[ Right click to 'save audio as' for downloading Audio ]
( अनुष्टुप् )
श्रीशुकदेव म्हणतात -
भाग्यवंत तुम्ही राजे ! भक्तां माजी शिरोमणी ।
ऐकता पुसता प्रेमे नवीन रस आणिता ॥ १ ॥
( इंद्रवज्रा )
ती संतवाणी हृदयो नि कर्ण
गाण्यास लीला अन त्या स्मराया ।
ऐकावयाला नित तत्परो की
जै लंपटाला विषयात हर्ष ॥ २ ॥
( अनुष्टुप् )
रहस्यमयि या लीला तरी लक्षूनि ऐकणे ।
दयाळू गुरु तो शिष्या गुप्तज्ञानहि बोधिती ॥ ३ ॥
मृत्यू अघासुरातून कृष्णाने बाळ रक्षिले ।
आणिले वाळवंटी नी वदले कृष्ण त्याजला ॥ ४ ॥
( इंद्रवज्रा )
पहा प्रियांनो अति रम्य वाळू
खेळावया सर्वचि युक्त आहे ।
पहा जळाशी कमळे फुलोनी
पक्षीही गाती तरु शोभले हे ॥ ५ ॥
( अनुष्टुप् )
जेवणे करुया आता वेळ तो बहु जाहला ।
भूकही लागली खूप वासुरे तृण सेविती ॥ ६ ॥
वदले ठीक गोपाळ वासुरे जळ पाजुनी ।
चराया सोडिले आणि आनंदे शिंकि सोडिली ॥ ७ ॥
( इंद्रवज्रा )
मध्यात बैसे मग कृष्णजी तो
नी मंडलैसे भवतीहि गोप ।
श्रीकृष्णजीला बघतीचि प्रेमे
त्या कर्णिकेच्या जणु पाकळ्याची ॥ ८ ॥
( अनुष्टुप् )
कोणी फुले नि पानांचे फळनी सालिचे कुणी ।
दगडी पात्र ते कोणी करोनी जेवु लागले ॥ ९ ॥
कृष्ण नी बाळ गोपाळ बोलती रुचि ज्या परी ।
हासती तोंड फाडोनी मजेने जेवु लागले ॥ १० ॥
( मंदाक्रांता )
कान्हा खोवी कमरपटिसी वेणु ती दृश्यभागी ।
शिंगा होते बगलि धरिले पात्र डाव्या करात ॥
दही भातो घृत चटणीया लोणची त्यात होती ।
मुलांमाजी बसुनि हसतो बोलतो तो विनोदे ॥
भोक्ता यज्ञीं जरिहि असला जेवितो बाललीले ।
स्वर्गामाजी नवल गमले पाहता देवतांना ॥ ११ ॥
( अनुष्टुप् )
नृपारे ! जेविता ऐसे कृष्णलीलात बाळ ते ।
वासरे दूर ती गेली जंगली तृणलालसे ॥ १२ ॥
बाळांच्या ध्यानि ते येता जाहले भयभीत ते ।
मित्रांनो नच हो थांबा निवांत जेवणे तुम्ही ।
वदे कृष्ण पहा मीच वासुरे वळवीतसे ॥ १३ ॥
भाताचा घेवुनी काला कृष्णजी धावला तसा ।
गिरी गुंफा वनीं सार्या वत्सांना धुंडु लागला ॥ १४ ॥
( शार्दूलविक्रीडित )
ब्रह्मा तो नभमंडळी स्थित असे पाही अघामृत्यु तो ।
आश्चर्ये बघतो मनात स्मरतो पाहू हरीच्या लिला ॥
चोरी वत्स तसेचि गोपी हलवी नेवोनि हो गुप्त तो ।
अज्ञाने करि हे घडे कमळिच्या पुत्रें भ्रमी कार्य हे ॥ १५ ॥
( अनुष्टुप् )
वासुरे दिसली नाही कृष्ण वाळूसि पातला ।
मुलेही नव्हती तेथे शोधी कृष्ण जिथे तिथे ॥ १६ ॥
परंतु बाळ गोपाळ सान वत्स तयांचिये ।
दिसले नच ते तेंव्हा ओळखी कुष्ण तो मनीं ।
ब्रह्माची जाणितो विश्वा त्याचेचि कृत्य हे असे ॥ १७ ॥
गोपमाता नि ब्रह्म्याला आनंद द्यावया तसे ।
धरले वत्सरूपे ती बाळेही तोचि जाहला ॥ १८ ॥
( शार्दूलविक्रीडित )
होती गोपमुले नि वत्स तशिची घेई हरी रूप तै ।
वंश्या शिंगि नि शिंकि वस्त्र तशिची काठ्या करीही तशा ।
जैसे भाव गुणादि रूप सगळे झाला तसाची हरी ।
विश्वोरूप तसाचि विष्णु हरिही ती देववाणी खरी ॥ १९ ॥
( अनुष्टुप् )
वासुरे गोपही झाला सर्वात्मा भगवान स्वता ।
आत्मरूप असे वत्स बाळेही आत्मरूप ते ।
घेरता जमले सारे सवत्स व्रजि पातले ॥ २० ॥
विभक्त जाहले सर्व वासुरे बाळ ज्यांचि ते ।
गोठ्यात घुसले सर्व ज्याच्या त्याच्या घरात ते ॥ २१ ॥
( इंद्रवज्रा )
तो बासुरीचा ध्वनी ऐकताची
माता तदा धावुनि पातल्या नी ।
घेवोनि कृष्णा समजोनि पुत्र
नी धुंद दुग्धा स्तनि पाजिले की ॥ २२ ॥
ऐसाचि नित्यो वनि जाय कृष्ण
नी बाळगोपाळ बनोनि येई ।
माता तयाला सजवीत नित्य
गालासि दृष्टी टिपकाहि देती ॥ २३ ॥
त्या गौळणींच्या परि सर्व गाई
चरोनि येता वनि वत्स घेती ।
चाटोनि त्यांना स्तनपान देती
पान्हा स्तनीचा झरताच राही ॥ २४ ॥
( अनुष्टुप् )
मातृभाव जसा होता शुद्ध गो गोपिंचा तसा ।
रमला कृष्ण पुत्रैसा परी ना मोहला कुठे ॥ २५ ॥
ज्ञानैश्वर्य विना प्रेम शुद्धची मातृभाव तो ।
गाई नी गोपिका देती कृष्णाच्या परि बालका ॥ २६ ॥
या परी क्रीडला कृष्ण सर्वात्मा भगवान् हरी ।
गोपाळ वासरां रूपे गोठीं गेहात वर्ष ते ॥ २७ ॥
पाच - सात दिनो पूर्व वर्ष ते संपण्या पुरे ।
बळीच्या सह श्रीकृष्ण गेला वत्सास चारण्या ॥ २८ ॥
गोवर्धनास माथ्याशी चरता गाई पाहती ।
दुरूनी आपुली वत्स व्रजात चरता तदा ॥ २९ ॥
( इंद्रवज्रा )
वात्सल्य आले उमटोनी चित्ती
न मानिती गोपहि आवरीता ।
हंबारुनी त्या पळत्याची गेल्या
संकोच मानीं उचलोनि पुच्छ ।
बेगात गेल्या पळत्या जशा की
दोन्हीच पायी पळती गमावे ॥ ३० ॥
( अनुष्टुप् )
नवीन जाहले वत्स तेही त्यांच्यांत पातले ।
स्नेहाने पाजिता गाई अंग चाटोनिया तदा ॥ ३१ ॥
गोपिंनी रोधिता त्यांना रोधले नच ते मुळी ।
लाजल्या क्रोधल्या गोपी तेथे पुत्रांस पाहती ॥ ३२ ॥
( इंद्रवज्रा )
मनात दाटे प्रभुप्रेम त्यांच्या
पळोनि गेला मग क्रोध दूर ।
घेवोनि पुत्रा धरिती उराशी
हुंगोनि डोकी बहु मोद घेती ॥ ३३ ॥
( अनुष्टुप् )
वृद्ध गोपासही मोद बाळां घेताच जाहला ।
बाळांना ठेविता दूर प्रेमाश्रू नेत्रि पातले ॥ ३४ ॥
पाहिले बलरामाने व्रजात गोप गाइ नी ।
गोपिका आपुल्या पुत्रा त्यजोनी प्रेम मेळिती ।
विचार करिता चित्ती न कळे मुळि कारण ॥ ३५ ॥
सर्वात्मा कृष्णदेवाचे माझ्याशी गोप बालका ।
आहे स्नेह तसा आहे वासुरां प्रेम हा करी ॥ ३६ ॥
माया ही कोठुनी आली देवता दानवीय कां ।
माणुसी कशि ही होय प्रभूची शक्ति ही खरी ॥ ३७ ॥
बळीने ज्ञान दृष्टीने पाहता वासरे तसे ।
गोपाळ सर्व ते कृष्ण दिसले कृष्ण रूपची ॥ ३८ ॥
( इंद्रवज्रा )
हे गोप बाळे बछडे नि देव
ऋषी न कोणी तव रूप सारे ।
कृपा करोनी मज सांग कृष्णा
तुझीच रूपे दिसती अनंत ।
ब्रह्माजिचे कृत्य तदा हरीने
बळीस सारे कथिले पहा ते ॥ ३९ ॥
( अनुष्टुप् )
ब्रह्माजी ब्रह्मलोकीचा व्रजात पातला असे ।
समयी त्रुटी ती झाली पाही सर्व जसे तसे ।
कृष्ण नी बाळ वत्सांना क्रीडता पहिल्या परी ॥ ४० ॥
गोकुळी जेवढी बाळे तेवढी झोपवीच मी ।
जागृत दिसती येथे कसे हे घडले असे ॥ ४१ ॥
मोहीत जेवढे केले तेवढे दिसती कसे ।
सर्व हे कृष्णजी साठी कसे खेळति वर्ष हे ॥ ४२ ॥
ब्रह्माजी ज्ञानदृष्टीने पाहती परि ना कळे ।
खरे खोटे ययीं भेद न जाणी ध्यान लावुनी ॥ ४३ ॥
कृष्णाने मोहिले माये माया ना स्पर्शिते तया ।
कृष्णाला मोहवायाते पाही ब्रह्मचि मोहिले ॥ ४४ ॥
उजेडी काजवा तैसी अंधारी घळ ना दिसे ।
संतांना मोहिता क्षुद्र स्वताचे तेज नाशिती ॥ ४५ ॥
विचार करिता ब्रह्म्या दिसती कृष्णरूप ते ।
शंख चक्र गदा पद्म शिरीं मुकुट कुंडले ॥ ४६ ॥
कंथात वनमाला नी नेसले पीतवस्त्र ते ।
श्यामवर्ण असे सारे भुजा चार तशा तयां ॥ ४७ ॥
श्रीवत्स चिन्ह वक्षासी भुजासीं बाजुबंद ते ।
जडीत शंख आकार कंकणे करि शोभली ॥ ४८ ॥
कोवळा सर्व अंगाशी तुळशीमाळ ही गळां ।
भाग्यवंत अशा भक्ते घातली जी तयां गळां ॥ ४९ ॥
कटाक्षदृष्टि ती मोही चांदणीहास्य फाकले ।
भासले रज सत्त्वाने भक्तांना तोषवी बहू ॥ ५० ॥
दुसरा ब्रह्मजी तेथे चराचर तृणांकुरे ।
गाती नी नाचती सर्व कृष्णां पुजाहि अर्पिती ॥ ५१ ॥
अणिमा गरिमा सिद्धी माया विद्या विभूती नी ।
चोवीस ते महत्तत्वे कृष्णाने घेरिले असे ॥ ५२ ॥
काल संस्कार इच्छा नी कर्म नी फळ मूर्तिमान् ।
हरिसी सेविती नित्य अस्तित्व संपवोनिया ॥ ५३ ॥
सीमीत नच हा काळां त्रिकालऽबाधि सत्य हा ।
अनंतो तेज मोदो हा वेदही गाउ ना शके ॥ ५४ ॥
परमात्मा परब्रह्म श्रीकृष्णरूप सर्व ते ।
ब्रह्म्याने पाहिले सर्व व्यापला जो चराचरी ॥ ५५ ॥
आश्चर्य जाहले ब्रह्म्या इंद्रियीं क्षुब्ध स्तब्धला ।
मौनी निस्तेज ही झाला स्तब्धची राहिला उभा ॥ ५६ ॥
( शिखरिणी )
हरिची ही ऐसी महति नच माया शिवितसे ।
न हो वर्णो त्याला श्रुतिहि वदती ब्रह्म न असे ।
न तो ब्रह्मा जाणी सकल असुनी ज्ञानहि तया ।
तशी माया लोपी हरिच बघता स्तब्धहि तया ॥ ५७ ॥
( अनुष्टुप् )
सचेत जाहला ब्रह्मा उघडी नेत्र तेधवा ।
स्वदेह पाहिला तेंव्हा शकला पाहु विश्व हे ॥ ५८ ॥
चौफेर पाहता ब्रह्मा दिसले व्रज तेधवा ।
डौरले वृक्ष तैं पर्णे फळ पुष्पहि दाटले ॥ ५९ ॥
वृंदावन लिलाभूमी तृष्णा क्रोध तिथे नसे ।
दुस्त्यज वैर सांडोनी जीव प्रेमेचि राहती ॥ ६० ॥
( वसंततिलका )
वृंदावनास बघता हरि गोप झाला
हा कृष्ण एक असुनी तरि कैक झाला ।
धुंडी तरीहि बछडे दहि भात खाता
लीला अगाध असली नकळे तयाला ॥ ६१ ॥
हंसावरी बसुनिया पळताच ब्रह्मा
आला धरेसि पडला जणु स्वर्णदंड ।
चारी मुकुट हरिच्या पदि ठेवुनीया
मोदाश्रुने हरिपदा अभिषेक केला ॥ ६२ ॥
( अनुष्टुप् )
उठतो स्मरतो लीला पडतो पायि तो पुन्हा ।
वारंवार किती वेळा पदासी पडला असा ॥ ६३ ॥
( इंद्रवज्रा )
ब्रह्मा हळुने उठताचि नेत्रा
पुसोनि पाही तरि हात जोडी ।
कांपेहि देहे तरि हात जोडी
कंपीत शब्दे स्तुति गायिली ही ॥ ६४ ॥