्य नामसमाधि लावतो तो मरणकालीहि तींत स्थित होऊन मुक्त होतो. ही प्रयाणकालीन साधना गीतेने पुढील श्लोकांत वर्णिली आहे.

ॐ इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मां अनुस्मरन् ।
य: प्रयाति त्यजन् देहं स याति परमां गतिम् ।।

तदनुसार हे सहस्र गात आणि ध्यात महाभागवत भीष्म निजधामास गेले. त्यामुळे ह्या नामसहम्राला आध्यात्मिक महत्त्वाबरोबर ऐतिहासिक महत्त्वहि लाभले आहे. आणि त्यामुळेच त्याचा भारतीय आर्यामध्ये व्यापक प्रचार झाला आहे. त्याच्याइतकें लोकप्रिय दुसरें स्तोत्र दाखविणे कठिण आहे.

(३) विष्णुनामसहस्र आणि इतर सहस्रे विष्णुनामसहस्र म्हणण्याचा परिपाठ हिंदु समाजांत सर्वत्र आहे. ब्राह्मण आणि इतरहि वर्णांचे लोक त्याचा नित्य पाठ करीत असतात. स्वतंत्ररीत्या आणि पारायणाच्या अन्तीं तें म्हणण्याची प्रथा आहे. भगवान् विष्णु शिवाचें कमलपुष्पांनीं सहस्रार्चन करीत असतां त्यांत एक कमल कमी पडले तेव्हां त्याने आपलें एक नेत्रकमल उपटून तेंच वाहिले आणि आपलें सहस्रार्चनव्रत पार पाडलें अशी आख्यायिका आहे. सहम्राहुति यज्ञाप्रमाणे हे सहस्र अक्षता, मंजिऱ्या बिल्वदलें वा कमलें वाहून पूजन करण्याची रीति निघाली आणि चालली. त्यामुळेहि सहस्राचा प्रसार खूप झाला. मंत्र म्हणायचा, स्वाहाकार करायचा आणि आहुति द्यायची त्याप्रमाणे विश्वस्मै नमः विष्णवे नम: असें म्हणायचे आणि देवाला एक एक फूल वहायचे. अशा या यज्ञांत आणि नाम-यज्ञांत देह, प्राण, मन तिहींचा संगम आहे. मनाने दैवताचें ध्यान करायचे म्हणजे त्याचे रूप मनश्चलूंसमोर आणायचे, वाणीनें त्याचा मंत्र, स्तोत्र वा नाम उच्चारायचे आणि हातांनी तत्प्रीत्यर्थ समर्पण करायचे. या तिन्ही कर्मपंथांनी जेव्हां आपण यजन पूजन करतो तेव्हांच तें उपासनाकर्म सर्वात्मना झालें असें म्हणावयाचे. सर्व उपासनांमध्ये हे तत्त्व कोणत्या ना कोणत्या प्रकारें अनुस्यूत असते. यज्ञभावनेने सूत कातणारा आपल्या मनश्चक्षूसमोर दरिद्र-नारायणाची मूर्ति आणतो, त्याच्या सेवेसाठी मी हे सूत काततों असें तो म्हणतो, त्याचा मंत्र 'वन्दे मातरम्' असतो, आणि शेवटीं सूत कांतून तें तो 'इदं न मग' म्हणून राष्ट्रदेवाला अर्पण करतो.

विष्णुनामसहस्राची ही लोकप्रियता पाहून इतर संप्रदायांनीहि आपआपल्या दैवतांची अशी सहमें रचिलीं आहेत. ललितासहस्र, शिवसहन, गणेशसहस्र, गोपालसहभ्र इत्यादि अनेक सहनै निघाली. परंतु त्यांना विष्णुसहस्राची सर नाही. कारण ती सांप्रदायिक आहेत. एका विशिष्ट देवतेची ती सहस्र नामें आहेत. त्यांत विष्णुसहस्राची व्यापकता नाही, खोली नाहीं, तो तत्त्वस्पर्श नाही.

विष्णुसहस्राची ही अनुकरणे जशी झाली तसें तें सबंध सबंधच इतर पुराणांत उद्धृत झाले आहे. कदाचित् मूळ महाभारतांतलेच पण. तेंही स्कंद पुराण (५/६३/७६, २०५) नारद-पंचरात्र (४/३ आणि ४/८) त्याचप्रमाणे गरुडमहापुराण (७१५) यांमध्येहि आढळतें.

विष्णुसहस्राचे अवांतर संक्षेपहि रूढ असावेत असें दिसते. विष्णुमहापुराणांत विष्णुशतनामस्तोत्र आले आहे. चित्रशाळा मुद्रणालय, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या हरिवंशाच्या परिशिष्टांत तें दिले आहे. सर्वांत छोटा पण प्रचाराने मोठा संक्षेप म्हणजे संध्येतील चोवीस नामें होत. ती सर्व विष्णुसहस्रांतूनच घेतलेली असून अधिकतर कृष्णपर आहेत. संध्येतला मुख्यविधि गायत्रीजप आहे. पण गायत्री सर्व वर्णांना खुली नाही म्हणून गायत्रीच्या २४ अक्षरांवरून २४ च नामांची एक नाम-चोविसी तयार केली आणि ती संध्येत आरंभीच जोडून दिली. ह्या नाम चोविशीचाहि ज्याने जप केला त्याने संध्या केली अशी कल्पना. ही सार्ववर्णिक संध्या झाली. पण अराजक असंघटित संकरप्राय हिंदु समाजांत तिचाहि सार्वत्रिक रूढ विधि होऊ शकला नाही, ही गोष्ट वेगळी.

(४) विष्णु-सहस्र आणि गोपाल-सहस्र विष्णु-परमात्याचेंच नांव जर गोविन्द आणि गोपाल आहे तर विष्णु-सहस्र असतांना परत गोपाल सहस्र कशाला? त्याचे कारण गीतोपदेशक देवकीपुत्र वासुदेव वेगळा आणि नन्दनन्दन यशोदेचा लाल राधारमण गोपाल वेगळा. हे दोन कालांतराने एकवटून पौराणिक कृष्ण-कथा निर्माण झाली आहे. विष्णुसहम्रांत केशिहा आहे चाणूरान्ध्रनिषूदन आहे पण कंसहा नाही. वस्तुतः कंस-विध्वंस हे त्याचे एक अवतारकार्य होय. त्याचा उल्लेख असायला पाहिजे होता. पण विष्णु-सहभ्रांत ती कृष्णलीला नाही. विष्णुसहस्रांत नामें सर्व गौण म्हणजे गुणवाचक आहेत. जी नामें ऐतिहासिक वा व्यक्तिवाचक घेतल्यावांचून सुटकाच नाही अशी नामें थोडीच आहेत आणि ती हि अन्यथा लावणे अशक्य नाही. गोपाल कृष्णाला पोरपण आहे, पण गीतोपदेष्ट्या वासुदेव कृष्णाला थोरपणच आहे. पण पूर्णाकार मूर्ति रचायची तर नुसते मुंडकें चालायचे नाहीं नि नुसतें धडहि चालायचे नाही. दोहोंचे एकीकरण पाहिजे. पौराणिक कृष्ण-कथेत तसें तें केलेले आहे. वस्तुत: कृष्णकथा म्हणजे पूर्णावतार-कथा आहे. गाणसाचा पूर्णावतार बाल्य, तारुण्य आणि वृद्धत्व मिळून होतो. त्या तिहींचा स्पृहणीयतम भाग घेऊन कृष्णाचा पूर्णावतार कवींनी कल्पिला आहे. बाललीला आणि क्रीडा सर्वांना सुखवितात. तारुण्यांतील तारुण्यसुलभ शृंगार आणि वीरता म्हणजे पराक्रम सर्वांना आकृष्ट करतात. वृद्धत्वातील संशयच्छेदी ज्ञान आणि संसारच्छेदी वैराग्य सर्वांना भारून टाकतात. असा त्रिवेणी संगम जिथे झाला आहे तोच पूर्णावतार होय. असा पूर्णावतार स्वभावतांच अपूर्ण असलेल्या मानवाच्या ठाईं संभवत नाही आणि त्या पूर्णावताराची ओढहि त्याला कधी सोडीत नाही. तेव्हां कवि पुढे सरसावतो आणि अशा अलौकिक पूर्णत्वाची कथा आपल्या काव्यांत रंगवतो. आणि प्रत्येक मानवाचें तें अंतरतर चिर-अभिलषित असल्यामुळे त्याला तें अतीव सुखविते. आणि नुसतेंच सुखवीत नाही तर तदर्थ दिव्य करायचे अपार्थिव साहसहि त्याला तें देत असते. त्याच पूर्णत्वाच्या अनिवार प्रेरणेतून रामकृष्णादि महापुरुष निर्माण होतात, बुद्ध, येशू, गांधी अवतरतात आणि पूर्ण पूर्णतर होत जाते. प्रत्येक तरंगवलय आपल्या पूर्वीच्या तरंगवलयाहून मोठे असतें तद्वत् मागील अवताराहून पुढचा अवतार हा मोठा असतो. आणि त्या काळचा तोच पूर्णावतार म्हटला जातो. रामावतारी रामच पूर्णावतार आणि कृष्णावतारी कृष्णच. पण रामाहून कृष्ण मोठा, आणि कृष्णाहून अतिकृष्ण हरि मोठा. 'पूर्णात् पूर्ण उदच्यते'. विष्णुनामसहस्र त्या पूर्णत्वाचे गायन करतें ज्याच्या अगाध जलराशीवर एकामागून एक अवतारांचे तरंग उठत असतात. तथापि वर्तमान अवतार म्हणून भगवान् कृष्णाचा विशेष उल्लेख त्यांत होणे अपरिहार्यच होय आणि म्हणून इतर कोणत्याहि अवताराहून कृष्ण-अवताराची वाचकें अधिक आली आहेत. (१) अमृतांशूद्भव, (२) यदुश्रेष्ठ, (३) शौरि, (४) वासुदेव, (५) देवकीनन्दन, (६) गदाग्रज, (७) चाणूरान्ध्रनिषूदन, (८) सुयामुन इत्यादि कांहीं नामें स्पष्टच कृष्णव्यक्तिवाचक होत. ही अगदी मोजकीच आहेत. आणि त्यांचाहि गुणवाचक म्हणून अर्थ लावणे शक्य आहे. आणि अनेकदां तसा तो लावलाहि आहे. गुणवाचक नामें तर गुणवाचक आहेतच पण व्यक्ति-वाचक नामेंहि वस्तुत: गुणवाचकच होत. व्यक्तित्व म्हणजे तरी काय? विशिष्टगुणसमुच्चयच. त्या (सदसत्) गुणसमुच्चयांतील प्रकृष्ट गुण म्हणजेच मुख्यत: व्यक्तित्व. जसें कर्ण म्हटला म्हणजे दानशूरता. भीम म्हटला म्हणजे बलाढ्यता इत्यादि गुणोत्कर्ष आपल्या डोळ्यांसमोर उभे राहतात. आणि व्यवहारांत त्यांचा आपण तसा प्रयोगहि करतो. 'तो बृहस्पति आहे'. 'ती साक्षात् लक्ष्मी आहे' इत्यादि प्रयोगांत विद्वत्ता, सौन्दर्य इत्यादि गुणांचाच गौरव केलेला आहे हे उघड आहे. गोपालसहस्रांत विशिष्ट नामरूपगुणकर्मावर भर देऊन लीला-प्रधानतेवर भर देऊन, विष्णुसहस्राहून ते वेगळे कल्पिलें आहे. विष्णुसहस्रांत व्यक्तीपेक्षां गुणांवर भर दिलेला असून तें स्थूल अवतार-कथांहून वेगळे, सूक्ष्म भावावर भर देणारे आहे. परमात्म्याचे सर्वात्मक व्यापक रूपगुणवर्णन करणारे आहे तें. अशी दोहोंतील दृष्टि भिन्न आहे. तथापि परस्परांचा अविरोधच समजला पाहिजे. या बाबतींत गीतेच्याच भाषेत -

'व्यक्ती अव्यक्त जो पाहे अव्यक्ती व्यक्त जो तसें ।
तो बुद्धिमंत लोकांत जाणे तत्त्व समग्र तो।।" असें म्हणता येईल.

शेवटी अगदी थोडक्यांत नेमके बोलायचे म्हणजे गोपालसहम्र वा तत्सम इतर सहस्र अन्यदेवता-पर, तर विष्णुसहस्र हे भगवत्-पर होय, असें म्हटले पाहिजे.

(५) नाम-महिमा परमात्मा हा अनन्त आहे. कोणत्याहि दृष्टीने पहा त्याला इयत्ता नाहीं, मिति नाही. त्यामुळे त्याच्या उपासनांनाहि मिति नाही. ज्याला जी उपासना लाभली वा आवडली ती त्याने अंगीकारावी आणि तद्द्वारा परमात्म्याशी ऐक्य अनुभवावें. या अचिंत्य परमात्याच्या उपासनेच्या मुख्य दोन शाखा आहेत. (१) निर्गुण आणि (२) सगुण; तत्त्वत: निर्गुण विचारावरच स्थिर व्हावें लागते. कारण, अन्तिम विश्लेषणांत नागरूप मिथ्या ठरून वस्तूची केवलताच तेवढी सिद्ध होते. पण त्याचबरोबर तिवें ग्रहण नामरूपावांचून परशारेंच सहसा होत नाही. म्हणून सगुणाची कास ही धरावीच लागते. साधनेच्या या दोन अंगांची दोन टोके म्हणजे निर्गुण अंगाला नामहि सहन न होणे आणि सगुण अंगाला स्थूल मूर्तिहि चालणे अशी म्हणता येतील. नाम त्या दोहोंचा सुवर्णमध्य आहे. तो शब्दहि सहन न करण्याइतका अति अव्यक्त नाहीं आणि चतुर्भुजादि मूर्ति कल्पिल्याशिवाय भागावयाचे नाही इतका अति स्थूल हि नाहीं. नाम हे व्यक्ताव्यक्त आहे. तें अव्यक्ताचाच निर्देश करतें पण त्याचबरोबर व्यक्ताचाहि निषेध करीत नाही. कारण, अव्यक्त हे व्यक्तगर्ग आहेच', आणि व्यक्त हैं अव्यक्तपर्यवसायीच आहे. किंबहुना अव्यक्तच्छायारूपच आहे. छाया वस्तूहून स्वतंत्र असत नाही. त्यामुळे तिचा अत्यंत निषेध म्हणजे एकपरी वस्तुचाच निषेध म्हणावा लागेल तो. आणि तसें करणे कोणालाहि केव्हां हि शक्यच नाही. व्यक्ताव्यक्ताचा हा असा परस्पर-संबंध लक्षांत घेऊन उभयवाचक शब्द म्हणजे नाग होय आणि तें सर्व वेदांचे म्हणजेच सर्व ज्ञान-कर्म-उपासनांचे सार होय. असें हें नाम सगुण आहे, निर्गुण आहे, आणि त्या दोहोंच्या पर आहे असा ऋषींचा निष्कर्ष आहे. अशा या नामाचा उपदेश काशीत तो विश्वनाथ सर्वाना सारखा करीत बसला आहे. किंबहुना नागावांचून दुसरें कांहीं तो बोलतच नाही. ज्ञानदेव म्हणतात : "सार सार सार विठोबा नाम तुझें सार । म्हणोनि शूलपाणि जपताहे वारंवार ।।" त्या आदिनाथापासून गुरुशिष्यपरंपरेने चालत आलेल्या या नामाचाच उपदेश आपल्याला आपल्या गुरूंनी श्रीनिवृत्तिनाथांनी दिला आहे. असे ते दुसन्या एका भजनांत सांगत आहेत : "शांतीची पै शांति निवृत्तिदातारु । हरिनाम-उच्चारु दिधला तेणें।" त्याच. हरिनागाचा पाठ त्यांनी आपल्या शिष्य-प्रशिष्य सांप्रदायिकांना म्हणजेच वारकऱ्यांना आणि तद्द्वारा सगळ्या महाराष्ट्राला, किंबहुना जो ऐकेल त्याला, दिला आहे. या हरिनामाचे महत्त्व मध्ययुगीन सर्वच आचार्य, संतमहंत आणि साधु-सज्जनांनी सर्वत्र दुमदुमविलें आहे. इकडे महाराष्ट्रांत 'विठूचा गजर'' होता, तर तिकडे बंगालांत 'हरि बोल' चा गदारोळ उठला. शंकराचार्यांनी आसेतु-हिमाचल पादाक्रांत करून सर्वत्र "भज गोविन्दम्, भज गोविन्दम्' ची चर्पटपंजरी वांटली आहे. कबीर, नानक, मीराबाई, तुलसीदास उत्तरेला तर शैववैष्णव भक्त दक्षिणेला; नरसी मेहता पश्चिमेला, तर शंकर माधव थेट पूर्वेला नामघोषाने दिग्दिगन्त दुमदुमवून सोडीत आहेत. असें समग्र भारताला संतांनी नागमय करून सोडले आहे. या सर्वांचा प्रिय आणि पूज्य आद्य नाम-ग्रंथ विष्णुनामसहस्रच होय. त्याचाच अनुवाद त्यांनी आपआपल्या प्राकृत भाषांत विविध पदावलीत केला आहे.

वेदानुवचन आणि यज्ञ, दान व तप ही वैदिक उपासना आहे. पण तिचा फक्त त्रैवर्णिकांनाच अधिकार आहे. वेदमंत्र सर्वांना खुले नाहीत. हे एक आणि दुसरे म्हणजे ज्यांना खुले आहेत त्यांनाहि ते अति दुर्बोध आहेत. यज्ञकर्माचे अनुष्ठान वेद-वेदांगांच्या ज्ञानावांचून आणि साधन-संपत्तीवांचून करणे शक्य होत नाही. सूक्ष्म कालज्ञानहि त्यासाठी हवें. दानालाहि पात्रापात्र-विचार हवा. आणि द्रव्यानुकूलताहि हवीच. तपांत ज्ञान हवें, विवेक हवा आणि कष्टसहिष्णुताहि हवी. या सगळ्या गोष्टी सर्वांना सुलभ नाहींत. नामाला या कशाचीच गरज नाही. त्याचा उच्चार कोणीहि आणि केव्हांहि करूं शकतो. त्याचा विधि यज्ञासारखा जटिल नाहीं वा वित्तसाध्यहि नाही. आज्याची गरज नाही. पत्रपुष्पाने वा तोयदानानेंहि तो भगवान् संतुष्ट होतो. कृचांद्रायणादि विषम व्रतें आचरायला नकोत. नित्य गंगालयाचें स्नान व एकादशीचा उपवास पुरें. मोठ्या कष्टाची गरज नाही. असा हा भागवत-संप्रदाय आहे. कोणताहि संप्रदाय म्हटला, उपासना- पद्धति म्हटली की, तिचे काही विधिनिषेध हे असायचेच. तसे ते श्रद्धाभूलक नामप्रधान भूतसेवामय, भागवत-संप्रदायाचे वा भक्तिपंथाचेहि आहेत. त्यालाच सारांशाने गीतेनें “यज्ञानां जपयज्ञोऽस्मि' म्हणून गौरविलें आहे. यज्ञाचे हे शुद्धीकरण आणि सुलभीकरण वा व्यापकीकरण आहे. उत्तरोत्तर सत्य आणि संयग यांचे अनुसरण करून धर्माचें असें शुद्धीकरण केल्यानेच तो धर्ग सनातन या पदवीस प्राप्त होतो. यज्ञांत अचिंत्य दैवी शक्तीला आवाहन हा मनोयोग, मन्त्रोच्चार हा वाग्योग आणि हवन हा क्रियायोग आहे. भक्तिभावाने नामोच्चार करून आणि हात जोडून व डोकें लववून केलेल्या नमस्कारांतहि तो विविध योग आहे. पण यज्ञांतील तो त्रैवर्णिकाधिकार-वाद, तो अगम्य व असुकर गन्त्रोच्चार आणि ती पशुहिंसा व ते नियमबद्ध हवन हा गौणभाग त्यांत नाही, यज्ञाचें तें सार नव्हे, टरफल आहे.

श्रद्धामूलक नाभप्रधान भूतसेवारूप या वैष्णव वा भागवत धर्माचे तत्वदर्शन अद्वैत, की द्वैत, की विशिष्टा द्वैत? याचे उतर यथारुचि तुम्ही हवें तें समजा, त्याचा त्याबाबत अनाग्रह आहे. तो दोन्ही नामें घेतो- "एको नैक:'. तो परमात्गा अद्वितीय एक आहे. तो एकच नाही, त्याच्या सवें जीवहि आहे जगत्हि आहे. दिसायला गणिणी एक दिसली, तरी तिच्या पोटांत गर्भ ही दुसरी जीवसता नांदत असते, आणि जिथे गर्भ नि गर्भिणी आहे तिथे धाताहि आहेच हे सांगणे न लगे. युक्तीने सर्वच दर्शनें उपपन्न होतात. कोणतेंहि दर्शन स्वीकारलें तरी सर्वत्र नाग हे सगानच मान्य आहे. तें दर्शनाच्या पलीकडे आहे. अद्वैतवादी शंकराचार्या, विष्णु-नामसहस्रावर भाष्यच आहे. इतर सांप्रदायिकांच्या टीका आहेत. शंकराचार्य शैव होते, इतर आचार्य वैष्णव होते. प्रस्थानत्रयीप्रमाणे नागसहभ्राचे सर्वाना समान आकर्षण आहे आणि त्याचा पाठ सर्वच संप्रदायांत होतो.

भलो जो है पोच जो है, दाहिनो जो बाम रे। रामनाम ही सो अन्त, सबही को काम रे।। सज्जन असो वा दुर्जन असो, इष्ट असो वा अनिष्ट असो, सर्वांना शेवटी रामनाम घ्यावेच लागतें असें तुलसीदासांनी म्हटले आहे. तेच अद्वैती, द्वैती, विशिष्टाद्वैती इत्यादि मतवाद्यांनाहि लागू आहे. कोणतेंहि मत वा उपपत्ति तुम्हीं अंगीकारली तरी उपासना आणि प्रयाणकालीन साधना म्हणून नाममहिमा अभंगच राहतो. गीतेने म्हटले आहे :
(१) मां अनुस्मर युध्य च। (२) ॐ इत्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मां अनुस्मरन् । य: प्रयाति त्यजन् देहं स याति परम गतिम् ।।

अन्तिम दर्शनाप्रमाणे साधनाबाबतहि भेद आहेत. कोणी ज्ञानमार्गी तें अन्तिम दर्शन प्राप्त करून घेण्यासाठी महावाक्यविचार वा तत्-त्वं-पदार्थशोधन हाच मार्ग योग्य असें म्हणतात. कोणी योगमार्गी चित्तवृत्ति-निरोध हाच त्याचा शास्त्रीय उपाय होय, असे प्रतिपादितात. कोणी कर्ममार्गी म्हणतात, निषिद्ध कर्मे वर्ण्य करणे, काम्य कर्मे सोडून देणे आणि स्वधर्म-कर्मे फलवासना न राखतां करणें हाच श्रेयोमार्ग आहे; परंतु भक्तिमार्गी म्हणतात, त्या परमात्म्याच्या ठाईं परम श्रद्धा ठेवून त्याचेच निरन्तर स्मरण करणे आणि सर्व कर्मे त्यालाच समर्पित करणे हाच सर्वोत्कृष्ट श्रेयोमार्ग होय. ज्ञानमार्गात बुद्धि, योगमार्गांत चित्त, कर्ममार्गांत देहेद्रिये आणि भक्तिमार्गांत हृदय वा जिव्हाळा हे मुख्य हत्यार आहे. तें हत्यार हस्तगत करून त्यालाच जो उत्तरोत्तर निर्दोष धारदार आणि पाणीदार बनवीत राहील तोच शेवटीं फावणार. सिद्धि ही साधनाधीन असल्यामुळे साधनाचे महत्त्व निरतिशय आहे, हे उघड आहे. पण साधनें अनेक असल्यामुळे त्यांत निवड करावी लागते. साधक म्हणजे सिद्धिक्षम असेल तेंच साधन या पदवीस पात्र होतें. ज्या साधनाने क्षिप्र आणि अल्पायासाने साध्य हस्तगत करतां येतें तें उत्तम साधन म्हणावयाचे. जे साधन अपात्रांतील अपात्रालाहि अशी क्षिप्र व अनायास सिद्धि मिळवून देतें तें तर उत्तमोत्तम साधन म्हणावयाचें. नाम हे असें उत्तमोत्तम साधन आहे. -

क्षिप्रं भवति धर्मात्मा शश्वच्-छान्तिं निगच्छति ।
कौन्तेय प्रतिजानीहि न मे भक्तः प्रणश्यति ।।
अशी या नाम-निष्ठ भक्ति-संप्रदायाची ख्याति आहे. अजामिल, वाल्मीकि, नामदेव इत्यादिकांची उदाहरणे त्याचीच आहेत. म्हणून ज्ञानियांचे राजे नि योगियांचे शिरोमणि ज्ञानदेव म्हणतात : मंथुनी नवनीता तैसें घे अनन्ता । वायां आणिका पंथा जाशी झणे ।। लोणी जसें सर्व गोरसाचे सार होय, तसें सर्व साधनांचे सार हे नाम होय. सर्व वेदांचे सार ॐकार; शतकोटि-प्रविस्तर रामायणांचें सार रामनाम. हा निष्कर्ष जुनाच आहे आणि तो सार्वत्रिकहि आहे. इस्लाममध्ये अल्लाची नव्याण्णव नामें प्रसिद्ध आहेत. ख्रिस्ती पंथांतहि देवाचे नाम गाजो' म्हणून वारंवार आले आहे. असें हें नाम-माहात्म्य सर्वत्र मान्यच आहे.

सर्व साधनांत याच नामसार भक्तियोगाला भगवंतानें गीतेंत सर्वोत्तम योग म्हटले आहे: -

(१) योगिनामपि सर्वेषां मद्गतेनान्तरात्मना ।
श्रद्धावान् भजते यो मां स मे युक्ततमो मतः ।।
(२) मय्यावेश्य मनो ये मां नित्ययुक्ता उपासते ।
श्रद्धया परयोपेतास् ते मे युक्ततमा मताः ।। -
इथे भीष्मांनीहि तोच निर्णय दिला आहे:
एष मे सर्वधर्माणां धर्मोऽधिकतमो मतः ।
यद् भक्त्या पुण्डरीकाक्षं स्तवैर् अर्चेत् नरः सदा ।।

दोन्हीकडे शब्दप्रयोग देखील सारखाच आढळून येतो.

ब्रह्मरूप परायणाचे म्हणजे अन्तिम गन्तव्याचे स्वच्छ दर्शन झाल्यावर आणि त्याला पोचायचा योग्य मार्ग निश्चित झाल्यावर उरतें केवळ मार्गक्रमण. तेंच साधकाचें कर्तव्य. त्याचाच त्याला ध्यास पाहिजे. ज्ञानदेव त्याबाबत ही सूचना देतात :

सकळ नेणोनिया आन| एक विठ्ठलचि जाण हेचि भक्ति हेंचि ज्ञान। एक विठ्ठलचि जाण गुरुगम्य ही खूण। एक विठ्ठलचि जाण बुझसी जरी तूं निर्वाण, एक विठ्ठलचि जाण बाप विठ्ठलाची आण। एक विठ्ठलचि जाण असा एकत्वाभ्यास झाला म्हणजे मग त्याला ती दशा प्राप्त होते जी ज्ञानदेव पुढील भजनांत आपली वर्णीत आहेत(१) धर्म जागो निवृत्तीचा हरिनामें उत्साहो। कर्मधर्म लोपलें माझें फिटला संदेहो। धर्म अर्थ काम पूर्ण दान मान समूहो। ने मी इंद्रिय-वृत्ति रामकृष्ण-नामी टाहो।। (२) कल्पना मावळली कल्पवृक्ष-तळवटीं। चिंता हारपली माझी नित्य अमृताची वाटी। मन हे मग्न जालें नित्य वसे वैकुंठीं। तापत्रय पाप गेलें नाना दोषांचे थाटी।। (३) आत्माराम निर्गमले वेदशास्त्र-गुह्यज्ञानें। वासनाचि मोहो जाळी ते विराली नानास्थानें। फुटले नाना घट तुटली बंधनें। सुटलिया जीवग्रन्थी ऐसें केलें गुरु-ज्ञानें।। (४) बुद्धि बोध सवंगडे सजीव कर-चरण। नयनीं नयन जाले चक्ष मी समाधान। दिव्यदेह अमृत-कळा दशदिशा परिघन। सर्व हे ब्रह्म जालें फळलें विज्ञान।। (५) निवृत्ति गुरु माझा अंधपण फेडिलों। सर्वत्र दृष्टि जाली एकतत्त्वें राहिलों। निरसली माया मोहो रामांजन लेइलों। ज्ञानदेव ज्ञानगंगे निवृत्ती बुडविलों।। या भजनांत म्हटल्याप्रमाणे जेव्हां 'सर्वत्र दृष्टि'' होते आणि सर्वत्र एकच एक तत्त्व दिसू लागतें असें नव्हे तर साधक तद्रूपच होऊन राहतो, "एकतत्त्वें राहिलों' असें अनुभवतो, तेव्हांच साधन सुफल संपूर्ण होते. अशा ब्रह्मभूत पुरुषाचे, महाभागवत भीष्मदेवाचें तें अद्भुत दर्शन या नामसहस्रांत सांठले आहे. तें एकच एक तत्त्व त्याला सर्वत्र अनुभवास येते आणि आपल्या त्या भावाविष्ट दर्शत तो 'आश्चर्यवद् वदति' चकितवत् बोलतो. ती आश्चर्यवाणी म्हणजे हे नामसहस्र होय. तें अद्भुत दर्शन, गीतेच्याच शब्दांत तें अत्यद्भुत रूप अर्जुनाला पहायला मिळालें, इथें त्या अत्यद्भुताचें नाम, विश्वरूपाप्रमाणे तें विश्वनाम, धर्मराजाला ऐकायला मिळाले आहे. शब्दांकित विश्वरूपच ते आहे.

विश्वरूपाचे विश्लेषण करणे शक्य नाही. कारण तें अद्भुत दर्शन आहे, तें सर्वस्वी अगोचरच आहे. तीच गोष्ट या नामसहस्राची. त्याचे विश्लेषण होऊ शकत नाही, तें एक समग्र दर्शन आहे, एक भावदर्शन आहे. त्याचे तुकडे तुकडे केल्याने में दर्शन होईल, तें छिन्नाचे दर्शन होईल, समग्राचे होणार नाही. त्या दिक्कालाद्यच्छिन्न वस्तूचे दर्शन दिव्य चक्षूनेंच होणे शक्य आहे. तो दिव्य चक्षु म्हणजे भावावेश होय, भावसमाधि होय.

नाहं वेदैर् न तपसा न दानेन न चेज्यया ।
शक्य एवंविधो द्रष्टुं, दृष्टवान् असि मां यथा ।।
भक्त्या त्वनन्यया शक्य अहं एवंविधो ऽर्जुन ।
ज्ञातुं द्रष्टुं च तत्त्वेन प्रवेष्टुं च परंतप ।।

या श्लोकांत गीतेने तेंच सुस्पष्ट केले आहे. तें भावदर्शन परम भागवत स्वत:च घेतील.

GO TOP