![]() |
श्रीमद् भागवत पुराण
श्रीकृष्णलीलानां संक्षेपतोऽवर्णनं, तन्महिषीणां तस्मिन् भगवान कृष्णांच्या लीला-विहारचे वर्णन - संहिता - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच
( अनुष्टुप् ) सुखं स्वपुर्यां निवसन् द्वारकायां श्रियः पतिः । सर्वसम्पत्समृद्धायां जुष्टायां वृष्णिपुङ्गवैः ॥ १ ॥ स्त्रीभिश्चोत्तमवेषाभिः नवयौवनकान्तिभिः । कन्दुकादिभिर्हर्म्येषु क्रीडन्तीभिस्तडिद्द्युभिः ॥ २ ॥ नित्यं सङ्कुलमार्गायां मदच्युद्भिर्मतङ्गजैः । स्वलङ्कृतैर्भटैरश्वै रथैश्च कनकोज्ज्वलैः ॥ ३ ॥ उद्यानोपवनाढ्यायां पुष्पितद्रुमराजिषु । निर्विशद्भृङ्गविहगैः नादितायां समन्ततः ॥ ४ ॥ रेमे षोडशसाहस्र पत्नीनां एकवल्लभः । तावद्विचित्ररूपोऽसौ तद्गेहेषु महर्द्धिषु ॥ ५ ॥
श्रीशुकदेव सांगतात - ( अनुष्टुप् ) सुखाने राहिला कृष्ण द्वारकीं लक्षुमीपती । सर्व संपन्नता तेथे मेळिली यादवीनरे ॥ १ ॥ मार्गी नगरिच्या योद्धे अश्व नी मत्त हत्ति ते । सुवर्ण रथ तै नित्य बाजारी फिरती पहा ॥ २ ॥ उद्याने पुष्प पर्णांच्या वृक्षांनी दाटले तिथे । भुंगे नी पक्षि ते गाती वीर तै भाग्य मानिती ॥ ३ ॥ वेषभूषी स्त्रिया नित्य यौवना शिंपिती तिथे । दिसता अंग ते थोडे विजेचा भास होतसे ॥ ४ ॥ सोळाहजार पत्न्यांशी रमे तो प्राण वल्लभ । जाया त्या तेवढी रूपे घेवोनी कृष्ण राहिला ॥ ५ ॥
श्रियः पतिः - लक्ष्मीपति श्रीकृष्ण - सर्वसंपत्समृद्धायां - सर्व संपत्तीने ओतप्रोत भरलेल्या - वृष्णिपुङगवैः जुष्टायां - मोठमोठया यादवांनी सेविलेल्या - स्वपुर्यां द्वारकायां - स्वतःची नगरी जी द्वारका तीत - सुखं निवसन् (सन्) - सुखाने रहात असताना. ॥१॥ उत्तमवेषाभिः - सुंदर वेष धारण करणार्या - नवयौवनकान्तिभिः - नवीन तारुण्याने शोभणार्या - हर्म्येषु - मंदिरात - कंदुकादिभिः क्रीडन्तीभिः - चेंडू आदिकरून साधनांनी खेळणार्या - तडिद्द्युभिः - विजेप्रमाणे आहे कांति ज्यांची अशा - स्त्रीभिः (सह) - स्त्रियांसह - रेमे - रममाण झाला. ॥२॥ मदच्युद्भिः मतङगजैः - मद गाळणार्या हत्तींनी - कनकोज्वलैः स्वलंकृतैः - सुवर्णाप्रमाणे तेजस्वी व अलंकारांनी भूषविलेल्या - भटैः अश्वैः रथैः च - योद्ध्यांनी, घोडयांनी व रथांनी - नित्यं संकुलमार्गायां - नित्य व्यापिलेले आहेत मार्ग जीतील अशा - उद्यानोपवनाढयायां - उद्याने व क्रीडास्थाने यांनी भरलेल्या - पुष्पितद्रुमराजिषु - फुललेल्या वृक्षांच्या रांगांमध्ये - निर्विशद्भृङगविहगैः - प्रविष्ट झालेल्या भुंग्यांच्या व पक्ष्यांच्या समूहांनी - समन्ततः नादितायां - जिकडे तिकडे दुमदुमलेल्या - षोडशसाहस्रपत्नीनाम् एकवल्लभः - सोळा हजार स्त्रियांचा एक प्रिय पति असा - तावत् विचित्ररूपः असौ - तितकीच चित्रविचित्र स्वरूपे धारण करणारा हा श्रीकृष्ण - महार्धिषु तद्गृहेषु रेमे - मोठ्या समृद्धींनी युक्त अशा त्या स्त्रियांच्या गृहांमध्ये रममाण झाला. ॥३-५॥
श्रीशुक म्हणतात - परीक्षिता ! द्वारकेची शोभा अलौकिक (अशीच) होती. तेथील सडका मदरसाचा स्राव करणारे मदोन्मत्त हत्ती, उत्त्तम पोषाख घातलेले योद्धे, घोडे आणि सुवर्णांचे रथ यांच्या गर्दीने नेहमी फुललेल्या असत. जिकडे पहावे तिकडे हिरवीगार उपवने आणि उद्याने होती. तेथे फुलांनी लहडलेल्या झाडांच्या राई होत्या. त्यांच्यावर बसून भ्रमर गुणगुणत होते आणि पक्शी किलबिल करीत होते. सर्व प्रकारच्या संपत्तींनी ती नगरी परिपूर्ण होती. जगातील श्रेष्ठ वीर यादव तेथे राहात होते. नवतारुण्याची झळाळी असलेल्या तेथील स्त्रिया सुंदर वेषभूषा करून नटलेल्या असत. विजेसारखी कांती असणार्या त्या आपापल्या महालात चेंडू इत्यादी खेळ खेळत. लक्ष्मीपती भगवंत अशा या आपल्या द्वारकेत निवास करीत असत. सोळा हजार पत्न्यांचे एकटॆच प्राणवल्लभ भगवान श्रीकृष्ण ऐश्वर्याने संपन्न अशा त्यांच्या प्रासादांत तितकीच सुंदर रूपे धारण करून त्यांच्याबरोबर विहार करीत असत. (१-५)
प्रोत्फुल्लोत्पलकह्लार कुमुदाम्भोजरेणुभिः ।
वासितामलतोयेषु कूजद्द्विजकुलेषु च ॥ ६ ॥ विजहार विगाह्याम्भो ह्रदिनीषु महोदयः । कुचकुङ्कुमलिप्ताङ्गः परिरब्धश्च योषिताम् ॥ ७ ॥
स्वतंत्र त्या महालांसी तळ्यात कंज शोभले । हंस सारस इत्यादी पोहती पक्षि त्यात की ॥ ६ ॥ कधी तेथे नदी मध्ये पत्न्यांसी रमला हरी । स्तनीचा लेप तो लागे कृष्ण अंगास की तदा ॥ ७ ॥
प्रोत्फुल्लोत्पलकह्लारकुमुदाम्भोजरेणुभिः - फुललेली कमले, कहलारे, कुमुदे व अंभोजे यांच्या परागांनी - वासितामलतोयेषु - सुगंधित झाली आहेत निर्मळ उदके ज्यांतील अशा - च - आणि - कूजद्द्विजकुलेषु - गात आहेत पक्ष्यांचे थवे जेथे अशा - ह्लदिनीषु - सरोवरांमध्ये - महोदयः कुचकुंकुमलिप्ताङगः - मोठा आहे उदय ज्याचा असा, स्तनांवरील केशराने रंगून गेले आहे अंग ज्याचे असा - योषितां च परिरब्धः (सः) - आणि स्त्रियांनी आलिंगिलेला तो श्रीकृष्ण - अम्भः विगाह्य विजहार - पाण्यात पोहून क्रीडा करिता झाला. ॥६-७॥
सर्व पत्न्यांच्या वाड्यांत परिसरांत सुंदर-सुंदर अशी सरोवरे होती. त्यांतील निर्मळ पाणी, उमललेल्या निळ्या, पिवळ्या, शुभ्र, लाल अशी निरनिराळ्या कमळांच्या परागांनी सुगंधित होत असे. त्यांमध्ये पक्ष्यांचा किलबिलाट चालू असे. त्या जलाशयांमध्ये प्रवेश करून श्रीकृष्ण पत्नींसह जलविहार करीत असत. त्यांच्याबरोबर विहार करणार्या पत्न्यांच्या अंगाच्या केशराची उटी आलिंगनाच्या वेळी भगवंतांच्या अंगाला लागत असे. (६-७)
उपगीयमानो गन्धर्वैः मृदङ्गपणवानकान् ।
वादयद्भिर्मुदा वीणां सूतमागधवन्दिभिः ॥ ८ ॥
गाती गंधर्व तेंव्हा नी वंदी मागध नी सुत । मृदंग ढोल नी वीणा छेडिती वाद्यही तदा ॥ ८ ॥
मृदङगपणवानकान् वीणां (च) मुदा वादयद्भिः गन्धर्वैः - मृदंग, पणव, दुंदुभि व वीणा ही वाद्ये आनंदाने वाजविणार्या गंधर्वांनी - सूतमागधबन्दिभिः (च) - आणि सुत, मागध व स्तुतीपाठक यांनी - उपगीयमानः - गायिला जाणारा असा. ॥८॥
स्स्त्यावेळी गंधर्व गायन करीत आणि सूत, मागध तसेच भाट अतिशय आनंदाने मृदंग, ढोल, नगारे आणि वीणा वाजवीत. (८)
सिच्यमानोऽच्युतस्ताभिः हसन्तीभिः स्म रेचकैः ।
प्रतिषिञ्चन् विचिक्रीडे यक्षीभिर्यक्षराडिव ॥ ९ ॥
पिचकार्या भरोनीया कृष्णासी त्या स्त्रिया कधी । भिजविती तदा वाटे कुबेर यक्षिणीच त्या ॥ ९ ॥
हसन्तीभिः ताभिः - हास्य करणार्या त्या स्त्रियांनी - रेचकैः सिच्यमानः अच्युतः - पिचकार्यांनी भिजविलेला श्रीकृष्ण - (ताः) प्रतिसिञ्चन् - त्या स्त्रियांना उलट भिजवीत - यक्षीभिः यक्षराट् इव - यक्षस्त्रियांसह जसा यक्षाधिपति खेळतो त्याप्रमाणे - विचिक्रीडे स्म - क्रीडा करिता झाला. ॥९॥
भगवंतांच्या पत्न्या हसत हसत पिचकार्यांनी पाणी उडवून त्यांना भिजवून टाकीत. तेसुद्धा पुन्हा त्यांच्यावर पाणी उडवीत. यक्षराजाने यक्षिणींसह विहार करावा, त्याप्रमाणे भगवान आपल्या पत्न्यांबरोबर क्रीडा करीत. (९)
( वसंततिलका )
ताः क्लिन्नवस्त्रविवृतोरुकुचप्रदेशाः सिञ्चन्त्य उद्धृतबृहत्कवरप्रसूनाः । कान्तं स्म रेचकजिहीर्षययोपगुह्य जातस्मरोत्स्मयलसद् वदना विरेजुः ॥ १० ॥
( वसंततिलका ) मांड्या नि वक्ष भिजता दिसती मधून पुष्पे गळोनि पडती, पिचकारि घेण्या । जाती स्त्रिया नि करिती हरि अंगस्पर्श वाढेचि प्रेम हरिचे अन हास्य होई ॥ १० ॥
क्लिन्नवस्त्रविवृतोरुकुचप्रदेशाः - भिजलेल्या वस्त्रामुळे स्पष्ट दिसत आहेत मांडया व स्तनभाग ज्यांचे अशा - सिञ्चन्त्यः - उदक सिंचिणार्या - उद्धृतबृहत्कबरप्रसूनाः - धारण केली आहेत मोठया वेण्यांवर फुले ज्यांनी अशा - ताः - त्या श्रीकृष्णाच्या स्त्रिया - रेचकजिहीरषया - पिचकारी ओढून घेण्याच्या इच्छेने - कान्तं उपगुह्य - श्रीकृष्णाला दृढ आलिंगन देऊन - जातस्मरोत्सवलसद्वदनाः - उत्पन्न झालेल्या कामानंदामुळे टवटवीत झाली मुखे ज्यांची अशा - विरेजुः स्म - शोभल्या. ॥१०॥
त्यावेळी त्यांची वक्ष:स्थळे आणि मांड्या ओल्या वस्त्रांमुळे दिसू लागत. पाणी उडवताना त्यांच्या अंबाड्यातील फुले खाली पडू लागत. त्या पिचकारी काढून घेण्याचा बहाणा करून प्रियतमाजवळ जात आणि त्या बहाण्याने त्यांना आलिंगन देत. त्यांच्या स्पर्शाने पत्न्यांच्या हृदयामध्ये प्रेमभाव उचंबळून येत असे. त्यामुळे त्यांची मुखकमले प्रफुल्लित होऊन त्यांचे सौंदर्य आणखीच खुलून दिसे. (१०)
कृष्णस्तु तत्स्तनविषत् जितकुङ्कुमस्रक्
क्रीडाभिषङ्गधुतकुन्तलवृन्दबन्धः । सिञ्चन् मुन्मुहुर्युवतिभिः प्रतिषिच्यमानो रेमे करेणुभिरिवेभपतिः परीतः ॥ ११ ॥
राण्यांस्तनीचि उटिने वनमाल रंगे उन्मुक्त भाव भरता हलती बटा की । राण्या नि कृष्ण भिजवी वरचेवरी नी वाटे जणू करि तिथे गज तो विहार ॥ ११ ॥
तत्स्तनविषज्जितकुंकुमस्रक् - त्या स्त्रियांच्या स्तनांमुळे लागले आहे केशर माळेला ज्याच्या असा - क्रीडाभिषङगधुतकुन्तलवृन्दबन्धः - क्रीडेच्या नादाने हलली आहे केसांच्या झुबक्याची गाठ ज्याच्या असा - कृष्णः तु - श्रीकृष्ण तर - मुहुः सिञ्चन् - वारंवार पाणी फेकणारा - करेणुभिः इभपतिः इव - हत्तिणींकडून जसा गजेंद्र त्याप्रमाणे - युवतिभिः परीतः प्रतिषिच्यमानः - स्त्रियांकडून सर्व बाजूंनी उलट भिजविला जाणारा - रेमे - क्रीडा करिता झाला. ॥११॥
त्यावेळी श्रीकृष्णांची वनमाला त्या राण्यांच्या वक्ष:स्थळावर लागलेल्या केशराच्या रंगाने रंगून जाई. जलक्रीडेमध्ये मग्न झाल्यामुळे त्यांचे कुरळे केस भुरभुर उडत असत. ते आपल्या राण्यांना वारंवार भिजवीत आणि त्यासुद्धा त्यांना ओलेचिंब करीत. जशी हत्तिणींनी घेरलेल्या गजराजाने क्रीडा करावी, त्याप्रमाणे श्रीकृष्ण त्यांच्याबरोबर विहार करीत. (११)
( अनुष्टुप् )
नटानां नर्तकीनां च गीतवाद्योपजीविनाम् । क्रीडालङ्कारवासांसि कृष्णोऽदात्तस्य च स्त्रियः ॥ १२ ॥
( अनुष्टुप् ) क्रीडुनी भगवान् ऐसे पत्न्यांच्यासह वस्त्र नी । अलंकार उतरोनी देती त्या नर्तिकेस की ॥ १२ ॥
कृष्णः तस्य स्त्रियः च - श्रीकृष्ण व त्याच्या स्त्रिया - गीतवाद्योपजीविनाम् नटानां नर्तकीनां च - गायनवादनावर उपजीविका करणारे नट व नाचणार्या स्त्रिया ह्यांना - क्रीडालंकारवासांसि अदात् - क्रीडेसाठी उपयुक्त असे अलंकार व वस्त्रे देता झाला. ॥१२॥
श्रीकृष्ण आणि त्यांच्या पत्न्या जलक्रीडा केल्यानंतर आपापली वस्त्रे व अलंकार उतरवून गाणे, बजावणे या व्यवसायावरच ज्यांची उपजीविका आहे, अशा नट-नर्तकींना ती देऊन टाकीत. (१२)
कृष्णस्यैवं विहरतो गत्यालापेक्षितस्मितैः ।
नर्मक्ष्वेलिपरिष्वङ्गैः स्त्रीणां किल हृता धियः ॥ १३ ॥
विहार करिता ऐसा हासणे पाहणे तसे । आलिंगिता हरी त्यांना न राही भान ते मुळी ॥ १३ ॥
एवं विहरतः कृष्णस्य - याप्रमाणे क्रीडा करणार्या श्रीकृष्णाच्या - गत्यालापेक्षितस्मितैः - गति, भाषण, अवलोकन व मंदहास्य यांनी - नर्मक्ष्वेलिपरिष्वङगैः - विनोद, क्रीडा व आलिंगन यांनी - स्त्रीणां धियः हृताः किल - स्त्रियांची मने खरोखर हरण केली गेली. ॥१३॥
अशा प्रकारे भगवान त्यांच्याबरोबर विहार करीत. त्यावेळचे त्यांचे मोहक चालणे, वार्तालाप करणे, त्यांचे पाहाणे, स्मित हास्य, हसणे-खिदळणे आणि आलिंगन देणे इत्यादींमुळे त्यांना आणखी कशाचेच भान राहात नसे. (१३)
ऊचुर्मुकुन्दैकधियो गिर उन्मत्तवज्जडम् ।
चिन्तयन्त्योऽरविन्दाक्षं तानि मे गदतः श्रृणु ॥ १४ ॥
सर्वस्व कृष्ण तो त्यांचा श्यामसुंदर लोचन । समीप असुनी कृष्ण विरहे रडती कधी । उन्मादे बोलती तैशा विसंगतचि ते असे ॥ १४ ॥
मुकुन्दैकधियः - एका मुकुंदावरच आहे बुद्धि ज्यांची अशा त्या स्त्रिया - अरविन्दाक्षं चिन्तयन्त्यः - कमलनेत्र श्रीकृष्णाचे चिंतन करीत - अगिरः - न बोलणार्या - उन्मत्तवत् जडम् - उन्मत्ताप्रमाणे अडखळत - ऊचुः - बोलत्या झाल्या - तानि (वाक्यानि) गदतः मे शृणु - ती भाषणे सांगणार्या माझ्याकडून श्रवण कर. ॥१४॥
काही वेळा श्यामसुंदरांच्या चिंतनात त्या इतक्या मग्न होऊन जात की, त्या पुष्कळ वेळपर्यंत स्तब्ध राहात आणि पुन्हा त्यांचेच चिंतन करीत वेड्याप्रमाणे असंबद्ध बडबड करीत. मी त्यांचे बोलणे तुला ऐकवतो. (१४)
महिष्य ऊचुः -
( मालिनी ) कुररि विलपसि त्वं वीतनिद्रा न शेषे स्वपिति जगति रात्र्यामीश्वरो गुप्तबोधः । वयमिव सखि कच्चिद्गाढनिर्विद्धचेता नलिननयनहासोदारलीलेक्षितेन ॥ १५ ॥
राण्या म्हणतात - ( मालिनी ) कुररि रजनी झाली, दाटला अंधकार हरि तर निज तो हा बोध सारा मिटूनी । करिशि सजनि शोका जागुनी रात्रिशी का कमलनयन कृष्णे पाहता होय ऐसे ॥ १५ ॥
कुररि - हे टिटव्ये - गुप्तबोधः ईश्वरः - झाकले आहे ज्ञान ज्याने असा श्रीकृष्ण - जगति रात्र्यां स्वपिति - या लोकी रात्रौ झोप घेतो - त्वं - तू - वीतनिद्रा - गेली आहे झोप जीची अशी - विलपसि - विलाप करितेस - न शेषे - झोप घेत नाहीस - सखि - हे मैत्रिणी - वयम् इव - जशा आम्ही तशी - नलिननयनहासोदारलीलेक्षितेन - कमलनेत्र श्रीकृष्णाच्या हसण्यामुळे सुंदर दिसणार्या लीलायुक्त कटाक्षाने - गाढनिर्भिन्नचेताः कच्चित् - पूर्णपणे विद्ध झाले आहे चित्त जीचे अशी आहेस काय ? ॥१५॥
राण्या म्हणत- अग टिटवे ! रात्रीच्या यावेळी आपले अखंड ज्ञान झाकून ठेवून स्वत: भगवानही झोपी गेले आहेत आणि तू मात्र झोपत नाहीस का? झोप उडालेली तू अशीच रात्रभर जागून आक्रोश का करीत आहेस? गडे ! कमलनयन भगवंतांचे मधुर हास्य आणि लीलायुक्त उदार नजरेने तुझ्या हृदयालासुद्धा आमच्याप्रमाणे घरे पडली नाहीत ना? (१५)
( वसंततिलका )
नेत्रे निमीलयसि नक्तमदृष्टबन्धुः त्वं रोरवीषि करुणं बत चक्रवाकि । दास्यं गत वयमिवाच्युतपादजुष्टां किं वा स्रजं स्पृहयसे कबरेण वोढुम् ॥ १६ ॥
( वसंततिलका ) रात्री कशास करिसी तव नेत्र बंद गावास का पति तुझा निघुनीच गेला । ना ना तुझेचि गुण श्री हरितो हिरावी ते काय दुःख तुजला नच औषधी ज्या ॥ १६ ॥
चक्रवाकि - हे चक्रवाकी - नक्तं - रात्रौ - अदृष्टबन्धुः त्वं - अदृश्य आहे पति जीचा अशी तू - नेत्रे निमीलयसि - डोळे मिटतेस - बत करुणं रोरवीषि - आणि दीनपणे रुदन करितेस - किंवा - अथवा - वयम् इव दास्यं गता (त्वं) - आमच्याप्रमाणे दासीपणाला पावलेली तू - अच्युतपादजुष्टां स्रजं - श्रीकृष्णाच्या पायांवर लोळणार्या गळ्यातील माळेला - कबरेण वोढुं स्पृहयसे - वेणीवर धारण करण्यास इच्छितेस काय ? ॥१६॥
अग चक्रवाकी ! तू रात्रीच्या वेळी प्रियकर दिसत नसल्यामुळे आपले डोळे बंद करून अशा प्रकारे करुण स्वराने त्याला बोलावीत आहेस का? आमच्याप्रमाणेच भगवंतांची दासी होऊन त्यांच्या चरणांवर वाहिलेली पुष्पमाळ तू आपल्या वेणीत घालु इच्छितेस काय? (१६)
( मिश्र )
भो भोः सदा निष्टनसे उदन्वन् अलब्धनिद्रोऽधिगतप्रजागरः । किं वा मुकुन्दापहृतात्मलाञ्छनः प्राप्तां दशां त्वं च गतो दुरत्ययाम् ॥ १७ ॥
( इंद्रवज्रा ) हे सागरा गर्जसि तू सदाचा का जाहला तो तुज रोग तैसा । का घेतले श्रीहरिने गुणाते का व्याधि ऐशी नच औषधी ज्या ॥ १७ ॥
भो भो उदन्वन् - हे समुद्रा - अलब्धनिद्रः अधिगतप्रजागरः - मिळालेली नाही झोप ज्याला व प्राप्त झाले आहे जाग्रण ज्याला असा - त्वं सदा निष्टनसे - तू नित्य गर्जना करितोस - मुकुन्दापहृतात्मलांछनः - श्रीकृष्णाने हरण केले आहे स्वतःचे कौस्तुभादि चिन्ह ज्यापासून असा - किं वा (असि) - आहेस काय - च (अस्माभिः) प्राप्तां दुरत्ययां दशां गतः - व आम्हाला प्राप्त झालेल्या अपरिहार्य अवस्थेला प्राप्त झालेला आहेस काय ? ॥१७॥
अरे समुद्रा ! तू तर नेहमी गर्जनाच करीत असतोस. तुला झोप येत नाही का? तुला सदैव जागे राहाण्याचाच रोग जडला आहे. आमच्या प्रिय श्यामसुंदराने तुझे धैर्य, गांभीर्य इत्यादी स्वाभाविक गुण हिरवून घेतले आहेत. म्हणूनच तुझी अशी कठीण अवस्था झाली आहे काय? (१७)
( वसंततिलका )
त्वं यक्ष्मणा बलवतासि गृहीत इन्दो क्षीणस्तमो न निजदीधितिभिः क्षिणोषि । कच्चिन् गकुन्दगदितानि यथा वयं त्वं विस्मृत्य भोः स्थगितगीरुपलक्ष्यसे नः ॥ १८ ॥
( वसंततिलका ) कां जाहला क्षय तुला शशिदेव ऐसा नाही मुळीच तम तू हटवू शके की । का स्वामि शब्द करिता तव बंद वाचा चिंतेत काय असशी हरिच्या परी तू ॥ १८ ॥
इंदो - हे चंद्रा - त्वं बलवता यक्ष्मणा गृहीतः क्षीणः असि - तू बलवान क्षयरोगाने घेरलेला क्षीण असा आहेस - निजदीधितिभिः तमः न क्षिणोषि - आपल्या किरणांनी अंधकार नष्ट करीत नाहीस - भोः यथा वयं - अरे जशा आम्ही तसा - त्वं - तू - मुकुन्दगदितानि विस्मृत्य - श्रीकृष्णाची भाषणे विसरून - स्थगितगीः कच्चित् - कुंठित आहे शब्द ज्याचा असा आहेस काय ? - नः (तथा) उपलक्ष्यसे - आम्हाला तसा दिसतोस. ॥१८॥
हे चंद्रा ! असाध्य असा क्षयरोग तुला झाला आहे. म्हणूनच तू इतका क्षीण झाला आहेस. त्यामुळे तू आपल्या किरणांनी अंधार नाहीसा करू शकत नाहीस. आमच्या प्रिय श्यामसुंदराच्या गोड गोष्टी विसरल्यामुळे आमचे जसे बोलणे कमी झाले, तसेच तुझे किरण कमी झाले असावेत, असेच आम्हांला वाटते. (१८)
( अनुष्टुप् )
किं न्वाचरितमस्माभिः मलयानिल तेऽप्रियम् । गोविन्दापाङ्गनिर्भिन्ने हृदीरयसि नः स्मरम् ॥ १९ ॥
( अनुष्टुप् ) मलया त्रासिशी का रे हृदयीं काम निर्मिशी । माहीत तुज का तैसे हरीने चित्त बांधिले ॥ १९ ॥
मलयानिल - हे मलयवायो - अस्माभिः ते किम् अप्रियं आचरितं - आम्हांकडून तुझे काय बरे वाईट केले गेले आहे - गोविंदापाङगनिर्भिन्ने नः हृदि - श्रीकृष्णाच्या कटाक्षांनी विदीर्ण झालेल्या आमच्या हृदयामध्ये - स्मरं ईरयसि - कामवासना जागृत करितोस ? ॥१९॥
हे मलयपर्वतावरील वायो ! आम्ही तुझे काय वाकडे केले आहे की, ज्यामुळे तू भगवंतांच्या नेत्रकटाक्षांनी अगोदरच घायाळ झालेल्या आमच्या मनात पुन्हा कामदेवाला पाठवतोस? (१९)
( मंदाक्रान्ता )
मेघ श्रीमन् त्वमसि दयितो यादवेन्द्रस्य नूनं श्रीवत्साङ्कं वयमिव भवान् ध्यायति प्रेमबद्धः । अत्युत्कण्ठः शबलहृदयोऽस्मद्विधो बाष्पधाराः स्मृत्वा स्मृत्वा विसृजसि मुहुर्दुःखदस्तत्प्रसङ्गः ॥ २० ॥
( मंदाक्रांता ) मेघावर्णो तवचि परि तो कृष्ण मित्र का रे । आता तू तो नयन मिटुनी ध्यासि का त्या हरी ला ॥ उत्कंठेने हृदय भरुनी ओतिशी अश्रु ऐसे । श्यामो मेघा हरिसि धरिता संकटो ये घरासी ॥ २० ॥
श्रीमन् मेघ - हे सुंदर मेघा - त्वं नूनं यादवेन्द्रस्य दयितः असि - तू खरोखर यादवाधिपति श्रीकृष्णाचा आवडता आहेस - भवान् - तू - वयम् इव - आम्हांप्रमाणे - प्रेमबद्धः - प्रेमाने बांधला असा - श्रीवत्साङकं ध्यायति - श्रीवत्सलांछन धारण करणार्या श्रीकृष्णाचे ध्यान करितोस - अत्युकण्ठः - अत्यंत उत्कंठित झालेला - शबलहृदयः - गहिवरलेले आहे हृदय ज्याचे असा - अस्मद्विधः - आमच्या सारखा - स्मृत्वा स्मृत्वा - पुनः पुनः स्मरण करून - मुहुः बाष्पधाराः विसृजसि - वारंवार अश्रुधारा सोडितोस - तत्प्रसङगः दुःखदः - त्या श्रीकृष्णाचा विशेष संग दुःखदायक असतो. ॥२०॥
श्रीमान मेघा ! तू निश्चितच यादवराजांचा लाडका आहेस. म्हणूनच तू आमच्याचप्रमाणे त्यांच्या प्रेमपाशात बांधला जाऊन त्यांचे ध्यान करीत आहेस. त्यांच्या भेटीसाठी तुझे मन कासावीस झाले आहे. त्यामुळेच तू त्यांची वारंवार आठवण काढून आमच्याप्रमाणे अश्रूधारा गाळीत आहेस ! अरे बाबा ! त्यांच्याशी संबंध जोडणे म्हणजे खरोखर विकतचे दुखणे घेणेच होय ! (२०)
( वियोगिनि )
प्रियरावपदानि भाषसे मृत सञ्जीविकयानया गिरा करवाणि किमद्य ते प्रियं वद मे वल्गितकण्ठ कोकिल ॥ २१ ॥
( वियोगिनी ) करितेसचि कोकिले रवा वदसि कृष्णस्वारापरि अशी । तव वाणि सुधे परि असे मृतप्रेमा उठवोनि प्रेरिशी ॥ २१ ॥
वल्गितकण्ठ कोकिल - मधुर आहे कंठ ज्याचा अशा हे कोकिला - अमृतसंजीविकया अनया गिरा - अमृताप्रमाणे जीवन देणार्या ह्या वाणीने - प्रियरावपदानि भाषसे - प्रेमळ ध्वनियुक्त असे शब्द तू बोलतोस - अद्य ते किं प्रियं करवाणि - आज तुझे कोणते प्रिय करावे - मे वद - मला सांग. ॥२१॥
सुरेल गळा असणार्या कोकिळा ! आमच्या प्राणप्रियासारखेच, मधुर स्वरात तू बोलतेस. प्रियकराच्या विरहामुळे मेलेल्यांना जीवन देणार्या या गोड शब्दांत मला सांग की, मी तुझ्या आवडीचे काय करू? (२१)
( पुष्पिताग्रा )
न चलसि न वदस्युदारबुद्धे क्षितिधर चिन्तयसे महान्तमर्थम् । अपि बत वसुदेवनन्दनाङ्घ्रिं वयमिव कामयसे स्तनैर्विधर्तुम् ॥ २२ ॥
( पुष्पिताग्रा ) न चलसि न वदो उदार बुद्धे क्षितिधरा मनि चिंतितोस काय । स्तन अमुचि जसे रुपो तुझे म्हणुनी हरिपद घ्यावया स्मरे कां ? ॥ २२ ॥
उदारबुद्धे क्षितिधर - हे उदार अंतःकरणाच्या पर्वता - न चलसि न वदसि - तू चालत नाहीस, बोलत नाहीस - महान्तम् अर्थम् चिन्तयसे - मोठया गोष्टीचा विचार करितोस - बत - काय - वसुदेवनन्दनाङ्घ्रिं वयम् इव - श्रीकृष्णाचे पाय जसे आम्ही धरतो तसे - स्तनैः विधर्तुं कामयसे अपि - आपल्या शिरावर धारण करण्याची इच्छा करितोस काय ? ॥२२॥
हे उदार मनाच्या पर्वता ! तू हलत-डुलत नाहीस की काही सांगत-ऐकत नाहीस. तू कोणत्या तरी गहन चिंतेमध्ये बुडाला आहेस, असे वाटते. आमच्याप्रमाणेच तुलाही असे वाटते का की, आमच्या स्तनांप्रमाणे असणार्या तुझ्या शिखरांवर वासुदेवांचे चरणकमल धारण करावेत ! (२२)
( वसंततिलका )
शुष्यद्ध्रदाः करशिता बत सिन्धुपत्न्यः सम्प्रत्यपास्तकमलश्रिय इष्टभर्तुः । यद्वद् वयं मधुपतेः प्रणयावलोकम् अप्राप्य मुष्टहृदयाः पुरुकर्शिताः स्म ॥ २३ ॥
( वसंततिलका ) हा ग्रीष्म होय सरिते सलिलो न कुंडी ना कंज तेथ खुलले कृश देह झाला । आम्ही हरीस स्मरता कृश जैचि झालो मेघास त्या स्मरुनि का अति दीन झाली ॥ २३ ॥
सिंधुपत्न्यः - हे नद्यांनो - शुष्यद्ध्रदाः - सुकून गेले आहेत डोह ज्यांतील अशा - करशिताः - वाळलेल्या - संप्रति अपास्तकमलश्रियः बत - सांप्रत गेली आहे कमळाची शोभा ज्यांच्या अशा खरोखर झाल्या आहात - यद्वत् वयं (तद्वत्) - ज्याप्रमाणे आम्ही त्याप्रमाणे - इष्टभर्तुः मधुपतेः - प्रियपति जो श्रीकृष्ण त्याचे - प्रणयावलोकं अप्राप्य - प्रेमळ अवलोकन न मिळाल्यामुळे - मुष्टहृदयाः पुरुकर्शिताः स्म - चोरलेले आहे हृदय ज्यांचे अशा अत्यंत कृश झाल्या आहात. ॥२३॥
हे समुद्रपत्नी नद्यांनो ! तुमचे डोह सुकून जाऊन तुम्ही अत्यंत कॄश झाला आहात. तुमच्यामध्ये उमललेल्या कमळांचे सौदर्यही आता दिसत नाही. जशा आम्ही आमच्या प्रियतम श्यामसुंदरांची प्रेमळ नजर आमच्यावर न पडल्यामुळे बेचैन होऊन अत्यंत कृश झालो आहोत, त्याचप्रमाणे तुम्हीसुद्धा मेघांच्या द्वारा आपल्या प्रियतम समुद्राचे पाणी न मिळल्यामुळे अशा दीन झाला आहात, असे वाटते. (२३)
( शार्दूलविक्रिडित )
हंस स्वागतमास्यतां पिब पयो ब्रूह्यङ्ग शौरेः कथां दूतं त्वां नु विदाम कच्चिदजितः स्वस्त्यास्त उक्तं पुरा । किं वा नश्चलसौहृदः स्मरति तं कस्माद्भजामो वयं क्षौद्रालापय कामदं श्रियमृते सैवैकनिष्ठा स्त्रियाम् ॥ २४ ॥
( शार्दूलविक्रीडित ) या हो हंस बसा असे बसुनिया सांगा हरीच्या कथा आम्ही तो समजो तुम्हास हरिचे ते दूत कैसे हरी । त्याची मैत्रि अशी हरी कुशल ना तू क्षूद्रचा दूत कां लक्ष्मीशी रत तो न कां कुणि तशी आम्हात रूपी गुणी ॥ २४ ॥
अङग हंस - हे हंसा - (ते) स्वागतं - तुझे स्वागत असो - आस्यतां - बसावे - पयः पिब - दूध पी - शौरेः कथां ब्रूहि - श्रीकृष्णाच्या कथा सांग - त्वां नु दूतं विदाम - आम्ही तुला खरोखर दूत समजतो - अजितः स्वस्ति आस्ते कच्चित् - श्रीकृष्ण खुशाल आहेत - चलसौहृदः (सः) - ज्याची मैत्री क्षणिक आहे असा तो श्रीकृष्ण - नः पुरा उक्तम् स्मरति किं वा - आमचे पूर्वीचे भाषण स्मरतो काय - वयं कस्मात् तं भजामः - आम्ही काय म्हणून त्याच्या भजनी लागावे - क्षौद्र - हे क्षुद्रदूता - कामदं (तं) श्रियं ऋते आलापय - मनोरथ पुरविणार्या त्या श्रीकृष्णाला लक्ष्मीशिवाय हाक मार - स्त्रियां सा एव - स्त्रियांमध्ये तीच - एकनिष्ठा (किम्) - एकनिष्ठ भक्त आहे काय ? ॥२४॥
हंसा ! अरे ये !! तुझे स्वागत असो. बैस. हे दूध पी ! बाबा रे ! श्यामसुंदरांविषयी काही सांग. तू त्यांचा दूत आहेस, असे आम्हांला वाटते. श्रीकृष्ण सुखरूप आहेत ना? त्यांची मैत्री फारच अस्थिर आहे. त्यांनी आम्हांला सांगितलेले त्यांना आठवते का? ते आमची पर्वा करीत नाहीत, तर आम्ही तरी त्यांच्यामागे कशाला धावावे ? हे क्षुद्राच्या दूता ! आमची इच्छा पूर्ण करणार्या त्यांना बोलावून आण. परंतु लक्ष्मीला मात्र बरोबर आणू नकोस. भगवंतांवर अनन्य प्रेम असणारी सर्व स्त्रियांमध्ये एकटी लक्ष्मीच आहे काय? (२४)
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) इतीदृशेन भावेन कृष्णे योगेश्वरेश्वरे । क्रियमाणेन माधव्यो लेभिरे परमां गतिम् ॥ २५ ॥
( अनुष्टुप् ) कृष्णपत्न्या असा भाव कृष्णासी नित्य ठेविती । म्हणोनी लाभले त्यांना श्रेष्ठची पद ते पहा ॥ २५ ॥
इति - याप्रमाणे - माधव्यः - श्रीकृष्णाच्या स्त्रिया - योगेश्वरेश्वरे कृष्णे - योगाधिपति श्रीकृष्णाच्या ठिकाणी - ईदृशेन क्रियमाणेन भावेन - अशा तर्हेच्या केलेल्या भक्तीने - परमां गतिं लेभिरे - श्रेष्ठ गतीला प्राप्त झाल्या. ॥२५॥
श्रीकृष्णपत्न्यांचा योगेश्वरेश्वर श्रीकृष्णांविषयी असाच अनन्य प्रेमभाव होता. म्हणूनच त्यांनी परमपद प्राप्त करून घेतले. (२५)
श्रुतमात्रोऽपि यः स्त्रीणां प्रसह्याकर्षते मनः ।
उरुगायोरुगीतो वा पश्यन्तीनां कुतः पुनः ॥ २६ ॥
कितेक परि या लीला गीतीं गाती कितेक त्या । हरी तो हरितो चित्ता स्त्रियांचे भाग्य केवढे ॥ २६ ॥
यः - जो श्रीकृष्ण - उरुगायोरुगीतः - ज्याची श्रेष्ठ कीर्ति पुष्कळ प्रकारे गायिली जाते असा - श्रुतमात्रः अपि - केवळ ऐकिला गेला असताच - स्त्रीणां मनः प्रसह्य आकर्षते - स्त्रियांचे मन बलात्काराने आकर्षितो - (तं) पश्यन्तीनां पुनः कुतः वा - मग त्याचे प्रत्यक्ष दर्शन घेणार्या स्त्रियांचे कसे बरे मन आकर्षण करणार नाही ? ॥२६॥
ज्यांच्या लीला अनेक प्रकारे अनेक गीतांच्या द्वारा गाईल्या गेल्या आहेत, त्या केवळ ऐकूनच स्त्रियांचे मन बळेच त्यांचेकडे ओढ घेत असे. मग ज्या त्यांना आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहात होत्या, त्यांच्या बाबतीत काय बोलावे? (२६)
याः सम्पर्यचरन् प्रेम्णा पादसंवाहनादिभिः ।
जगद्गुरुं भर्तृबुद्ध्या तासां किं वर्ण्यते तपः ॥ २७ ॥
जगद्गुरू असा ज्यांनी कृष्ण तो पति मानुनी । न्हाविले चेपिले पाय जेवूं खाऊ हि घातले । तप ते काय वर्णावे भाग्य थे श्रेष्ठची असे ॥ २७ ॥
याः - ज्या - भर्तृबुद्ध्या - पतिबुद्धीने - प्रेम्णा पादसंवाहनादिभिः - प्रेमाने पाय चेपणे इत्यादि प्रकारांनी - जगद्गुरुं पर्यचरन् - जगद्गुरु श्रीकृष्णाची सेवा करित्या झाल्या - तासां तपः किं वर्ण्यते - त्यांची तपश्चर्या किती वर्णावी ? ॥२७॥
ज्या स्त्रियांनी जगद्गुरु श्रीकृष्णांना आपले पती मानून प्रेमाने त्यांचे चरण चुरणे इत्यादी वेगवेगळ्या प्रकारे त्यांची सेवा केली, त्यांच्या तपश्चर्येचे काय वर्णन करावे? (२७)
एवं वेदोदितं धर्मं अनुतिष्ठन् सतां गतिः ।
गृहं धर्मार्थकामानां मुहुश्चादर्शयत् पदम् ॥ २८ ॥
संतांचा आसरा कृष्ण वेदोक्त वागुनी तये । दाविले घरची धर्म अर्थ कामार्थ साधन ॥ २८ ॥
सतां गतिः - साधूंचा आश्रय असा श्रीकृष्ण - एवं वेदोदितं धर्मं अनुतिष्ठन् - याप्रमाणे वेदोक्त धर्म आचरीत - मुहुः च - आणि वारंवार - गृहम् - घर - धर्मार्थकामानां पदं (अस्ति) - धर्म, अर्थ व काम ह्यांचे स्थान आहे - (इति) अदर्शयत् - असे दाखविता झाला. ॥२८॥
सत्पुरुषांचे एकमेव आश्रय असणार्या श्रीकृष्णांनी वेदोक्त धर्माचे स्वत: आचरण करून लोकांना दाखवून दिले की, धर्म, अर्थ आणि काम साध्य करण्याचे गृहस्थाश्रम हेच स्थान आहे. (२८)
आस्थितस्य परं धर्मं कृष्णस्य गृहमेधिनाम् ।
आसन् षोडशसाहस्रं महिष्यश्च शताधिकम् ॥ २९ ॥
गृहस्थोचित त्या धर्मे कृष्ण ते वागले पहा । सोळा हजार आणीक एकशे आठ त्या स्त्रिया ॥ २९ ॥
गृहमेधिनां परं धर्मं आस्थितस्य कृष्णस्य - गृहस्थाश्रम्यांच्या श्रेष्ठ धर्माचे आचरण करणार्या श्रीकृष्णाला - षोडशसाहस्रं शताधिकं च महिष्यः आसन् - सोळा हजार एकशे स्त्रिया होत्या. ॥२९॥
म्हणूनच ते गृहस्थाला उचित अशा धर्माचा आश्रय घेऊन व्यवहार करीत होते. त्यांच्या सोळा हजार एकशे आठ राण्या होत्या. (२९)
तासां स्त्रीरत्नभूतानां अष्टौ याः प्रागुदाहृताः ।
रुक्मिणीप्रमुखा राजन् तत्पुत्राश्चानुपूर्वशः ॥ ३० ॥
रुक्मिणी आदि त्या पट्टराण्या नी पुत्र त्यांचिये । क्रमाने बोललो सर्व पूर्वीच आपणा पुढे ॥ ३० ॥
राजन् - हे परीक्षित राजा - स्त्रीरत्न भूतानां तासां - स्त्रियांमध्ये श्रेष्ठपणा पावलेल्या त्या श्रीकृष्णाच्या स्त्रियांपैकी - याः रुक्मिणीप्रमुखाः अष्टौ - ज्या रुक्मिणीप्रमुख अशा आठ स्त्रिया - (ताः) तत्पुत्राः च - त्या आणि त्यांचे पुत्र - अनुपूर्वशः प्राक् उदाहृताः - अनुक्रमाने पूर्वीच वर्णिले आहेत. ॥३०॥
राजा ! त्या श्रेष्ठ पत्न्यांपैकी रुक्मिणी इत्यादी आठ पट्टराण्या आणि त्यांच्या पुत्रांचे मी यापूर्वीच क्रमाने वर्णन केले आहे. (३०)
एकैकस्यां दश दश कृष्णोऽजीजनदात्मजान् ।
यावत्य आत्मनो भार्या अमोघगतिरीश्वरः ॥ ३१ ॥
उरल्या त्याहि पत्न्यांना प्रत्येकी दशपुत्र ते । अशक्य काय तो त्याला संकल्प शक्तिमान् हरी ॥ ३१ ॥
अमोघगतिः ईश्वरः कृष्णः - व्यर्थ न जाणारे आहे कार्य ज्याचे असा श्रीकृष्ण - यावन्त्यः आत्मनः भार्याः - जितक्या स्वतःच्या भार्या - (तासां) एकैकस्यां दश दश आत्मजान् अजीजनत् - त्यांतील प्रत्येकीच्या ठिकाणी दहा दहा पुत्र उत्पन्न करिता झाला. ॥३१॥
त्यांव्यतिरिक्त सत्यसंकल्प भगवान श्रीकृष्णांच्या आणखी जेवढ्या पत्न्या होत्या, त्या प्रत्येकीचे दहा पुत्र होते. (३१)
तेषां उद्दामवीर्याणां अष्टादश महारथाः ।
आसन्नुदारयशसः तेषां नामानि मे शृणु ॥ ३२ ॥
त्यातील आठरा पुत्र होते थोर महारथी । यश ज्यांचे जगामध्ये नावे त्यांचीच सांगतो ॥ ३२ ॥
उद्दामवीर्याणां तेषां - अत्यंत पराक्रमी अशा त्या पुत्रांपैकी - अष्टादश - अठरा - महारथाः उदारयशसः (च) - महारथी व मोठे कीर्तिमान - आसन् - होते - तेषां नामानि मे शृणु - त्यांची नावे माझ्या तोंडून ऐक. ॥३२॥
त्या अत्यंत पराक्रमी पुत्रांमध्ये अठरा महारथी होते. त्यांचे यश सर्वत्र पसरले होते. त्यांची नावे माझ्याकडून ऐक. (३२)
प्रद्युम्नश्चानिरुद्धश्च दीप्तिमान् भानुरेव च ।
साम्बो मधुर्बृहद्भानुः चित्रभानुर्वृकोऽरुणः ॥ ३३ ॥ पुष्करो वेदबाहुश्च श्रुतदेवः सुनन्दनः । चित्रबाहुर्विरूपश्च कविर्न्यग्रोध एव च ॥ ३४ ॥
प्रद्युम्न अनिरुद्धो नी दीप्तिमान् भानु सांब नी । मधु वृक बृहद्भानु चित्रबाहू अरुण नी ॥ ३३ ॥ पुष्करो वेदबाहू नी श्रुतदेव सुनंदन । चित्रबाहू विरूपो नी न्यग्रोध कवि ही तसा ॥ ३४ ॥
प्रद्युम्नः च अनिरुद्धः (च) दीप्तिमान् च भानु एव च साम्बः (च) - प्रद्युम्न, अनिरुद्ध, दीप्तिमान, भानु व सांब - मधुः बृहद्भानुः चित्रभानुः वृकः अरुणः (च) - मधु, बृहद्भानु, चित्रभानु, वृक व अरुण. ॥३३॥ पुष्करः वेदबाहुः श्रुतदेवः सुनंदनः च - पुष्कर, वेदबाहु, श्रुतदेव आणि सुनंदन - चित्रबाहुः विरूपः च कविः न्यग्रोधः एव च - चित्रबाहु, विरूप, कवि तसाच न्यग्रोध. ॥३४॥
प्रद्युम्न, अनिरुद्ध, दीप्तिमान, भानू, सांब, मधू, बृहद्भानू, चित्रभानू, वृक, अरुण, पुष्कर, वेदबाहू, श्रुतदेव, सुनंदन, चित्रबाहू, विरुप, कवी आणि न्यग्रोध. (३३-३४)
एतेषां अपि राजेन्द्र तनुजानां मधुद्विषः ।
प्रद्युम्न आसीत् प्रथमः पितृवद् रुक्मिणीसुतः ॥ ३५ ॥
राजेंद्रा कृष्णपुत्रात प्रद्युम्न श्रेष्ठ तो असे । गुणांनी आपुल्या सर्व पित्याच्या समची असे ॥ ३५ ॥
राजेंद्र - हे परीक्षिता - मधुद्विषः एतेषाम् अपि तनुजानां - श्रीकृष्णाच्या ह्याहि पुत्रांमध्ये - प्रथम रुक्मिणीसुतः प्रद्युम्नः - पहिला रुक्मिणीचा पुत्र प्रद्युम्न - पितृवत् (श्रेष्ठ) आसीत् - पित्याप्रमाणे श्रेष्ठ होता. ॥३५॥
हे राजेंद्रा ! श्रीकृष्णांच्या या पुत्रांपैकीसुद्धा रुक्मिणीनंदन प्रद्युम्न हा पित्याप्रमाणेच सर्वांत श्रेष्ठ होता. (३५)
स रुक्मिणो दुहितरं उपयेमे महारथः ।
तस्यां ततोऽनिरुद्धोऽभूत् नागायतबलान्वितः ॥ ३६ ॥
रुक्मिची वरिली पुत्री प्रद्युम्ने त्या महारथे । तिच्या गर्भे तया झाला अनिरुद्ध महाबळी ॥ ३६ ॥
सः महारथः - तो महारथी प्रद्युम्न - रुक्मिणः दुहितरं उपयेमे - रुक्मीच्या मुलीशी विवाह लाविता झाला - तस्मात् नागायुतबलान्वितः अनिरुद्धः सुतः अभूत् - त्यापासून दहा हजार हत्तींचे सामर्थ्य असलेला अनिरुद्ध हा पुत्र झाला ॥३६॥
महारथी प्रद्युम्नाने रुक्मीच्या कन्येशी विवाह केला होता. तिच्यापासून अनिरुद्ध झाला. त्याला दहा हजार हत्तींचे बळ होते. (३६)
स चापि रुक्मिणः पौत्रीं दौहित्रो जगृहे ततः ।
वज्रस्तस्याभवद् यस्तु मौषलादवशेषितः ॥ ३७ ॥
मामाची मुलगी तेणे वरिली रूपवान् पहा । वज्र तो जन्मला जो की शापात एक वाचला ॥ ३७ ॥
सः दोहित्रः च अपि - आणि तो कन्यापुत्र अनिरुद्धहि - रुक्मिणः पौत्रीं जगृहे - रुक्मीच्या नातीला वरिता झाला - ततः तस्य वज्रः अभवत् - तीपासून त्या अनिरुद्धाला वज्र झाला - यः तु मौसलात् अविशेषितः - जो तर मुसलयुद्धांतून जिवंत राहिला ॥३७॥
रुक्मीच्या मुलीचा मुलगा अनिरुद्ध याने रुक्मीच्या मुलाच्या मुलीशी विवाह केला. तिच्यापासून वज्रनाभ याचा जन्म झाला. ऋषींच्या शापाने यदुवंशाचा नाश झाल्यावर हाच एकटा वाचला होता. (३७)
प्रतिबाहुरभूत्तस्मात् सुबाहुस्तस्य चात्मजः ।
सुबाहोः शान्तसेनोऽभूत् शतसेनस्तु तत्सुतः ॥ ३८ ॥
वज्राचा प्रतिबाहू नी तयाचाच सुबाहु तो । शांतसेनो सुबाहूचा शतसेन तया पुढे ॥ ३८ ॥
तस्मात् प्रतिबाहुः अभूत् - त्या वज्रापासून प्रतिबाहु झाला - तस्य च आत्मजः सुबाहुः - आणि त्या प्रतिबाहूचा पुत्र सुबाहू - सुबाहोः शान्तसेनः अभूत् - सुबाहूला शांतसेन हा पुत्र झाला - तत्सुतः तु शतसेनः - व त्याचा पुत्र शतसेन होय ॥३८॥
वज्रनाभाचा पुत्र प्रतिबाहू. प्रतिबाहूचा सुबाहू, सुबाहूचा शांतसेन आणि शांतसेनाचा शतसेन. (३८)
न ह्येतस्मिन्कुले जाता अधना अबहुप्रजाः ।
अल्पायुषोऽल्पवीर्याश्च अब्रह्मण्याश्च जज्ञिरे ॥ ३९ ॥
न कोणि वंशि त्या झाला निर्धनो अल्प आयु नी । अल्पशक्ति असा कोणी, सर्वची द्विजभक्त ते ॥ ३९ ॥
एतस्मिन् कुले - ह्या यदुवंशामध्ये - अधना अबहुप्रजाः - दरिद्री व थोडी आहे संतति ज्यांना असे - अल्पायुषः अल्पवीर्याः च - थोडे आयुष्य असलेले व थोडा पराक्रम असलेले - न हि जाताः - खरोखर उत्पन्न झाले नाहीत - अब्रह्मण्याः च (न) जज्ञिरे - आणि ब्राह्मणांचे अकल्याण करणारेहि उत्पन्न झाले नाहीत ॥३९॥
या वंशात कोणीही पुरुष निर्धन, निपुत्रिक अल्पायुषी, अशक्त किंवा ब्राह्मणभक्त नसलेला जन्मला नाही. (३९)
यदुवंशप्रसूतानां पुंसां विख्यातकर्मणाम् ।
सङ्ख्या न शक्यते कर्तुं अपि वर्षायुतैर्नृप ॥ ४० ॥
यशस्वी यदुवंशात पुरूष जाहले बहू । तयांची मोजण्या संख्या हजार वर्ष ना पुरे ॥ ४० ॥
नृप - हे राजा - यदुवंशप्रसूतानां विख्यातकर्मणां पुंसां - यदुवंशात उत्पन्न झालेल्या व ज्यांचा पराक्रम प्रसिद्ध आहे अशा पुरुषांची - संख्या - गणती - वर्षायुतैः अपि कर्तुं न शक्यते - लक्षावधि वर्षांनी सुद्धा करिता येणे शक्य नाही ॥४०॥
परीक्षिता ! यदुवंशांमध्ये असे यशस्वी आणि पराक्रमी पुरुष होऊन गेले की , ज्यांची गणती हजारो वर्षांमध्ये पूर्ण होऊ शकणार नाही. (४०)
तिस्रः कोट्यः सहस्राणां अष्टाशीतिशतानि च ।
आसन्यदुकुलाचार्याः कुमाराणां इति श्रुतम् ॥ ४१ ॥
तीन कोटी नि अठ्ठाविस् लक्ष आचार्य तेधवा । मुलांना यदुचा होते विद्या ती शिकवावया ॥ ४१ ॥
सहस्राणां कुमाराणां यदुकुलाचार्याः - अपरिमित यदुकुमाराचे कुलपरंपरागत शिक्षक - तिस्रः कोट्यः अष्टाशीति शतानि च - तीन कोटी आठ हजार आठशे - आसन् - होते - इति श्रुतं - असे ऐकिले आहे ॥४१॥
यदुवंशातील मुलांना शिक्षण देण्यासाठी तीन कोटी अठ्ठावीस लाख आचार्य होते, असे ऐकिवात आहे. (४१)
सङ्ख्यानं यादवानां कः करिष्यति महात्मनाम् ।
यत्रायुतानां अयुत लक्षेणास्ते स आहुकः ॥ ४२ ॥
तदा त्या वंशिची संख्या मोजुनी सांगणे कसे । उग्रसेना महापद्म सैनीक एकट्याचिये ॥ ४२ ॥
कः महात्मनां यादवानां संख्यानं करिष्यति - कोण बरे मोठमोठ्या यादवांची गणती करील - यत्र - जेथे - सः आहुकः - तो उग्रसेन - अयुतानां अयुतलक्षेण (सह) आस्ते - दशसहस्रांच्या दशसहस्रांना लक्षाने गुणून येतील इतक्या बांधवांसह रहात असे ॥४२॥
अशा स्थितीत महात्म्या यादवांची संख्या कशी सांगता येईल? स्वत: महाराज उग्रसेन यांच्या आधिपत्याखाली जवळ जवळ एक महापद्म सैनिक होते. (४२)
देवासुराहवहता दैतेया ये सुदारुणाः ।
ते चोत्पन्ना मनुष्येषु प्रजा दृप्ता बबाधिरे ॥ ४३ ॥
असूर देवसंग्रामी मेलेले दैत्य ते पुन्हा । माणुसी रूपि जन्मोनी गर्वाने त्रासिती जनां ॥ ४३ ॥
ये - जे - सुदारुणाः दैतेयाः - अत्यंत भयंकर दैत्य - देवासुराहवहताः - देवदैत्यांच्या युद्धात मृत झाले होते - ते च मनुष्येषु उत्पन्नाः - तेच मनुष्ययोनीत जन्मास आलेले असे - दृप्ताः (सन्तः) प्रजाः बबाधिरे - गर्विष्ठ होत्साते लोकांना पीडा देते झाले ॥४३॥
प्राचीन काळी देव आणि असुर यांच्या संग्रामाच्या वेळी पुष्कळसे उग्र स्वभावाचे असुर मारले गेले. ते मनुष्यजातीत जन्माला येऊन घमेंडीने जनतेला त्रास देऊ लागले. (४३)
तन्निग्रहाय हरिणा प्रोक्ता देवा यदोः कुले ।
अवतीर्णाः कुलशतं तेषां एकाधिकं नृप ॥ ४४ ॥
तयांना मारण्या याची कुळी ते जन्मले पहा । एकशे एक ही त्यांच्या कुळाची गणती असे ॥ ४४ ॥
नृप - हे राजा - हरिणा तन्निग्रहाय प्रोक्ताः देवाः - श्रीविष्णूने त्या दैत्यांच्या नाशासाठी आज्ञापिलेले देव - यदोः कुले अवतीर्णाः - यदुवंशात उत्पन्न झाले - तेषाम् एकाधिकं कुलशतं (अभवत्) - त्यांची एकशे एक कुले होती ॥४४॥
त्यांना शासन करण्यासाठी भगवंतांच्या आज्ञेने देवांनी यदुवंशामध्ये अवतार घेतला होता. परीक्षिता ! त्यांच्या कुळांची संख्या एकशे एक होती. (४४)
तेषां प्रमाणं भगवान् प्रभुत्वेनाभवद्धरिः ।
ये चानुवर्तिनस्तस्य ववृधुः सर्वयादवाः ॥ ४५ ॥
सर्व ते भगवान् कृष्णा आपुला स्वामि मानिती । संबंधी यदुवंशाचे तेही उन्नत जाहले ॥ ४५ ॥
तेषां (सर्वेषाम्) - त्या सर्वांना - भगवान् हरिः - भगवान श्रीविष्णु - प्रभुत्वेन - सामर्थ्यामुळे - प्रमाणं अभवत् - नियामक होता - च - व - ये - जे यादव - तस्य अनुवर्तिनः (आसन्) - त्याच्या आज्ञेत रहाणारे होते - (ते) सर्वयादवाः - ते सर्व यादव - ववृधुः - उत्कर्ष पावले ॥४५॥
ते सर्वजण श्रीकृष्णांनाच आपला स्वामी मानीत होते. जे त्यांचे अनुयायी होते, त्यांची सर्व प्रकारे भरभराट झाली. (४५)
शय्यासनाटनालाप क्रीडास्नानादिकर्मसु ।
न विदुः सन्तमात्मानं वृष्णयः कृष्णचेतसः ॥ ४६ ॥
चित्त ते यदुवंशींचे सदैव कृष्णि गुंतले । न शुद्ध राहिली त्यांना नित्यकर्माचिही तशी ॥ ४६ ॥
कृष्णचेतसः वृष्णयः - श्रीकृष्णाच्या ठिकाणी होते अन्तःकरण ज्यांचे असे ते यादव - शय्यासनाटनालापक्रीडास्नानादिकर्मसु - निजणे, बसणे, हिंडणे, बोलणे, खेळणे, स्नान करणे इत्यादि कर्मांमध्ये - सन्तं आत्मानं न विदुः - असलेल्या स्वतःला न जाणते झाले ॥४६॥
यदुवंशियांचे चित्त श्रीकृष्णांमध्ये इतके जडले होते की, त्यांचे निजणे-उठणे, हिंडणे-फिरणे, बोलणे-चालणे, खेळ, स्नान इत्यादी कामांच्या बाबतीत त्यांना आपल्याला शरीर आहे, याचीही शुद्धता राहात नसे. (४६)
( स्रग्धरा )
तीर्थं चक्रे नृपोनं यदजनि यदुषु स्वःसरित्पादशौचं । विद्विट्स्निग्धाः स्वरूपं ययुरजितपरा श्रीर्यदर्थेऽन्ययत्नः । यन्नामामङ्गलघ्नं श्रुतमथ गदितं यत्कृतो गोत्रधर्मः कृष्णस्यैतन्न चित्रं क्षितिभरहरणं कालचक्रायुधस्य ॥ ४७ ॥
( स्रग्धरा ) गंगाजी तीर्थ श्रेष्ठो परि महति हरी जन्मता अल्प झाली । लक्ष्मीसी ध्याति देवो परि हरि पदिती ती नित्य सेवेत राही । नामाची थोरवी की जरि मनि स्मरले एकवेळेचि श्रद्धे । नष्टेपापो धरेच नवल मुळिच ना भार हारी स्वचक्रे ॥ ४७ ॥
नृप - हे राजा - यत् यदुषु अजनि - जे यदुकुळात उत्पन्न झाले - (तत्) तीर्थम् - ते कृष्णरुपी तीर्थ - स्वःसरित्पादशौचं - स्वर्गातील गंगारुपी पाय धुण्याच्या तीर्थाला - ऊनं चक्रे - गौण करिते झाले - विद्विट्स्निग्धाः - शत्रू व मित्र - स्वरुपं ययुः - श्रीकृष्णाच्या स्वरुपाला प्राप्त झाले - यदर्थे - ज्या लक्ष्मीसाठी - अन्ययत्नः - इतरांचा प्रयत्न चालला असतो - (सा) श्रीः - ती लक्ष्मी - अजितपरा - श्रीकृष्णच सर्वस्व जीचे अशी - यन्नाम - ज्या श्रीकृष्णाचे नाव - श्रुतम् अथ गदितं (सत्) - ऐकिले व उच्चारिले असता - अमङ्गलन्घम् - अशुभांचा नाश करणारे आहे - गोत्रधर्मः यत्कृतः - कुलधर्महि ज्या श्रीकृष्णानेच निर्माण केलेला आहे - (तस्य) कालचक्रायुधस्य कृष्णस्य - त्या कालचक्र हेच आयुध धारण करणार्या श्रीकृष्णाचे - एतत् क्षितिभरहरणं - पृथ्वीचा भार दूर करण्याचे कार्य - चित्रं न - आश्चर्यकारक नव्हे ॥४७॥
परीक्षिता ! जेव्हा परमतीर्थ अशा भगवंतांनी स्वत: यदुवंशामध्ये अवतार घेतला, तेव्हा त्या तीर्थापुढे गंगाजलाचा महिमा आपोआपच कमी झाला. प्रेमाने वा द्वेषाने श्रीकृष्णपरायण झालेले त्यांच्या स्वरूपालाच प्राप्त झाले. जिला प्राप्त करण्यासाठी देवदानवही प्रयत्न करीत असतात, तीच लक्ष्मीदेवी श्रीकृष्णांच्या सेवेत स्वत: व्यग्र असते. श्रीकृष्णांचे नाव एक वेळ ऐकल्याने किंवा उच्चारल्याने सर्व अमंगल नाहीसे करते. सर्व कुळांचे धर्म श्रीकृष्णांनीच स्थापन केले आहेत, त्यांनी आपल्या हातामध्ये कालस्वरूप चक्र घेतलेले आहे. अशा स्थितीत, त्यांनी पृथ्वीवरील भार उतरविला, यात आश्चर्य ते काय ? (४७)
( मालिनी )
जयति जननिवासो देवकीजन्मवादो यदुवरपरिषत्स्वैर्दोर्भिरस्यन्नधर्मम् । स्थिरचरवृजिनघ्नः सुस्मितश्रीमुखेन व्रजपुरवनितानां वर्धयन् कामदेवम् ॥ ४८ ॥
( मालिनी ) सकल जन निवासो जन्मिला देवकी ने यदुकुल पद त्याचे सेविते धर्म मार्गे । हसुनि हरि बघे तो प्रेमवर्षाव होई जय जय जगती हा श्री जेयी एकला तो ॥ ४८ ॥
जननिवासः - लोकांमध्ये वास करणारा - देवकीजन्मवादः - देवकीपासून जन्म झाला असे ज्या संबंधाने म्हणणे आहे असा - यदुवरपर्षत् - यादवांतील श्रेष्ठ पुरुष ज्याचे सेवक आहेत असा श्रीकृष्ण - स्वैः दोर्भिः - आपल्या बाहूंनी - अधर्मम् अस्यन् - अधर्माचा नाश करणारा - स्थिरचरवृजिनन्घः - स्थावर जंगम प्राण्यांचे पाप नष्ट करणारा श्रीकृष्ण - सुस्मितश्रीमुखेन - स्मित हास्याने शोभणार्या सुंदर मुखाने - व्रजपुरवनितानां कामदेवं वर्धयन् - गोकुळातील गोपींची कामवासना वाढवित श्रीकृष्ण - जयति - विजयी होतो ॥४८॥
भगवान श्रीकृष्णच सर्व जीवांचे आश्रयस्थान आहेत. त्यांनी देवकीच्या उदरी जन्म घेतला ही केवळ त्यांची लीला आहे. यदुवंशातील वीर पार्षद होऊन त्यांची सेवा करीत असतात. त्यांनी आपल्या बाहुबळाने अधर्माचा अंत केला आहे. ते चराचराचे दु:ख नाहीसे करणारे आहेत. मंद हास्याने युक्त असे त्यांचे श्रीमुख व्रजस्त्रिया आणि नगरातील स्त्रियांच्या हृदयात प्रेमभाव वाढविते. अशा त्यांचा जयजयकार असो ! (४८)
( वसंततिलका )
इत्थं परस्य निजवर्त्मरिरक्षयात्त लीलातनोस्तदनुरूपविडम्बनानि । कर्माणि कर्मकषणानि यदूत्तमस्य श्रूयादमुष्य पदयोरनुवृत्तिमिच्छन् ॥ ४९ ॥
( वसंततिलका ) स्थापोनि धर्म हरि तो स्वय आचरे की लीला मनात स्मरता भवबंध नष्टे । ज्यांना हवाचि अधिकार पदास जाण्या त्यांनी कथाचि हरिची नित ऐकणे की ॥ ४९ ॥
अमुष्य पदयोः अनुवृत्तिं इच्छन् - ह्या श्रीकृष्णाच्या चरणांचे अनुकरण करण्यास इच्छिणारा पुरुष - इत्थं - याप्रमाणे - निजवर्त्मरिरक्षया - स्वतःच्या धर्ममार्गांचे रक्षण करण्याच्या इच्छेने - आत्तलीलातनोः - घेतले आहे क्रीडेसाठी शरीर ज्याने अशा - परस्य यदूत्तमस्य - श्रेष्ठ अशा श्रीकृष्णाची - तदनुरूप विडम्बनानि - त्या शरीराला अनुरुप अशा आचरणाची - कर्मकषणानि कर्माणि - कर्मांनी प्राप्त होणार्या दोषांचा नाश करणारी कर्मे - श्रूयात् - श्रवण करो ॥४९॥
प्रकृतीच्याही पलीकडे असलेल्या परमात्म्याने स्वत:च स्थापन केलेल्या धर्ममर्यादेचे रक्षण करण्यासाठी दिव्य लीलाशरीर धारण केले आणि त्याला अनुरूप अशा अनेक अद्भूत घटनांचा अभिनय केला. त्यांचे एक एक कर्म, स्मरण करणार्यांच्या कर्मबंधनाला तोडून टाकणारे आहे. यदुश्रेष्ठ श्रीकृष्णांच्या चरणकमलांच्या सेवेचा अधिकार जो प्राप्त करून घेऊ इच्छितो, त्याने त्यांच्या लीलांचेच श्रवण करावे. (४९)
मर्त्यस्तयानुसवमेधितया मुकुन्द
श्रीमत्कथाश्रवणकीर्तनचिन्तयैति । तद्धाम दुस्तरकृतान्तजवापवर्गं ग्रामाद्वनं क्षितिभुजोऽपि ययुर्यदर्थाः ॥ ५० ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे उत्तरार्धे श्रीकृष्णचरितानुवर्णनं नाम नवतितमोऽध्यायः ॥ ९० ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
श्रीमत्कथा श्रवण कीर्तन चिंतनाने ते कालचक्र भजका अन्च त्रासिते की । ते श्रेष्ठ धाम मिळण्या तपि थोर गेले लीला म्हणोनि भजके भजनात गाव्या ॥ ५० ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर नव्वदावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
मर्त्यः - मनुष्य - अनुसवं एधितया - वेळोवेळी वाढलेल्या - तया - त्या - मुकुन्दश्रीमत्कथाश्रवणकीर्तनचिन्तया - श्रीकृष्णाच्या सुंदर कथांच्या श्रवणांच्या व कीर्तनाच्या चिंतनाने - दुस्तरकृतान्तजवापवर्गं तद्धाम - तरून जाण्यास कठीण अशा कालाच्या वेगातून सोडविणार्या त्या श्रीकृष्णाच्या स्थानाला - एति - प्राप्त होतो - यदर्थाः क्षितिभुजः अपि - ज्या स्थानाची इच्छा करणारे राजेहि - ग्रामात् वनं ययुः - गावातून अरण्यात गेले ॥५०॥ नव्वदावा अध्याय समाप्त
जेव्हा मनुष्य क्षणाक्षणाला श्रीकृष्णांच्या मनोहर लीलाकथांचे श्रवण, कीर्तन आणि चिंतन करू लागतो, तेव्हा त्याची क्षणोक्षणी वाढणारी हीच भक्ती त्याला भगवंतांच्या परमधामाला नेऊन पोहोचविते. काळाच्या गतीच्या पलीकडे जणे जरी अत्यंत कठीण असले, तरीसुद्धा तेथे काळाची डाळ शिजत नाही. त्या धामाच्या प्राप्तीसाठी अनेक सम्राटांनी आपले राज्य सोडून अरण्याची वाट धरली आहे. (५०) अध्याय नव्वदावा समाप्त - स्कन्ध दहावा समाप्त - ॥ हरि: ॐ तत्सत् ॥
अध्याय नव्वदावा समाप्त |