श्रीशुकदेव सांगतात -
( अनुष्टुप् )
शिशूपाल नि तो शाल्व पौंड्रक मेल्यावरी तदा ।
मित्रऋण स्मरोनीया एकटा दंतवक्त्र तो ॥ १ ॥
आला क्रोधोनि पायाने हाती एकचि ती गदा ।
शक्तिवंत असा की तो चालता भूमिकंप हो ॥ २ ॥
कृष्णाने पाहिले त्याला झपाटे पातला असा ।
समुद्रा तट जै रोधी कृष्णाने रोधिला तसा ॥ ३ ॥
घमेंडी कारुषो तेंव्हा कृष्णा ओरडुनी म्हणे ।
भाग्यची गोष्ट की आज दिसशी मजला पुढे ॥ ४ ॥
मामेभाऊ म्हणोनिया मारण्या नच इच्छि मी ।
मारिले मम ते मित्र म्हणोनी ठेचितो तुला ॥ ५ ॥
मूर्खा तू आप्त नी शत्रू शरीरा रोगची जसा ।
मित्रांचे ऋण मी आता फेडितो तुज मारुनी ॥ ६ ॥
अंकुशो हत्तिसी जैसा माहूत टोचितो तसा ।
कृष्णाला बोलता मारी गदेचा तो प्रहार की ॥ ७ ॥
गदेचा लागता घाव कृष्ण तो जसच्या तसा ।
उचली स्वगदा नी त्या दैत्याच्या वक्षि मारिता ॥ ८ ॥
दैत्याची फाटली छाती रक्तची ओकला तदा ।
पसरी हात पायांना निष्प्राण पडला तसा ॥ ९ ॥
शिशुपाल मरे तेंव्हा निघाली प्राणज्योत जै ।
दंतवक्त्र मरे तेंव्हा तै मिळे कृष्णरुपिची ॥ १० ॥
विदुरथ तया बंधू झाला शोक तया तसा।
क्रोधाने जाहला लाल आला कृष्णा वधावया ॥ ११ ॥
राजेंद्रा ! पाहिले कृष्णे आता हा मारु इच्छितो ।
तदा चक्रे करोनीया तयाचे शीर तोडिले ॥ १२ ॥
या परी भगवान् कृष्ण शाल्व नी दंतवक्त्र नी ।
विदुरथा वधोनीया गेलासे द्वारकापुरी ॥ १३ ॥
देवांनी माणसांनीही कृष्णाची स्तुति गायिली ।
मुनी नी सिद्ध गंधर्व विद्याधर नि वासुकी ॥ १४ ॥
अप्सरा पितरे यक्ष गावोनी नाचले तदा ।
सजली द्वारका सारी वीर ते सर्व चालले ॥ १५ ॥
असा योगेश्वरो कृष्ण भगवान् जगदीश्वर ।
वाटतो हारला अज्ञां परी तो विजयी सदा ॥ १६ ॥
ऐके युद्ध तयारीत कुरुंच्या सह पांडव ।
राम मध्यस्थ ते होते पक्ष घेणे न आवडे ।
म्हणोनी तीर्थ स्नानाच्या मिसे गेलेहि दूर ते ॥ १७ ॥
प्रभासी घेतले स्नान तर्पणे भोजने दिली ।
द्विजांना घेउनी गेले जिथे वाहे सरस्वती ॥ १८ ॥
बिंदुसर पृथदक त्रितकूप सुदर्शन ।
चक्रतीर्थी क्रमे गेले पूर्ववाही सरस्वती ॥ १९ ॥
गंगा नी यमुनाकाठी श्रेष्ठ क्षेत्रासि तेथल्या ।
एकदा नैमिषारण्यी सत्संग चालला महान् ॥ २० ॥
दीर्घ सत्संग तो होता बैसले ऋषि थोर तै ।
उठले राम ते येता पूजिले युक्त त्या परी ॥ २१ ॥
आसनी बैसता पूजा संपता पाहतात तो ।
रोमहर्षण हा शिष्य व्यासपीठास बैसला ॥ २२ ॥
जन्मे सूत असोनीया श्रेष्ठ विप्रासनी असा ।
बैसला, उठला ना तो न नमी, क्रोधले बळी ॥ २३ ॥
वदले प्रतिलोमा तू धर्मरक्षक क्षत्रिय ।
श्रेष्ठ विप्रांपुढे बैसे मृत्यु दंडास पात्र की ॥ २४ ॥
व्यासशिष्य असोनीया पुराण धर्म शास्त्र नी ।
वाचशी इतिहासाते परी संयम तो नसे ॥ २५ ॥
उदंड जाहला ऐसा संत पंडित मानिती ।
सोंग हे दाविशी सारे नकटीच्या परी असे ॥ २६ ॥
धर्माचे दावि जो सोंग पापी श्रेष्ठचि तो असे ।
सोंग हे मोडण्यासाठी जन्मे मी मृत्युभूमिसी ॥ २७ ॥
निवृत्त जाहले यात्रीं दुष्टांही नच मारिती ।
सहजी फेकिता दर्भ मेले दैवे सुतो तदा ॥ २८ ॥
सूत मेले तदा सर्व ऋषि ते हाय बोलले ।
रामाला वदले सर्व अधर्म घडला बहू ॥ २९ ॥
आम्ही द्विजासनी त्यांना स्थापिले सत्र होइ तो ।
आरोग्यपूर्ण ती आयू सूता आम्हीच ती दिली ॥ ३० ॥
अजाणता तुम्ही केले ब्रह्महत्त्याच ही दुजी ।
योगेश्वर तुम्ही ऐसे न शासी वेद ही तुम्हा ॥ ३१ ॥
स्वयं इच्छा असे ती तो ब्रह्महत्त्या म्हणोनिया ।
लोकांना शिकवायाते प्रायश्चित्तास सेविणे ॥ ३२ ॥
भगवान् बलराम म्हणाले -
लोकांना बोधिण्या धर्म करितो मी अवश्य ते ।
प्रायश्चित्त जसे श्रेष्ठ विधान करणे तसे ॥ ३३ ॥
बल आयु नी शक्ती ती वदाल सर्व ते सुतां ।
योगाने सर्व ते देतो सांगा काय हवे तसे ॥ ३४ ॥
ऋषि म्हणाले -
रामा ते तुमचे शस्त्र तसे यांचाहि मृत्यु तो ।
आमुचे वरदानोही सत्य हो करणे असे ॥ ३५ ॥
भगवान् बलराम म्हणाले -
ऋषिंनो श्रुति ती सांगे आत्माचि आत्मजो असे ।
पुराण सांगणे पुत्रे दीर्घायू देइ मी तया ॥ ३६ ॥
आणखी सांगणे इच्छा पूर्ण ती मी करीन की ।
प्रायश्चित्त मला सांगा ज्ञाते या विषयी तुम्ही ॥ ३७ ॥
ऋषि म्हणाले -
इल्वाचा बल्वलो पुत्र दुष्ट दानव तो असे ।
त्रासितो दूषितो पर्वा आमुच्या येथ येउनी ॥ ३८ ॥
पूव रक्त तशी विष्ठा मूत्र मद्य नि मास ते ।
फेकितो, मारणे त्याला सेवा श्रेष्ठचि ही घडे ॥ ३९ ॥
एकचित्ते पुन्हा स्नान करोनी भारतात या ।
फिरावे तीर्थ यात्रेसी तेणे शुद्धीच होतसे ॥ ४० ॥
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अष्ट्याहत्तरावा अध्याय हा ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥