समश्लोकी श्रीमद्भागवत महापुराण
स्कंध ३ रा - अध्याय ३० वा
देहगेहात आसक्त असलेल्या पुरुषांच्या अधोगतीचे वर्णन -
भगवान कपिलदेव म्हणाले -
( अनुष्टुप् )
वायूने उडुनी मेघ वायूचे बळ नेणती ।
काळशक्त्ये तसे जीव भ्रमती बळ नेणती ॥ १ ॥
सुखासाठीच वस्तूंचा करितो जीव संग्रह ।
काळ तो नष्टितो सारे जीवांना शोक होतसे ॥ २ ॥
अज्ञानी धन नी शेती तनू घरहि नाश्य या ।
वस्तूस मोह पाशाने नित्य सत्यचि मानिती ॥ ३ ॥
संसारी जीव या योनी मधुनी जन्मतो तिचा ।
आनंद मानितो आणि विरक्त नच होतसे ॥ ४ ॥
मायेने मोहतो आणि नारकी योनि जन्मता ।
विष्टादी भोगही लाभ मानोनी नच सोडितो ॥ ५ ॥
आपुली तनु स्त्री पुत्र बंधू गेह पशू धनीं ।
आसक्त होउनी भाग्य मानितो रचि कल्पना ॥ ६ ॥
तयाच्या पालनी चिंता करिता देह जाळितो ।
परी दुर्वासनी चित्ते मूढ तो पापची करी ॥ ७ ॥
कपटी कुलटा स्त्रीच्या एकांता प्रेम मानितो ।
मुलांच्या गोड गोष्टीत कर्मी लिंपोनिया फसे ॥ ८ ॥
सावधान असोनिया दुःखासी दूर लाविता ।
वाटते त्यात त्यां मोठे सुखाचे क्षण सर्वही ॥ ९ ॥
हिंसेने मिळवी वित्त पोसितो लोक गेहिचे ।
उरले स्वय तो भक्षी नरकी जातसे पुन्हा ॥ १० ॥
यत्नाने न जगे तेंव्हा लोभाला वश पावतो ।
अधीर होउनी इच्छी अन्यांचे धन जिंकण्या ॥ ११ ॥
मंद भाग्यामुळे जेंव्हा प्रयत्न करुनी पुरे ।
धनहीन कुटुंबाला पोसण्या असमर्थ हो ॥
चिंतीत होउनी तेंव्हा दीर्घ श्वासास सोडितो ॥ १२ ॥
असमर्थ अशा त्याला स्त्रीया पुत्र उपेक्षिती ।
किसान वृद्ध बैलांना जसे नित्य उपेक्षिती ॥ १३ ॥
विरागी तरि ना होतो जयांना पोसिले यये ।
आता ते पोसिती याला वृद्धत्वी रुप नासते ॥ १४ ॥
अग्निही मंद होतोनी जरा व्याधिहि ग्रासिती ।
कुत्र्यापरी जगे आणि मरणोन्मुख लौंड तो ॥ १५ ॥
मरणासमयी श्वास कफाने आडके सदा ।
खोकणे श्वासही कष्ट कंठी घर्घर लागते ॥ १६ ॥
शोकाकुलचि आप्तात घेरुनी पडतो असा ।
मृत्युच्या पथि जाताना बोलता बोलु ना शके ॥ १७ ॥
न जिंकी इंद्रिया जोतो पोसितोचि कुटुंबिया ।
रडत्या स्वजनांमध्ये भोगितो अंति वेदना ॥ १८ ॥
अशा त्या मरणावस्थीं क्रोधिष्ठ यमदूत तो ।
पाहता भीति वाटोनी मलमूत्रास त्यागितो ॥ १९ ॥
यातना देहि त्याला ते यमाचे दूत लोटिती ।
गळ्यास बांधुनी दोर यमलोकात ओढिती ॥ २० ॥
ह्रदयो फाटते धाके शरीरीं कापरे भरे ।
लचके तोडिती कुत्रे व्याकुळ पाप आठवी ॥ २१ ॥
( इंद्रवज्रा )
तृष्णा क्षुधे व्याकुळ घामघूम
दावानली तप्तहि वाळु मध्ये ।
ना ओढतो पाय पुढे हि एक
चाले तसाची यमदूत ठोकी ॥ २२ ॥
( अनुष्टुप् )
थकतो पडतो मूर्छे पुन्हा उठुनि चालतो ।
अशा दुःखतमी मार्गी क्रुर दूतहि ओढिती ॥ २३ ॥
नव्यान्नव् योजने पद्म दूर तो यम लोक जो ।
दोन तीन मुहूर्तात जाऊनी नरकी पडे ॥ २४ ॥
धग्धगी विस्तावामाजी तनू ती फेकिती पुन्हा ।
शरीर कापुनी त्याचे देती खाण्या तयासची ॥ २५ ॥
जिवंत असुनी त्याचे कुत्रे आतडि तोडिती ।
साप विंचू नि ते डास चाउनी त्रासिती जिवा ॥ २६ ॥
तुकडे करिती दूत हत्तीच्या पायि देतही ।
फेकिती पर्वताहून किंवा डब्क्यात कोंडिती ॥ २७ ॥
तमिस्त्र अंधकारात रौरवो नरकात त्या ।
स्त्रिया वा पुरुषी जीव पापाचे फळ भोगिती ॥ २८ ॥
काहींचे म्हणणे ऐसे स्वर्ग मृत्यु इथेचि ते ।
नारकी यातना येथे पाहाया मिळती सदा ॥ २९ ॥
असे ते कष्ट भोगोनी कुटुंबा जीव पोसितो ।
सर्वास सोडुनी जातो भोगतो दुःख एकटा ॥ ३० ॥
सोडितो शरीरा आणि प्राण्यांचा द्वेष सर्वही ।
शिदोरी बांधितो पाप एकटा नर्क भोगतो ॥ ३१ ॥
पोटाच्या साठि ते पाप करितो भोगतो फळ ।
व्याकुळ बहु तो होतो लुटला जणु सर्वची ॥ ३२ ॥
पापाच्या धन मार्गाने रमुनी घर पोषि जो ।
अंधतामिस्त्र तो नर्क भोगितो कष्टदायक ॥ ३३ ॥
श्वान सूकर इत्यादी योनींचे दुःख भोगुनी ।
क्रमाने शुद्ध होवोनी मानवी जन्म लाभतो ॥ ३४ ॥
॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता ।
विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर तिसावा अध्याय हा ॥ ३ ॥ ३० ॥
हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
GO TOP
|