![]() |
श्रीमद् भागवत पुराण
भगवताकुब्जामनोरथपूर्तिः; अक्रूरगृहं गत्वा भगवंतांचे कुब्जा अणि अक्रूराच्या घरी जाणे - संहिता - अन्वय - अर्थ समश्लोकी - मराठी
श्रीशुक उवाच -
( अनुष्टुप् ) अथ विज्ञाय भगवान् सर्वात्मा सर्वदर्शनः । सैरन्ध्र्याः कामतप्तायाः प्रियमिच्छन् गृहं ययौ ॥ १ ॥ महार्होपस्करैराढ्यं कामोपायोपबृंहितम् । मुक्तादामपताकाभिः वितानशयनासनैः । धूपैः सुरभिभिर्दीपैः स्रग् गन्धैरपि मण्डितम् ॥ २ ॥
( अनुष्टुप् ) श्रीशुकदेव सांगतात - मीलना व्याकुळे कुब्जा तिच्या तृप्त्यर्थ कृष्ण तो । सर्वात्मा भगवान् गेला तिच्याही घरि एकदा ॥ १ ॥ मूल्यवान् गेह ते होते श्रृंगारोचित वस्तु तै । आसने झालरी छत्त मोतीहार कुठे कुठे । सुगंधी धूप नी दीप गंध चंदन ठाइ त्या ॥ २ ॥
अथ सर्वात्मा - नंतर सर्वांच्या ठिकाणी आत्मरूपाने रहाणारा सर्वदर्शनः भगवान् विज्ञाय - सर्वसाक्षी श्रीकृष्ण मनातील अभिप्राय जाणून कामतप्तायाः - कामवासनेने संतप्त झालेल्या सैरन्ध्रयाः प्रियं इच्छन् - दासी कुब्जेचे प्रिय करण्याची इच्छा करणारा महार्होपस्करैः आढयं - मोठमोठया मौल्यवान भोग्य पदार्थांनी समृद्ध अशा कामोपायोपबृंहितं - कामोद्दीपक उपायांनी श्रृंगारिलेल्या मुक्तादामपताकाभिः - मोत्यांच्या माळा, पताका, वितानशयनासनैः सुरभिभिः - छत, शय्या, आसन, सुगंधी पदार्थ, धूपैः दीपैः च - धूप, दीप स्रग्गन्धैः अपि मंडितं - व सुगंधी फुलांच्या माळा यांनी शोभणार्या गृहं ययौ - घरी गेला. ॥१-२॥
श्रीशुक म्हणतात - सर्वांचे आत्मा व सर्वसाक्षी भगवान श्रीकृष्ण, त्यांना भेटण्यासाठी व्याकूळ झालेल्या कुब्जेला सुखी करण्यासाठी तिच्या घरी गेले. (१)
बहुमोल सामग्रीने कुब्जेचे घर भरलेले होते. शृंगाराला उपयोगी अशी पुष्कळ सामग्री तेथे रचलेली होती. ठिकठिकाणी मोत्यांच्या झालरी आणि पताका लावलेल्या होत्या. चांदवे लावलेले होते. शय्या अंथरलेल्या होत्या आणि बसण्यासाठी आसने ठेवली होती. धुपाचा सुगंध दरवळत होता. दिवे प्रकाशत होते. फुलांचे हार आणि सुगंधी द्रव्ये ठेवलेली होती. (२)
( मिश्र )
गृहं तमायान्तमवेक्ष्य सासनात् सद्यः समुत्थाय हि जातसम्भ्रमा । यथोपसङ्गम्य सखीभिरच्युतं सभाजयामास सत्-आसनादिभिः ॥ ३ ॥
( इंद्रवज्रा ) कृष्णास येता बघता त्वरेने सत्कारिले त्या सखिच्या सवे नी । देऊनि कृष्णा मग आसनो तै सर्वोपचार पुजिले विधीने ॥ ३ ॥
सा - ती कुब्जा गृहं आयान्तं तं अवेक्ष्य - घरी आलेल्या त्या श्रीकृष्णाला पाहून जातसंभ्रमा - धांदल उडालेली आहे जिची अशी सद्यः आसनात् उत्थाय - तत्काळ आसनावरून उठून सखीभिः यथा उपसंगम्य - सख्यांसह योग्य रीतीने सामोरी जाऊन अच्युतं सदासनादिभिः हि - श्रीकृष्णाला चांगले आसन इत्यादि देऊन त्याचा सभाजयामास - सत्कार करिती झाली. ॥३॥
भगवंत आपल्या घरी आलेले पाहून कुब्जा लगबगीने आपल्या आसनावरून उठून उभी राहिली आणि आपल्या सख्यांसह पुढे होऊन तिने भगवंतांना उत्तम आसन वगैरे देऊन त्यांची पूजा केली. (३)
तथोद्धवः साधुतयाभिपूजितो
न्यषीददुर्व्यामभिमृश्य चासनम् । कृष्णोऽपि तूर्णं शयनं महाधनं विवेश लोकाचरितान्यनुव्रतः ॥ ४ ॥
नी उद्धवाही पुजिले रितीने स्पर्शोनि त्यांनी मग आसनाला । ते उद्धवो भूमिसि बैसले की नी उच्च सेजी बसला हरी तो ॥ ४ ॥
तथा च - आणि त्याचप्रमाणे तया साधु अभिपूजितः - तिने चांगल्या रीतीने सत्कारलेला उद्धवः आसनं अभिमृश्य - उद्धव आसनाला स्पर्श करून उर्व्यां न्यषीदत् - भूमीवर बसला कृष्णः अपि लोकोचरितानि अनुव्रतः - कृष्णसुद्धा लोकाचाराला अनुसरून महाधनं - महामौल्यवान शयनं तूर्णं विवेश - अशा शयनमंदिरात लवकर गेला.॥४॥
त्याचप्रमाणे उद्धवाची सुद्धा तिने योग्य पद्धतीने पूजा केली. परंतु तो सन्मानासाठी तिने दिलेल्या आसनाला केवळ स्पर्श करून जमिनीवरच बसला. श्रीकृष्णही लोकरीतीचे अनुकरण करीत लगेच तिच्या बहुमूल्य शय्येवर जाऊन बसले. (४)
सा मज्जनालेपदुकूलभूषण
स्रग्गन्धताम्बूलसुधासवादिभिः । प्रसाधितात्मोपससार माधवं सव्रीडलीलोत्स्मितविभ्रमेक्षितैः ॥ ५ ॥
स्नानादि वस्त्रे तइ हार गंधे तांबूल घेता सजली बहू स्त्री । लीलामयी लाजुनी हासली नी कटाक्ष देता परिपाशि आली ॥ ५ ॥
मज्जनालेपदुकूलभूषण - स्नान, उटी, सुंदर वस्त्र, अलंकार, स्रग्गंधतांबूल - पुष्पमाळा, चंदन, तांबूल सुधासवादिभिः - व अमृततुल्य मद्य इत्यादिकांनी प्रसाधितात्मा सा - जिचे अंतःकरण प्रसन्न झाले आहे अशी ती माधवं सव्रीडलीलोत्स्मित - श्रीकृष्णाजवळ लज्जायुक्त कामक्रीडेने मंदहास्यपूर्ण विभ्रमेक्षितैः उपससार - असे विलासयुक्त कटाक्ष फेकीत प्राप्त झाली. ॥५॥
तेव्हा कुब्जेने स्नान करून उटणे, रेशमी वस्त्रे, अलंकार, पुष्पहार, गंध, विडा, सुधासव इत्यादींनी स्वतःला खूप सजविले, आणि लज्जायुक्त स्मितहास्य व हावभाव करीत विलासपूर्ण नजरेने पाहात पाहात ती भगवंतांच्याकडे आली. (५)
आहूय कान्तां नवसङ्गमह्रिया
विशङ्कितां कङ्कणभूषिते करे । प्रगृह्य शय्यामधिवेश्य रामया रेमेऽनुलेपार्पणपुण्यलेशया ॥ ६ ॥
नवीन संगा बहु लाजली ती बोलावि कृष्णो धरि हात हाती । शय्याक्रिडा तो हरि साधि तेंव्हा त्या अंगरागे फळ कृष्ण हे दे ॥ ६ ॥
नवसङगमह्लिया - नवीन समागमाची विशङ्कितां कान्तां आहूय - भीति वाटत असलेल्या सुस्वरूपी सैरन्ध्रीला हाक मारून कङकणभूषिते करे प्रगृह्य - कंकणांनी शोभणारा तिचा हात धरून शय्यां अधिवेश्य - शय्येवर बसवून अनुलेपार्पणपुण्यलेशया - उटी अर्पण केल्याच्या अल्प पुण्याच्या प्रभावामुळे रामया रेमे - त्या सुंदरीसह रममाण झाला. ॥६॥
मिलनाची पहिलीच वेळ असल्याने कुब्जा संकोचाने थोडीशी थबकली. तेव्हा श्रीकृष्णांनी तिला आपल्याजवळ बोलाविले आणि कंकणांनी सुशोभित असा तिचा हात धरून तिला पलंगावर बसवून घेऊन ते तिच्याशी रममाण झाले. या जन्मामध्ये कुब्जेने भगवंतांना फक्त सुगंधी उटणे अर्पण केले होते. त्या एका शुभकर्माचे हे फळ होते. (६)
( वसंततिलका )
सानङ्गतप्तकुचयोरुरसस्तथाक्ष्णोः जिघ्रन्त्यनन्तचरणेन रुजो मृजन्ती । दोर्भ्यां स्तनान्तरगतं परिरभ्य कान्तम् आनन्दमूर्तिमजहादतिदीर्घतापम् ॥ ७ ॥
श्रीकृष्णपाया स्तन नेत्रि घेता सुगंध येता बहु तृप्त झाली । वक्षस्थलासी हरि आवळोनी ती शांत झाली किति त्या दिनांची ॥ ७ ॥
सा - ती सैरन्ध्री अनंतचरणेन - श्रीकृष्णाच्या चरणाने अनङ्गतप्तकुचयोः उरसः - कामसंतप्त स्तनांच्या, वक्षस्थलाच्या तथा च अक्ष्णोः रुजः मृजन्ति - तशाच नेत्रांच्या पीडा दूर करीत (श्रीकृष्णचरणं) जिघ्रन्ती - श्रीकृष्णाच्या चरणाचा सुवास घेत स्तनान्तरगतं - आपल्या दोन स्तनांच्या मध्यभागी आलेल्या आनन्दमूर्तिं कान्तं - आनंदाची मूर्ति अशा रमणीय श्रीकृष्णाला दोर्भ्यां परिरभ्य - दोन्ही हातांनी आलिंगन देऊन अतिदीर्घतापं अजहात् - पुष्कळ दिवसांचा ताप नाहीसा करिती झाली. ॥७॥
भगवान श्रीकृष्णांचे चरण कुब्जेने आपले कामसंतप्त हृदय, वक्षःस्थळ आणि डोळ्यांवर ठेवून घेऊन त्यांचा दिव्य सुगंध ती घेऊ लागली. अशाप्रकारे तिने आपली सर्व व्यथा नाहीशी करून घेतली. आनंदमूर्ती प्रियतम श्यामसुंदरांना आपल्या दोन्ही हातांनी गाढ आलिंगन देऊन कुब्जेने प्रदीर्घ कालापासूनचा आपला विरहताप शांत केला. (७)
( अनुष्टुप् )
सैवं कैवल्यनाथं तं प्राप्य दुष्प्राप्यमीश्वरम् । अङ्गरागार्पणेनाहो दुर्भगेदमयाचत ॥ ८ ॥
( अनुष्टुप् ) अंगिरा अर्पिता कृष्ण कुब्जेस लाभला पहा । परी दुर्भागिता कैसी भक्तिना मागता म्हणे ॥ ८ ॥
अहो - अहो दुर्भगा सा - दुर्दैवी ती सैरन्ध्री एवं अङगरागार्पणेन - याप्रमाणे उटी अर्पण करून कैवल्यनाथं दुष्प्राप्यं तं ईश्वरं प्राप्य - मोक्षाधिपति दुर्मिळ अशा परमेश्वराला मिळवून इदं अयाचत - हे मागती झाली. ॥८॥
कुब्जेने फक्त सुगंधी उटणे दिले होते. तेवढ्यानेच तिला मोक्ष देण्यास समर्थ व मिळण्यास कठीण अशा भगवंतांची प्राप्ती झाली. परंतु त्या अभागिनीने मात्र हेच मागितले. (८)
आहोष्यतामिह प्रेष्ठ दिनानि कतिचिन्मया ।
रमस्व नोत्सहे त्यक्तुं सङ्गं तेऽम्बुरुहेक्षण ॥ ९ ॥
रहावे दिन ते कांही क्रीडता या परी इथे । मला न सोडवे तुम्हा श्रीकृष्ण कमलाक्षजी ॥ ९ ॥
अम्बुरुहेक्षण प्रेष्ठ - हे कमलनेत्रा प्रियतमा श्रीकृष्णा कतिचित् दिनानि इह उष्यतां - कित्येक दिवस आपण येथे रहावे मया रमस्व - माझ्यासह क्रीडा कर ते सङगं त्यक्तुं न उत्सहे - तुझा समागम मी सोडू शकत नाही. ॥९॥
हे प्रियकरा ! आपण काही दिवस येथेच राहून माझ्याबरोबर रमावे. कारण हे कमलनयना ! माझ्याच्याने आपली संगत सोडवत नाही. (९)
तस्यै कामवरं दत्त्वा मानयित्वा च मानदः ।
सहोद्धवेन सर्वेशः स्वधामागमदर्चितम् ॥ १० ॥
अभीष्ट वर देवोनी सन्मान करुनी तिचा । स्विकारून पुजा सर्व पातले आपुल्या घरा ॥ १० ॥
मानदः सर्वेशः - मान देणारा सर्वेश्वर श्रीकृष्ण तस्यै कामवरं दत्त्वा - त्या सैरन्ध्रीला इष्ट वर देऊन च मानयित्वा - आणि तिला मान देऊन उद्धवेन सह अर्चितं - उद्धवासह पूज्य अशा स्वधाम अगमत् - स्वस्थानाला निघून गेला. ॥१०॥
सर्वेश्वर श्रीकृष्णांनी तिच्या म्हणण्याला मान देऊन वस्त्रालंकारांनी तिची संभावना केली व तिला इच्छिलेला वर देऊन, उद्धवाबरोबर ते आपल्या संपन्न घरी परतले. (१०)
दुरार्ध्यं समाराध्य विष्णुं सर्वेश्वरेश्वरम् ।
यो वृणीते मनोग्राह्यं असत्त्वात् कुमनीष्यसौ ॥ ११ ॥
ब्रह्मादिका न पावे जो विष्णु सर्वेश्वरो असा । पावता मागणे त्याला दुर्बुद्धि मानणे पहा ॥ ११ ॥
यः दुराराध्यं - जो आराधण्यास कठीण सर्वेश्वरेश्वरं - व सर्वश्रेष्ठ पुरुषांचा अधिपति विष्णुं आराध्य - अशा श्रीकृष्णाची आराधना करून मनोग्राह्यं वृणीते - मनाला आवडणार्या विषयसुखाची याचना करितो असत्त्वात् असौ - तो अत्यंत तुच्छ अशा विषयांची इच्छा केल्यामुळे कुमनीषी - दुर्बुद्धीच होय. ॥११॥
आराधना करण्यासही अत्यंत कठीण अशा सर्वदेवाधिदेव विष्णूंना प्रसन्न करून घेऊन जो कोणी त्यांना तुच्छ विषयसुख मागतो, तो निश्चितच मूर्ख होय. (११)
अक्रूरभवनं कृष्णः सहरामोद्धवः प्रभुः ।
किञ्चित् चिकीर्षयन् प्रागाद् अक्रूरप्रीयकाम्यया ॥ १२ ॥
एकदा भगवान् कृष्ण बळी उद्धव घेउनी । काम काढोनि गेले त्या अक्रूरा घरि हे तिघे ॥ १२ ॥
सहरामोद्धवः प्रभुः कृष्णः - बलराम व उद्धव ह्यांसह प्रभू श्रीकृष्ण किंचित् चिकीर्षयन् - काही एक कार्य करण्यासाठी अक्रूरप्रियकाम्यया - अक्रूराचे प्रिय करण्याच्या इच्छेने अक्रूरभवनं प्रागात् - अक्रूराच्या घरी गेला. ॥१२॥
त्यानंतर भगवान श्रीकृष्ण, बलराम आणि उद्धवासह, अक्रूराची मनोकामना पूर्ण करण्यासाठी तसेच त्याच्याकडून काही काम करून घेण्यासाठी त्याच्या घरी गेले. (१२)
विवरण :- श्रीकृष्ण मथुरेस आल्यानंतर कंसासाठी अंगविलेपने घेऊन जाणारी कुब्जा त्यांना मार्गात भेटली. कृष्णाने विलेपने घेण्याची इच्छा दर्शविल्यानंतर तिने ती त्यास समर्पित केली. एवढीच तिची पुण्याई. त्त्यावेळीच ती कामातुर झाली होती; पण कृष्णाने तिची ती इच्छा नंतर पूर्ण केली. अशा कुब्जेला नवव्या श्लोकात 'दुर्भगा' 'करंटी' असे म्हटले आहे. ते का ? ज्या कृष्णपरमात्म्याची प्राप्ती मोठमोठया योग्यांनाहि दुर्लभ, तो प्रत्यक्ष श्रीकैवल्यनाथ कृष्ण आपण होऊन तिच्याकडे आला. तिची इच्छापूर्ती केली. अशा भगवंताकडे त्याच्या निरंतर भक्तीचे वरदान मागण्याऐवजी तिने विषयभोगाची, केवळ विषयोपभोगाची मागणी केली. ती एक सामान्य स्त्री होती. गोपींप्रमाणे कृष्णाबद्दलचे तिच्या मनात अनन्य निष्ठा नव्हती, की त्याच्या बद्दलच्या भक्तिरसात बुडून जाऊन, ती स्वतःचे अस्तित्व विसरली नव्हती. उलट तिला तिची इच्छापूर्ती करून घ्यावयाची होती. हे म्हणजे कृष्ण परमात्म्याकडून भक्तिरसाचे अमृत न मागता विषयरूपी सुरा मागण्यासारखे आहे. अर्थात हे मागणे तिच्या सामान्य व्यक्तिमत्वास धरूनच आहे. तिच्या कुवतीप्रमाणेच तिने मागितले. गोपी त्या गोपीच. तिला त्यांची सर थोडीच येणार ? म्हणूनच (गोपी आणि कृष्ण यांचे अभिन्नत्व पाहून कृष्णला 'गोपीकृष्ण' म्हणत असावेत.) मात्र तिच्यासारख्या सामान्य स्त्रीची आठवण कृष्णानेहि ठेवावी, हा त्याचा मोठेपणाच. (१२)
स तान् नरवरश्रेष्ठान् आरात् वीक्ष्य स्वबान्धवान् ।
प्रत्युत्थाय प्रमुदितः परिष्वज्याभिनन्द्य च ॥ १३ ॥ ननाम कृष्णं रामं च स तैरप्यभिवादितः । पूजयामास विधिवत् कृतासनपरिग्रहान् ॥ १४ ॥
नरवीर असे येता अक्रूरे पाहिले तदा । आनंदे धावले त्यांना मिठीत घेतले असे ॥ १३ ॥ अक्रूरे वंदिले बंधु त्रये अक्रूर वंदिले । आसने देउनी त्यांना विधिवत् पूजिले असे ॥ १४ ॥
सः तान् नरवरश्रेष्ठान् - तो अक्रूर त्या मनुष्यश्रेष्ठ अशा स्वबान्धवान् - आपल्या बांधवांना आरात् वीक्ष्य प्रमुदितः - दुरूनच पाहून आनंदित झालेला असा प्रत्युत्थाय परिष्वज्य अभिनंद्य च - उठून, आलिंगन देऊन व अभिनंदन करून कृष्णं च रामं ननाम - कृष्ण व बलराम ह्यांना नमस्कार करिता झाला तैः अपि अभिवादितः सः - त्या कृष्णादिकांनीहि नमस्कार केलेला तो अक्रूर कृतासनपरिग्रहान् - आसनांवर बसलेल्या त्या तिघांची विधिवत् पूजयामास - यथाविधि पूजा करिता झाला. ॥१३-१४॥
आपले बांधव असणारे ते पुरुषोत्तम येत असल्याचे लांबूनच अक्रूराने पाहिले आणि तातडीने उठून तो सामोरा गेला आणि आनंदाने त्यांचे स्वागत करून त्याने त्यांना आलिंगन दिले. (१३)
अक्रूराने राम-कृष्णांना नमस्कार केला. तसाच त्या तिघांनी अक्रूरालाही केला. सर्वजण आसनावर बसल्यावर अक्रूराने त्यांची विधिवत पूजा केली. (१४)
पादावनेजनीरापो धारयन् शिरसा नृप ।
अर्हणेनाम्बरैर्दिव्यैः गन्धस्रग् भूषणोत्तमैः ॥ १५ ॥ अर्चित्वा शिरसानम्य पादावङ्कगतौ मृजन् । प्रश्रयावनतोऽक्रूरः कृष्णरामावभाषत ॥ १६ ॥
कृष्णाचे पाय धूवोनी घेतले शिरिं तीर्थ ते । पूजा सामग्रि गंधो नी वस्त्र मालाहि अर्पिल्या ॥ १५ ॥ नमिता धरिले पाय हाताने चेपु लागले । विनये कृष्ण रामाला अक्रूर बोलु लागला ॥ १६ ॥
नृप - हे राजा शिरसा पादवनेजनीः आपः धारयन् - मस्तकाने पादप्रक्षालनाचे उदक धारण करून अर्हणेन दिव्यैः अम्बरैः - अर्ध्यादि पूजासाहित्याने दिव्य वस्त्रांनी गन्धस्रग्भूषणोत्तमैः अर्चित्वा - व चंदन माळा व श्रेष्ठ अलंकार यांनी पूजा करून शिरसा आनम्य - मस्तकाने नमस्कार करून अङकगतौ पादौ मृजन् - श्रीकृष्णाचे पाय मांडीवर घेऊन चुरीत प्रश्रयावनतः अक्रूरः - नम्रतापूर्वक लीन होऊन अक्रूर कृष्णरामौ अभाषत - श्रीकृष्ण व बलराम ह्याजपाशी बोलू लागला. ॥१५-१६॥
परीक्षिता ! प्रथम त्याने भगवंतांचे चरणोदक मस्तकी धारण केले. नंतर दिव्य वस्त्रे, गंध, माळा, मौल्यवान अलंकार इत्यादी पूजासामग्रीने त्यांचे पूजन केले, मस्तक लववून त्यांना नमस्कार केला व त्यांचे चरण आपल्या मांडीवर घेऊन तो ते चेपू लागला. त्याचवेळी विनम्र भावाने तो राम-कृष्णांना म्हणाला. (१५-१६)
दिष्ट्या पापो हतः कंसः सानुगो वामिदं कुलम् ।
भवद्भ्यामुद्धृतं कृच्छ्राद् दुरन्ताच्च समेधितम् ॥ १७ ॥
आनंद जाहला देवा मारिला कंस पापि तो । यदुवंशा सुखी केले द्वयांनी उन्नतो असे ॥ १७ ॥
भवद्भ्यां सानुगः कंसः हतः - तुम्ही दोघांनी सेवकांसह कंसाचा वध केला वां इदं कुलं - तुम्ही हे कुळ दुरन्तात् कृच्छ्रात् उद्धृतं - अपार संकटापासून मुक्त केले दिष्टया समेधितं च - आणि सुदैवाने त्याचा उत्कर्षहि केला. ॥१७॥
तुम्ही पापी कंसाला त्याच्या अनुयायांसह मारले, हे छान झाले ! त्याला मारून आपण दोघांनी यदुवंशाला मोठ्या संकटातून वाचविले आणि तो वंश समृद्ध केला. (१७)
युवां प्रधानपुरुषौ जगद्धेतू जगन्मयौ ।
भवद्भ्यां न विना किञ्चित् परमस्ति न चापरम् ॥ १८ ॥
तुम्हीच सर्व वस्तूंचे कार्यकारण भावही । दोघेही आदि पुरुष न वस्तु ती तुम्हा विना ॥ १८ ॥
युवां प्रधानपुरुषौ - तुम्ही दोघे श्रेष्ठ पुरुष असून जगद्धेतू - जगाच्या उत्पत्यादिकांना कारण आहा जगन्मयौ - आणि सर्व जगाला व्यापून रहाणारे आहा भवद्भ्यां विना - तुमच्याशिवाय दुसरे परं किंचित् न अस्ति - जगाला कोणतेहि कारण अपरं च न - अगर कार्य असू शकत नाही. ॥१८॥
आपण दोघे जगाचे कारण आणि जगत्स्वरुप आदिपुरूष आहात. आपल्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही वस्तू कारण नाही की कार्य नाही. (१८)
आत्मसृष्टमिदं विश्वं अन्वाविश्य स्वशक्तिभिः ।
ईयते बहुधा ब्रह्मन् श्रुतप्रत्यक्षगोचरम् ॥ १९ ॥
तुम्हीच निर्मिली सृष्टी काल मायादि शक्तिने । प्रवेश करिता तीत प्रतीत वस्तु होतसे ॥ १९ ॥
ब्रह्मन् - हे श्रीकृष्णा स्वशक्तिभिः आत्मसृष्टं - आपल्या शक्तींनी स्वतः उत्पन्न केलेल्या इदं विश्वं अन्वाविश्य - ह्या सृष्टिमध्ये प्रवेश करून भवान् श्रुतप्रत्यक्षगोचरं - तू ऐकिल्या जाणार्या व प्रत्यक्ष दिसणार्या वस्तूंनी दिसणारा बहुधा ईयते - असा अनेक प्रकारचा भासतोस. ॥१९॥
हे परमात्मन ! आपणच निर्माण केलेल्या या विश्वात ज्या ज्या वस्तू पाहिल्या आणि ऐकल्या जातात, त्यांच्या रूपाने आपलाच प्रत्यय येत असतो. (१९)
( मिश्र )
यथा हि भूतेषु चराचरेषु मह्यादयो योनिषु भान्ति नाना । एवं भवान्केवल आत्मयोनिषु आत्मात्मतन्त्रो बहुधा विभाति ॥ २० ॥
( इंद्रवज्रा ) भूतात तैसेचि चराचरात अनेक रूपातहि तूचि होशी । स्वेच्छेचि तू हे धरितोस रूपे ही ही असे एक लीला तुझीच ॥ २० ॥
यथा हि मह्यादयः योनिषु - ज्याप्रमाणे खरोखर पृथिव्यादि पदार्थ चराचरेषु भूतेषु - आपल्या स्थावरजंगमात्मक कार्यामध्ये नाना भान्ति - अनेकप्रकारचे असे भासतात एवं केवलः - त्याप्रमाणे एक आत्मतन्तरः आत्मा भवान् - स्वतंत्र आत्मरूपाने सर्वत्र रहाणारा तू आत्मयोनिषु - स्वतः निर्मिलेल्या मनुष्यपश्वादि अनेक शरीरांमध्ये बहुधा विभाति - अनेक प्रकारांनी भासतोस. ॥२०॥
जसे पृथ्वी इत्यादी पंचमहाभूतांपासून जी स्थावर-जंगम शरीरे बनतात, त्यात तीच महाभूते वेगवेगळ्या रूपांमध्ये अनुभवाला येतात. त्याचप्रमाणे आपणही आपल्या या कार्यरूप विश्वामध्ये स्वेच्छेने अनेक रूपांमध्ये प्रतीत होता. (२०)
सृजस्यथो लुम्पसि पासि विश्वं
रजस्तमःसत्त्वगुणैः स्वशक्तिभिः । न बध्यसे तद्गुणकर्मभिर्वा ज्ञानात्मनस्ते क्व च बन्धहेतुः ॥ २१ ॥
तू जन्मिशी पोषिशि मारिशी त्या रजो नि सत्वो तम या गुणांनी । ज्ञानस्वरूपी अति शुद्ध तूं जो । ती बंधने कै तुज स्पर्शि देवा ॥ २१ ॥
रजस्तमःसत्त्वगुणैः - रजोगुण, तमोगुण व सत्त्वगुण स्वशक्तिभिः - अशा ज्या तुझ्या तीन शक्ति विश्वं सृजसि पासि अथो लुम्पसि - त्यांनी जगाची उत्पत्ति, रक्षण आणि संहार करितोस सद्गुणकर्मभिः वा न बध्यसे - परंतु त्याच्या गुणांनी किंवा कर्मांनी बद्ध होत नाहीस ज्ञानात्मनः ते - आणि ज्ञानरूपी अशा तुला बन्धहेतुः क्व च - बन्धनाचे कारण कोठून असणार ? ॥२१॥
प्रभो ! आपण आपल्या रजोगुण, सत्वगुण आणि तमोगुणरूप शक्तींनी विश्वाची उत्पत्ती पालन आणि संहार करता. परंतु आपण त्या गुणांनी किंवा त्यांच्या द्वारा होणार्या कर्मांनी बंधनात पडत नाही. कारण आपण शुद्धज्ञानस्वरूप आहात. तर मग आपल्याला बंधनाचे कारण कोणते असणार ? (२१)
देहाद्युपाधेरनिरूपितत्वाद्
भवो न साक्षान्न भिदात्मनः स्यात् । अतो न बन्धस्तव नैव मोक्षः स्यातां निकामस्त्वयि नोऽविवेकः ॥ २२ ॥
उपाधि ना ती स्थुल सूक्ष्मतेची ना जन्ममृत्यू तइ भेद तूं ते । ती बंध मोक्षो मनकल्पना की अज्ञान सारे अमुचेच आहे ॥ २२ ॥
देहाद्युपधिः आत्मनः - देहादि उपाधि आत्म्याला अनिरूपितत्वात् साक्षात् - वस्तुतः नसल्यामुळे प्रत्यक्ष भवः (च) मिथः न स्यात् - त्याला संसार व भेदभाव नाही अतः तव - म्हणून आत्मरूपी तुला बन्धः न (च) मोक्षः एव न स्यातां - बंध व मोक्ष मुळीच नाहीत त्वयि निकामः - तुझे ठिकाणी ते आहेत असे समजणे म्हणजे नः अविवेकः - हा आमचा अविचार होय. ॥२२॥
प्रभो ! स्थूलदेह, सूक्ष्मदेह इत्यादी उपाधी आत्म्याला नसल्यामुळे त्याला जन्म-मृत्यू नाही की त्याच्याहून दुसरा कोणता पदार्थ नाही. म्हणूनच आत्मस्वरुप आपल्याला बंधन किंवा मोक्ष नाही. तरीही आत्म्याविषयी बंधमोक्षाची जी कल्पना असते, ती केवळ आमच्या अविवेकामुळे. (२२)
विवरण :- कुब्जेची इच्छा पूर्ण करून भगवंत अक्रूराकडे गेले. त्याने राम-कृष्णांची यथोचित पूजा करून त्यांचे चरणतीर्थ घेतले. तेव्हा त्यांची स्तुती करताना तो म्हणतो, आपण दोघे प्रधानपुरुष, प्रकृति-पुरुष आहात. जगाच्या निर्मितीचे कारण आपण दोघे असून आपणांशिवाय दुसरे कोणतेच कार्य होऊ शकत नाही. सर्व उत्तमोत्तम गोष्टींचे स्थानहि आपणच आहात. आपण दोघेही या जगाला व्यापून उरला आहात. ज्याप्रमाणे सर्वच छोटया वस्तूत पंचमहाभूतांचे अस्तित्व, त्याप्रमाणे आपण सर्व गोष्टीत आहात. मात्र सर्वात असूनहि नसल्यासारखे आहात. जगाची सृष्टि, स्थिती, लय ही सर्व आपली लीला. प्रकृतीने निर्माण केलेला हा पसारा अज्ञानाने, अविवेकाने खरा वाटतो. बंधन, मोक्ष इ.ची कल्पना आपल्याबाबतीत लावणे हे आमचे अज्ञान असून आपण वेदमार्गाच्गे रक्ष्ण करण्यास अवतार घेतला आहे. (१९-२२)
त्वयोदितोऽयं जगतो हिताय
यदा यदा वेदपथः पुराणः । बाध्येत पाषण्डपथैरसद्भिः तदा भवान् सन्सत्त्वगुणं बिभर्ति ॥ २३ ॥
तू निर्मिले वेद हिता जगाच्या सनातनी धर्म पथोचि श्रेष्ठ । पाखंडी जेंव्हा त्रसिती जनांना तू शुद्ध रूपे अवतार घेशी ॥ २३ ॥
त्वया जगतः हिताय - तू जगाच्या कल्याणासाठी उदितः अयं पुराणः वेदपथः - उत्पन्न केलेला हा प्राचीन वेदमार्ग असद्भिः पाखण्डपथैः - दुष्ट अशा पाखंडमार्गी लोकांनी यदा यदा बाध्येत - जेव्हा जेव्हा पीडिला जातो तदा भवान् सत्त्वगुणं बिभर्ति - तू तेव्हा सत्त्वगुण धारण करितोस. ॥२३॥
आपण जगाच्या कल्याणासाठी हा सनातन वेदमार्ग प्रगट केला आहे. या मार्गाची जेव्हा जेव्हा नास्तिकवृत्तीच्या दुष्टांकडून पायमल्ली होते, तेव्हा तेव्हा आपण शुद्ध सत्वमय शरीर धारण करता. (२३)
( वसंततिलका )
स त्वं प्रभोऽद्य वसुदेवगृहेऽवतीर्णः स्वांशेन भारमपनेतुमिहासि भूमेः । अक्षौहिणीशतवधेन सुरेतरांश राज्ञाममुष्य च कुलस्य यशो वितन्वन् ॥ २४ ॥
( वसंततिलका ) तू जन्मलास वसुदेवघरी कराया हा भार दूर सगळा सह या बळीच्या । जे जन्मले असुर नी करितात राज्य तू मारुनी सकल ते यश वाढवीसी ॥ २४ ॥
प्रभो - हे श्रीकृष्णा सः त्वं अद्य इह - तो तू आज येथे सुरेतरांशराज्ञां - दैत्यांच्या अंशापासून जन्मलेल्या राजांचे अक्षौहिणीशतवधेन - शंभर अक्षौहिणी सैन्य मारून भूमेः भारं अपनेतुं - पृथ्वीचा भार दूर करण्याकरिता अमुष्य कुलस्य च यशः वितन्वन् - आणि ह्या यदुकुलाची कीर्ति वाढविणारा वसुदेवगृहेस्वांशेन - वसुदेवाच्या घरी स्वतःच्या अंशाने अवतीर्णः असि - अवतरला आहेस. ॥२४॥
प्रभो ! तेच आपण यावेळी आपले अंश श्रीबलराम यांचेसह पृथ्वीचा भार नाहीसा करण्यासाठी येथे वसुदेवांच्या घरी अवतीर्ण झाला आहात. असुरांच्या अंशापासून उत्पन्न झालेल्या नामधारी राजांच्या शेकडो अक्षौहिणी सेनेचा आपण संहार कराल आणि यदुवंशाच्या यशाचा विस्तार कराल. (२४)
अद्येश नो वसतयः खलु भूरिभागा
यः सर्वदेवपितृभूतनृदेवमूर्तिः । यत्पादशौचसलिलं त्रिजगय् पुनाति स त्वं जगद्गुरुरधोक्षज याः प्रविष्टः ॥ २५ ॥
ते सर्वदेव पितरे जिव भूप सारे ती सर्व रूप तवची, तव शुद्ध गंगा । तू एक शिक्षक जिवा कितरो नि देव भाग्या सिमा न उरली घर धन्य झाले ॥ ५ ॥
अधोक्षज ईश - हे जितेंद्रिय ईश्वरा अद्य नः वसतयः खलु - आज आमची घरे खरोखर भूरिभागाः (जाताः) - अत्यंत भाग्यवंत झाली आहेत यः सर्वदेवपितृ - जो सर्व देव, पितर, भूतनृदेवमूर्तिः - भूते, मनुष्य व वेद ह्यांची मूर्ति होय यत्पादशौचसलिलं - ज्याच्या पादप्रक्षालनाचे उदक त्रिजगत् पुनाति - त्रैलोक्याला पवित्र करिते सः जगद्गुरुः त्वं - तो जगत्पति तू याः प्रविष्टः - ज्या घरामध्ये आलास. ॥२५॥
हे परमात्मन ! सर्व देव, पितर, भूतगण, मनुष्य आणि वेद (हे पाच यज्ञ) या आपल्या मूर्ती आहेत. आपले चरणतीर्थ अशी गंगा तिन्ही लोकांना पवित्र करते. आपण जगद्गुरू आहात. तेच आपण आज आमच्या घरी आला आहात. आज आमचे घर धन्य धन्य झाले. त्याच्या भाग्याला सीमाच उरली नाही. (२५)
कः पण्डितस्त्वदपरं शरणं समीयाद्
भक्तप्रियादृतगिरः सुहृदः कृतज्ञात् । सर्वान् ददाति सुहृदो भजतोऽभिकामान् आत्मानमप्युपचयापचयौ न यस्य ॥ २६ ॥
भक्तास प्रीय प्रभू तू हितु नी कृतज्ञ तो कोण त्यागि चतुरो अन पूजि अन्या । तू पूर्ण हेतु करिसी भजगा स्वताच्या तू कांही ना ठिविशि नी स्वयची रहाशी ॥ ६ ॥
कः पण्डितः - कोणता ज्ञानी पुरुष भक्तप्रियात् ऋतगिरः - भक्तांवर प्रेम करणार्या, खरे बोलणार्या, सुहृदः कृतज्ञान त्वत् अपरं - मित्र व परोपकारी अशा तुझ्याहून दुसर्याला शरणं समीयात् - शरण जाईल सर्वान् सुहृदः - सर्व भक्तांना अभिकामान् - इष्ट वस्तु यस्य उपचयापचयौ न (तं) - ज्याची क्षय व वृद्धि होत नाही आत्मानम् अपि - असा तो आत्मासुद्धा (भवान्) ददाति - तू अर्पण करतोस. ॥२६॥
प्रभो ! आपण भक्तप्रिय, सत्यवक्ते, अकारण हितचिंतक आणि कृतज्ञ आहात. आपण आपले भजन करणार्या भक्तांच्या सर्व अभिलाषा पूर्ण करता; एवढेच काय पण स्वतःलाही देऊन टाकता. तरीही आपल्यामध्ये कमी-जास्तपणा उत्पन्न होत नाही. अशा तुम्हांला सोडून कोणता बुद्धिमान मनुष्य दुसर्या कोणाला शरण जाईल ?(२६)
दिष्ट्या जनार्दन भवानिह नः प्रतीतो
योगेश्वरैरपि दुरापगतिः सुरेशैः । छिन्ध्याशु नः सुतकलत्रधनाप्तगेह देहादिमोहरशनां भवदीयमायाम् ॥ २७ ॥
ते भक्त कष्ट हरिशी भवमुक्ति देशी जाणू तुला न शकती तपि देवराजा ! स्त्री पुत्र गेह धन ययात बद्ध साक्षात भेट करिशी भव तो तुटेल ॥ २७ ॥
जनार्दन - हे श्रीकृष्णा योगेश्वरैः (च) सुरेशैः अपि - योग्यांना व श्रेष्ठ देवांना ज्याची दुरापगतिः भवान् - गति समजत नाही असा तू इह नः प्रतीतः - येथे आम्हाला दिसलास दिष्टया - ही मोठी सुदैवाची गोष्ट होय नः सुतकलत्रधनाप्तगेह - आम्हाला पुत्र, स्त्री, धन, संबंधी, घर, देहादिमोहरशनां - शरीर इत्यादिकांच्या भवदीयमायां - मोहाने बांधणारी अशी तुझी माया आशु छिन्धि - लवकर तोडून टाक. ॥२७॥
हे प्रभो ! मोठेमोठे योगी आणि देवराजसुद्धा ज्यांचे स्वरुप जाणू शकत नाहीत; त्या आपले आम्हांला साक्षात दर्शन झाले, ही केवढी भाग्याची गोष्ट आहे ! प्रभो ! आम्ही स्त्री, पुत्र, धन, स्वजन, घर, देह इत्यादी रूप मोहाच्या दोरीने बांधले गेलो आहोत. हा आपल्याच मायेचाखेळ आहे. कृपा करून आपण आमचे हे बंधन लगेच तोडून टाका. (२७)
( अनुष्टुप् )
इत्यर्चितः संस्तुतश्च भक्तेन भगवान्हरिः । अक्रूरं सस्मितं प्राह गीर्भिः सम्मोहयन्निव ॥ २८ ॥
श्रीशुकदेव सांगतात - ( अनुष्टुप् ) अक्रूरे पूजिता कृष्णा स्तविता भक्तिने असे । हासुनी गोड शब्दाने बोलला मोहिता असे ॥ २८ ॥
भक्तेन इति अर्चितः - भक्त अक्रूराने अशा रीतीने पूजिलेला च संस्तुतः भगवान् - आणि स्तविलेला श्रीकृष्ण अक्रूरं गीर्भिः संमोहयन् इव - अक्रूराला शब्दानी मोह पाडीतच की काय प्राह - म्हणाला. ॥२८॥
श्रीशुक म्हणतात- परीक्षिता ! भक्त अक्रूराने अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णांची पूजा आणि स्तुती केली. नंतर त्यांनी स्मित हास्य करून, त्यांना जणू मोहित करीत आपल्या मधुर वाणीने म्हटले. (२८)
श्रीभगवानुवाच -
त्वं नो गुरुः पितृव्यश्च श्लाघ्यो बन्धुश्च नित्यदा । वयं तु रक्ष्याः पोष्याश्च अनुकम्प्याः प्रजा हि वः ॥ २९ ॥
श्री भगवान् म्हणाले - तुम्ही गुरू तसे काका वंशाचे हितकारक । कृपा पालन नी रक्षा पात्र बालक तो अम्ही ॥ २९ ॥
त्वं नः गुरुः - तू आमचा गुरु च पितृव्यः - आणि चुलता नित्यदा श्लाघ्यः च बन्धुः - नेहमी स्तुत्य व आप्त आहेस वयं तु - आम्ही तर रक्ष्याः च पोष्याः - तुझ्याकडून रक्षिले व पोषिले जाण्यास योग्य आहो (वयं) हि वः - खरोखर आम्ही तुमच्या अनुकम्प्याः प्रजाः - दयेस पात्र अशा प्रजा आहो. ॥२९॥
श्रीकृष्ण म्हणाले- काका ! आपण आमचे हितोपदेशक, चुलते आणि आदरणीय बांधव आहात. आम्ही आपल्या मुलासारखे आहोत. आपणच आमचे रक्षण, पालन करून आमच्यावर कृपा करायची. (२९)
भवद्विधा महाभागा निषेव्या अर्हसत्तमाः ।
श्रेयस्कामैर्नृभिर्नित्यं देवाः स्वार्था न साधवः ॥ ३० ॥
कल्याण इच्छि जो त्याने तुम्हा संतास पूजिणे । संत देवाहुनी श्रेष्ठ संतांना स्वार्थ तो नसे ॥ ३० ॥
श्रेयस्कामैः नृभिः - कल्याणेच्छु पुरुषांनी भवद्विधाः अर्हसत्तमाः - आपल्यासारखे पूजा करण्यास अत्यंत योग्य असे महाभागाः - महाभाग्यशील भगवद्भक्त नित्यं निषेव्याः - सेवा करण्यास योग्य होत देवाः स्वार्थाः (सन्ति) - देव हे स्वार्थसाधू आहेत, साधवः न - साधु तसे नव्हेत. ॥३०॥
जे आपले कल्याण इच्छितात, त्यांनी आपल्यासारख्या परम पूजनीय आणि महाभाग्यवान संतांची नेहमी सेवा केली पाहिजे. संत देवतांपेक्षाही श्रेष्ठ होत. कारण देवता स्वार्थी असतात, संतांचे ठिकाणी स्वार्थ नसतो. (३०)
न ह्यम्मयानि तीर्थानि न देवा मृच्छिलामयाः ।
ते पुनन्त्युरुकालेन दर्शनादेव साधवः ॥ ३१ ॥
मूर्ती ना देवता होय पाणी ना तीर्थ ते कधी । तयांना सेविणे नित्य क्षणात संत तारिती ॥ ३१ ॥
अम्मयानि तीर्थानि - जलमय तीर्थे (दर्शनात् एव) (न पुनन्ति) - दर्शनमात्रेकरून पवित्र करीत नाहीत शिलामयाः देवाः - पाषाणाचे देव (दर्शनात् एव) न (पुनन्ति) - दर्शनमात्रेकरून पवित्र करीत नाहीत ते उरुकालेन पुनन्ति - ते पुष्कळ काळाने पवित्र करितात साधवः दर्शनात् एव - साधु दर्शनमात्रेकरूनच पुनन्ति - पवित्र करितात. ॥३१॥
फक्त पाणी म्हणजे तीर्थ नव्हे, फक्त माती आणि पाषाण यांनी बनविलेल्या मूर्तीच देवता नव्हेत. कारण तीर्थे व देव कालान्तराने पवित्र करतात; परंतु संत मात्र दर्शन होताच पवित्र करतात. (३१)
स भवान्सुहृदां वै नः श्रेयान् श्रेयश्चिकीर्षया ।
जिज्ञासार्थं पाण्डवानां गच्छस्व त्वं गजाह्वयम् ॥ ३२ ॥
हितैषी सुहृदां मध्ये काका श्रेष्ठ तुम्ही असा । म्हणौनी पांडवी हीत करण्या हस्तिनापुरी । जावुनी पुसणे सर्व कुशलो मंगलो तया ॥ ३२ ॥
सः भवान् वै - तो तू खरोखर नः सुहृदां श्रेयान् - आमच्या हितकर्त्यामध्ये कल्याणप्रद आहेस श्रेयः चिकीर्षया - कल्याण करण्याच्या इच्छेने पाण्डवानां जिज्ञासार्थं (च) - व पांडवांचा समाचार घेण्यासाठी त्वं गजाह्वयं गच्छ - तू हस्तिनापुरला जा. ॥३२॥
आपण आमच्या पांडवांचे हित करण्यासाठी तसेच त्यांची खुशाली जाणून घेण्यासाठी हस्तिनापुरला जावे. (३२)
विवरण :- अक्रूराने राम-कृष्णांची अनेक प्रकारे स्तुती करून शेवटी या मायामोहातून मुक्त करण्याची विनंती केली. तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात, तू आम्हाला वंद्य आहेस. तुझ्यासारख्या श्रेष्ठांची तर सर्वांनीच सेवा करावी. कारण देव हे स्वार्थी असतात. वरवर पाहता हे विधान फार धार्ष्टयाचे वाटेल. अर्थात ते एका देवानेच केले आहे, हेही खरेच आहे. 'देव स्वार्थी' याचा अर्थ देवांचा जेवढयास तेवढे हा न्याय. देवांचे जितकी सेवा करावी, तेवढेच फळ ते देतात आणि तेही बर्याच वेळानंतर. म्हणजे देवांनाहि सेवा अपेक्षित असावी. हल्लीच्या शब्दात असेही म्हणता येईल की 'जेवढी मागणी तेवढाच पुरवठा' असाच देवांचा व्यवहार. पण साधूंना मात्र कोणतीच अपेक्षा नसते. ते निस्वार्थी असतात. समदृष्टी असतात. परकल्याण हेच त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट असते. कोणीही आणि कितीही निंदा अथवा स्तुतिही केली तरी ते परहित करण्यातच रममाण असतात. म्हणूनच हिंदी कवी आपल्याला उपदेश करतात, 'हरिसे तू जनि (मत) हेत (प्रेम) कर, कर हरिजनसे हेत ।' या श्लोकात देवत्वाविषयीची संकल्पना स्पष्ट केली आहे. नुसत्या पाण्याच्या साठयाला 'तीर्थ' म्हणत नाहीत. तसेच फक्त दगड-मातीच्या मूर्तीलाहि 'देव' म्हणत नाहीत. त्याठिकाणी देवतांचे वास्तव्य असावे लागते. किंवा त्यामध्ये भक्तीने, भावाने देवत्व निर्माण करावे लागते. या गोष्टीला बराच काळ लागतो. पण साधूंच्या दर्शनाने मनुष्य पवित्र होतो. त्याच्यासाठी इतर आणखी कोणतीच दुसरी गोष्ट करण्याची गरज नसते. त्यामुळे फळ लगेच देणारा, कोणत्याही इतर गोष्टी न करता, असा हा सत्संगच अधिक श्रेष्ठ. (३१-३२)
पितर्युपरते बालाः सह मात्रा सुदुःखिताः ।
आनीताः स्वपुरं राज्ञा वसन्त इति शुश्रुम ॥ ३३ ॥
ऐकता मरता पंडू कुंतीच्या सह पांडव । दुःखात राहती सारे आता ते हस्तिनापुरी ॥ ३३ ॥
पितरि उपरते - पिता पंडू मृत झाला असता मात्रा सह दुःखिताः - मातेसह दुःखित झालेले राज्ञा स्वपुरं आनीताः - राजा धृतराष्ट्राने आपल्या नगरामध्ये आणिलेले बालाः वसन्ते - धर्मादि लहान असतानाच तेथे रहातात इति शुश्रुम - असे आम्ही ऐकिले आहे. ॥३३॥
आम्ही ऐकले आहे की, पांडूच्या मृत्यूनंतर माता कुंतीसह युधिष्ठिर इत्यादी पांडव अत्यंत दुःखी झाले होते. धृतराष्ट्राने आता त्यांना राजधानीत आणले असून ते तेथेच राहतात. (३३)
तेषु राजाम्बिकापुत्रो भ्रातृपुत्रेषु दीनधीः ।
समो न वर्तते नूनं दुष्पुत्रवशगोऽन्धदृक् ॥ ३४ ॥
धृतराष्ट्र तसा अंध मनाचे बळही कमी । पुत्र दुर्योधन दुष्ट पांडवा नित्य त्रासितो ॥ ३४ ॥
दीनधीः अन्धदृक् - क्षुद्र बुद्धीचा व आंधळा व दुष्पुत्रवशगः - दुष्ट पुत्रांच्या स्वाधीन झालेला राजा अंबिकापुत्रः - अंबिकेचा पुत्र धृतराष्ट्र राजा तेषु भ्रातृपुत्रेषु नूनं - त्या भावाच्या मुलांच्या ठिकाणी खरोखर समः न वर्तते - समबुद्धीने वागत नाही. ॥३४॥
धृतराष्ट्र एक तर अंध आहे आणि मनाने कणखर नाही. दुष्ट पुत्रांच्या अधीन झाल्याकारणाने तो भावाच्या मुलांशी आपल्या पुत्रांसारखा व्यवहार खात्रीने करत नसणार. (३४)
गच्छ जानीहि तद्वृत्तं अधुना साध्वसाधु वा ।
विज्ञाय तद् विधास्यामो यथा शं सुहृदां भवेत् ॥ ३५ ॥
तेंव्हा तुम्ही तिथे जावे पुसावी स्थिति ती कशी । पुन्हा उपाय तो योजू सुहृदा सुख द्यावया ॥ ३५ ॥
गच्छ - जा अधुना तद्वृत्तं - आणि सांप्रतच्या त्याच्या साधु वा असाधु जानीहि - चांगल्या वाईट वागणुकीचा शोध कर तत् - ते विज्ञाय - जाणून सुहृदां शं यथा भवेत् - बांधवांचे कल्याण ज्यायोगे होईल (तथा) विधास्यामः - तशी व्यवस्था आपण करू. ॥३५॥
म्हणून आपण तेथे जावे आणि त्यांची स्थिती चांगली आहे की वाईट, हे जाणून घ्यावे. ते समजताच त्या आप्तांना सुख कसे मिळेल, ते आपण पाहू. (३५)
इत्यक्रूरं समादिश्य भगवान् हरिरीश्वरः ।
सङ्कर्षणोद्धवाभ्यां वै ततः स्वभवनं ययौ ॥ ३६ ॥ इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां दशमस्कन्धे पूर्वार्धे अष्टचत्वारिंशोऽध्यायः ॥ ४८ ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
शक्तिमान् भगवान् कृष्ण अक्रूरा सांगुनी असे । घरास पातले तेंव्हा बल नी उद्धवासह ॥ ३६ ॥ ॥ इति श्रीमद्भागवती महापुराणी पारमहंसी संहिता । विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर अठ्ठेचाळिसावा अध्याय हा ॥ हरिः ॐ तत्सत् श्रीकृष्णार्पणमस्तु ॥
भगवान् हरिः ईश्वरः - षड्गुणैश्वर्यसंपन्न परमेश्वर श्रीकृष्ण इति अक्रूरं समादिश्य - असे अक्रूराला सांगून संकर्षणोद्धवाभ्यां (सह) - बलराम व उद्धव ह्यांसह ततः स्वभवनं वै ययौ - तेथून आपल्या घरीच गेला. ॥३६॥
भगवान श्रीकृष्ण, अक्रूराला असे सांगून बलराम आणि उद्धवासह आपल्या घरी परतले. (३६)
अध्याय अठ्ठेचाळिसावा समाप्त |