![]() |
श्रीमद् भागवत पुराण मार्कण्डेयस्य तपस्या, तत्कृत नरनारायण स्तुतिश्च - अथर्ववेदाच्या शाखा आणि पुराणांची लक्षणे - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशौनक उवाच –
(अनुष्टुप्) सूत जीव चिरं साधो वद नो वदतां वर । तमस्यपारे भ्रमतां नॄणां त्वं पारदर्शनः ॥ १ ॥
शौनक म्हणाले - ( अनुष्टुप् ) आयुष्मन् सूतजी व्हा हो ! तुम्ही वक्ता शिरोमणी । तमी भटकता लोक तुम्हि तो ब्रह्म दाविता ॥ १ ॥
शौनका म्हणाला - हे साधो सूता ! तुला उदंड आयुष्य मिळो ! तू वक्त्यांमध्ये श्रेष्ठ आहेस. जे लोक संसाराच्या घनदाट अंधकारात भटकत असतात, त्यांना तू परमात्म्याचा साक्षात्कार करवितोस. आता आम्हांला यासंबंधी सांग. (१)
आहुश्चिरायुषं ऋषिं मृकण्डुतनयं जनाः ।
यः कल्पान्ते उर्वरितो येन ग्रस्तमिदं जगत् ॥ २ ॥
मार्कंडेय चिरंजीव वदती कोणि लोक ते । प्रलयें गिळिले विश्व तदा ते वाचले म्हणे ॥ २ ॥
लोक सांगतात की, मृकंड ऋषींचा पुत्र मार्कंडेय ऋषी चिरायू आहे. ज्यावेळी प्रलयाने सर्व जग गिळून टाकले होते, त्यावेळी सुद्धा तो वाचला. (२)
स वा अस्मत् कुलोत्पन्नः कल्पेऽस्मिन् भार्गवर्षभः ।
नैवाधुनापि भूतानां सम्प्लवः कोऽपि जायते ॥ ३ ॥
परी या आमच्या कूळी श्रेष्ठ जे भृगुवंशिय । माहीत जेवढे त्यांना न प्राणी प्रलयो कळे ॥ ३ ॥
तो तर याच कल्पामध्ये आमच्याच वंशात जन्मलेला एक श्रेष्ठ भृगुवंशी आहे आणि आतापर्यंत प्राण्यांचा कोणताही प्रलय झालेला नाही. (३)
एक एवार्णवे भ्राम्यन् ददर्श पुरुषं किल ।
वटपत्रपुटे तोकं शयानं त्वेकमद्भुतम् ॥ ४ ॥
प्रलयीं बुडता पृथ्वी मृकुंड पुत्र पोहतो । अद्भूत पाहिले त्यांनी मुकुंदबाल तेधवा ॥ ४ ॥
अशा स्थितीमध्ये हे खरे असू शकेल, की ज्यावेळी मार्कंडेय मुनीने त्यामधून फिरत असताना वटवृक्षाच्या पानांच्या द्रोणामध्ये पहुडलेल्या अत्यंत अद्भुत अशा पुरूषाला पाहिले ! (४)
एष नः संशयो भूयान् सूत कौतूहलं यतः ।
तं नश्छिन्धि महायोगिन् पुराणेष्वपि सम्मतः ॥ ५ ॥
कसे हे जाहले शक्य शंका मोठीच मानसी । तुम्ही तो योगि नी वक्ते करा संशय दूर हा ॥ ५ ॥
हे सूता ! आमच्या मनामध्ये हा मोठाच संशय उत्पन्न झाला आहे. आणि हे समजून घेण्याची आम्हांला अतिशय उत्कंठा आहे. तू महान योगी आहेस. शिवाय पुराणे जाणणारा म्हणून प्रसिद्ध आहेस. तरी आमच्या या संशयाचे निराकरण करावे. (५)
सूत उवाच -
प्रश्नस्त्वया महर्षेऽयं कृतो लोकभ्रमापहः । नारायणकथा यत्र गीता कलिमलापहा ॥ ६ ॥
सूत सांगतात - पुसला छान हा प्रश्न लोकभ्रम यये मिटे । नारायणकथा ही तो गाता कलिमलो हटे ॥ ६ ॥
सूत म्हणाले - शौनका ! तू विचारलेल्या प्रश्र्नामुळे लोकांच्या मनातील शंका नाहीशी होईल. शिवाय या कथेमध्ये भगवान नारायणांचा महिमा कथन केलेला आहे. जो या कथेचे गायन करतो, त्याचे कलियुगामुळे उत्पन्न होणारे दोष नष्ट होतात. (६)
प्राप्तद्विजाति संस्कारो मार्कण्डेयः पितुः क्रमात् ।
छन्दांस्यधीत्य धर्मेण तपःस्वाध्यायसंयुतः ॥ ७ ॥
मिळता द्विज संस्कार मार्कंडेय पित्या पुढे । शिकले वेद नी धर्म तपी स्वाध्यायि जाहले ॥ ७ ॥
मृकंड ऋषीने आपला पुत्र मार्कंडेय याच्यावर द्विजाला आवश्यक सर्व संस्कार त्या त्या वेळी केले. नंतर विधिपूर्वक वेदांचे अध्ययन करून मार्कंडेय तपश्चर्या आणि स्वाध्याय करीत होता. (७)
बृहद्व्रतधरः शान्तो जटिलो वल्कलाम्बरः ।
बिभ्रत्कमण्डलुं दण्डं उपवीतं समेखलम् ॥ ८ ॥
राहिले ब्रह्मचारी ते वल्कले धारिल्या जटा । मेखळा पवित्रो दंड शभले शांत रूप ते ॥ ८ ॥
त्याने नैष्ठिक ब्रह्मचर्य व्रत धारण केले होते. तो शांत भावाने राहात होता. मस्तकावर जटा होत्या. झाडांच्या सालीच तो वस्त्र म्हणून नेसत असे. हातात तो कमंडलू आणि दंड धारण करी. त्याच्या अंगावर जानवे आणि मेखला शोभून दिसत असे. (८)
कृष्णाजिनं साक्षसूत्रं कुशांश्च नियमर्द्धये ।
अग्न्यर्कगुरुविप्रात्म स्वर्चयन् सन्ध्ययोर्हरिम् ॥ ९ ॥
अक्षमाला मृगचर्म कुश हे सर्व पुंजि की । अग्नि अर्क गुरू विप्र पूजा मानस सांध्य ती ॥ ९ ॥
काळे मृगचर्म, रुद्राक्षांची माळ आणि कुश, एवढेच साहित्य त्याच्याजवळ होते. आपल्या व्रताच्या समृद्धीसाठी त्याने हे सर्व ग्रहण केले होते. सायंकाळी आणि प्रातःकाळी तो अग्निहोत्र, सूर्योपस्थान, गुरुवंदन, ब्राम्हणसत्कार आणि स्वतःला परमात्म्याचे स्वरूप मानणे इत्यादी प्रकारांनी भगवंतांची आराधना करी. (९)
सायं प्रातः स गुरवे भैक्ष्यं आहृत्य वाग्यतः ।
बुभुजे गुर्वनुज्ञातः सकृन्नो चेदुपोषितः ॥ १० ॥
दो वेळा गुरुला भिक्षा अर्पोनी मौनि राहती । गुर्वाज्ञे भोज ते एक अन्यथा उपवासची ॥ १० ॥
संध्याकाळी-सकाळी भिक्षा मागून ती गुरूदेवांच्या चरणांशी ठेवून तो मौन राही. गुरूजींची आज्ञा झाली, तरच एक वेळ भोजन करी, नाहीतर उपवास करी. (१०)
एवं तपःस्वाध्यायपरो वर्षाणां अयुतायुतम् ।
आराधयन् हृषीकेशं जिग्ये मृत्युं सुदुर्जयम् ॥ ११ ॥
वागले तप स्वाध्याये करोडो वर्ष ते असे । आराधिता हृषीकेशा जिंकिला मृत्यु दुर्जय ॥ ११ ॥
मार्कंडेयाने अशा प्रकारे तपश्चर्या आणि स्वाध्याय यांमध्ये तत्पर राहून कोट्यावधी वर्षेपर्यंत भगवंतांची अराधना केली आणि जिंकण्यास कठीण अशा मृत्यूवर विजय प्राप्त केला. (११)
ब्रह्मा भृगुर्भवो दक्षो ब्रह्मपुत्राश्च ये परे ।
नृदेवपितृभूतानि तेनासन् अतिविस्मिताः ॥ १२ ॥
विजया पाहता त्यांचा ब्रह्मा दक्ष शिवो भृगु । मनुष्य पितरे देवां आश्चर्य जाहले बहू ॥ १२ ॥
त्यामुळे ब्रह्मदेव, भृगू, शंकर, दक्ष, ब्रह्मदेवाचे अनेक अन्य पुत्र तसेच मनुष्य, देवता, पितर व इतर सर्व प्राणी अत्यंत आश्चर्यचकित झाले. (१२)
इत्थं बृहद्व्रतधरः तपःस्वाध्याय संयमैः ।
दध्यावधोक्षजं योगी ध्वस्तक्लेशान्तरात्मना ॥ १३ ॥
ब्रह्मचर्ये व्रते योगे तपे स्वाध्याय संयमे । अविद्या क्लेश संपोनी ध्यायिती परमात्म तो ॥ १३ ॥
अशा प्रकारे नैष्ठिक ब्रह्मचर्य-व्रत धारण केलेला योगी मार्कंडेय याने तपश्चर्या, स्वाध्याय आणि संयम यांच्या द्वारा अविद्या इत्यादी सर्व क्लेश नाहीसे करून शुद्ध अंतःकरणाने तो इंद्रियातीत परमात्म्याचे ध्यान करू लागला. (१३)
तस्यैवं युञ्जतश्चित्तं महायोगेन योगिनः ।
व्यतीयाय महान् कालो मन्वन्तरषडात्मकः ॥ १४ ॥
योग्याने त्या पहा होगे जोडिले चित्त या परी । गेला काल तसा यांचा सहा मनवंतरे पहा ॥ १४ ॥
योगी मार्कंडेय-मुनी महायोगाच्या द्वारे आपले चित्त भगवंतांच्या स्वरूपाशी एकरूप करीत राहिला. असे करता करता सहा मन्वन्तरे उलटून गेली. (१४)
एतत् पुत्पुरन्दरो ज्ञात्वा सप्तमेऽस्मिन् किलान्तरे ।
तपोविशङ्कितो ब्रह्मन् आरेभे तद्विघातनम् ॥ १५ ॥
मन्वंतरात या सप्ती इंद्र शंके भिला असे । तपात विघ्न घालाया केला आरंभ तो तये ॥ १५ ॥
ब्रह्मन ! या सातव्या मन्वन्तरामध्ये इंद्राला जेव्हा हे समजले, तेव्हा तो त्याच्या तपश्चर्येने भयभीत झाला. म्हणून त्याने त्याच्या तपश्चर्येत विघ्न आणणे सुरू केले. (१५)
गन्धर्वाप्सरसः कामं वसन्तमलयानिलौ ।
मुनये प्रेषयामास रजस्तोकमदौ तथा ॥ १६ ॥
आश्रमीं अप्सरा काम वसंत मलयानलो । मद नी लोभ धाडोनी विघ्न ही टाकिले पहा ॥ १६ ॥
मार्कंडेय मुनीच्या तश्चर्येमध्ये विघ्न आणण्यासाठी इंद्राने त्याच्या आश्रमावर गंधर्व, अप्सरा, काम, वसंत, मलय पर्वतावरील वारा, रजोगुणाचे अपत्य लोभ आणि मद यांना पाठविले. (१६)
ते वै तदाश्रमं जग्मुः हिमाद्रेः पार्श्व उत्तरे ।
पुष्पभद्रा नदी यत्र चित्राख्या च शिला विभो ॥ १७ ॥
हिमालयोत्तरी त्यांचा आश्रमो तेथ पातले । पुष्पभद्र नदी तेथे चित्रा नामक ही शिळा ॥ १७ ॥
महर्षे ! ते सर्वजण हिमालयाच्या उत्तरेकडे त्याच्या आश्रमावर गेले. तेथे पुष्पभद्रा नावाची नदी वाहाते आणि तिच्याजवळ चित्रा नावाची एक शिळा आहे. (१७)
तदाश्रमपदं पुण्यं पुण्यद्रुमलताञ्चितम् ।
पुण्यद्विजकुलाकीर्णं पुण्यामल जलाशयम् ॥ १८ ॥
आश्रमो पावनो त्यांचा हिरवे वृक्ष चौदिशीं । वेली जाळीत पुण्यात्मे नी पवित्र जलाशय ॥ १८ ॥
मार्कंडेय मुनींचा आश्रम अत्यंत पवित्र होता. तेथे पवित्र वृक्ष आणि वेली होत्या. पुण्यात्मा ऋषिकुलांनी तो गजबजलेला होता. तेथे अतिशय पवित्र व स्वच्छ जलाशय होते. (१८)
मत्तभ्रमरसङ्गीतं मत्तकोकिल कूजितम् ।
मत्तबर्हिनटाटोपं मत्तद्विजकुलाकुलम् ॥ १९ ॥
गाती तै मत्त ते भृंग मत्त कोकिळ कूजती । नाचती नटवे मोर गाती द्विजथवे कुठे ॥ १९ ॥
कोठे धुंद भ्रमर गुंजारव करीत होते, तर कोठे आनंदी कोकीळ पंचम स्वरात कूजन करीत होते. काही ठिकाणी मदोन्मत्त मोर आपले पंख पसरून कलापूर्ण नृत्य करीत असत, तर काही ठिकाणी मदधुंद पक्ष्यांचे थवे किलबिल करीत. (१९)
वायुः प्रविष्ट आदाय हिमनिर्झरशीकरान् ।
सुमनोभिः परिष्वक्तो ववावुत्तम्भयन् स्मरम् ॥ २० ॥
इंद्रे पाठविता वायू मंद त्या झुळुकीसह । फुलां आलिंगुनी वारा कामोत्तेजक धावला ॥ २० ॥
तेथे इंद्राने पाठविलेल्या वायूने थंडगार झर्यांच्या जलबिंदूंसह प्रवेश केला. सुगंधित फुलांच्या परागकाणांनी युक्त असा तो कामभावना उत्तेजित करीत वाहू लागला. (२०)
उद्यच्चन्द्रनिशावक्त्रः प्रवालस्तबकालिभिः ।
गोपद्रुमलताजालैः तत्रासीत् कुसुमाकरः ॥ २१ ॥
उदेला निशिसी चंद्र किरणे पसरीतची । हजारो वृक्ष वेली ते झुकती कवटाळुनी । फळ नी फुलभारांचे गुच्छ ते शोभले बहू ॥ २१ ॥
रात्रीच्या प्रारंभी चंद्र उदयाला आला होता. वसंतामुळे वेलींच्या जाळ्यांसह असलेले पुष्कळ फांद्यांचे वृक्ष, पाने, फळे आणि फुलांचे गुच्छ यांनी शोभून दिसत होते. (२१)
अन्वीयमानो गन्धर्वैः गीतवादित्रयूथकैः ।
अदृश्यतात्तचापेषुः स्वःस्त्रीयूथपतिः स्मरः ॥ २२ ॥
गंधर्व चालता गाती अप्सरा चालती सवे । काम तो नायको त्यांचा करी संमोहिनी तिर ॥ २२ ॥
वसंतामागोमाग गाणी-बजावणी करणार्या गंधर्वांच्या तांड्यांबरोबर स्वर्गीय अप्सरा-समूहाचा नायक कामदेव हातात धनुष्य बाण घेऊन तेथे आला. (२२)
हुत्वाग्निं समुपासीनं ददृशुः शक्रकिङ्कराः ।
मीलिताक्षं दुराधर्षं मूर्तिमन्तं इवानलम् ॥ २३ ॥
अग्निहोत्र करोनीया मुनी ध्यानस्थ बैसता । दैदिप्य अग्निच्या ऐसे कामदेवेहि पाहिले । मनात लक्षिले त्याने जिंकिणे या कठीणची ॥ २३ ॥
मार्कंडेय मुनी त्यावेळी अग्निहोत्र आटोपून भगवंतांची उपासना करीत होता. त्याने डोळे मिटले होते. तो मूर्तिमंत अग्नीच वाटत होता. त्याला पराभूत करणे अतिशय कठीण होते. इंद्राच्या सेवकांनी त्याला अशा अवस्थेमध्ये पाहिले. (२३)
ननृतुस्तस्य पुरतः स्त्रियोऽथो गायका जगुः ।
मृदङ्गवीणापणवैः वाद्यं चक्रुर्मनोरमम् ॥ २४ ॥
अप्सरा नाचल्या गान गंधर्वे छेडिल असे । मृदंग ढोल नी वीणा मधूर छेडिती तसे ॥ २४ ॥
अप्सरा त्याच्यासमोर नृत्य करू लागल्या. गंधर्व मधुर स्वरात गाऊ लागले. तर काहीजण मृदंग, वीणा, ढोल इत्यादी वाद्ये अतिशय मनोहर स्वरात वाजवू लागले. (२४)
सन्दधेऽस्त्रं स्वधनुषि कामः पञ्चमुखं तदा ।
मधुर्मनो रजस्तोक इन्द्रभृत्या व्यकम्पयन् ॥ २५ ॥
पंचमुखी असा बाण कामाने वेधिला तदा । वसंत लोभ या भृत्यें केले चित्तास अस्थिर ॥ २५ ॥ [ पंचमुखी = शोषण, दीपन, संमोहन, तापन, उन्माद ]
त्यावेळी कामदेवाने आपल्या धनुष्याला शोषण, दीपन, संमोहन, तापन आणि उन्मादन अशी पाच मुखे असलेला बाण लावला. त्याचवेळी वसंत आणि लोभ हे इंद्राचे सेवक, मार्कंडेय मुनीचे मन विचलित करण्याच्या बेतात होते. (२५)
क्रीडन्त्याः पुञ्जिकस्थल्याः कन्दुकैः स्तनगौरवात् ।
भृशमुद्विग्नमध्यायाः केशविस्रंसितस्रजः ॥ २६ ॥
पुंजिकस्थल नावाची अप्सरा चेंडु खेळली । स्तनभारें कटी मध्ये लचके मधुनीच ती । सवेचि वेणिची पुष्पे फ़ळली जमिनीस ती ॥ २६ ॥
पुंजकास्थळी नावाची अप्सरा त्याच्यासमोर चेंडू खेळत होती. स्तनांच्या भारामुळे तिची कंबर वारंवार लचकत होती. वेणी विस्कटलेली असून तीत माळलेला गजरा घरंगळत होता. (२६)
इतस्ततो भ्रमद्दृष्टेः चलन्त्या अनु कन्दुकम् ।
वायुर्जहार तद्वासः सूक्ष्मं त्रुटितमेखलम् ॥ २७ ॥
नेत्राने तिरके पाही धावे चेंडुसवे कधी । कर्धनी तुटली तेणे फिटली साडि पूर्ण ती ॥ २७ ॥
ती नेत्रकटाक्षांनी इकडे-तिकडे पाहात होती. ती चेंडूच्या पाठीमागे पळत जात असता तिच्या कमरेचा करदोटा तुटला आणि तिची तलम साडी वारा उडवू लागला. (२७)
विससर्ज तदा बाणं मत्वा तं स्वजितं स्मरः ।
सर्वं तत्राभवन् मोघं अनीशस्य यथोद्यमः ॥ २८ ॥
युक्त ही पाहुनी वेळ कामाने बाण सोडिला । मुनिला जिंकितो वाटे परी निष्फळ जाहला ॥ २८ ॥
आता आपण मार्कंडेय मुनीला जिंकले, असे समजून कामदेवाने त्याच्यावर आपला बाण सोडला. परंतु जसे अशक्त माणसाचे प्रयत्न विफल होतात, त्याप्रमाणे मार्कंडेय मुनीवर त्याने केलेला प्रयोग निष्फळ ठरला. (२८)
त इत्थमपकुर्वन्तो मुनेस्तत्तेजसा मुने ।
दह्यमाना निववृतुः प्रबोध्याहिमिवार्भकाः ॥ २९ ॥
वसंत काम नी अन्य ऋषिंचे तेज पाहुनी । पळाले पळती जैसे सापां डिवचुनी मुले ॥ २९ ॥
हे शौनका ! त्याला तपोभ्रष्ट करण्यासाठी आलेले ते सर्वजण त्या महामुनीच्या तेजाने होरपळू लागले आणि जशी लहान मुले झोपलेल्या सापाला जागे करून पळून जातात, त्याप्रमाणे पळून गेले. (२९)
इतीन्द्रानुचरैर्ब्रह्मन् धर्षितोऽपि महामुनिः ।
यन्नागादहमो भावं न तच्चित्रं महत्सु हि ॥ ३० ॥
इंद्राचे भृत्य येवोनी थोडाही न ढळे मुनी । अहंकार न त्या झाला संतां ना सर्व शक्य ते ॥ ३० ॥
हे शौनका ! अशा प्रकारे इंद्राच्या सेवकांनी मार्कंडेय मुनीला पराजित करण्याची इच्छा केली, परंतु तो जराही विचलित झाला नाही, की त्याच्या मनात या घटनेमुळे अहंकार सुद्धा उत्पन्न झाला नाही. महापुरूषांच्या बाबतीत हे काही आश्चर्य नव्हे, हेच खरे ! (३०)
दृष्ट्वा निस्तेजसं कामं सगणं भगवान् स्वराट् ।
श्रुत्वानुभावं ब्रह्मर्षेः विस्मयं समगात् परम् ॥ ३१ ॥
देवेंद्रे पाहता काम निस्तेजचि ससैन्य तो । ब्रह्मर्षींच्या प्रभावाला ऐकता नवलावला ॥ ३१ ॥
देवराज इंद्राने पाहिले की, कामदेव आपल्या सेनेसह निस्तेज होऊन परत आला आहे. तसेच ब्रह्मर्षी मार्कंडेय मुनीचा प्रभाव ऐकून इंद्राला फारच आश्चर्य वाटले. (३१)
तस्यैवं युञ्जतश्चित्तं तपःस्वाध्यायसंयमैः ।
अनुग्रहायाविरासीत् नरनारायणो हरिः ॥ ३२ ॥
धारणा तप स्वाध्याये ध्यान लावोनि चिंतनी । बैसता बोधिण्या आले नर नारायणो हरी ॥ ३२ ॥
मार्कंडेय मुनी तपश्चर्या, स्वाध्याय, धाराणा, ध्यान आणि समाधी यांच्याद्वारा भगवंतांचे ठिकाणी चित्त एकाग्र करी. तेव्हा त्याच्यावर कृपा करण्यासाठी नर-नारायण-स्वरूप हरी प्रगट झाले. (३२)
(मिश्र-१२)
तौ शुक्लकृष्णौ नवकञ्जलोचनौ चतुर्भुजौ रौरववल्कलाम्बरौ । पवित्रपाणी उपवीतकं त्रिवृत् कमण्डलुं दण्डमृजुं च वैणवम् ॥ ३३ ॥
( इंद्रवज्रा ) ते शुक्ल कृष्णो नवकंजनेत्री चतुर्भुजो वल्कल मृगचर्म । त्रिसूत्र कूशे बहु शोभले ते कमंडलू दंडहि एक साधा ॥ ३३ ॥
त्या दोघांपैकी एकाचे शरीर गौरवर्ण होते तर दुसर्याचे कृष्णवर्ण. नुकत्याच उमलेल्या कमलाप्रमाणे त्यांचे डोळे होते. त्यांना चार हात होते. एकाने मृगचर्म तर दुसर्याने वल्कल परिधान केले होते. हातामध्ये कुशपवित्रे घातली होती आणि गळ्यांत तिपेडी जानवी शोभून दिसत होती. कमंडलू आणि वेळूचे सरळ दंड त्यांनी धारण केले होते. (३३)
पद्माक्षमालामुत जन्तुमार्जनं
वेदं च साक्षात् तप एव रूपिणौ । तपत् तडिद्वर्णपिशङ्गरोचिषा प्रांशू दधानौ विबुधर्षभार्चितौ ॥ ३४ ॥
ती पद्ममाला करि कुंचि तैशी ब्रह्मादिकांच्या हुनि उंच दोघे । करांत वेदो तळपेहि तेज तपोचि झाले जइ मूर्तिमंत ॥ ३४ ॥
कमळाच्या बियांची माळ, वेद आणि जन्तूंना पिटाळण्याची चवरी त्यांच्याजवळ होती. ब्रह्मदेव, इंद्र इत्यादींना सुद्धा पूज्य असे भगवान नर-नारायण उंचे-पुरे होते. चमकणार्या विजेप्रमाणे पिवळ्या रंगाचे त्यांचे तेज होते. मूर्तिमंत तपच असे ते भासत होते. (३४)
(अनुष्टुप्)
ते वै भगवतो रूपे नरनारायणौ ऋषी । दृष्ट्वोत्थायादरेणोच्चैः ननामाङ्गेन दण्डवत् ॥ ३५ ॥
( अनुष्टुप् ) पाहता भगवद्रूप नरनारायणो ऋषी । तदा ते उठए आणि दंडवत् नमिले तयां ॥ ३५ ॥
भगवंतांचे साक्षात स्वरूप असे नर-नारायण ऋषी आले आहेत, असे पाहून तो अत्यंत आदराने उठून उभा राहिला आणि त्यांना त्याने साष्टांग दंडवत घातला. (३५)
स तत् सन्दर्शनानन्द निर्वृतात्मेन्द्रियाशयः ।
हृष्टरोमाश्रुपूर्णाक्षो न सेहे तावुदीक्षितुम् ॥ ३६ ॥
आनंदी डुंबला देह हृदयो शांत जाहले । आनंदे गळले अश्रु न शके पाहु पूर्णही ॥ ३६ ॥
त्यांच्या दर्शनाने झालेल्या आनंदाने त्याचे शरीर इंद्रिये आणि अंतःकरण शांतिसमुद्रामध्ये डुंबू लागले. शरीर पुलकित झाले. डोळे अश्रूंनी एवढे भरुन आले की, तो त्यांना पाहूसुद्धा शकत नव्हता. (३६)
उत्थाय प्राञ्जलिः प्रह्व औत्सुक्यादाश्लिषन्निव ।
नमो नम इतीशानौ बभाशे गद्गदाक्षरम् ॥ ३७ ॥
उठोनी जोडिले हात झुकले पूर्ण त्या पुढे । न फुटे शब्द तो अन्य वदती ते नमो नमो ॥ ३७ ॥
त्यानंतर तो नम्रपणे हात जोडून उभा राहिला. त्याच्या ह्रदयामध्ये उत्सुकता एवढी दाटून आली होती की, तो जणू भगवंतांना आलिंगनच देत होता. त्याच्या तोडून शब्द फुटत नव्हता. ‘नमस्कार ! नमस्कार !’ एवढेच तो सद्गदित वाणीने त्या दोघांना म्हणाला. (३७)
तयोरासनमादाय पादयोरवनिज्य च ।
अर्हणेनानुलेपेन धूपमाल्यैः अपूजयत् ॥ ३८ ॥
आसने घालती त्यांना श्रद्धेने पाय धूतले । धूप चंदन मालांनी तयांना पूजिले असे ॥ ३८ ॥
यानंतर त्याने दोघांना आसन देऊन मोठ्या प्रेमाने त्यांचे चरण धुतले आणि अर्घ्य, चंदन, धूप आणि पुष्पमाळा इत्यादींनी त्यांची पूजा केली. (३८)
सुखमासनमासीनौ प्रसादाभिमुखौ मुनी ।
पुनरानम्य पादाभ्यां गरिष्ठाविदमब्रवीत् ॥ ३९ ॥
द्वय ते आसनी स्वस्थ कृपेची दृष्टी टाकिती । मार्कंडेये नमोनीया पुढती स्तविले असे ॥ ३९ ॥
भगवान नर-नारायण सुखाने आसनावर बसले होते आणि मार्कंडेय मुनीवर ते प्रसन्न होते. मार्कंडेयाने त्या सर्वश्रेष्ठ मुनिवेषधारी नर-नारायणांच्या चरणांना पुन्हा नमस्कार केला आणि त्यांची अशी स्तुती केली. (३९)
श्रीमार्कण्डेय उवाच -
(वसंततिलका) किं वर्णये तव विभो यदुदीरितोऽसुः संस्पन्दते तमनु वाङ्मन इन्द्रियाणि । स्पन्दन्ति वै तनुभृतामजशर्वयोश्च स्वस्याप्यथापि भजतामसि भावबन्धुः ॥ ४० ॥
मार्कंडेय म्हणाले - ( वसंततिलका ) वर्णू कसा प्रभू तुझा महिमाच थोर ही स्पंदने नि मन वाणि तुझीच शक्ती । ब्रह्मादिका नि सकला हरि प्राण तूची तू मुक्त ते भजक बांधिति प्रेम भावे ॥ ४० ॥
मार्कंडेय म्हणाला - भगवन ! अल्पज्ञ असा मी जीव आपल्या महिम्याचे वर्णन कसे बरे करू ? आपल्या प्रेरणेनेच सर्व ब्रह्मदेव, शंकर इत्यादी देहधार्याच्या तसेच माझ्या शरीरामध्येसुद्धा प्राणशक्तीचा संचार होतो आणि नंतर तिच्यामुळेच वाणी, मन व इतर इंद्रियांना प्रेरणा मिळते. अशा प्रकारे परतंत्र अशा इंद्रियांनी आपले भजन केले तरी आपण भक्तांच्या प्रेमबंधनाने बांधले जाता. (४०)
मूर्ती इमे भगवतो भगवन् त्रिलोक्याः
क्षेमाय तापविरमाय च मृत्युजित्यै । नाना बिभर्ष्यवितुमन्यतनूर्यथेदं सृष्ट्वा पुनर्ग्रससि सर्वमिवोर्णनाभिः ॥ ४१ ॥
हे दो तुपे हरि तुझे जगि सौख्य देण्या जिंकावयास मरणा तुम्हि घतलेले । घेता विवीध रुपडे जग रक्षिण्याला जै कीट जाल पसरी मिटवोनि घेई ॥ ४१ ॥
हे प्रभो ! फक्त विश्वाचे रक्षण करण्यासाठी आपण जसे मत्स्य, कूर्म इत्यादी अनेक अवतार ग्रहण केलेत, तसेच आपण ही दोन्ही रूपेसुद्धा त्रैलोक्याचे कल्याण, त्याच्या दुःखाची निवृत्ती आणि विश्वातील प्राण्यांना मृत्यूवर विजय प्राप्त करता यावा, यासाठी ग्रहण केली आहेत. आपण रक्षण तर करताच. शिवाय कोळी-कीटकाप्रमाणे आपल्यापासूनच हे विश्व प्रगट करता आणि पुन्हा आपल्यामध्येच ते विलीनही करून घेता. (४१)
तस्यावितुः स्थिरचरेशितुरङ्घ्रिमूलं
यत्स्थं न कर्मगुणकालरुजः स्पृशन्ति । यद्वै स्तुवन्ति निनमन्ति यजन्त्यभीक्ष्णं ध्यायन्ति वेदहृदया मुनयस्तदाप्त्यै ॥ ४२ ॥
स्वामी जगास तुम्हि नी नियतेहि तैसे मी पादमद्म नमितो त्यजिण्यास क्लेश । मर्मज्ञ ते ऋषिमुनी नित ध्याति तूं ते पूजा नि वंदन नि ध्यान स्तवोनि तैसे ॥ ४२ ॥
आपण चराचराचे पालन आणि नियमन करणारे आहात. मी आपल्या चरणकमलांना नमस्कार करीत आहे. जे आपल्या चरणकमलांना शरण येतात, त्यांना कर्म, गुण आणि काळानुसार निर्माण होणारे क्लेश स्पर्शसुद्धा करू शकत नाहीत. वेदांचे मर्मज्ञ मुनी आपल्या प्राप्तीसाठी नेहमी आपले स्तवन, वंदन, पूजन आणि ध्यान करीत असतात. (४२)
नान्यं तवाङ्घ्र्युपनयादपवर्गमूर्तेः
क्षेमं जनस्य परितोभिय ईश विद्मः । ब्रह्मा बिभेत्यलमतो द्विपरार्धधिष्ण्यः कालस्य ते किमुत तत्कृतभौतिकानाम् ॥ ४३ ॥
जीवास ते चहुकडे भय दातलेले ब्रह्मादि भीति तुमच्या नित कालरूपा । नाही पदाहुनि दुजा कसला उपाय मोक्षस्वरूप तुम्हि तो अन शांति दाते ॥ ४३ ॥
हे प्रभो ! चारही बाजूंनी भयाने ग्रासलेल्या लोकांना मोक्षस्वरूप अशा तुमच्या चरणप्राप्तीशिवाय दुसरा कल्याणकारक उपाय आम्हांला माहीत नाही. आपल्या काळस्वरूपाला दोन परार्ध आयुष्य असणारा ब्रह्मदेवसुद्धा भिऊन असतो. तर मग त्यांनी उत्पन्न केलेल्या भौतिक शरीरधारी प्राण्यांबद्दल काय सांगावे ? (४३)
तद् वै भजाम्यृतधियस्तव पादमूलं
हित्वेदमात्मच्छदि चात्मगुरोः परस्य । देहाद्यपार्थमसदन्त्यमभिज्ञमात्रं विन्देत ते तर्हि सर्वमनीषितार्थम् ॥ ४४ ॥
तुम्ही समस्त जगता गुरुज्ञानरूपी त्यागोनि देह घत निष्फळ नाशवंत । आलो पदास शरेणी तुमच्या म्हणोनी जेणे अभिष्ट सगळे मिळते जगाला ॥ ४४ ॥
हे भगवन ! आपण सर्व जीवांचे परम गुरू आणि सत्य-ज्ञानस्वरूप आहात. म्हणून आत्मस्वरूपाला झाकून टाकणार्या देह-घर इत्यादी निष्फळ, असत्य, नाशिवंत आणि फक्त इंद्रियांच्या अनुभवाला येणार्या या सर्व पदार्थांचा त्याग करून मी आपल्या चरणकमलांना शरण आलो आहे. कोणताही प्राणी जर आपल्याला शरण आला, तर तो त्याचे इच्छित सर्व पदार्थ प्राप्त करून घेऊ शकतो. (४४)
सत्त्वं रजस्तम इतीश तवात्मबन्धो
मायामयाः स्थितिलयोदयहेतवोऽस्य । लीला धृता यदपि सत्त्वमयी प्रशान्त्यै नान्ये नृणां व्यसनमोहभियश्च याभ्याम् ॥ ४५ ॥
सत्त्वो रजो तम तसे तुमचेच बंध मायामयी स्थिति लयो उदयो नि हेतु । कीका करोनि सगळ्या तरि शांति देता ना तो तमीं नि रजि ते मुळि दुःख वाढे ॥ ४५ ॥
हे जीवांच्या बन्धो ! या जगाची उत्पत्ती, स्थिती, लय इत्यादी अनेक मायामय लीला करण्यासाठी सत्व, रज, तम अशा तिन्ही गुणांच्या ब्रह्मा, रुद्र इत्यादी मूर्ती जरी आपल्याच असल्या, तरीसुद्धा सत्वगुणमय मूर्तीच जीवाला परम शांती प्रदान करते. दुसर्या नाहीत. त्यांच्यापासून दुःख, मोह आणि भय हेच मिळते. (४५)
तस्मात्तवेह भगवन्नथ तावकानां
शुक्लां तनुं स्वदयितां कुशला भजन्ति । यत्सात्वताः पुरुषरूपमुशन्ति सत्त्वं लोको यतोऽभयमुतात्मसुखं न चान्यत् ॥ ४६ ॥
तेणेचि ते चतुरही भजती तुम्हाला नी पंचरात्रि भजता नितधाम लाभे । जे भोगयुक्त असुनी निजबोध ऐसे ना तो रजो नि तमही मुळि तेथ लिंपे ॥ ४६ ॥
हे भगवन ! म्हणूनच बुद्धिमान पुरूष आपल्या आणि आपल्या भक्तांच्या परम प्रिय तसेच शुद्ध- अशा नर-नारायणांच्याच मूर्तीची उपासना करतात. पांचरात्र सिद्धांताचे अनुयायी विशुद्ध सत्वालाच आपला अवतार मानतात. त्याच्याच उपासनेने आपले नित्यधाम जे वैकुंठ, त्याची प्राप्ती होते. तसेच अभय आणि आत्मसुख मिळते. दुसर्या दोन गुणांना ते स्वीकारीत नाहीत. (४६)
तस्मै नमो भगवते पुरुषाय भूम्ने
nbsp; विश्वाय विश्वगुरवे परदैवतायै । नारायणाय ऋषये च नरोत्तमाय हंसाय संयतगिरे निगमेश्वराय ॥ ४७ ॥
शुद्धस्वरूप गुरु तू तुजला नमस्ते तू सर्व व्यापि सकला तुचि व्यापियेले । वेदादि वाणि तवची तव आधिनी ती नारायण नररुपा तुजला नमस्ते ॥ ४७ ॥
भगवन ! आपण अंतर्यामी, सर्वव्यापक, सर्वस्वरूप, जगद्गुरू, परम आराध्यदैवत आणि शुद्ध स्वरूप आहात. सर्व लौकीक आणि वैदिक वाणी आपल्या अधीन आहे. आपणच वेदमार्गाचे प्रवर्तक आहात. मी आपल्या या युगलस्वरूप नरोत्तम नर आणि ऋषिवर नारायण यांना नमस्कार करतो. (४७)
यं वै न वेद वितथाक्षपथैर्भ्रमद्धीः
सन्तं स्वखेष्वसुषु हृद्यपि दृक्पथेषु । तन्माययावृतमतिः स उ एव साक्षाद् आद्यस्तवाखिलगुरोरुपसाद्य वेदम् ॥ ४८ ॥
इंद्रीय प्रान वसशी तरी ती माया तुझीच फसवी अन तेज झाकी । तू जो गुरूचे जगता तुझिया कृपेने ते वेदज्ञान मिळते अन रूप लाभे ॥ ४८ ॥
प्रत्येक जीवाची इंद्रिये, त्यांचे विषय, प्राण आणि ह्रदयामध्ये जरी आपण असलात, तरीसुद्धा आपल्या मायेने जीवाची बुद्धी इतकी मोहित होऊन जाते, की ती निष्फळ आणि खोट्या इंद्रियांच्या जाळ्यात अडकून आपल्याला जाणत नाही. आपल्या मायेने बुद्धी झाकून गेलेला ब्रह्मदेवसुद्धा सर्वांचे गुरू असलेल्या तुमच्याकडून वेद मिळवितो, तेव्हाच त्याला आपले साक्षात दर्शन होते. (४८)
यद्दर्शनं निगम आत्मरहःप्रकाशं
मुह्यन्ति यत्र कवयोऽजपरा यतन्तः । तं सर्ववादविषयप्रतिरूपशीलं वन्दे महापुरुषमात्मनिगूढबोधम् ॥ ४९ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां द्वादशस्कन्धे अष्टमोऽध्यायः ॥ ८ ॥
वेदी रहस्य प्रगटे तव त्या रुपाचे ब्रह्मादि यत्नि पडता ग्रसतात मोही । जैसा स्वभाव धरिता रुप तैचि भासे वंदे तुला पुरुष तूचि विशुद्ध ज्ञानी ॥ ४९ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर आठवा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
हे प्रभो ! आपला साक्षात्कार करून देणारे ते ज्ञान वेदांमध्ये पूर्णपणे विद्यमान आहे की, जे आपल्या स्वरूपाचे रहस्य प्रकट करते. ब्रह्मदेव इत्यादी मोठेमोठे ज्ञानी ते प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न करीत असूनही मोहामध्ये अडकतात. आपणसुद्धा वेगवेगळ्या मतांचे विद्वान आपल्यासंबंधी जसा विचार करतात, तसे रूप धारण करून आपण त्यांच्यासमोर प्रगट होता. आपण देह इत्यादी सर्व उपाधींच्या आत लपलेले विशुद्ध ज्ञानच आहात. हे पुरूषोत्तमा ! मी आपणास वंदन करीत आहे. (४९)
स्कन्द बारावा - अध्याय सातवा समाप्त |